मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 133

भारताची सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त ग्राहक खर्चावर प्रभाव निर्माण करण्याची शक्यता

वेव्हज‌् २०२५ मध्ये होणार बीसीजी अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. २ :- सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वाढीमुळे भारताच्या डिजिटल परिदृश्यात लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. “फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स: मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी” असे शीर्षक असलेल्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या नवीन अहवालाचे उद्या  (३ मे २०२५) मुंबईतील वेव्हज २०२५ मध्ये प्रकाशन होणार असून या अहवालानुसार, भारतातील  सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेचा ३५० अब्ज डॉलर्सहून अधिक ग्राहक खर्चावर प्रभाव असून २०३० पर्यंत ही आकडेवारी १ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होण्याची  अपेक्षा आहे.

भारतात १००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती अशी  व्याख्या करण्यात आलेले २ ते २.५ दशलक्ष डिजिटल  सृजनशील  निर्माते असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. इतकी मोठी संख्या असूनही त्यांच्यापैकी केवळ  ८–१०% निर्माते त्यांच्या आशयातून सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहेत, ज्यामधून अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या या क्षेत्राचा पुरेशा प्रमाणात वापर होत नसल्याचे अधोरेखित होत आहे. या सृजनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेतील प्रत्यक्ष महसूल सध्या २०-२५ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज असून या दशकाच्या अखेरपर्यंत तो १००-१२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

अहवालातील प्रमुख निष्कर्षांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :

सध्या सृजनशील निर्मात्यांचा ३०% पेक्षा जास्त ग्राहकांच्या निर्णयांवर असलेल्या प्रभावामुळे आज ३५०-४०० अब्ज डॉलर्सचा खर्च केला जातो.

या परिसंस्थेचा जेन झेड आणि महानगर केंद्रांच्या पलीकडे विस्तार होत असून विविध वयोगट आणि विविध श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचत आहे.

शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ (लघु कालावधीची दृश्ये) हे सर्वाधिक पाहिले जाणारे आशयांचे (कंटेंट) स्वरूप आहे, ज्यात विनोदी, चित्रपट, दैनंदिन मालिका आणि फॅशन यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.

ब्रँड स्ट्रॅटेजींचा उदय होत असून वेगाने आशय निर्मितीवर, सर्जनशील निर्मिती स्वातंत्र्यावर, विविध प्रकारच्या ग्राहकांना विचारात घेण्यावर आणि फलनिष्पत्ती आधारित चाचणीवर जास्तीत जास्त भर दिला जात आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आभासी भेटवस्तू, लाईव्ह कॉमर्स आणि सदस्यत्वाचे फायदे अशी आर्थिक आकर्षणे असलेली उत्पन्नाची विविध साधने तयार केली जात आहेत.

येत्या काही वर्षात हे ब्रँड सर्जनशील निर्मात्यांच्या बाजारपेठेत आपली गुंतवणूक १.५ ते ३ पट करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे विपणन आणि वाणिज्य क्षेत्रावर डिजिटल सर्जनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेच्या प्रभावाचे संकेत मिळत आहेत.

हा बीसीजी अहवाल उद्या मुंबईत वेव्हज २०२५ मध्ये औपचारिकपणे प्रकाशित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या वेव्हज २०२५ या भव्य कार्यक्रमात  एआय (AI), सोशल मीडिया, एव्हीजीसी (AVGC) क्षेत्र आणि चित्रपट यातील उदयोन्मुख पैलूंवरील चर्चा डिजिटल माध्यम क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दाखवत आहे.

00000

सागरकुमार कांबळे/ससं/

लिगल करंट्स : अ रेग्युलॅरिटी हॅण्डबुक ऑन इंडिया’स मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंन्ट सेक्टर २०२५ उद्या प्रकाशित होणार

मुंबई, २ :- वेव्हज् २०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद) –  हे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचे वळण असून, या परिषदेदरम्यान Legal Currents: A Regulatory Handbook on India’s Media & Entertainment Sector २०२५ अर्थात “कायदेविषयक घडामोडी : भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीची नियामक पुस्तिका २०२५” या महत्त्वाच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन उद्या होणार आहे. वेव्हज-२०२५ या शिखर परिषदेअंतर्गत ज्ञान आणि माहितीविषयक भागीदारांपैकी एक असलेल्या खेतान अँड कंपनीने ही अहवाल पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेतून भारताच्या बहुआयामी  माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या वाढत्या क्षमतेला आकार देणाऱ्या तसेच या क्षेत्राला चालना देणाऱ्या नियामक संरचनांची रूपरेषा मांडली आहे.

भारताचे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व बदलातून जात आहे. नेमक्या या महत्वाच्या काळातच ही कायदेविषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली जात आहे. या पुस्तिकेत मांडलेल्या नियामक आराखड्यामुळे माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्राशी संबंधितांना प्रसारण तसेच माहिती आधारित मनोरंजन, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता,  डिजिटल माध्यमे आणि चित्रपट यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करता आला आहे. अलिकडच्या काळात भारतात इंटरनेटच्या सुलभ उपलब्धतेत झपाट्याने वाढ झाली आहे, तसेच भारतातील आशय सामग्रीच्या वापराचे स्वरुपही बदलले असून, सध्या भारत एका सक्रिय आणि स्वीकारार्ह प्रशासनाच्यावतीने सुरू केलेल्या गेलेल्या एका डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. याअंतर्गत सरकारने आजही देशात मोठा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवलेल्या मुद्रित तसेच दूरचित्रवाणी आणि नभोवाणी सारख्या माध्यमांकरता नियामक प्रक्रिया सुलभ आणि अनुकूल केल्या आहेत.

मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये या क्षेत्राशीसंबंधित परदेशातील व्यक्ति आणि व्यावसायिकांसाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणे, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या स्थापित करणे आणि आपल्या प्रकल्पांचे कार्यान्वयन करणे या प्रक्रिया सुलभ करण्यासह त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या प्रमुख उपक्रमांचा तसेच कायदेविषयक महत्वाच्या तरतुदींविषयींचा तपशील दिलेला आहे.  केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने निर्मिती तसेच सह-निर्मितीसाठी  प्रोत्साहनपर लाभ मिळवून देणाऱ्या योजनाही राबवल्या जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत आशय सामग्री निर्मितीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

जाहिरात, ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल मीडिया यासारख्या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित उद्योग व्यावसायिक संस्था आणि सरकारमध्ये परस्पर सहकार्यपूर्ण भागिदाऱ्याही प्रस्थापित झाल्या आहेत. यामुळे या उद्योग क्षेत्राशी संबंधित भागधारकांना आपल्या प्रकल्पांच्या कार्यान्वयासाठी  लवचिकता प्राप्त झाली असून, त्यांच्याद्वारे नियमांच्या अनुपालनाचीही सुनिश्चिती होऊ शकली आहे.

आज भारत आशय निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान अधिकाधिक भक्कम करू लागला आहे, अशावेळी आजच्या बहुआयामी, तंत्रज्ञानाधारित माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भागधारकांसाठी एक महत्त्वाचे संसाधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन केले जात आहे.

0000

सागरकुमार कांबळे/ससं/

ॲनिमे ऍसेन्डिंग : वेव्हज् २०२५ मध्ये विविध तज्‍ज्ञांनी जागतिक कथाकथनाच्या पद्धती आणि उद्योगाच्या वाढीची उलगडली गुपिते

धाडसी कल्पनांना व्यापक प्रमाणात राबवण्याची अनोखी क्षमता भारतामध्ये, ज्यांना इतरत्र यश मिळालेले नाहीः जेरेमी लिम, जीएफआर फंड

पडद्यामागील द्रष्टी व्यक्तिमत्वेः वेव्हज 2025 मध्ये सिनेमॅटिक ब्रह्मांडात ‘व्हीएफएक्स’च्या भवितव्यावर खुमासदार चर्चा

भारत ‘व्हीएफएक्स’ उद्योगात महासत्ता बनेल आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘वेव्हज’ हा अतिशय उत्तम उपक्रम

मुंबई, दि. २ :-मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पहिल्यावहिल्या वेव्हज २०२५ शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, भारतातील AVGC (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम्स आणि कॉमिक्स) क्षेत्रावर सखोल चर्चा घडवून आणणाऱ्या माहितीपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले.

“ऍनिमे ऍसेन्डिंगः अनलॉकिंग ग्लोबल पोटेन्शियल इन स्टोरीटेलिंग, फॅनडम अँड इंडस्ट्री ग्रोथ” नावाच्या एका सत्रामध्ये जपानी आणि भारतीय ऍनिमेशन उद्योगातील दिग्गज एकत्र आले. त्यांनी ऍनिमेची उत्क्रांती, भावनिक गाभा आणि जागतिक कक्षा या विषयांशी संबंधित चर्चा केली. यामध्ये भारतात या क्षेत्रामध्ये वृद्धी करण्याच्या असलेल्या क्षमतेवर भर देण्यात आला.

फिक्की एव्हीजीसी-एक्सआर फोरमचे अध्यक्ष मुंजाल श्रॉफ यांनी या सत्राचे संचालन केले. या प्रतिष्ठित पॅनेलमध्ये माकोतो तेजुका, संचालक आणि सीईओ, नॉनटेट्रा;  हिदेओ कात्सुमाता, अध्यक्ष, द ऍनिमे टाइम्स कंपनी, जपान; माकोतो किमुरा, सीईओ, ब्लू राइट्स, जपान;  अत्सुओ नाकायामा, सीईओ आणि अध्यक्ष, री एंटरटेनमेंट कं. लि. आणि जिओस्टारच्या बिझनेस हेड – किड्स एंटरटेनमेंट अँड इन्फोटेनमेंट, अनु सिक्का यांचा समावेश होता.

हिदेओ कात्सुमाता यांनी भारतीय प्रेक्षक आणि भाषा यावर आता जास्त प्रमाणात भर दिला जात असल्याची माहिती दिली. सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक एकत्रीकरण यांच्या महत्त्वावर भर देत ते म्हणाले, “स्थानिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी आम्ही जपानी ऍनिमेशनला भारतीय परंपरांमध्ये कसे मिसळता येईल यावर विचार करत आहोत.”

अत्सुओ नाकायामा यांनी जपानमध्ये ऍनिमेचा आर्थिक प्रभाव किती आहे यावर सखोल माहिती दिली आणि ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. त्यांनी जपानी ऍनिमेशनसाठी भारत एक आश्वासक बाजारपेठ असल्याचा आशावाद व्यक्त केला आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक तसेच व्यावसायिक संबंधांना जोडणाऱा सेतू उभारण्यात मनोरंजन व्यवसायाच्या संभाव्यतेवर भर दिला.

माकोतो तेजुका यांनी एका सविस्तर सादरीकरणात ऍनिमेच्या उत्पत्तीचा मागोवा घेतला आणि जपानी ऍनिमेशनची मुळे जपानच्या मांगा (MANGA) संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत, हे लक्षात आणून दिले.

अनु सिक्का यांनी भारतातील तरुण प्रेक्षकांना काय आवडते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी केलेल्या विस्तृत संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “जपानी आशयाशी असलेली सांस्कृतिक समानता आणि भावनिक जोडणीमुळे भारतीय मुलांमध्ये ऍनिमेची लोकप्रियता वाढत आहे.” त्यांनी पुढे सांगितले की प्रेक्षकसंख्येच्या कलाच्या वर्तनात्मक विश्लेषणाने प्रोग्रामिंगच्या निर्णयांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

माकोतो किमुरा यांनी ऍनिमेची जागतिक स्तरावर वाढती उपस्थिती आणि विविध देशांवर त्याच्या स्पष्ट प्रभावावर भर दिला.

योलोग्राम स्टाईलचे सीईओ आदित्य मणी यांनी संचालित केलेल्या “द न्यू आर्केड: व्हीसी’ज पर्स्पेक्टिव्ह ऑन गेमिंग न्यू फ्रंटियर” या माहितीपूर्ण चर्चा सत्रात भारतातील गेमिंग क्षेत्रातील रोमांचक संधी आणि नवोन्मेषांवर सखोल नजर टाकण्यात आली. या सत्रात साहसी भांडवलदारांच्या (VCs) एका प्रतिष्ठित पॅनेलने गेमिंग उद्योगातील प्रमुख कल, आव्हाने आणि संधींवर चर्चा केली. या पॅनेलमध्ये बिटक्राफ्ट व्हेंचरचे पार्टनर अनुज टंडन, जेटॅपल्टचे संस्थापक शरण तुलसियानी, इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्सचे संस्थापक आणि सीईओ विनय बन्सल, क्राफ्टन इंडियाचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट लीड निहांश भाट आणि जीएफआर फंडचे प्रिंसिपल जेरेमी लिम यांचा समावेश होता.

या पॅनेलने कथाकथन करणाऱ्यांचा देश म्हणून भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानावर भर दिला. भारताची समृद्ध सांस्कृतिक कथाकथन परंपरा अधिकाधिक संवादी माध्यमांमध्ये गुंफली जात आहे. गेमिंग केवळ चित्रपट आणि डिजिटल फॅशनमध्येच नव्हे, तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्येही मिसळले जात आहे आणि भारतीय गेमिंग स्टुडिओ महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले.

धाडसी कल्पनांना व्यापक प्रमाणात राबवण्याची एक अनोखी क्षमता भारतामध्ये आहे, ज्यांना इतरत्र यश मिळालेले नाही याकडे जेरेमी लिम यांनी लक्ष वेधले.

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये यश मिळवण्यासाठी स्थानिकीकरणाच्या भूमिकेवर सत्रात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. जागतिक मॉडेल प्रेरणास्रोत ठरत असले तरी, पॅनेलने गेमिंग अनुभवांना स्थानिक अंतर्दृष्टी आणि ग्राहकांच्या वर्तनानुसार रूपांतरित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

2025 या वर्षाकडे पाहता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावाला अधोरेखित करण्यात आले. गेमप्ले वैयक्तिकृत करण्यात, वापरकर्त्याच्या संवादात वाढ करण्यात आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणाऱ्या कथाकथन पद्धतींना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सज्ज आहे.

व्हीएफएक्सवरील चर्चासत्राने आधुनिक सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सची निर्णायक भूमिका आणि कथाकथनाला आकार देण्यात त्याचे भविष्य जाणून घेण्याची एक अनोखी संधी दिली. फ्रेमस्टोअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अखौरी पी. सिन्हा यांनी या सत्राचे संचालन केले. या सत्रात डीएनईजीचे व्हीएफएक्स सुपरव्हायझर  जयकर अरुद्रा; स्वतंत्र व्हीएफएक्स सुपरव्हायझर संदीप कमल; बाहुबली मधील कामासाठी प्रसिद्ध असलेले श्रीनिवास मोहन यांसारख्या प्रतिष्ठित पॅनेल सदस्यांचा समावेश होता. पॅनेल सदस्यांनी व्हीएफएक्स सिनेमॅटिक कथनात कशा प्रकारे क्रांती घडवत आहे, याबद्दल माहिती दिली.

जयकर अरुद्रा यांनी व्हीएफएक्स-प्रधान निर्मितीच्या रचनात्मक मागण्या पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि डिझाइनच्या महत्त्वावर भर दिला. “हे केवळ देखाव्याबद्दल नाही तर, कथेच्या सलगतेबद्दल आहे,” असे ते म्हणाले. भारत व्हीएफएक्स उद्योगात महासत्ता बनण्यासाठी सज्ज आहे आणि वेव्हज हे स्वप्न साकार करण्यासाठी एक उत्तम उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.

“तंत्रज्ञान हा आमूलाग्र कायापालट घडवणारा एक घटक आहे,” असे श्रीनिवास मोहन म्हणाले. ते म्हणाले, “जेव्हा त्याचा योग्य वापर केला जातो, तेव्हा ते आपल्याला मर्यादा ओलांडून जागतिक दर्जाचे दृश्य तयार करण्यास मदत करते.”

संदीप कमल यांनी उच्च-गुणवत्तेच्या व्हीएफएक्स साधनांच्या वाढत्या सुलभतेवर आणि परवडणारी किंमत आता उत्कृष्टतेसाठी अडथळा कशी राहिली नाही यावर चर्चा केली. “स्पष्ट दृष्टी हीच गुणवत्ता आणि वेळेचे व्यवस्थापन हे दोन्ही  साध्य करण्यात आपल्याला मदत करते,” असे ते म्हणाले.

ऍनिमे, व्हीएफएक्स आणि गेमिंग जगभरात शक्तिशाली सांस्कृतिक तसेच व्यावसायिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना, या चर्चा सत्रांमध्ये तीव्र आशावाद व सहकार्याची भावना दिसून आली. या क्षेत्रांमध्ये भारतासाठी अभूतपूर्व क्षमता आहे. वेव्हज च्या भावनेला अनुसरून, या चर्चा सत्रांनी नवोन्मेष आणि कथाकथनाच्या महत्त्वाला अधोरेखित केले.

0000

सागरकुमार कांबळे/ससं/

महाराष्ट्रासह ११ राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

नवी दिल्ली 2 : यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्षे 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3,798 मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीतून समोर आले. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) निवारा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि कामाच्या वेळांमध्ये बदल यासारख्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले आहे. आयोगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत उष्म्याशी संबंधित आजारांवर उपचार, सार्वजनिक ठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी, ORS आणि सावलीची व्यवस्था, तसेच कामगारांसाठी संरक्षक कपडे आणि विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: वसाहती आणि कामगार वस्त्यांमधील कुटुंबांना पंखे, थंड छताचे साहित्य आणि ORS ची पाकिटे देण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आयोगाने राज्यांना विद्यमान मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि एनडीएमए (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर आणि उघड्यावर काम करणाऱ्या व्यक्तींवर उष्णतेचा होणारा परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे.

०००००

अमरज्योत कौर अरोरा/वि.वृ.क्र.99 /दि.02.05.2025

मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

Oplus_131072

मुंबई, दि. 2 : आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी बांधवांच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

Oplus_131072

आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी 30 मे पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, मुंबई उपनगर जिल्ह्यात 222 आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांचे सर्वेक्षण होऊन बरेच वर्ष झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या पाड्यांचे सर्वेक्षण करावे व याबाबतचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनमन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी बांधव वंचित राहू नये. आभा योजना, वनपट्टे, तसेच इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती लाभार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे यासाठी सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी सी. एस. आर. च्या माध्यमातून आदिवासी‍ औद्योगिक समूह तयार करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” निमित्त ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची मुलाखत

मुंबई, दि. २ : महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने ५ ते ९ मे २०२५ दरम्यान “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे” आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीं आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” या विषयावर अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही सोमवार दि.५, मंगळवार दि.६ आणि बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.०० वा. प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेली टेक वारी म्हणजे पहिली डिजिटल वारी असून याची सुरूवात मंत्रालयातून होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामामध्ये कुशलता वाढवून कामांची गुणवत्ता वाढवणे, समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासणे, कमी कालावधीत अधिक अचूक काम करणे व लोकाभिमुख असणे आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) प्रणालीवर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून या कार्यक्रमाचे स्वरूप आणि पार्श्वभूमी, याविषयी अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी माहिती दिली आहे.

०००

खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 2 : कोणत्याही स्वरूपात खतासोबत लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे घाऊक व किरकोळ खत विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांच्या ‘माफदा’ या संघटनेमार्फत पुकारलेल्या खत खरेदी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी संचालक सुनिल बोरकर, खत पुरवठादार,उत्पादक कंपन्या व ‘माफदा’ संघटनेचे सदस्य यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, खत विक्रते यांनी लिंकिंगचे कोणतेही खत खरेदी करू नये व सक्ती झाल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. तालुका व जिल्हापातळीवर देखील याबाबत कृषी विभागाने सक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश यावेळी कृषिमंत्री यांनी दिले.

खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील यापुढे कोणत्याही स्वरूपात लिंकिंग न करण्याचे आश्वासन बैठकीत उपस्थित विक्रेता संघटना व विभागाला दिले. ‘माफदा’ संघटनेमार्फत कृषिमंत्री यांचे आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खते, कीटकनाशके बियाणे विक्रेते संघटनेने (माफदा) खत खरेदी बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘माफदा’ संघटनेच्या वतीने अध्यक्ष विनोद तराळ व सचिव बिपिन कासलीवाल यांनी संघटनेचे म्हणणे मांडले.

श्री विनोद तराळ यांनी सांगितले की, कंपन्यांच्याद्वारे लिंकिंगमध्ये खतपुरवठा होत असल्यास त्यावर शासनाने कठोर भूमिका घ्यावी. याअनुषंगाने खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया या उत्पादकांच्या संघटनेचे सचिव डी रामाकृष्ण व महाराष्ट्र शाखेचे प्रतिनिधी सुरेश शेटे यांनी खत उत्पादक कंपन्यांची बाजू मांडली. अनुदानित खतांबाबतची स्थिती तसेच जमिनीची सुपीकता राखण्यासाठी सेंद्रिय, जैविक, नॅनो खते वापरण्यासंदर्भातील धोरणाबाबत माहिती दिली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

“वेव्हज् मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” – अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई, दि. २ :- जिओ वर्ल्ड सेंटर येथील दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज्) २०२५ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अल्लू अर्जुन मंचावर येताच या स्वप्ननगरीत चैतन्य सळसळले. टीव्ही ९ नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सूत्रसंचालन केलेले ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ हे बहुप्रतिक्षित ‘परस्परसंवादी’ सत्र प्रसिद्धीचे वलय, अस्तित्व आणि चैतन्य या विषयातील एक हृदयस्पर्शी मास्टरक्लास बनले.

कथाकथनात भारताच्या वाढत्या जागतिक कथनतंत्रातील दीपस्तंभ म्हणून अल्लू अर्जुन यांनी या शिखर परिषदेचे कौतुक केले. “भारताकडे नेहमीच चैतन्य होते. आता, आपल्याकडे वेव्ह्ज मंच आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधताना “वेव्हज भारतासाठी सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी एक संधी असेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्याने सहा महिन्यांच्या विश्रांती घेण्यास  भाग पडलेल्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताचा उल्लेख केल्याने हे संभाषण अधिक भावनिक झाले. “तो विराम हा एक आशीर्वाद होता,” हे नमूद करताना ते म्हणाले, “यामुळे मी माझी दृष्टी धाडसाकडून मतितार्थाकडे वळवली. मला जाणवले की स्नायू कमजोर होत असताना, प्रभुत्व वाढले पाहिजे. अभिनय ही माझी नवीन सीमा बनली.”

त्यांनी दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबतच्या आगामी प्रकल्पाची माहिती दिली आणि त्याला “भारतीय भावनेत रुजलेला दृश्य देखावा” असे संबोधले. “आम्ही आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा देशी चैतन्याशी मिलाफ करत भारतासाठी आणि भारताकडून जगासाठी एक चित्रपट देत आहोत,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यात उत्कटता दिसली.

या संभाषणात निरंतर विकसित होणाऱ्या उद्योगात तग धरून राहण्याच्या आव्हानांचाही समावेश होता. “प्रत्येक भाषेत प्रतिभावान तरुण कलाकार उदयास येत आहेत. प्रामाणिक राहिले पाहिजे, कामाबाबत आस असली पाहिजे आणि अष्टपैलू असले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. “हा फक्त एक उद्योग नाही, तर सर्जनशीलता, लवचिकता आणि उत्क्रांतीची युद्धभूमी आहे” असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

त्यांच्या जीवनाविषयी ते माहिती सांगताना उपस्थितांचा श्वास रोखला. अर्जुन यांनी त्यांच्या  कुटुंबातील आजोबा अल्लू रामलिंगय्या, वडील आणि निर्माता अल्लू अरविंद आणि काका आणि आजीवन प्रेरणास्थान चिरंजीवी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “मी स्वतः घडलेलो नाही” हे कबूल करताना “मी माझ्या सभोवतालच्या लोकांच्या मार्गदर्शनाने, पाठिंब्याने आणि महानतेने घडलो. मी भाग्यवान आहे” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

त्यांच्या ऊर्जेविषयी विचारले असता, ते म्हणाले की हे सर्व चाहत्यांसाठी आहे. “जेव्हा दिवे मंद होतात आणि टाळ्यांचा कडकडाट कमी होतो, तेव्हा तुम्हीच मला उचलता. तुम्हीच मला आठवण करून देता की मी हे का करतो. माझी ऊर्जा… तुम्हीच आहात.”

* * *

सागरकुमार कांबळे/ससं/

ईशान्य भारतात सिनेमाची ‘आव्हाने आणि भवितव्य’ विषयावरील चर्चेत आसाममधील चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी

ईशान्य भारत हे प्रतिभेचे भांडार जानू बारुआ

आसामला आपल्या चित्रपटांना चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी मंचांची गरज – जतीन बोरा

मुंबई, 1 मे 2025 :-मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित  जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज् 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या “ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य” या शीर्षकाखाली पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.

या पॅनेलमध्ये जानू बरुआ, जतीन बोरा, रवी शर्मा, ऐमी बरुआ, हाओबम पाबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांच्यासारखे नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा समावेश होता, सर्वांनीच ईशान्येतील चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या चर्चेत या प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांना भेडसावणाऱ्या  अपुऱ्या उत्पादन पायाभूत सुविधा, भाषिक अडथळे, मर्यादित बाजारपेठ उपलब्धता आणि संस्थात्मक पाठबळाचा अभाव यांच्यासह अनेक समस्यांवर विशेष भर देण्यात आला. या अडचणी असूनही, पॅनेल सदस्यांनी ईशान्य भारत चित्रपट निर्मितीतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक कथाकथनासाठी एक सुपीक भूमी असल्याबाबत सहमती व्यक्त केली.

ईशान्य भारत म्हणजे प्रतिभेचे भांडार असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते जानू बारुआ यांनी व्यक्त केले. या प्रदेशातील चित्रपट निर्माते उल्लेखनीय निर्मिती करत आहेत. या प्रदेशातील सांस्कृतिक गुंफण आणि अकथित कथांच्या विपुलतेवर त्यांनी भर दिला. अनेक युवा प्रतिभांचा उदय होत असल्याने ईशान्येकडील सिनेमाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी नमूद केले.

ईशान्येकडील चित्रपटांची प्रादेशिक सीमांच्या पलीकडे असलेली मर्यादित पोहोच आसाममधील लोकप्रिय अभिनेते जतीन बोरा यांनी अधोरेखित केली. डिजिटल वितरणाच्या गरजेवर ते म्हणाले, “आसामला आपल्या चित्रपटांना अधिक चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गरज आहे.” त्यांनी प्रादेशिक चित्रपटांना अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यात मदत करण्यासाठी अशा मंचांच्या निर्मितीला पाठिंबा देण्याचे आवाहन सरकारला केले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही प्रादेशिक चित्रपट परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले आणि मजबूत वितरण नेटवर्कशिवाय, सर्वोत्कृष्ट चित्रपटदेखील राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी संघर्ष करतात असे सांगितले.

रवी सरमा यांनी या प्रदेशातील सर्जनशील पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची तातडीची गरज असल्याचे सांगितले. प्रादेशिक उद्योगाच्या वाढीसाठी आर्थिक पाठबळ आणि विपणन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ईशान्येकडे लाखो सुंदर आणि अद्वितीय कथा आहेत, असे ते म्हणाले.

अभिनेत्री-दिग्दर्शिका ऐमी बरुआ यांनी भाषिक विविधता जपण्यामध्ये  सिनेमा महत्त्वाची  भूमिका बजावतो असे सांगितले. “आपल्या भाषांना शतकानुशतकांचा मौखिक इतिहास आहे. चित्रपट हे त्यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे,” असे त्यांनी नमूद केले.

चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांनी या प्रदेशातील तळागाळातील चित्रपट निर्मितीबद्दल माहिती दिली. अनेक कथाकार आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असल्याचे सांगितले.

पॅनेल सदस्यांनी पारंपरिक अडथळे दूर करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, प्रादेशिक सहकार्य आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा धोरणात्मक वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व भागधारक, सरकारी संस्था, खासगी गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय स्टुडिओना ईशान्य भारतातील चित्रपटसृष्टीची हा ऐकण्याचे आणि त्यांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

0000

सागरकुमार कांबळे/ससं/

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी बायकॉन कंपनीस राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : औषध निर्मिती  प्रकल्पाच्या माध्यमातून बायकॉन लिमिटेड महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहे, ही स्वागतार्ह बाब असून यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित “वेव्हज २०२५ दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये “बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती किरण शॉ मुजुमदार यांच्या समवेत आयोजित भेटी  दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य शासनाचे अधिकारी बायकॉन व्यवस्थापन समितीसोबत प्राथमिक चर्चा करतील. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने बायकॉनला सर्व सहकार्य करण्यात येईल,  असे सांगितले.

यावेळी औषध उत्पादन निर्मितीमध्ये बायकॉन गुंतवणूक करायला उत्सुक आहे. इन्सुलिन निर्मिती मध्ये लवकरच बायकॉन जगातील अव्वल कंपनी होणार आहे. या दृष्टीने बायकॉनला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असून पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्याचे किरण शॉ मुजुमदार यांनी सांगितले.

****

वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था – परिवहन मंत्री...

0
मुंबई, दि. ०१ : आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या...

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव...

0
मुंबई, दि. १ : मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
मुंबई, दि. १ : महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू...

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विधानभवन येथे अभिवादन

0
मुंबई, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे विनम्र अभिवादन केले. विधानभवन...

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...