शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1485

जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’योजना राबविणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्यात येईल, असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

विधानभवन येथे आयोजित बैठकीस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाबाबत स्वतंत्र बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल. शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्यात येईल, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

इंद्रायणी मेडिसिटीबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन वेळेवर करावे. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

विभागीय आयुक्त श्री.राव यांनी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याबाबत आणि इंद्रायणी मेडिसिटीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीविषयी यावेळी माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात किमान १० ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या  आहे.  ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव प्राप्त होत असून त्यांना मान्यता देण्यात येत आहे. सामाजिक संस्थांशीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, अश्विनी जगताप, उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सुनील शेळके, संग्राम थोपटे, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर, संजय जगताप, अतुल बेनके, रवींद्र धंगेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ मधील मार्च २०२३ अखरे झालेल्या ८७५ कोटीच्या, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १२८ कोटी ९३ लाख रुपयांच्या आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५४ कोटी ११ लाख  कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

गतवर्षी एकूण १०० टक्के खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाश्वत विकासाची ध्येये समोर ठेवून ग्रामीण विकासासाठी २६९ कोटी ७२ लाख रुपये, ग्रामीण रस्ते ९३ कोटी, इतर जिल्हा मार्ग ४१ कोटी ५२ लाख, ६० लाख किंमतीची २५ साकवांची कामे प्रगतीपथावर, नागरी क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यातील १७ नगरपालिका व नगरपंचायतींना १३२ कोटी ४९ लाख, विद्युत विकासासाठी ४४ कोटी ७२ लाख रुपये निधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी ३६ कोटी ५० लाख आणि डिजीटल क्लासरुमसाठी ४ कोटी २० लाख, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये सायन्स लॅबसाठी ४ कोटी ५० लाख, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १० लाख, लघु पाटबंधारे व कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे २५ कोटी, पोलीस वाहन खरेदी ६ कोटी, पोलीस वसाहत सुविधा २ कोटी, पोलीस स्टेशन इमारत ९७ लाख ८१ हजार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत सुविधांसाठी २ कोटी ५० लाख रुपये देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये १ हजार ५८ कोटी ४ लाख रुपये नियतव्यय अर्थसंकल्पीत होता, तर २०२३-२४ मध्ये १ हजार १९१ कोटी रुपये नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या तसेच राज्य शासनाने घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 22 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

0000

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी  दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता  

मुंबई दिनांक १९  : देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सादरीकरण केले.

आज मान्य करण्यात आलेल्या सुशासन नियमावली २०२३ मध्ये नागरिकांना सुलभरीत्या सेवा मिळण्यावर भर देण्यात आला आहे.

देशातली पहिलीच सुशासन नियमावली

शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा. यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी व अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्या होत्या.

निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, यांची समितीही नेमण्यात आली होती.

या समितीने तयार केलेली देशातील अशा स्वरूपाची ही पहिलीच नियमावली असून यामध्ये २०० हून अधिक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १६ अध्याय असून ही नियमावली तयार करताना समितीच्या ४३  बैठका झाल्या आहेत तसेच ३५ विभागांना भेटी देऊन, मंत्रालयीन अधिकारी तज्ञ व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी चर्चा करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

सुशासनाचे निर्देशांक

यामध्ये विभागनिहाय १६१ निर्देशांक तयार करण्यात आले असून अगदी जिल्हा पातळीपर्यंत या निर्देशांकाच्या आधारे सुशासनाची कामगिरी तपासली जाईल.

ऑनलाईन सेवा कालमर्यादेत

यामध्ये एंड टू एंड ऑनलाईन सेवा कालमर्यादेत देण्याची सोय असेल.  आपले सरकार सेवा केंद्र आणि त्याची व्याप्ती वाढवून नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निपटारा करण्यात येतील.  आपले सरकार पोर्टल अद्यावत करण्यात येईल. शासकीय कामकाज ई-ऑफिसद्वारे करण्यात येईल. पब्लिक रेकॉसार्वजनिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. जेणेकरून जलद गतीने कामे होतील व कार्यक्षमता वाढेल.

कुठल्याही फाईलचा प्रवास चार स्तरापेक्षा जास्त स्तरांवर न होण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, असेही सुजाता सौनिक यांनी सांगितले.

वातावरणीय बदलासाठी स्वतंत्र कक्ष

या सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचा देखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय निर्णय प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल

या सुशासन नियमावलीला सर्व विभागांना पाठवून यावर कार्यवाही करण्यास सांगण्यात येईल असेही यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले. यासंदर्भातील कायद्याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

०००००

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९ : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

राजाराम तलावाच्या जवळ तयार होणाऱ्या या कन्व्हेंशन सेंटरमध्ये २००० क्षमतेच ऑडीटेरीअम, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर आदी सुविधा असणार आहेत. राजाराम तलावामध्ये संगीत कारंजे, लाईट ॲण्ड साऊंड शो ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

स्थानिक आणि परिसरातील कलावंतासाठी आर्ट गॅलरी, ॲम्फीथिएटर हक्काचे व्यासपीठ होणार असून याठिकाणी शहर आणि परिसरातील छोटे व्यासायिक, उद्योजक यांना विविध विषयांवर प्रदर्शनासाठी केंद्र उपलब्ध होणार आहे. सेंटर निर्माण करतानाच त्याठिकाणी वृक्षरोपण करून त्याचे सुशोभीकरण करावे. त्याचबरोबर याभागात येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पंचतारांकीत हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या सेंटरसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे सेंटर निर्माण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथे भारत राखीव बटालियन क्र.३ ला जागा मंजूर करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीअसा जागेवर जाऊन पाहणी करावी आणि लोकांचे हित तसेच भारत राखीव बटालीयनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत चर्चा करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

००००

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करण्यावर भर द्यावा – पालकमंत्री दादाजी भुसे          

नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व जलजीवन मिशन या विभागांच्या आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपवनसंरक्षक उमेश वावरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नाशिक व कळवण चे सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, विशाल नरवाडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये घरकुल, सार्वजनिक शौचालय, विहिरी या व्यतिरिक्त इतर कामे देखील घेण्यात यावीत. त्यात आदर्श शाळा, शाळांच्या संरक्षक भिंती, साखळी बंधारे अशा विविध कामांचा समावेश या कामांमध्ये करण्यात यावा. मनरेगा अंतर्गत 101 कोटींचा खर्च केला त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व मजुरांनी केलेल्या कामाचे कौतुक पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी केले.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून गावांचा व कामांचा क्रम ठरविण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी कमी जागेत जास्त पाणीसाठा होईल, अशा जागा निश्चित कराव्यात. या अभियानाच्या माध्यमातून जमिनीची पाणी पातळी वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेथे जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. त्याचप्रमाणे संबंधित विभागांनी या अभियानाच्या कामांचा एकत्रितपणे विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश ही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यावेळी म्हणाले की, शासनाच्या योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या उद्घाटन प्रसंगी देखील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच पूर्ण झालेल्या गावनिहाय कामांची सद्यस्थिती व वस्तुस्थितिदर्शक अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावा अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बैठकीदरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जलयुक्त शिवार अभियानाबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते व जलजीवन मिशन बाबत जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा):  औद्योगिक विकासासोबतच नाशिकला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर येत्या काळात साकार होणार आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

आज आयटीआय सातपूर येथील मैदानात आयोजित निमा पॉवर 2023 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, निमा चे अध्यक्ष धनंजय बेळे, व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सहसंचालक प्रफुल्ल वाकडे निमा चेअरमन तथा प्रदर्शन अध्यक्ष मिलिंद राजपूत, निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्यासह उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजुरीसोबतच दिंडोरी, घोटी याठिकाणी सुद्धा एमआयडीसीचे विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक उद्योजकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात 12 हजार 360 उद्योजक तयार झाले असून या वर्षभरात 25 हजार उद्योजक निर्मितीचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर निर्मितीमुळे बाहेरील उद्योगही निश्चित नाशकात येतील यात शंका नाही, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंत म्हणाले, नाशिकसाठी अनेक सकारात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यात येत आहेत. निमाच्या आयोजित चार दिवसीय प्रदर्शनाला देशाबाहेरील कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील उद्योजकतेचा विकास होण्यास मदत होणार आहे. शहरात येणाऱ्या उद्योगामुळे विकासासोबतच पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता उद्योजकांनी घेतली पाहिजे. एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांचे प्रश्न विश्वासात घेऊन जनजागृतीद्वारे सोडविण्यात निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अग्रेसर राहावे. तसेच माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी देखील उद्योजकांनी घेतली पाहिजे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यानंतर औद्योगिक विकास करायचा असेल तर आता नाशिकशिवाय पर्याय नाही, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री दादाजी भुसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, निमा पॉवर 2023 या चार दिवसीय प्रदर्शनात उभारलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योजकांना मार्गदर्शन व ज्ञान मिळणार आहे. निमा संस्था ही गेल्या 53 वर्षापासून रोजगार निर्मिती, उद्योजक तयार करण्याचे काम अविरत करत असल्याची बाब प्रशंसनीय आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होणार आहे. नाशिकच्या विकासात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा समूहाचा मोठा वाटा आहे. दिंडोरी, सिन्नर परिसरात उद्योगांसाठी जागा उपलब्ध झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या विकासात एक मानबिंदू म्हणून आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत साधारणत: 400 खाटांचे रुग्णालय व 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. यासोबत विद्यार्थिनीसाठी एनडीए प्रवेशासाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकमध्ये सुरू होत आहे, ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. देशपातळीवर पाच शहरांमध्ये क्वालिटी सिटी म्हणून नाशिक शहराची निवड झाली असून त्यास निमा व उद्योजक यांचा हातभार महत्त्वाचा आहे. चार दिवसीय प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून निमा पॉवर 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे प्लॅटिनम स्पॉन्सर एमआयडीसी, गोल्डन स्पॉन्सर टीडीके, ई स्मार्ट, सिल्वर स्पॉन्सर थायसानक्रुप व एचएएलच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी मनोगत निमाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना :- 

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत), (LLP, FPO) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५.०० लाख रु. मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. इतर कोणतेही शुल्क महामंडळ अदा करणार नाही. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील. गटातील लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ४५ वर्षे असावे.  गटातील उमेदवाराने अर्ज करते वेळी या प्रकल्पांसाठी व यापूर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळांच्या कोणत्याही योजनांचा वैयक्तिक लाभ घेतलेला नसावा. गटांच्या भागीदारांचे किमान रु. ५०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकींग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत/शेड्युल बँक खाते असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान ५०० इतका असावा. गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अर्जदार लाभार्थीची अर्हता :- 

लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा. तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा कमी असावे. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभा घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावाच्या कागदपत्रांचा तपशिल :-

उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला. २ जामिनदारांची हमीपत्र अथवा गहाणखत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे. त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/लायसन्स, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक, महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल, अर्जदाराने मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

या योजनांच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे अथवा 8879945080 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

                                                           

संकलन नंदकुमार ब. वाघमारे,

प्र.जिल्हा माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. १९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. परंतु कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावालागतो.

कांद्याचे उत्पादन ठरावीक हंगामात येते. मागणी मात्र वर्षभर सारखीच असते. कांद्याचे पीक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचा भाव पडतो. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावातील चढ-उतार होण्यापासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.

कांदा ही एक जीवंत वस्तू आहे. तिचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कांदाचाळीच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनरेगा अंतर्गत एकूण १,६०,३६७ रूपये मिळणार.

मनरेगा अंतर्गत अकुशल मनुष्यबळासाठी ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल मनुष्यबळासाठी ४० टक्केच्या मर्यादेत म्हणजे ६४ हजार १४७ रुपये आणि अधिक साहित्याचा खर्च असे एकूण १ लाख ६० हजार ३६७ रूपये इतके अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च – ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.

गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येऊ शकतो. खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे उत्पादन होते. राज्यात साधारण १३६.६८ लाख मेट्रिक

टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण ९.४५ लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली आहे. कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची – २.९५ मी. (जमीनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमान असते. साधारण ०१ हेक्टर धारण क्षेत्रावर २५ मेट्रिक टन कांदा उत्पादन होते. कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येऊ शकतो, असेही मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले..

०००

राजू धोत्रे/विसंअ/

गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार..

राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हा गाळ उपसा करुन शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांमधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे…

“गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना महाराष्ट्रात सन २०२१ पर्यंत उल्लेखनीयपणे राबविली असली तरी ती पुन्हा सुरू करुन राज्यातील जलसाठ्यांमधील अंदाजे ४४ कोटी घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे.  आधीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरविण्याचा खर्च शेतकरी स्वतः करीत होते. “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ” या योजनेचे महत्त्व पाहता यावेळेस शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हींचा खर्च देणे प्रस्तावित करण्यात आला असून अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

अशी आहे योजना

या योजनेमध्ये स्थानिक अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात (अनुदान) येईल व बहुभुधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असल्यास प्राथमिकता देण्यात येईल. गाळ उपसण्याकरिता सार्वजनिक व खाजगी भागिदारी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून म्हणजेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार २.० या योजनेच्या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जीओटॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करणे इत्यादी स्वरुपाची प्रक्रिया ‘अवनी अॅप’ द्वारे करण्यात येईल. त्यात जलस्तोत्रनिहाय साचलेल्या गाळाची माहिती, प्रत्येक साईटची काम करण्यापूर्वीची आणि नंतरची चित्रे आणि व्हिडिओ, शेतकरी व त्यांनी नेलेल्या गाळाची माहिती, जलसाठे व गाव निहाय शेतकरी निहाय भूधारणा, घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण व भरलेल्या ट्रॉलीची (ट्रॅक्टर ट्रॉलीच्या तपशीलासह) संख्या याची माहिती. उत्खनन यंत्रसामुग्रीच्या कामाच्या तासांची संख्या, एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण आदी माहितीचा समावेश करुन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्व कामे कुठे वेगाने सुरू आहेत आणि कोणते जिल्हे मागे आहेत याची जिल्हास्तरीय एकत्रित माहिती उपलब्ध होणार आहे.

“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविल्यानंतर एक किंवा दोन पावसाळा उलटल्यावर जलसाठ्यात झालेली वाढ व शेतकऱ्यांच्या उत्पादकता, उत्पादन, उत्पन्न आणि निव्वळ नफ्यात झालेली वाढ, जीवनमान उंचावणे या विषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येईल.

यासाठी प्रकल्प खर्चाच्या १ टक्क्यांपर्यंत खर्च करण्यात येईल. ६०० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व १० वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यांना प्राध्यान्यक्रम राहील. गाळ घेऊन गेलेले सीमांत / अत्यअल्पभूधारक ( १ हेक्टर पर्यंत) व लहान (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. शिवाय विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास (सबसीडी) पात्र राहतील. सदर लोक बहूभूधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील.

असे मिळणार अनुदान

पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रु. ३५.७५प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रु. १५ हजारच्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये ४०० घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच रु. ३७ हजार ५०० अधिकाधिक देय राहील. विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतऱ्यांना देखील ही मर्यादा लागू राहील. वाहून नेण्यात येणारा गाळ संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरणे बंधनकारक असून अशा गाळाची (गौण खनिजाची विक्री किंवा त्याचा वापर इतर कोणत्याही प्रयोजनासाठी करता येणार नाही. गाळ काढल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येणारे सवलतीचे अनुदान ग्रामपंचायतीमार्फत डिबीटी मार्फत एका आठवड्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल.

योजनेची कार्यपद्धती

गावात “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हा स्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा. त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक असेल. जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक-बाधक विचार करून संबंधित संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी. जिल्हास्तरीय समितीस बैठकीअभावी मान्यता देण्यास कालावधी लागण्याची शक्यता असल्यास, अध्यक्ष व सचिवांच्या मान्यतेने संस्थेस कार्यकारी यंत्रणा म्हणून व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी तद्नंतर समितीच्या अवलोकनार्थ ठेवावे. एका जलसाठ्याचा गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक अशासकीय सस्थांचे अर्ज आल्यास संबंधित संस्थाची क्षमता तपासून घेऊन जिल्हा समिती एका जलसाठ्यासाठी एक अशासकीय संस्थेची निवड करेल. निवड झालेली अशासकीय संस्था जिल्ह्यातील ज्या जलसाठ्यातून गाळ काढणार आहे त्या प्रत्येक जलसाठ्याची माहिती अवनी अॅपवर नोंदणी करेल. अवनी अॅपवर भरण्यात येणारी माहिती बरोबर असल्याचे सदर संस्थेतील कार्यरत इतर व्यक्तीकडून प्रमाणित करुन घेईल. अशासकीय संस्थामध्ये नियुक्त करण्यात येणा-या कर्मचा-यांना अवनी अॅप संदर्भातील प्रशिक्षण ATE. Chandra Foundation यांचेमार्फत दिले जाईल.

अशा प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अशा क्षेत्रातील संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत घरणातील / जलसाठ्यातील गाळ उपसा परिमाण इ. बाबी प्रमाणित करुन त्यानुसार उपअभियंताद्वारे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल व तसे संबंधित संस्थेस कळविण्यात येईल. गाळ काढण्याचे काम सुरु करण्यापूर्वी जलसाठ्याचे फोटो तथा व्हिडिओ काढण्यात येऊन त्याचे जिओटॅगिंग करण्यात येईल.त्यानंतर गाळ उपसण्याची कार्यवाही करण्यात येईल. गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव करुन जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा.

  • संदीप गावित, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय,नंदुरबार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...