मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 134

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग आघाडी घेईल, असा विश्वास अभिनेते अमीर खान यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, 2025 मधील ‘भविष्यातील स्टुडिओ : भारताला जागतिक स्टुडिओ नकाशावर नेण्यासाठी पुढाकार’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते, या चर्चासत्रात पीव्हीआर आणि इनॉक्सचे संस्थापक अजय बिजिली, अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन, चित्रपट निर्माते दिनेश विजन, प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा, आणि चित्रपट निर्माते रितेश सिधवानी सहभागी झाले होते. यावेळी चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनेते अमीर खान म्हणाले, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे. शासन आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने संवाद सुरु झाला आहे आणि ही सुरुवात निश्चित आशादायक आहे. संवादातून या क्षेत्रासाठी दूरगामी परिणाम करणारी धोरणं निश्चित तयार होऊ शकतील.

 भारतातील कंटेंट क्रिएशन आणि मनोरंजन व्यवसायाची जागतिक स्तरावर दमदार छाप – चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन

भारतामध्ये कंटेंट क्रिएशन, मनोरंजन व्यवसाय आणि स्ट्रीमिंग किंवा लीजिंगसारख्या विविध माध्यमांचा अनुभव घेताना जाणवते की, हा उद्योग पूर्णपणे वेगळ्या मॉडेलवर चालतो. जागतिक पातळीवर काम पाहत असताना आणि येथील काम देशांतर्गत केंद्रित आहे, त्यामुळे दृष्टिकोनही वेगळा आहे, असे मत अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन यांनी व्यक्त केले.

श्री. रोव्हेन म्हणाले, मी चित्रपट किंवा कंटेंट तयार करताना आधीच ठरवतो की, ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर की, चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण येथे आधी कंटेंट तयार होतो आणि मग त्याचे प्रदर्शन करण्याचा मार्ग ठरवला जातो. या ठिकाणी कधी स्वतः तर कधी इतरांकडून गुंतवणूक  केली जाते, ही पद्धत वेगळी आहे आणि ती खूपच छान आहे.

वेव्हज कार्यक्रमाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर या क्षेत्रात आपले लक्ष केंद्रीत करत आहे. खरं तर, भारताला जगाकडे पाहण्याची गरज नाही, कारण आता जगच तुमचा कंटेंट शोधून येऊ लागले आहे, असंही त्यांनी नमूद केले.

भारतीय चित्रपटांच्या जागतिक वितरणासाठी भाषा आणि सुस्पष्ट संवाद महत्त्वाचा – चित्रपट निर्माते रितेश सिधवानी

मार्केटमध्ये पुन्हा एकदा भावना जागृत होत आहेत. पूर्वी 80 च्या दशकात, स्थानिक वितरण सर्वात मोठे मानले जात होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही फक्त त्याचा एक भाग असायची. पण आजच्या घडीला, भाषेच्या विविधतेमुळे आणि विविध प्रेक्षकसमूहांच्या गरजांमुळे, वितरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, असे चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी सांगितले.

श्री. सिधवानी म्हणाले की, आज एकाच चित्रपटासाठी वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगळे ट्रेलर्स तयार केले जातात. यूकेसाठीचा ट्रेलर अमेरिकेसाठीच्या ट्रेलरपेक्षा वेगळा असतो. युरोपियन मार्केटसाठी एक ट्रेलर असतो आणि उत्तर अमेरिकेसाठी दुसरा ट्रेलर असतो. त्यामुळे भाषांतर नक्कीच मदत करते, पण त्या माहितीचा योग्य प्रकारे संवाद आणि वितरण कसे होईल, हे अधिक महत्त्वाचे आहे.

पश्चिमेकडील देशातील प्रेक्षक फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश चित्रपट सहज स्वीकारतात. ते त्यांची भाषा समजतात आणि त्या चित्रपटांकडे उत्सुकतेने पाहतात. ते आता भारतीय चित्रपटांची ओळख करून घेत आहेत. योग्य वितरण व्यवस्था आणि सादरीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांसाठी स्थानिक वाटू शकतात – फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा

योग्य प्रतिभा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील दिशादर्शक दृष्टिकोन यांच्या योग्य संमिश्रणातून जगभरातील प्रेक्षकांना आपली गोष्ट स्थानिक वाटते. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चित्रपट विविध भाषांमध्ये केवळ भाषांतरित नाही, तर त्या भाषेत ‘लिपसिंक’सह प्रदर्शित करू शकतो, ज्यामुळे उपशीर्षकांची किंवा व्हॉइसओव्हरची गरज उरत नाही, असे मत प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

श्री.मल्होत्रा म्हणाले, भारतीय चित्रपट इंग्रजी, स्पॅनिश, जपानी अशा विविध भाषांमध्ये तयार करता येईल आणि हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्याच वेळी, आपली कथा, तिचे पात्र आणि त्यांचा आत्मा जपून ठेवते, आपण ती जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो. कारण अनेक वेळा भाषा ही सर्वात मोठी अडचण ठरते. चांगला कंटेंट ही अडचण पार करू शकतो, पण व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषेची अडचण दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ

मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे. इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी सांगितले.

बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.

वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया

सत्रांमधील चर्चेदरम्यान,  एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अ‍ॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.

“कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता” या विषयावर अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री.नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.

एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, “पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही.” एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन  पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा समर्थित जगात याचा  प्रतिध्वनी कसा उमटतो, याबाबत त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले.

एनव्हीआयडीआचे उपाध्यक्ष रिचर्ड केरिस यांनी, जनरेटिव्ह एआय सह, आपण संकल्पनेपासून निर्मितीकडे खूप वेगाने प्रगती करू शकतो. असे सांगताना त्यांनी मूलभूत गोष्टींशी संपर्क गमावण्याविरोधात सजग केले. आपल्या सर्वांच्या फोनवर कॅमेरा असल्याने आपण सर्वजण उत्तम छायाचित्रकार बनत नाही. एआय तुमच्या हातात विविध साधने देते. परंतु कला, मूलभूत गोष्टी जाणून घेणे आजही तितकेच आवश्यक आहे. सर्जनशील लोक त्यांचे काम अक्षरशः जगतात. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता त्याची जागा घेत नाही तर ते लोकांना अधिक सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात, एनव्हीडीआचे सोल्युशन्स आर्किटेक्ट अनिश मुखर्जी यांनी “जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे” हे सत्र हार्डवेअरच्या पलिकडे जाऊन परिवर्तनात्मक साधनांकडे वळण्याच्या एनव्हीडीआच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते असे त्यांनी सांगितले. मुखर्जी यांनी एआय-द्वारे सक्षम उपायांचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामध्ये स्थिर प्रतिमा डिजिटल मानवांमध्ये रूपांतरित करणे, बहुभाषिक व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओवर आधारित कॅरेक्टर अ‍ॅनिमेशन यांचा समावेश होता. एनव्हीआयडीआयएच्या फुगाटो मॉडेलचा वापर करून, त्यांनी एआयद्वारे जनरेट केलेले संगीत आणि डबिंगसाठी वास्तववादी लिप-सिंकिंग दाखवले. त्यांनी ओम्निव्हर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ जनरेशन आणि सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी मूलभूत मॉडेल्सचा संच ‘कॉसमॉस’ देखील सादर केला.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

‘वेव्हज् २०२५’ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्‍यमांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण हे माध्‍यम  महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले.

बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये “प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात, एका कथेची नवीन पटकथा लिहिणे” या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन, इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली  बियांका बाल्टी, माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.

रोना-ली शिमोन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, धैर्याने व एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाही, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.

एरिअन हिंगस्ट हिने पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला प्रवास सांगितला. लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्‍यमांकडून मिळणारी कमी प्रसिद्धी आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत, महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसे, यामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.

000

सागरकुमार कांबळे/ससं/

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज् परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज् परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार  (MoUs) केलेले आहेत. यामध्ये  सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज् निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार  केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे.

यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल.  ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.

पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान

फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचे, मात्र जे लोकं जाऊ शकत नाहीत, त्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल, तर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स, कंटेंट वापर, आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळे, हे शक्य झाले आहे आणि मुंबई, ही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘भारत पॅव्हेलियन’ला भेट

मुंबई, दि. २ : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज्-२०२५ जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

भारत पॅव्हेलियनमध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. याशिवाय करमणूक  क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, मेटा,स्टार्टअप,  विविध मनोरंजन  आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत.

सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी श्री.फडणवीस यांनी विविध पॅव्हेलियनला भेट देऊन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

Making India AI Ready

मुंबई, दि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

वेव्हज् परिषदेत वेव्हज् एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले.

‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले की, या माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.

‘एआय’ तंत्रज्ञान, रिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज् २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘वेव्हज’ परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, ‘लोकराज्य’ चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  ‘वेव्हज्’ शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

—–०००—-

संतोष तोडकर/विसंअ/

 

लोकराज्य मे २०२५

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांशी घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि  कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो.

आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतू आत्मा एक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यात अनन्यसाधारण असे योगदान आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली तरी उभय राज्यांचा आत्मा एकच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत  राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १ मे) साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी भारताला अनेक महान राष्ट्रपुरुष दिले असून आज त्यांची ओळख त्यांच्या मूळ राज्यापुरती मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी झाली आहे. महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाकरिता आदर्श आहेत, तर गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्वज्ञान आज संपूर्ण जगाकरिता मार्गदर्शक ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही रुजविण्यात मोठे योगदान दिले. आज गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र व तामिळनाडूच्या संबंधांचा ऐतिहासिक दाखला देताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडू येथील जिंजी, वेल्लोर येथील किल्ले जिंकले होते तसेच तिरुवन्नामलै येथील शिव मंदिराची प्रतिष्ठापना करून धर्म रक्षणाचे कार्य केले होते, असे सांगितले. तंजावर येथील भोसले राजांनी आपल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथालयात दुर्मिळ असे तामिळ साहित्य जपून ठेवले. या सांस्कृतिक एकीमुळे आज भारत महान राष्ट्र झाले आहे असे सांगताना देश आपली एकात्मता यापुढेही कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

विविध धर्म व पंथांचे पंथाचे लोक, विभिन्न भाषा बोलणारे लोक या देशात राहत असून देखील भारत एकसंध राष्ट्र कसे आहे असा अनेक जागतिक नेत्यांना प्रश्न पडतो. परंतू भिन्न भाषा, भिन्न पोशाख व भिन्न खाद्य संस्कृती असली तरी देखील या देशाला धर्म व संस्कृतीचे अधिष्ठान आहे, असे सांगून एकात्मतेचे हे अधिष्ठान जपत भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे लोकनृत्य व गीते यांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत विभागातील शिक्षक – कलाकारांनी देखील यावेळी एक पोवाडा सादर केला.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, वाघ्या मुरळी व दिंडी नृत्य ही राज्याची तर तिप्पाणी हे लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी ‘जय जय गरवी गुजरात’ हे राज्यगीत देखील सादर केले. राज्य स्थापना दिवस कार्यक्रमात महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, लोककला व संस्कृती दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ पराग केळकर, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य, कला दिग्दर्शक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

****

Maharashtra Ahead May 2025

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...