गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1273

समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना प्राधान्य : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 8 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त):  समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उपअभियंता रवींद्र पुरी, शाखा अभियंता तनुष चव्हाण, आर. फारुकी, सरपंच शरद भडांगे, सचिन दरेकर, मीना माळी, उपसरपंच चेतन आहेर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, नागरिकांना आवश्यक असलेल्या मुलभूत सेवा-सुविधा आणि लोकोपयोगी कामांना प्राधान्य देवून त्यानुसार विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले असून लवकरच दुसराही हप्ता वितरित केला जाईल. येणाऱ्या काळातही विकासाची कामे सुरू राहतील, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

या कामांचे झाले लोकार्पण

  • निफाड तालुक्यातील दहेगांव येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत सभामंडपाचे लोकार्पण.
  • निफाड तालुक्यातील वाहेगाव जिल्हा नियोजन मधुन सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविणे कामाचे लोकार्पण,
  • निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे स्थानिक विकास निधीमधून पिक-अप शेडचे लोकार्पण करण्यात आले.

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असून त्यासाठी मंडळामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे दि. 12 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 9 सप्टेंबर, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटरhttps://twitter.com/MahaDGIPR

फेसबुकhttps://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.२५ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.25 टक्के दराने 9 ऑक्टोबरपर्यंत देय असलेल्या व्याजासह सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतीतल प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

विकास कर्जाच्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली असे यथोचितरित्या नमूद करुन रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत. रोखेधारकांनी रोखे मुखांकित ठिकाणी अथवा नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावीत. असे वित्तीय सुधारणाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.

०००

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. 8 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसंबधित खर्चासाठी 10 वर्षे मुदतीच्या तसेच 11 वर्षे मुदतीच्या प्रत्येकी दोन हजार कोटींच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकासकामांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लीलाव आयोजित करण्यात येईल. लीलावाचे बिडस् दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 13 सप्टेंबर, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 13 सप्टेंबर, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी अनुक्रमे 10 व 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 13 सप्टेंबर, 2023 पासून सुरु होईल. 10 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक 13 सप्टेंबर 2033 रोजी तर 11 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांची परतफेड दि. 13 सप्टेंबर 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 13 मार्च व 13 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील.

००००

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक : 8 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी 57 लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आनंदा शिधा वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसीलदार निरांजना पराते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक कोटी 57 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप होणार असून त्याचा राज्यातील साधारण साडेसात कोटी जनतेला लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. या आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरित केला जाणार आहे. राज्यातील गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.

येवला तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण 38 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींसाठी राज्यात १२ लाख घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने  १२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे ही त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी ५०० नवीन रेशन कार्डचेही वाटप करण्यात आले.

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. ८ : अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये चर्चासत्राचे आयोजन करून त्या माध्यमातून समस्या जाणून घ्याव्यात व त्यानुसार नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. या समाजातील नागरिकांसाठी  नवीन विविध योजना तयार करुन त्या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा मानस आहे. मंत्री श्री. सत्तार यांनी या बैठकीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दयांवर चर्चा केली.

या बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार – मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. ८ :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका) : शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप येईल. तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) येथे केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) तर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा. धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेंडकर, राजेखान जमादार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. राज्यातील शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने  शासनाने सुमारे 1100 कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली असून भविष्यात शैक्षणिक सुधारणांचे अनेक निर्णय घेणार असल्याचे सांगून यावर्षीपासून अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) अभ्यासक्रम मराठीतून सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींची निवड अतिशय पादर्शकपणे‍ केली असल्याचे खा. श्री. माने यांनी सांगितले तर कोल्हापूर जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा गुणवत्तापूर्ण असल्याचे गौरवोद्गार आ. जयंत आसगावकर यांनी काढले.

प्रारंभी भुदरगड तालुक्यातील सचिन देसाई, करवीर तालुक्यातील सुधीन आमनगी व नकुशी देवकर हातकणंगले तालुक्यातील शिवाजी पाटील यांना सन 2023 तर शाहूवाडी तालुक्यातील शोभा पाटील यांना सन 2022 चा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  शाल, श्रीफल, स्मृर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 

सन 2022-23 व 2023-24 या वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक :-

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022- मारुती डेळेकर (आजरा), सचिन भोसले- (भुदरगड), राजेंद्र शिंदे- (भुदरगड), प्रशांत पाटील- (चंदगड), अर्चना देसाई- (गडहिंग्लज), गीतांजली कमळकर- (कागल), राजाराम नारींगकर- (राधानगरी), विश्वास भोसले-(गगनबावडा), सुषमा माने- (हातकणंगले), महेश बन्ने- (हातकणंगले), दत्तात्रय पाटील- (करवीर), तानाजी घरपणकर- (पन्हाळा), शिवाजी पाटील- (शाहूवाडी), अरुणा शहापुरे- (शिरोळ) सन 2023 पुरस्कार – श्रीमती सुरेखा नाईक- (आजरा), कविता चौगले- (भुदरगड), सरीता नाईक-(चंदगड), पद्मश्री गुरव- (गडहिंग्लज), स्नेहा चव्हाण- (कागल), गणेश पाटील- (राधानगरी), सायली तांबवेकर- (हातकणंगले), राजेंद्र तौदकर- (करवीर), किरण सुतार-(पन्हाळा), कविता मगदूम- (शाहूवाडी), साताप्पा नेजे- (शिरोळ), संजय देसाई- (गगनबावडा) यांना देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 – विजय परिट, (कागल) ; जिल्हा शिक्षक पुरस्कार 2022 माध्यमिक शिक्षक गट-  संतोष सनगर (करवीर) तर उच्च माध्यमिक गट कुंडलिक जाधव (गगनबावडा)  व सुषमा पाटील (करवीर) यांना विभागून देण्यात आला.

विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार 2023 –   अनिल चौगले (राधानगरी) यांना तर माध्यमिक शिक्षक गट पुरस्कार विजया दिंडे (करवीर) यांना देण्यात आला.

यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन 2019-20) हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत संभापूरला 5, शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत शिवारेला 3 तर आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला 2 लाख रुपये तसेच सन 2020-21 व 2021-22 साठी आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत वाटंगीला 5, हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी ग्रामपंचायत 3 तर पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोखलेला 2 लाख रुपयांचे बक्षीस पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन यावेळी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी तर आभार श्रीमती शेंडकर यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि.8 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरचा जयपूरच्या धर्तीवर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करुन पंचगंगा घाटावरील विकास व संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर होणाऱ्या विकास व संवर्धन कामाचे भूमिपूजन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेतून दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीतून ही कामे होणार आहेत. पंचगंगेचा जूना 60 मीटर व नवीन 55 मीटरचा घाट अशा एकूण 115 मीटर लांब घाटाचा विकास व पायरीचे 11 टप्पे या निधीतून करण्यात येणार आहेत. यातील 115 मीटरचे 5 टप्पे होणार असून 55 मीटरचे 11 टप्पे होतील. घाटाचा हेरिटेज लुक कायम ठेवून कामे गतीने करावीत, अशा सुचना करुन हे काम पूर्ण झाल्यावर पंचगंगा घाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

केवळ औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील विकासाबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा विकास करणे आवश्यक आहे. राज्यासह देशभरातील प्रत्येक नागरिक कोल्हापूरला आला पाहिजे या दृष्टीने कोल्हापूरच्या विकासावर भर देण्यात येत आहे, असे सांगून पंचगंगा घाट हे कोल्हापूरचे सौंदर्य आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाच्या विकासाबरोबरच जुना राजवाडा ते नवा राजवाडा मार्ग, अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आदी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहकार्याने कोल्हापूरचा विकास गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.  त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

—–०—–

ताज्या बातम्या

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...