शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1484

नालेसफाईबाबत मुंबईकरांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९: मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले. सलग दुसऱ्यादिवशी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतील पश्चिम उपनगरांतील नालेसफाईची पाहणी केली. चार तासांहून अधिक हा पाहणी दौरा सुरू होता. एके ठिकाणी मुख्यमंत्री स्वत: नाल्याच्या पात्रात उतरले आणि त्यांनी कामाची पाहणी करत सफाई कर्मचाऱ्याशी संवाद देखील साधला.

दरम्यान, अंधेरीतील गोखले पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज मिलन भूयारी मार्ग (सांताक्रुझ), गोखले पूल (अंधेरी पूर्व), ओशिवरा नदी (लिंक रोड, अंधेरी पश्चिम), पोयसर नदी, लिंक रोड (कांदिवली पश्चिम), दहिसर नदी (आनंदनगर पूल), दहिसर पूर्व व पश्चिम नदी पुनरुज्जीवन (बोरिवली पूर्व), श्रीकृष्ण नगरालगत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य (बोरिवली पूर्व) येथे पाहणी केली. यानंतर बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, यावर्षी पाणी साचणार नाही अशी अपेक्षा आपण करू. महापालिका प्रशासनाने त्याची खबरदारी घेतली आहे. त्याचा परिणाम दिसेल, ३१ मे पर्यंत चांगले काम पाहायला मिळेल.

नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर अभिप्राय नोंदवता यावा त्याचबरोबर नालेसफाईबाबत तक्रार असेल तर नागरिकांनी १ ते १० जून दरम्यान त्याची छायाचित्रे महापालिकेला पाठवावी. नाले सफाईमध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच संबंधित कामी हलगर्जी केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.

रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत. आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लड गेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना देखील त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी साधला नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी नाल्याच्या बाजूला गाळ काढून ठेवलेले त्याना दिसले त्यामुळे त्यांनी स्वतः नाल्यात उतरून नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तसेच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले तसेच त्याला या कामाबद्दल शाबासकी दिली.

गोखले पुलाचे काम दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे

अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधकांशी संवाद साधला.

नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दरवर्षी पाणी साचत असलेल्या पोईसर नदीची पाहणी केली. दरवर्षी या नदीपात्रात पाणी साचल्याने आजूबाजूचा परिसर जलमय होतो. काठावरील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो त्यामुळे या नदीपात्रातील गाळ देखील उपसून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रटीकरणाला सुरूवात झाली असून सध्या ४५० किमी रस्त्यांचे काम सुरू झाले आहे तर ४०० किमी रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाली असून समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात येतील. आरोग्याच्या सोयीसाठी  मुंबईत १७० आपला दवाखाना सुरू झाले असून मुंबईत २५० आपला दवाखाना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे पर्यटन, महिला आणि बाल कल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती मनीषा चौधरी, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर,अमित साटम, प्रकाश सुर्वे मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू आदी उपस्थित होते.

०००००

प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 19 : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची सुलभता वाढविण्यासाठी शासनाची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. परंतु, सुशासनासाठी समाजाचा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘हा देश माझा आहे’ आणि ‘हे शहर माझे आहे’ ही भावना ठेवून प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केल्यास एकूणच समाजाचे जीवनमान उन्नत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

इंडियन मर्चंट चेंबरतर्फे आयोजित तिसऱ्या ‘इज ऑफ लिविंग: नागरिकांचा मूलभूत अधिकार’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन राज्यपाल श्री.बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उद्घाटन सत्राला इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पदनिर्देशित अध्यक्ष डॉ. समीर सोमैया, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ‘आयएमसी – इज ऑफ लिविंग समिती’चे अध्यक्ष एम के चौहान, वरिष्ठ शासकीय व नागरी सेवा अधिकारी तसेच उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.

सुशासनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे सांगताना राज्यपालांनी सार्वजनिक हिताच्या कार्यात मुंबईतील दानशूर उद्योजकांनी केलेल्या कार्याची जंत्री सादर केली.

जमशेद जीजीभॉय यांच्या दातृत्वामुळे जे जे हॉस्पिटल निर्माण झाले तर ससून कुटुंबियांमुळे डेव्हिड ससून वाचनालय उभे राहिले.  नाना शंकरशेट यांच्या दातृत्वामुळे निर्माण झालेली स्मशानभूमी आजही समाजाला सेवा देत आहे असे सांगून कॉर्पोरेट जगताने महिलांसाठी अधिक स्वच्छतागृहे निर्माण करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

मुंबईतील रस्ते सुधारावे

जनसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुंबईतील रस्ते सुधारण्याची गरज आहे.मुंबई शहरात रस्ते सदैव वाहतुकीने भरलेले असतात, लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. हा भर कमी होण्यासाठी जलवाहतून सुरु झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

देशात ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना येण्यापूर्वीच ‘नया रायपूर’ हे स्मार्ट शहर निर्माण झाले व त्याठिकाणची जीवनमान सुधारले असे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट रुग्णालयांनी एक दिवस जनता ओपीडी सुरु करावी

आज अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. त्यांनी जनसामान्यांसाठी किमान एक दिवस निःशुल्क सेवा दिली तर सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

जीवनस्तर उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची : विवेक फणसळकर

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगताना नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांचे पालन केल्यास पोलिसांचेही काम सुलभ होईल असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पोलिसांकडे समाजातील सर्व लोकांकडून वेगवेगळ्या तक्रारी येतात परंतु पोलीस दलाशी संबंधित नसून देखील पोलीस लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये लोक अनेकदा परस्पर सहकार्य करत नाही व तक्रारी पोलिसांपर्यंत येतात या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे वाढत आहेत तसेच वाढत्या वाहन संख्येमुळे रस्त्यांवरील ताण देखील असह्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी प्रास्ताविक केले तर आयएमसी इज ऑफ लिव्हिंग परिषदेचे अध्यक्ष एम के चौहान यांनी परिषदेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली.

००००

‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास- संदीपान भूमरे

औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) :  पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील ‘सिट्रस इस्टेट’ हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोपं तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून Center of Excellence अंतर्गत आणखी  12 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून हा प्रकल्प नावारुपास येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील आणि पर्यांयाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे म्हणाले.

इसारवाडी येथील तालुका फळरोपवाटीका आणि  ‘सिट्रस इस्टेट’ च्या विविध विकासकामांचे भुमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, कृषी सह संचालक दिनकर जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, प्रगतशील शेतकरी भगवान कापसे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘सिट्रस इस्टेट’ उभारणीचा अभ्यास करण्यासाठी पंजाब येथील सिट्रस पार्कचा बारकाईने अभ्यास केला. इसारवाडीतील ‘सिट्रस इस्टेट’ मधून शेतकऱ्यांना मोसंबीचे दर्जेदार रोप तयार करुन देण्यात येईल. तसेच येथे मोसंबी या फळपिकावर संशोधन देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर  मोसंबीची लागवड केली जाते.  हेक्टरी 8 टन एवढे मोसंबीचे  उत्पादन घेतले जाते पण हे उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

कृषी आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले की, या सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 40 कोटी रुपयांचा निधी  मिळाला आहे.  राज्यात 65 हजार हेक्टर मोसंबी क्षेत्र आहे. मोसंबीला आता राजाश्रय मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळले पाहिजे. ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये चांगले रोप बनविण्यात येतील. तसेच प्रशिक्षण देण्यात येत असल्याने  सर्वांनी प्रशिक्षण घ्यावे. Pepsi, Coco-Cola अशा शीतपेयांमध्ये मोसंबीचा रस टाकता येईल का याचा देखील राज्य सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले.

संत ज्ञानेश्वर उद्यान हे जागतिक दर्जाचे उद्यान बनणार- पालकमंत्री सदीपान भुमरे

औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) :  पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या उद्यानाला जागतिक दर्जाचे उद्यान बनविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

        गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानच्या विकास कामांचा भुमिपुजन कार्यक्रम रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त सुनील  चव्हाण,पाटबंधारे विभागाचे अधिक्षक सबनवार,अभियंता अशोक चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती.

            श्री. भुमरे म्हणाले  संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जा कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. चाळीस वर्षापूर्वी उद्यान जसे होते तसेच करण्यात येईल. या ठिकाणी जागा भरपूर असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना येथे निवास व्यवस्था देखील करण्यात येईल. उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. येथे आलेला पर्यटक जास्त दिवस कसा राहिल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरुन रोजगारामध्ये वाढ होईल. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकास कामे  प्रत्यक्षात सुरू झाल्याने  सध्या  रस्ते,पार्किंग,पाईपलाईन, संगीतकारंजे,ई पहील्या टप्प्यात कामे होणार असुन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे पूर्ण करून दिवाळी पुर्वी संत ज्ञानेश्वर  उद्यान पर्यटकांसाठी नक्कीच खुले करण्यात येईल.सप्टेंबर मध्ये शहरात जागतिक पर्यटन परिषद होणार आहे. या परिषदेतील शिष्टमंडळांना धरण, उद्यान दाखविण्यात येईल असेही ते म्हणाले.

पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

सातारा दि. 19 : पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, पणन मंडळाचे संचालक विनायक कोकरे, पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव हरिष सूर्यवंशी, जिल्हा पणन अधिकारी प्रसाद भुजबळ आदी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि  उत्पन्न बाजार समितीच्या माध्यामातून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याविषयी माहिती घेऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बाजार समितीसाठी तातडीने कोणत्या सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात याविषयीचा अहवाल सादर करावा. तसेच शीतगृह सारखी सुविधा उभारण्यात यावी. तालुक्यात आंबा, फणस यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुक्यातील वातावरणही त्यास पोषक आहे. याचा विचार करून आंब्यासाठी सोयी निर्माण कराव्यात. बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याविषयी कृषि पणन मंडळ व कृषि अधिक्षक कार्यालयाने समन्वयाने काम करुन अहवाल सादर करावा.  मल्हारपेठ येथे चांगले मार्केट उभारण्याचा आराखडा तयार करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- पालकमंत्री

सातारा दि. 19 : शासन आपल्या दारी हे अभियान निरंतर चालणारे आहे. एक दिवस योजनांचा लाभ दिला आणि संपले असे नाही. तर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम यापुढेही सतत सुरू ठेवायचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपातळीवर प्रत्यक्ष भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेविका असे ग्रामपातळीवर काम करणारे आपले कर्मचारी आहेत. त्यांनी पंधरा दिवसातून एकदा गावातील कुटुंबांशी संवाद साधून त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे याची तपासणी करावी. त्यासाठी कुटुंबाची संपूर्ण माहिती जमा करावी. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे, कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे हे तपासावे. ज्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे त्याचा अर्ज जागेवर भरून घ्यावा. तालुका स्तरीय अधिकारी जसे तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनीही महिन्यातून किमान एकदा गावामध्ये जाऊन संवाद साधावा व कोणत्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना देता येतो. याविषयी पहाणी करावी. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना योजनांची माहिती द्यावी व पात्र लाभार्थ्यांची निवड करावी. जिल्हास्तरीय अधिकारी यांनीही महिना किंवा दोन महिन्यातून एकदा गावांमध्ये भेटी द्याव्यात. सर्वांनी जबाबदारीने कर्तव्य भावनेतून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीच्या सुरुवातीस पाटणचे प्रांताधिकारी श्री.  गाढे यांनी पाटण येथील शासन आपल्या दारी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. तसेच कशा प्रकारे लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना लाभ देण्यात आला याची सविस्तर माहिती सादर केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १७५ तक्रारींचे निराकरण

मुंबई, दि. १९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नॉर्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच  निकाली काढण्यात आल्या. तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड येथे ७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या  तसेच ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या देखील तातडीने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या  स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे.  हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत   दुपारी ३ ते ५.३० वाजता सुरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

0000

संध्या गरवारे/विसंअ

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक १९: नागरिक आपल्या सूचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन आणि माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज यांनी यासंदर्भात सादरीकरण केले.

नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेल, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमातून शासनाकडे सूचना, तक्रारी, निवेदने पाठवित असतात. त्यावर कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना त्या पाठवणे, पाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागरिकांना योजनांची माहिती

राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपल्याला राज्य किंवा केंद्राच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो हे आता पोर्टलवरून सहजपणे कळू शकणारी केंद्राप्रमाणे माय स्कीम हे पोर्टलही तयार होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळात देखील अमुलाग्र बदल करण्यात येत असून त्यातून सहज आणि त्वरित आवश्यक माहिती मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे.

प्रकल्पांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम

राज्यात विविध प्रकल्प सुरु असतात.  त्यांच्या कामांवर लक्ष ठेऊन ते त्यांची सद्यस्थिती कळण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम तयर करण्यात येत आहे

गोल्डन डेटा (सुवर्ण विदा)

राज्यातील सर्व विभागांचा आणि एकूणच शासनातील सर्व डेटा एकत्रितरीत्या ठेवण्यासाठी गोल्डन डेटा (सुवर्ण विदा) व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

ड्रोनसाठी धोरण

ड्रोनची अनेक कारणांसाठी उपयुक्तता असून शासनात देखील याचा वापर विविध विभाग करतात. यासाठी एक सर्वंकष ड्रोन धोरणही अंतिम होत असून त्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

न्यायालयीन प्रकरणे

एकूणच राज्य शासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती तसेच सद्यस्थिती व इतर बाबींची माहिती एका क्लिकमध्ये कळण्यासाठी लिगल ट्रॅकिंग सिस्टिम देखील तयार होत आहे याविषयी सांगण्यात आले.

याशिवाय ई ऑफिसच्या माध्यमातून फाईल्सचा निपटारा कशा रीतीने करणे सुरु झाले आहे हेही सांगण्यात आले. भारतनेट चे जाळे राज्यभर पसरविण्याचे काम २६ जिल्ह्यांत मिळून ७७ टक्के झाले आहे याची माहिती देऊन प्रधान सचिव पराग जैन म्हणाले की, २७५१ ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बीएसएनएल कार्यवाही करते आहे.

मुख्यमंत्री डॅश बोर्ड

याशिवाय मुख्यमंत्री डॅश बोर्ड, मुख्यमंत्री हेल्पलाईनविषयी माहिती देण्यात आली. हेल्पलाईनमध्ये चॅटबॉट तसेच व्हॉटसएपचा अंतर्भाव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचा संदेश नागरिकांना द्यायचा असल्यास त्याचीही सोय असेल.

0000

 

 

सामान्य माणसांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१९ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि या योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध  आहे, या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्यात.

देवेंद्र फडणवीस  यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथील तहसिल कार्यालयात आज कळमेश्वर आणि सावनेर तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्यात  आली होती, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्या यासाठी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांमध्ये एकूण चार मतदारसंघांमध्ये आढावा बैठकी  घेतल्या जाईल. शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात अथवा नाही हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे लोकप्रतिनिधींचे कार्य असून त्यासाठी आढावा बैठकांच्या आयोजन करण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांमध्ये लोक सहभाग वाढला आहे. नुकतेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सन 2018-19 मध्ये जलसाठे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेत तातडीने सर्व वीज जोडण्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

वितरण विभागाने गेल्या वर्षीच्या प्रलंबित जोडणीला प्राधान्य देण्याबरोबरच यावर्षीच्या जोडण्याही पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याशिवाय सौर -पंप योजनेसाठी जागरूकता निर्माण करण्याचे सांगितले.

श्री. फडणवीस यांनी प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अभियानांतर्गत स्थानिक स्वयंसेवी संस्था व लोकसहभागाची माहिती जाणून घेतली. प्रधानमंत्री आवास योजना,भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सद्यस्थिती, स्वच्छ भारत अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषी क्रांती योजना,राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नवीन विहिरींचे वाटप,विद्युत जोडणी आदींबाबत आढावा घेतला. शिवाय आरोग्य, शिक्षण, कृषी व खरीप पूर्व तयारी विषयीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनिल केदार, चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत,महिला बालकल्याण समिती अध्यक्ष अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व उपविभागीय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी इंडो ईस्त्रायल प्रकल्पांतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याच्या तेलगाव येथील उर्मिला राऊत यांना आणि कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील अजनी येथील रामदास उमाटे यांना त्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरीत करण्यात आले.बैठकीचे सादरीकरण उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.

००००

 

 

 

 

 

येत्या दोन महिन्यात घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर दि १९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय कार्यालयात आज नरखेड व काटोल तालुक्यातील उपविभागीय आढावा बैठक झाली. खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर,अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, राज्य व  केंद्र शासनाच्या घरकुल योजनाअंतर्गत राज्यात दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी पूरक ठरणारे पट्टे वाटप काटोल आणि नरखेड तालुका प्रशासनाने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे. या उद्दिष्ट्य पूर्तीच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहील. आजच्या आढावा बैठकीत सादरीकरण करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व योजना येत्या काळात वेगाने पूर्ण करा. पालकमंत्री म्हणून या कामातील अडचणी दूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

सरासरीपेक्षा कमी पावसाची परिस्थिती लक्षात घेता. त्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीक नियोजन आणि पेरण्यांच्या तारखांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ‘अटल भूजल योजना’ व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना गती दिल्यास कमी पावसातही पिके जगवता येतील,असे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनीची गरज आहे. नापीक, पडीक जमिनीचा यासाठी उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती द्या, सौर पॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती झाल्यास दिवसाच्या ओलीतासाठी वीजेचा अतिरिक्त साठा निर्माण होईल, यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा लाविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सादरीकरण केले.यात त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार,अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्यित योजना, गाव तिथे स्मशानभूमी, आपले सरकार सेवा केंद्र आदींची माहिती दिली.

आमदार सर्वश्री अनिल देशमुख, आशिष जायस्वाल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सूचना केल्या. आज बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि सादरीकरणात झालेली चर्चा पूर्णतः अंमलबजावणीत आली पाहिजे याबाबतचे निर्देशही त्यांनी बैठकीच्या शेवटी केले.

काटोल ,नरखेड आणि मोहाड नगरपरिषदेच्या विविध कामांचा आढावाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

00000

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...