शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1483

राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि. २० : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन  संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात  उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( टीमा) सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते  यावेळी आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, रवींद्र फाटक,  जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योगासाठी जमीन व शासनाच्या विविध परवानग्या लवकरात उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये करणे याबाबतीत देखील राज्य शासन लवकरचं सकारात्मक निर्णय घेणार आहे. उद्योग वाढीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैढक घेऊन उद्योगांचे सर्व प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.

या उद्योगांमधून लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळतो. हे उद्योग वाढावेत यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, उद्योजकांन कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण जिल्ह्यामध्ये होऊ नये. अशा प्रकारच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिल्या.

उद्योगवाढीबरोबर रोजगार वाढणार आहेत. स्थानिक नागरिक, बेरोजगार  स्थानिकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना आवश्यक सर्व सहकार्य व सुविधा देण्याचे काम राज्य सरकार करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००

स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११२ तक्रारींचे निराकरण

मुंबई,दि. २०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे १४० तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील ११२ तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या.  प्राप्त तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कार्यक्रमाला  उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या  स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५:३०  वाजेपर्यंत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत

मुंबई, दि. २०: भारताच्या जी २० परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक उद्या दि. २१ ते २३ मे २०२३ दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट संवादाच्या आराखड्याच्या अनुषंगाने होणाऱ्या फलनिष्पत्तीवर आधारित दृष्टीकोन ठेऊन चर्चा करण्यावर असेल.

या तीन दिवसीय बैठकीची सुरुवात जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने होईल. यानंतर ‘ओशन-२०’ संवादाचे आयोजन करण्यात येईल. आपले समुद्र किनारे आणि महासागरांचे रक्षण करण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामुदायिक सहभागाची जाणीव करून देणे किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

ओशन-२० मंचाची सुरुवात इंडोनेशियाच्या जी- २० अध्यक्षते दरम्यान महासागर विषयक प्रश्नांवरील विचार आणि कृती पुढे नेण्यासाठी झाली होती. या उपक्रमाचे सातत्य कायम राखून त्यात अधिक भर घालण्याच्या हेतूने भारताच्या अध्यक्षतेखाली सक्रीय नेतृत्वाचे दर्शन घडवून पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत नील अर्थव्यवस्थेच्या तीन स्तंभांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत आणि हवामानाच्या दृष्टीने संवेदनक्षम नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी होणारे सत्र ‘नील अर्थव्यवस्थे’च्या विविध पैलूंवर आधारित असेल. या दिवशीचे पहिले सत्र हे नील अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या विषयावर असेल. त्यानंतर धोरणे, शासन आणि सहभाग या विषयांवर परिसंवाद होतील तर नील अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा यंत्रणा स्थापन करणे या संदर्भात समारोपाचे सत्र होईल.

या सत्राची रचना, पॅनल चर्चा आणि त्यानंतर श्रोत्यांशी संलग्न चर्चा अशाप्रकारे केली गेली आहे. महासागरांची जपणूक आणि त्यांची हानी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि आपल्या सागरी स्त्रोतांचे रक्षण करण्यासाठीच्या चर्चेवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे.

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीत पुढील दोन दिवस जी २० देशांमधील एकमत साध्य करण्याच्या दिशेने विचारमंथन करून मसुद्याच्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या आराखड्यावर चर्चा केली जाईल. यानंतर अंतर्गत सत्रानंतर चौथ्या ECSWG बैठकीच्या नियोजना विषयी चर्चा होऊन समारोप होईल.

जी २० सदस्य राष्ट्रांमध्ये महासागरांचे शाश्वत व्यवस्थापन आणि समुद्री जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भारताच्या जी २० परिषदेच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट भर देत आहे. एकत्रित जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आणि सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी त्वरित कृतीची गरज यावर प्रत्येक बैठकीत सातत्याने भर देण्यात आला आहे.

शाश्वत आणि संवेदनशील भविष्या करता जी २० देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी तिसरी ECSWG बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, प्रत्येक प्राधान्य क्षेत्रांतर्गत परिणाम साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनशील भविष्य घडवण्यासाठी सर्व भागधारकांसोबत कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.

पीआयबी/ मुंबई

 

०००

तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळवावा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना, दि. २० (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात ग्रामीण भागातील मुलांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. आपल्या देशात  मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून  रोजगार कसा मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती  होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व  भोकरदन येथील मोरेश्वर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आज पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी  आमदार संतोष दानवे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जालना येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे, मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान डोंगरे, तुकाराम जाधव, संतोष जगताप, कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात ९१३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी  ५२४ उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी ४६ उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्रे देण्यात आली.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, उमेदवारांनी सर्व परिस्थितीचा प्रथम अभ्यास करुन रोजगार मेळाव्यातून नोकरी निवडावी. उमेदवाराच्या कौशल्यावर या मेळाव्यातून नोकरी मिळणार असल्याने आपली निवड न झाल्यास खचून न जाता नव्याने पुन्हा तयारीला लागून पुढील रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या शहर परिसरातील उद्योग व्यवसायाचा अभ्यास करुन त्या-त्या  क्षेत्रातील योग्यतेची पात्रता संपादन करावी. जेणेकरुन आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होवू शकेल, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. ज्या उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त नाही अशा उमेदवारांनी येथे भरविण्यात आलेल्या विविध महामंडळाकडून व्यवसायासाठी मिळणारे कर्ज घेऊन आपला स्वत: व्यवसाय उभारावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आमदार संतोष दानवे, वसंत जगताप यांची समयोचित भाषणे झाली. संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी अमोल बोरकर, आत्माराम दळवी, कैलास काळे, प्रदीप डोळे, उमेश कोल्हे, सोमेश्वर शिंदे, दिनेश उढाण, रामदास फुले यांनी परिश्रम घेतले.

०००

सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर  दि : २० : सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर ) येथील आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वधू वरांना शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे. अशा सोहळ्यातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही आनंददायी बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने पालकांच्या मागे चिंता लागतात. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून  ही समाज व काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे ६ हजार रुपये व राज्य सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकरी बांधवांना  देण्यात येतात.

या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी १५० बेडचे ईएसआय हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प या परिसरात राबवले जातील जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

०००

सामान्य माणसाला स्वस्तात वाळू मिळणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छ. संभाजीनगर (औरंगाबाद)  दि. २० (जिमाका) शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शासनाने  घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे. या उपक्रमात परिवहन विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या विभागाने  वाळू वाहतूकीचे दर कमी केल्यास सामान्य माणसाला आणखी फायदा होईल. शासनाने स्वस्तात वाळू उपलब्ध करून दिल्याने घराच्या किंमती देखील कमी होतील, असेही ते म्हणाले.

०००

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

छ. संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० (जिमाका) : सामान्य जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा‍धिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, शिरीष बोराळकर, संजय किनीकर तसेच विविध पदधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री म्हणाले की, शासकीय योजना सामन्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडण्यासाठी पदाधिकारी काम करत असतात. हे काम करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास शासकीय योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचतील.

‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब तसेच शिरीष बोराळकर, संजय किनीकर आणि इतर पदधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या सूचनांची दखल घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले.

०००

श्री रेणुका देवीचे दर्शन अबाल वृद्ध, दिव्यांगांसाठी सुकर होईल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नांदेड, (जिमाका), २० : नागपूरहून माहूरला पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागत. आज नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले आहे. माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉक बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या मंचावरुन ते बोलत होते. यावेळी  श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते.

सन २००४ साली एका अपघातात माझ्या पायाला चार फॅक्चर झाले होते. त्यानंतर मी दर्शनाला खुर्ची घेऊन गेलो होतो. आज गडावर मी श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनाला पायी गेलो. माझ्या आईला उरत्या वयात गडावर येऊन दर्शन घेणे सोपे नव्हते. भावनेचा हा धागा पकडत त्यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे भूमिपूजन करतांना माझ्या मनात कृतज्ञतेच्या भावना अधिक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते. शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

माहूर येथे वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी मोठा तलावही उपलब्ध आहे. सर्वांच्या प्रयत्नातून याठिकाणी तलावातील पाण्याची पातळी चार मीटर पेक्षा अधिक आपण आणू शकलो तर या विस्तारीत तलावाच्या पाण्यावर प्रवाशी विमानसेवाही आपण उपलब्ध करू असा दुर्दम्य आत्मविश्वास मंत्री श्री. गडकरी यांनी बोलून दाखविला. या भागाला जैवविविधता लाभलेली आहे. येथील सत्व लक्षात घेता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान ३ हजार झाडे लावावीत व याचबरोबर माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन तरी झाडे  लावावीत, असे आवाहन त्यांनी केले.

या भागातील बेरोजगारांच्या हातांना कामे मिळावीत, आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्न इतर साधणे मिळावीत, येथील ऐतिहासिक वारसा स्थळाला नव्या पिढीपर्यंत पोहचता यावे एवढी अपेक्षा असून यासाठी मी श्री रेणुका देवीला प्रार्थना केल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.

कंत्राटदारांनो काम व्यवस्थित नाही झाले तर केवळ बडतर्फी नसून कठोर कारवाई करू

देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये काही ठिकाणी कंत्राटदारांचे अतीशय वाईट अनुभव येतात यात नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या काम करणाऱ्या काही कंत्राटदारांचाही समावेश आहे. नांदेड-किनवट मार्गातील इस्लापूर येथील पुलाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही यासंदर्भात जाहीर तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर बडतर्फीची कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दिली. काम व्यवस्थीत झाले नाही तर आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची पाऊले उचल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी पर्यटनाला चालना दिल्याशिवाय पर्याय नाही –  खासदार हेमंत पाटील

किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील बहुसंख्य लोक हे माझ्या मतदारसंघातील आहेत. या भागातील शेती, शेतकरी आणि युवकांना स्वयंरोजगाराच्या कक्षेत आणण्यासाठी पर्यटन, कृषि पर्यटन व इतर शेतीपूरक उद्योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. यादृष्टिने सर्वच पातळ्यांवर एकत्रित विचार होऊन सामुहिक कृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.

आदिवासी व दुर्गम भास्क लक्षात  घेता सुविधांच्या निर्मितीवर भर आवश्यक –    आमदार भिमराव केराम

किनवट, माहूर या भागात चांगल्या रस्त्याची सुविधा अपेक्षित आहे. यादृष्टीने जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांपर्यंत भक्कम रस्त्याचे जाळे अत्यावश्यक आहे. किनवट ते आदिलाबाद, किनवट ते नांदेड (इस्लापूर), उनकेश्वर, हिमायतनगर व विदर्भाला जोडणाऱ्या भक्कम रस्त्याचे जाळे निर्माण करण्याची मागणी आमदार भिमराव केराम यांनी केली.

प्रारंभी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त कोनशिलेचे मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले. श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी मंत्री श्री. गडकरी यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांना व भूमिपूजन समारंभाला शुभेच्छा दिल्या.

०००

कुशल मनुष्यबळ निर्मितीतून रोजगार देणारा कौशल्य, उद्योजकता विभाग

सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वाधिक तरूणांचा देश आहे. तरूणाईच्या हाताला काम देऊन बेरोजगारीच्या आव्हानावर मात करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग काम करत आहे. या माध्यमातून युवाशक्तीला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची जोड दिली जाते. या विभागाच्या योजनांची माहिती आजच्या लेखात घेण्यात आली आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगारक्षम बनवणे, जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच, या विभागामार्फत उद्योजकांशी समन्वय साधून त्यांची नोंदणी केली जाते व त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षित कुशल उमेदवार पुरवले जातात. बेरोजगार उमेदवारांची नोंदणी केली जाते व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.

विभागाच्या पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, पात्रतेत वाढ, पत्ता बदल इत्यादी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योजकांना रिक्त पदे अधिसूचित करणे, विवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या विभागामार्फत विविध कौशल्य विकास योजना राबविल्या जातात. केंद्र व महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान करून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी व महाराष्ट्रात कौशल्य विकास सोसायटी मार्फत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित, NULM National Urban Livelihood Mission, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA, किमान कौशल्य विकास कार्यक्रम (जिल्हा नियोजन समिती निधीतून), पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता (RPL)  SANKALP –  Skill Acquisition and knowledge Awareness Livelihood Promotion या योजनांचा समावेश आहे.

या विभागामार्फत अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. स्टार्ट अप्सना सक्षम करण्यासाठी आर्थिक व इतर अनुषंगिक सहाय्य केले जाते. विविध सुविधा उपलब्ध करून स्टार्टअप्स ईकोसिस्टीमला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. नवीन व जागतिक दर्जाचे इनक्यूबेटर्स स्थापित करणे, महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्यूबेटर्सचा विकास करणे, व्यवसाय योजना स्पर्धेसारख्या जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करणे, कार्यशाळा व इतर संवादाद्वारे या धोरणाबद्दल जिल्ह्यांमध्ये जनजागृती करणे या बाबीही या विभागामार्फत केल्या जातात.

रोजगार मेळावे

ही योजना नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी असून, उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छताखाली आमंत्रित करणे. रोजगार मेळाव्यातून उमेदवारांना अनेक उद्योजकांकडे एकाच ठिकाणी मुलाखतीची संधी प्राप्त होते व उद्योजकांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची उपलब्धता करुन देण्यात येते.

रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (Employment Promotion Programme)  ही योजना सामान्यतः ‘ईपीपी’ म्हणून ओळखली जाते. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (EPP) ही खाजगी क्षेत्रातील आस्थापना/ उद्योगांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी On job Training  देण्याची योजना आहे. ही योजना नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी किमान १० वी उत्तीर्ण आणि १८ वर्षे व त्यावरील वयाचे उमेदवार पात्र आहेत. प्रशिक्षण कालावधी सहा महिने असतो. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड मिळतो.

मॉडेल करिअर सेंटर

जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानाचा वापर करुन उमेदवारांना व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. उमेदवारांची मूल्यमापन चाचणी (वर्तणूक, मानसशास्त्रीय, कौशल्य, कल इ. चाचणी) घेणे, समुपदेशन करुन रोजगार/ स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेबाबत सहाय्य केले जाते. तज्ञ व्यक्तिंमार्फत व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.

उद्योजकतेबाबत माहिती

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले जाते.

नोंदणीसाठी संकेतस्थळ

http://www.rojgar.mahaswayam.gov.in    अधिक माहितीसाठी संपर्क – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोर्ट, पार्क चौक, सोलापूर ०२१७-२९५०९५६

०००

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

अमरावती, दि. २० : धावपळीच्या  व स्पर्धेच्या आजच्या युगात  मनःशांती, तणाव निरसन, विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. ग्रामगीतेचे नियमित पठण, प्रार्थना व भजन आदींचा समावेश आपल्या जीवनशैलीत व्हावा, असे आवाहन वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आज पहाटे गुरुकुंज मोझरी आश्रमाला भेट देऊन सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेतला. येथील सर्व तीर्थकुंडात मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे वडील दिवंगत सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या अस्थीं विसर्जित करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, उप सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जर्नादन बोथे गुरुजी, सुभाष सोनारे, निवेदिता चौधरी यांच्यासह आश्रमाचे सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यानसाधना केली. कारे धरी गिरीधारी अबोला, नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, सबका भला करो, यही आवाज कहेंगे या भजनगीतांचे गायन झाले. भगवद्गीतेच्या अध्यायाचे पठन, प्रभु श्रीरामाचा जयघोष झाला.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्री गुरुदेव जीवन विद्या सुसंस्कार व छंद शिबिर तसेच श्री गुरुदेव आयुर्वेदीक महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांद्वारे खंजिरी वादन करत हनुमान चालीसाचे सादरीकरण झाले. खंजिरी वादन ऐकून मन प्रसन्न झाल्याचे ते म्हणाले, आनंदाचा महामार्ग दाखवणिाऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत तुम्ही जन्मला आहात. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. सुदृढ मनासाठी व सकारात्मक विचारांसाठी भजन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...