मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1298

दिलखुलास कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला प्रा. डॉ. हर्षद भोसले यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 23: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी 26 जून रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई येथील कीर्ती महाविद्यालयातील प्रा. डॉ. हर्षद भोसले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून व्याख्यान स्वरूपात माहिती दिली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या विषयांवर सविस्तर माहिती प्रा. डॉ. भोसले यांनी आपल्या व्याख्यानातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि. 26 जून  2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्र कार्यक्रमात २६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ. हर्षद भोसले यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 23: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी 26 जून रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून ही साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई येथील कीर्ती महाविद्यालयातील प्रा. डॉ. हर्षद भोसले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या विषयांवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती प्रा.डॉ. भोसले यांनी आपल्या व्याख्यानातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून हे व्याख्यान सोमवार, दि. 26 जून  2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व १२ कोटी जनतेला एकीकृत कार्ड – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

मुंबई, दि. 23: आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे.  या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिली.

आयुष्मान भारत योजनेची आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मांडविया बोलत होते.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जनऔषधी केंद्र अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे.  जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटिकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे.  त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी सांगितले.

राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले,  केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्मान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे.  संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल.

ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत.  गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्मान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.

केंद्राप्रमाणे १९०० आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.

प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे.  यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी ‘प्रोत्साहन निधी ‘ देण्याची योजना तयार करावी. आयुष्मान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात  यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.

००००

निलेश तायडे/विसंअ

उद्योग विभागाचा रिन्यु पॉवरसोबत सामंजस्य करार

मुंबई, दि. 23 : राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने डॉ.अमित पैठणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. त्याचप्रमाणे इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे.  आर्थिक परिस्थिती कोविड काळातही स्थिर होती. रिन्यु पॉवर या कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपुरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रयत्नाने होत असलेल्या या सामंजस्य कराराचे विशेष स्वागत केले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नविनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास श्री. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

या कराराच्या माध्यमातून राज्यात होत असलेली गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासंदर्भात प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी माहिती दिली. तर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती

मे. रिन्यू पॉवर लि., दिल्ली या घटकामार्फत १० गिगावॅट मेटालर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलीकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नविकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे.

हा प्रकल्प नागपूर येथे स्थापित होणे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प सुमारे ५०० एकर जागेवर स्थापित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० ते १०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित असलेल्या उद्योगांच्या (Ancillary Unit) माध्यमातून रु. २००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होणार आहे.

आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री श्री.सामंत यांच्या उपस्थितीत स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest- EoI) करण्यात आला आहे.

मे. रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्या वतीने समूह अध्यक्ष डॉ. अमित पैठणकर व राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव उद्योग डॉ.हर्षदीप कांबळे यांनी स्वारस्य अभिव्यक्तीवर Expression of Interest (EoI) स्वाक्षरी केली.

यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मलिकनेर, मे. रिन्यू पॉवर प्रा. लि.चे प्रमुख तांत्रिक अधिकारी सर्वनंट सेण्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कम सिकमोक उपस्थित होते.

००००

विसअ/अर्चना शंभरकर

ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’

राज्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक उद्योग असणा-या साखर उद्योग क्षेत्रात ऊसतोडणीचे काम करणारे बहुतांश कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. ऊसतोडणीच्या ऐन हंगामात विविध गाव- तांड्यावरून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. या हंगामी स्थलांतरामुळे त्यांच्या कुटुंबीयाना अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि ते तितकेच भेडसावतातही. त्यांच्या या स्थलांतरामुळे वृद्धांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी घेणे, ज्येष्ठ आजारी नागरिकांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेणे, लहान मुलांची शाळेतील अनुपस्थिती वाढणे, शालेय किशोरवयीन मुलींची काळजी घेणे किंवा मग अनिच्छेने का होईना त्यांचा विवाह करणे, त्यांच्या घरे, पाळीव जनावरे, प्राण्यांच्या देखभाल करणे यासह ऊसतोड कामगाराची गरोदर पत्नी असल्यास एकतर तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबणे किंवा मग तिला सोबत ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच त्या ऊसतोड कामगाराकडे राहत नाहीत. यासह इतर अनेक समस्यांना या कामगारांना तोंड द्यावे लागते.

या व्यवसायातील कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून दरवर्षी होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजुरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरी ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना विशेष अशा शैक्षणिक सुविधा पुरविणे देखील आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे सुरु आहे. यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम गतीने सुरु आहे.

आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात करण्यात आलेल्या योजनेत परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल व तत्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार १८ हजार ११३ असून, ते व त्यांचे कुटुंबीय अस्थिर व हलाखीचे जीवन जगत आहेत. या ऊसतोड कामगारांच्या राहणीमानात बदल होण्यासाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ४ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना स्थिर व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत.  वास्तव्यास असलेल्या ठिकाणी व सतत मागील तीन वर्षांपासून ऊसतोड कामगार असणाऱ्यांना ग्रामसेवकाने ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, कामात सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास तातडीने निराकरण करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती देण्यासाठी महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे ३ एप्रिल २०२२ रोजी सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत उपेक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना शासकीय पातळीवर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात येत आहे. भविष्यात ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये घरकुल, वैद्यकीय सुविधा, ऊसतोड करतेवेळी होणारे अपघात लक्षात घेता, भविष्यासाठी राज्य विमा योजना, त्यांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, कौशल्य विकास योजना, कमी व्याजदराने भांडवली कर्ज योजना, ऊसतोड वाहक व चालकांसाठी विमा योजना, स्वस्त धान्य योजना, अंगणवाडी शाळा इ. योजना राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात ७ साखर कारखाने कार्यरत असून, त्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी झालेल्यांची संख्या ही १८ हजार ११३ एवढी आहे.  यामध्ये श्री. रेणुका शुगर लिमिटेड, देवनांद्रा ता. पाथरी येथे १ हजार ६५५, श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर एल.एल. पी. अमडापूर ता. जि.परभणी. येथील कारखान्यात ६७२, योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, लिंबा ता. पाथरी  येथे ४ हजार २८९, गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड, माखणी ता. गंगाखेड येथे ५ हजार ११९, बळीराजा साखर कारखाना लिमिटेड, कानडखेड ता. पूर्णा येथे ७२०, ट्वेंटी वन शुगर लिमिटेड, देवीनगर तांडा, सायखेडा, ता. सोनपेठ येथे ५ हजार २०८ आणि श्री. तुळजाभवानी शुगर प्रा.लि. आडगाव (दराडे), ता. सेलू येथे ४५० असे एकूण १८ हजार ११३ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत या योजनेंतर्गत ५ हजार ६४८ ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आले असून, त्यांची तालुकानिहाय आकडेवारी ही पुढीलप्रमाणे आहे. परभणी ४२४, जिंतूर ३९२, गंगाखेड ९७५, सेलू १६५, मानवत ६५८, पाथरी २ हजार २६१, पालम १९२, पुर्णा ४१२ आणि सोनपेठ तालुक्यात १६९ कामगारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ओळखपत्राचे वितरण हे पाथरी तालुक्यात झाले असून, सर्वात कमी ओळखपत्र सेलू तालुक्यात वितरीत करण्यात आले आहेत.

 ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी दिनांक ०६ जून २०२३ अखेर माहे मे – २०२३ मध्ये परभणी जिल्ह्यात एकूण ९०० ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली आहे. या आरोग्य तपासणीत १३ गर्भवती ऊसतोड कामगार होत्या. त्या सर्व महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यांना व नवजात बालकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नियमित सुरु आहे.

ऊसतोड कामगार असलेल्या सर्जेराव तोडके या लाभार्थ्याचा अभिप्राय

सर्जेराव पाराजी तोडके, रा. तुरा पो. रामपुरी ता. पाथरी जि. परभणी येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार ओळखपत्र वितरीत केले आहे. जवळपास दहा वर्षांपासून विविध साखर कारखान्यात ऊसतोडणीचे काम करतो. मागील तीन ते चार वर्षांपासून गंगाखेड शुगर लि. विजयनगर, माखनी येथे सलग काम करीत आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी माझ्या (तुरा) गावचे ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधून माझे आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करून मला ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेने ऊसतोड कामगारांना संपर्क केलेला नसून यावर्षीच पहिल्यांदाच समाजकल्याण विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी मला व माझ्या काही सहकारी ऊसतोड कामगारांना समाजकल्याण विभागाच्या वर्धापनदिन निमित्त दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमास बोलावून सत्कार केलेला आहे. तसेच येणाऱ्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत माझ्या मुला-मुलींसाठी व एकूणच कुटुंबासाठी शासकीय वसतिगृह, घरकुल योजना, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य, आरोग्य विषयक सुविधा, विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबद्दल तसेच मला शासकीय कार्यालयामार्फत ‘ऊसतोड कामगार ओळखपत्र’ मिळवून दिल्याबाबत मी समाजकल्याण कार्यालय परभणी  आणि ग्रामपंचायत कार्यालय तुरा यांचा मनापासून आभारी आहे.’

 

  • प्रभाकर बारहाते,

     माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. २३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी१२ वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती‘ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

                ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्डशाळेचा दाखलामार्कशीटदोन फोटोपुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या.)मुंबई – गृहनिर्माण भवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलै२०२३ पर्यंत  अर्ज करावेत.

0000 

शैलजा पाटील/विसंअ/

परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना

समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थी अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अंमलबजावणी केली जाते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना ही शासनाची महत्वाची योजना आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेणे कठीण असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

हा लाभ दिला जातो

योजनेसाठी पात्र असणा-या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ योजनेतून दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असते. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी, एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये ज्या परदेशी विद्यापीठांचे रँकिंग 300 पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही योजना देय आहे.

अर्ज कुठे करावा

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा. परिपूर्ण अर्ज समाजकल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्यास मुदतवाढ

वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळवून देणारी ही महत्वपूर्ण योजना आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जूनपर्यंत होती. ती आता 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.

–  उपायुक्त सुनील वारे, प्रादेशिक समाजकल्याण कार्यालय

हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पंढरपूर दि. २३ (उ.मा.का.) :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी  पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 पालकमंत्र्यांनी केले सारथ्य

धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.  पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर पालखी विसावा ठिकाणापर्यंत चालण्याचा आनंद लुटला

सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे  आगमन सकाळी 10.40 वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र  डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

हरिनामात वारकरी तल्लीन

टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी,

वाट ती चालावी पंढरीची

या संत वचनानुसार  टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते.  प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे.

धर्मपुरी येथे पालखी अगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व  स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने उभारलेल्या तात्पुरत्या अतिदक्षता कक्षास  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर  माऊलींची पालखी पाटबंधारे  विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

नातेपुते येथे पालखीचा मुक्काम

धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गस्थ झाली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप

सातारा, दि. 23 (जिमाका) :  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 18 ते 23 जून दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन धर्मपुरी येथून आज सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री. डूडी  यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

श्री माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी खूप चांगले  काम केले असल्याचे सांगून  जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीचे केले सारथ्य

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी राजुरी पासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत   माऊलीच्या रथाचे सारथ्य केले.   हरी नामाचा गजर करीत पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला.

सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी – सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले

नव्या रूपाचं “आधार” आलंय जरा बघुया;आहे अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया !

सध्या बहुसंख्य जणांकडे जे आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा वापरच मोठ्या प्रमाणात होतो. बहुसंख्य कामासाठी ते वापरलं जातं. पण, आता मी तुम्हाला जर सांगितलं की, जसं आपलं एटीएम किंवा पॅन कार्ड प्लास्टिक स्वरूपात मिळतं, तसंच आधार कार्डही मिळणार आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’नं आधार कार्ड एका नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ‘आधार पीव्हीसी कार्ड’ असं या नव्या स्वरूपाचं नाव आहे. त्यामुळे आता आधार कार्डवरील माहिती पीव्हीसी म्हणजेच polyvinyl chloride कार्डवर प्रिंट करून मिळणार आहे.

आधार पीव्हीसी कार्डाविषयी माहिती देताना UIDAI नं म्हटलंय की, “या कार्डाची प्रिटिंग क्वालिटी चांगली असते आणि ते अधिक काळ टिकतं. शिवाय पावसामुळेही ते खराब होत नाही. यावर क्यूआर कोड असल्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशनही होऊ शकणार आहे.” त्यामुळे मग आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं, त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे, याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

आधार PVC कार्ड कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधील तुम्हाला http://uidai.gov.in असं सर्च करायचं आहे, त्यानंतर भारत सरकारच्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ची वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे वेगवेगळ्या भाषांचे पर्याय दिलेले असतील, त्यापैकी मराठीवर क्लिक करायचं आहे. पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

या वेबसाईटवर डावीकडे माझा आधार नावाचा रकाना दिसेल, यातील Order aadhar pvc card या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एका नवीन पेजवर तुम्ही जाल. इथेही भाषा बदलून मराठी करायची आहे. इथं तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. यातील दुसऱ्या आधार पीव्हीसी कार्ड मागवा यावर क्लिक करायचं आहे.

पुढच्या पेजवर तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड कसं असेल ते तिथं दाखवलेलं आहे. जसं की यावर क्यूआर कोड, होलोग्राम असणार आहे. या पेजवर तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत. आता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्ही डायरेक्ट ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करू शकता. पण ते नसेल तर इथल्या माझा मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही या पर्यायासमोरील बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी प्रविष्ट करा या रकान्यात तो टाकायचा आहे. पुढे असलेल्या नियम व अटीवर क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. “मी माझ्या आधार पीव्हीसी कार्डच्या छपाईसाठी संमती देतो. ते माझ्या पत्त्यावर पोस्टानं येईल आणि त्यासाठी मी ५०/- रुपये देण्यास सहमत आहे.” अशा आशयाचा हा मेसेज आहे. मग प्रस्तुत करणे यावर क्लिक केलं की तुमचा अर्ज सबमिट होईल.

पुढे तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. आपली विनंती नोंदवली गेली आहे असं त्यात नमूद केलेलं असेल आणि एसआरएन नंबर दिलेला असेल. या मेसेजखालील बरोबरच्या खुणेवर टीक करून आणि मग देय द्या या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथं वेगवेगळे पर्याय वापरून तुम्ही ५०/- रुपये भरू शकता. जसं मी कार्ड्स या पर्यायावर क्लिक करून माझ्या एटीएम कार्डावरचे डिटेल्स टाकले आहेत. मग प्रोसिड वर क्लिक केलं. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो इथं टाकायचा आहे. मग कम्प्लिट पेमेंटवर क्लिक करायचं आहे.

मग एक नवीन पेज ओपन होईल. जिथं तुमचा व्यवहार यशस्वी झाल्याचं दिसेल. खाली एसआरएन नंबर दिलेला असेल, हा नंबर वापरून तुम्ही तुमच्या पीव्हीसी कार्डचं स्टेटस पाहू शकणार आहात. पुढे कॅप्चा टाकला की मग पावती डाऊनलोड करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही पावती डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर स्पष्टपणे नमूद केलंय की, तुमचं पीव्हीसी कार्ड ५ दिवसांत प्रिंट केलं जाईल आणि त्यानंतर ते स्पीड पोस्टनं आधार कार्डवरील पत्त्यावर पाठवलं जाईल.

पीव्हीसी कार्डचं स्टेटस कसं पाहायचं?

आता आपण ऑर्डर केलेल्या पीव्हीसी कार्डचं स्टेटसही ऑनलाईन पाहू शकतो. ते कसं तर त्यासाठी तुम्हाला माझा आधार या रकान्यातील check aadhar pvc card status या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवं पेज दिसेल. यातल्या आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर स्थिती तपासा यावर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला पावतीवरील एसआरएन नंबर आणि कॅप्चा टाकून प्रस्तुत करणे वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सध्याची स्थिती या पर्यायसमोर तुम्हाला तुमच्या कार्डाची स्थिती दिसते. जसं की ते प्रिटिंगसाठी गेलं असेल तर तिथं प्रिटिंग प्रक्रिया असं लिहिलेलं असतं किंवा ते डिस्पॅच झालं, म्हणजे पोस्टातून निघालं की त्याची तारीखही इथं नमूद केलेली असते.

०००

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

ताज्या बातम्या

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद

0
मुंबई, दि. १: नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज...

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १:  महाराष्ट्राने उर्जा क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे महत्त्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या...

विधानपरिषद लक्षवेधी

0
अहिल्यानगर महापालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक - मंत्री उदय सामंत राज्यातील सर्व महानगरपालिकांचा आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करणार मुंबई, दि. १ :...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १ : राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १ : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या...