बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 1297

विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

पुणे, दि. २४: शिक्षण घेऊन विविध पदावर करीत असताना शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

भुगाव येथे आयोजित स्किल इन्स्टिट्यूट फेज-२ आणि फ्युएल बिझनेस स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य सल्लागार संतोष हुरालीकोप्पी, फ्युएलच्या कार्यकारी अधिकारी मयुरी राजेंद्र, उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे, ईव्यासच्या संस्थापिका डॉ. प्रतिमा शौरी, परांजपे, स्किमचे अमित परांजपे आदी उपस्थित होते.

श्री. लोढा म्हणाले,  कौशल्य विकासाचे  शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करीत असताना सोबत  संस्काराची जोड असावी. त्यामुळे स्वत:बरोबर समाजाचाही फायदा होईल. या संस्थेमार्फत मेहनतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत असून भविष्यात त्याला निश्चित फायदा होईल. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावे. या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. शासनाच्यावतीने संस्थेला आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी श्री. लोढा यांनी दिले.

श्री. देशपांडे म्हणाले, युवावर्गाला व्यवसायविषयक मार्गदर्शन होण्यासाठी फ्युएल संस्थेची स्थापना करण्यात आली.  महाराष्ट्र शासनाच्या मदतीने फ्युएल विद्यापीठ करण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न आहे.

000

सातारा जिल्ह्यातील पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात

सातारा :- आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात…जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देतात…आणि मुख्यमंत्री मार्गस्थ होतात…

आपला संवेदनशील स्वभाव कृतीतून पुन्हा एकदा दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याचे पुनर्वसन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जमिनीवर खाली बसून त्या वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. त्याचवेळी पिंपरीतांब गावातील एका गरीब दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरे येथे वास्तव्यास असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्या भेटीला गेले.

पिंपरीतांब येथील भागडवाडीतील ७५ वर्षाचे विठ्ठल धोंडू गोरे आपल्या पत्नीसह याठिकाणी राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नसल्याने  आहे त्या तुटपुंज्या संसारात ते दोघं उघड्यावरच राहतात. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांच्याजवळ गेले. थेट जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार? त्याऐवजी गावाजवळ का राहत नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही त्यामुळे गावाजवळ राहावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा वापर करता येईल, याचाच विचार करतात आणि ते कृतीतून ते दाखवतात. पिंपरीतांब येथील भागडवाडीतील विठ्ठल गोरे यांना मदत करताना त्यांच्यातली हीच संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

 

मराठा मंदिर संस्थेला गौरवशाली परंपरा; संस्थेने उदात्त हेतूने केलेले कार्य प्रेरणा देणारे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यपूर्व काळात उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने  विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे. मराठा मंदिर गौरवशाली इतिहास असलेली संस्था आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उच्च  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार भाई जगताप, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख,संजय राणे,शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यासह मराठा मंदिर या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या सह अनेक सदस्यांनी आपल्या कार्यातून उभी राहिलेली ही संस्था आज बहरली आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वोतोपरी शासनाकडून सहकार्य केले जाईल. आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा या काळात आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या, स्वातंत्र्याचा अर्थ शिकवणाऱ्या संस्थांची गरज होती. ती गरज मराठा मंदिर सारख्या संस्थांनी पूर्ण केली. आपल्या समाजमनाची मशागत केली. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. यातील मराठा मंदिर सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे. या संस्थांनी महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व समृद्ध केले आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा मंदिरने मुंबईसह, सोलापूर, सांगली, रत्नागिरी अशा विविध प्रांतात आपल्या शैक्षणिक कार्याचे जाळे उभे केले आहे. मराठा मंदिर च्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच मराठा मंदिरची ही दिमाखदार शैक्षणिक वाटचाल यापुढेही अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे. मराठा मंदिर च्या अमृत महोत्सवी वाटचालीस, आणि या निमित्ताने आयोजित सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

मराठा मंदिरच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणार : मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार

मराठा मंदिरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,  संस्थेत निःस्वार्थी काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्यामुळेच संस्था ही मोठी होते. मराठा मंदिरचे पहिले अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांचे कार्य मोलाचे आहे. रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात येणारे सागरी संशोधन महाविद्यालय यासाठी लागणारी परवानगी तसेच संस्थेच्या इतर काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. मराठा मंदिर या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी परदेश शिष्यवृत्ती सुरू करणार असून यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची जबाबदारी मी घेत आहे. या संस्थेची वाटचाल अशा प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असेही श्री.पवार म्हणाले.

समाजाच्या विविध पैलूना स्पर्श करणारी मराठा मंदिर संस्था : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,कोणतीही संस्था अनेक विषय घेवून काम करत असूनही या संस्थेचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे शालेय शिक्षण या संस्थेतून घेता आले याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेतांना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६३ हजार जणांना उद्योगासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू झाले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असेही ते याप्रसंगी म्हणाले.

मराठा मंदिरने मला घडवले : उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,या संस्थेच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण घेतले. राजकीय विद्यापीठ देखील याच व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळाले. वयाच्या २८ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून गेलो. मराठा मंदिरच्या माध्यमांतून अनेक विद्यार्थी घडले. मराठा मंदिर मुळे आज मी या क्षेत्रात आहे आणि याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागातील मराठा मंदिर अनेक उत्कृष्ट विद्यार्थी घडवत आहे खरोखरच खूपच अभिमनाची गोष्ट आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंदिर रत्नागिरी हायस्कूल च्या “राखेतून उडाला मोर” या राज्यस्तरीय बालनाट्य पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक संतोष गारडी, लेखक डॉक्टर संतोष साळुंखे आणि विद्यार्थी व कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे  व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.शशीकांत पवार यांनी केलेल्या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभा शशिकांत पवार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

*****

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून पनवेलमध्ये साकारणार

पालकमंत्री उदय सामंत यांनीही महारोजगार मेळाव्याला भेट देवून युवा वर्गाला दिल्या शुभेच्छा

अलिबाग,दि.24(जिमाका): प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम साकारण्यात येईल, त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपये तरतूदीची तसेच येथील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी लवकरच एक चांगले स्किल सेंटर उभे करण्याची घोषणा राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पनवेल येथे केली.

भूमीपुत्रांचे दैवत स्व.दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, लोकनेते दि. बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार, पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विजय टिकोले, सुप्रिया ठाकूर, पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, अरुणशेठ भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, गुलाब वझे, दीपक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनीही या महारोजगार मेळाव्याला भेट देऊन उपस्थित युवा वर्गाला शुभेच्छा दिल्या.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्थानिक जनतेसाठी व महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. ते लक्षात घेता त्यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून विविध नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. त्या मिळणे स्थानिकांचा हक्क आहे. त्यासाठी येथे 30 दिवसांच्या आत स्कील सेंटर उभे करू, असे सांगून राज्यात या शासनाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात सातशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. आज पनवेलमध्येही रोजगार मेळावा होत आहे. येथे बेरोजगार उमेदवारांना नोकरी- रोजगारासाठी उपस्थित अधिकारी सर्व माहिती देतील. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल तर आमची जबाबदारी आहे की, त्यासाठी योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ते मिळवून देणे. या मेळाव्यानंतरही तुम्हाला जे काही सहकार्य हवे असेल ते आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी करतीलच.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी लढा उभारण्यात आला होता. त्या अंतर्गत झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मीही आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. जनतेचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, याकरिता येथील भूमीपुत्रांनी ऐतिहासिक लढा दिला आणि त्याला यश मिळाले असून या विमानतळाला राज्य सरकारने ‘दिबां’चे नाव देण्याचे जाहीरही केले आहे. आता यासाठी  समितीमार्फत पुढील पाठपुरावा  केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

कृती समितीचे सल्लागार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश बालदी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून महारोजगर मेळाव्यानिमित्त उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या.

या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध 38 कंपन्यांकडून 2 हजार 399 रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली होती. तर या मेळाव्यास 651 बेरोजगार युवकांनी नावे नोंदविली होती. मुलाखत 1 हजार 124 जणांनी दिली तर एकूण 272 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी दिली.

कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत ‘दिबां’ना अभिवादन केले.

शेवटी जे. डी. तांडेल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमानंतर लोकनेते दि.बा.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांच्या पनवेल येथील घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000000

राज्यातील आश्रमशाळांमध्ये निर्माण करणार सुसज्ज डिजिटल ग्रंथालये – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,दिनांक.24 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच  स्पर्धा परिक्षांचाही अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा व संदर्भांनी युक्त असे सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज शहादा तालुक्यातील चिरखान तसेच तळोदा तालुक्यातील  बोरद येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन तसेच उद्धटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनिता पवार, सरपंच रविद्र ठाकरे (बोरद), कृष्णा पाडवी (छोटा धनपूर), सहायक प्रकल्प अधिकारी साबळे, मुख्याध्यापक जी.ए.भामरे, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लागावी त्यांना स्पर्धापरीक्षेत चांगले यश संपादन करण्यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेच्या इमारतीत सुसज्ज असे डिजिटल लायब्ररी उभारणार आहे. आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करुन देणार आहे. जेणे करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षणात खंड पडणार नाही. नवीन शाळेच्या इमारतीमध्ये डिजिटल ग्रंथालय, संगणक कक्ष, अत्याधुनिक प्रयोगशाळा, व्हर्चुअल क्लासरूम,तसेच  इयत्ता आठवी पासून सर्व विद्यार्थ्यांना टॅब देणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जगामध्ये काय चालू आहे याची माहिती उपलब्ध होईल. दर महिन्यात एखाद्या समाजसुधारक, तंज्ञ व्यक्तींची जयंती व पुण्यतिथी शासनस्तरावर साजरी केली जाते या दिवशी सर्व आश्रमशाळेत विद्यार्थ्यासाठी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घ्याव्यात जेणे करुन विद्यार्थ्यांना बोलण्याची सवय आता पासून लागेल. यावर्षी राज्यात 56 नवीन शाळांना बांधकामास मंजूरी देण्यात आली त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक 30 शाळाचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे बोलतांना म्हणाले की,  आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य वेळेवर खरेदी करण्यासाठी पुर्वी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत होते त्या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दर तीन महिन्यानी तसेच शिक्षकांची दर तीन महिन्यांनी परीक्षा घेऊन त्यांचे मुल्यमापन करण्यात येवून त्यानंतरही परिस्थिती न बदल्यास अशा विद्यार्थ्यांना ई-क्लास रुमच्या माध्यमातून  तज्ञ शिक्षकांकडून शिक्षण देण्यात येईल. शिक्षणांच्या बाबतीत कुठेही शिस्त आणि नियमांशी तडजोड केली जाणार नाही. जे शिक्षक व कर्मचारी शाळेत वेळेत येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यात ज्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाच्या नवीन इमारती नाही अशा ठिकाणी येत्या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून येत्या दोन वर्षांत आश्रमशाळेच्या ठिकाणी शिक्षक,कर्मचारी यांचे निवासस्थान  बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
0000000000

केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांनी केली वन प्रबोधिनीची पाहणी; प्रशिक्षणार्थ्यांसोबत साधला संवाद

चंद्रपूर, दि. २४ : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन प्रबोधिनी परिसराची पाहणी केली व १८ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि परेडचे निरीक्षण केले आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तीचे मूल्यांकन केले.  यानंतर त्यांनी  क्लर्क, लेखापाल आणि वनरक्षकांच्या प्रशिक्षणार्थींना देखील भेट दिली. अकादमी प्रशासनाने केलेल्या मॉर्निंग योगा आणि हृदयस्पर्शी ध्यान आदी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि शारीरिक आरोग्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व सांगितले.

त्यानंतर त्यांनी चंद्रपूर वन अकादमीच्या संचालकांकडून कॅम्पसमध्ये होणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याकडून घेतला. तसेच अकादमीच्या विविध सुविधांना भेट दिली आणि महाराष्ट्र सरकारने प्रशिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

चंद्रपूर वन अकादमीबाबत थोडक्यात माहिती :

चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ही चंद्रपूर, येथे स्थित एक प्रसिद्ध प्रशिक्षण संस्था आहे. वन अधिकाऱ्यांना वनीकरण क्षेत्रात विविध क्षमतांमध्ये सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आणि विकसित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अकादमी भारतीय वन सेवा (आयएफएस) तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स (आरएफओ) आणि वन विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम देते. प्रशिक्षण कार्यक्रम वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता, पर्यावरणीय कायदे, समुदाय सहभाग आणि प्रशासन यासह विविध विषयांवर लक्ष केंद्रित करतात.

प्रभावी प्रशिक्षणासाठी चंद्रपूर वन अकादमी आधुनिक सुविधा आणि संसाधनांनी सुसज्ज आहे. यामध्ये व्याख्यान कक्ष, प्रशिक्षण क्षेत्र, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, एक वाचनालय आणि प्रशिक्षणार्थींसाठी निवास सुविधा यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अकादमी व्यावहारिक क्षेत्र प्रशिक्षणावर भर देते. हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ वसलेले आहे, जे वन्यजीव व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतींसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करते. चंद्रपूर फॉरेस्ट अकादमीला शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी योगदान देणारे सक्षम आणि कुशल वन अधिकारी निर्माण करण्याच्या भूमिकेबद्दल मान्यता मिळाली आहे.

००००००

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

अमरावती, दि. २४ : भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात २४९ संशोधकांना आचार्य पदवी, ११९ गुणवंतांना सुवर्णपदके, २३ रौप्यपदके आणि २५ रोख पारितोषिके तसेच ४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी व २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.

नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी ‘दशसूत्री’ दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे  जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

०००

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा; तर  ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी  विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर बाल  साहित्यासाठी  बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या  ‘छंद देई आनंद’  या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये 1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी  22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कवयित्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांचा हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रिया दिली.’ कुटुंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगून आपल्याला जे आवडते ते लिहिण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटिंगमध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50  नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटिंग आणि कॉपीरायटिंग त्यांनी केलेलं आहे.

मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.

सुप्रसिद्ध बाल साहित्यकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’  या मराठी बाल कविता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिहित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’

साहित्य‍िक श्री. आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असे विविध प्रकारचे लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता.

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २३ : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई  येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातील बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून राहावे लागत नाही.  यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगारांच्या संधी, नवीन संशोधनाचा अभ्यास करून  विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी  तंत्रशिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी  इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल, कला, विज्ञान, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊ शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षणसुद्धा घेता येईल. हे या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.

या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

आराखड्यातील पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव सादर करा- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

        अमरावती, दि. 23 : मोझरी, वलगाव व कौंडण्यपूर विकास आराखड्यांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. अपूर्ण कामांचा प्रत्यक्ष सद्यस्थिती अहवाल यंत्रणांनी सादर करावा. त्यानुषंगाने निधीची तरतूद करणे सोईचे होईल. आराखड्यांतर्गत करावयाच्या कामांच्या संदर्भात पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मोझरी, वलगाव तसेच कौंडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकांव्दारे आज घेतला. आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपायुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी  विशेष कार्याधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोझरी विकास आराखड्यांतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 147 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी दिले.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 27 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 13  कामे पूर्ण झाली असून त्यासाठी 16 कोटी 77 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले आहे. आरखड्यांतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, अशी माहिती  श्री. चौधरी यांनी सादरीकरणातून दिली.

वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 35 कोटी 62 लक्ष रुपये खर्चूननिर्वाणभूमीच्या विकासाची कामे झाली आहेत.  उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबधित यंत्रणांना यावेळी दिले.

विकास आराखड्यांतर्गत येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पयर्टकांसाठी व भक्तांच्या निवासाची सुविधा उभारण्यात यावी. त्याठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, बगीचा तसेच महापुरुषांच्या जीवनचरित्र दर्शविणारे पोस्टर लावावेत, अश्या मागण्या आमदार ॲड. ठाकूर यांनी केल्या.

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....