गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1270

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाची मंत्री भुजबळ यांनी आज पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, अभियंता महेश बागुल, पर्यटन विभागाचे उप अभियंता ज्ञानेश्वर पवार, गोवर्धन गावचे सरपंच बाळासाहेब लांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, कलाग्राम प्रकल्पाचे काम हे त्वरीत पुर्ण करण्यात यावे. सद्यस्थितीत येथे बांधण्यात आलेल्या दुकानांचे अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण करणे, पथदिवे बसविणे त्याचप्रमाणे दुकानांना शटर, दरवाजे, खिडक्या बसविण्याची कामे सुरू करण्यात यावीत. कलाग्राम येथील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, उपहागृह व प्रसाधन गृह येथे आवश्यक असलेली प्लंबिंगची कामे, वाहनतळ पार्कींग व्यवस्था ही कामे दर्जात्मक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कलाग्रामच्या बाह्य बाजुस बाग-बगिचा व परिसर सुशोभिकरण करणे यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी पार्क तयार करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी भुजबळ यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर आणि अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूटच्या कामांचाही आढावा घेतला. बोटक्लब नाशिक येथे 1 हजार अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर बांधण्यात येत असून यात पहिल्या टप्प्यात 600 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असा 1 हॉल, 200 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे 2 हॉल, ऍप्मीथिअटर, उपहारगृह, प्रसाधान गृह, केंद्रीकृत वातुनूकुलित यंत्र, प्रोजेक्टर वीथ साउंड सिस्टीम ही कामे पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाख

निधीतून अंतर्गत फर्निचर व सजावट, वाहनतळाची व्यवस्था बाह्य बाजूस बाग-बगीचा व सुशोभिकरण करणे, पथ दिवे आणि अंतर्गत रस्ते यांची कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट सूरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत भुजबळ यांनी निर्देश दिले.

00000000

शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक : 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे  स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना  भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात, अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गंगापूर रोड येथील कै. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, नितीन बच्छाव (प्राथमिक) यांच्यासह सर्व शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. आज असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील शिक्षकच राबवित असतात. त्यासाठी काही शिक्षक स्वखर्चातून शाळांच्या विकासाला हातभार लावतात. तर काही गावातील नागरिकांना प्रेरीत करून त्यांच्या सहभागाने शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास साधत असतात. अशाच प्रतिकुल परिस्थिती व अथक परिश्रमातून ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या शिक्षकांची यापुढील जबाबदारी अधिकच वाढली आहे. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कामातून प्रेरणा घेवून इतर शिक्षकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे जाळे खूप विस्तारले असल्याने या डिजिटल युगात भविष्यातील नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी देखील तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण समित्यांनी तेथील शिक्षकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या 128 शाळा मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येत आहे. येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षी राबविण्यात आलेला ‘सुपर 50’ हा उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमामध्ये यावर्षी 50 ऐवजी 100 विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. सुपर 50 मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे भविष्यात नक्कीच आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसोबतच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सक्षमपणे उभे करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येणारा प्रत्येक नाविन्यपूर्ण शिक्षणाचा उपक्रम राज्यात शिक्षणाचा नाशिक पॅटर्न म्हणून राबविला जाईल, असा विश्वास ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

                                                                         

आमदार सिमा हिरे म्हणाल्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या ज्ञानदानाच्या कामातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील भर द्यावा, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण क्षेत्रात सुरु असून त्याअनुषंगाने शिक्षकांच्या कार्यशाळा देखील घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक शाळांमधील शिक्षक हे नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असतात. असे सर्व शिक्षक हे आदर्श व गुणवंत आहेत, अशा सर्व शिक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता नक्की वाढेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक शिक्षकांनी गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ही त्यांनी केले.

गुणवंत शिक्षक म्हणून यांचा झाला सन्मान:

  • प्रमिला भावराव पगार, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा भिलदर, ता.बागलाण,
  • वैशाली विलास जाधव, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा एकरुखे, ता.चांदवड,
  • अर्चना दादाजी आहेर, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा पिंपळेश्वर (वा), ता. देवळा,
  • नौशाद अब्बास मुसलमान, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा परमोरी, ता.दिंडोरी,
  • चित्रा धर्मा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा अभोणा मुली, ता. कळवण,
  • अनिल सारंगधर शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जामुंडे, ता.इगतपुरी,
  • प्रतिभा सुनील अहिरे, प्राथमिक शिक्षका, जिल्हा परिषद शाळा, वजीरखेडे, ता. मालेगाव,
  • देवेंद्र वसंतराव वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, देवीचा माथा, ता.निफाड,
  • उत्तम भिकन पवार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, हनुमान वाडी, ता.नाशिक,
  • राजकुमार माणिकराव बोरसे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, साकोरा, ता.नांदगाव,
  • रवींद्र सुभाष खंबाईत, पदवीधर प्राथ. शिक्षक, मोहपाडा ता.पेठ,
  • संतोष बाळासाहेब झावरे, जिल्हा परिषद शाळा, आशापुरी(घोटेवाडी) ता.सिन्नर,
  • परशराम पंडीत पाडवी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा शिंदे (दि) ता.सुरगाणा,
  • बालाजी बिभीषण नाईकवाडी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडववाडी, ता. येवला,
  • अर्चना ज्ञानदेव गाडगे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, हेदुलीपाडा ता. त्र्यंबकेश्वर

000000

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम-अमृत महोत्सवी वर्ष’सांगतानिमित्त होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दि :9 (जिमाका)- ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह ,जलसंधारण कृषी, शिक्षण , विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम , कृषी, रस्ते विकास , पर्यटन, वैद्यकीय शिक्षण,  आरोग्य विभाग यांच्यामार्फतही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव,  जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेतला.

०००००

मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.तून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीपीआरमध्ये बाह्यरुग्ण विभाग इमारतीत मोफत होमिओपॅथिक तपासणी ओ.पी.डी. क्र.111 व कॅन्सर तपासणी ओ.पी.डी. क्र.119 चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ झाले.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात सुविधा नसल्याने कर्करोगी रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील पुणे, मुंबई व चांगल्या सुविधा मिळणाऱ्या खर्चिक ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. आता, याठिकाणी सर्वसामान्यांना कॅन्सर प्रकारातील तोंड, घसा, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, आतडे, किडणी व मुत्राशय कर्करोग यावरील उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच येथील उपचार फक्त बुधवारीच सुरू न ठेवता सोमवार ते शुक्रवार सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता श्री. गुरव यांना त्यांनी सूचना दिल्या.

अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी शासकीय रूग्णालयातील होमिओपॅथिक तपासणीची ओ.पी.डी. ही राज्यात प्रथमच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत रूग्णांची तपासणी करून मोफत औषध दिली जाणार आहेत. तसेच रुग्णांना कर्करोगावर मोफत  तपासणी व उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी अशा रुग्णांनी नियमित शिजवलेले अन्न खावे व नियमित व्यायाम करून आजारांना दूर करावे असे सांगितले. कर्करोगाच्या सर्वसाधारण लक्षणांवर दुर्लक्ष झाल्यास गंभीर आजार उद्भवतो म्हणून वेळेत तपासणी व निदान करावे असे पुढे सांगितले.

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी कर्करोगावर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञामार्फत मोफत तपासणी नियमित सुरू राहून कर्करोगावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत कॅन्सर उपचारासह निदान करून रूग्णास जीवदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. गिरीष कांबळे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर्स, कोल्हापूर न्यू इंटीग्रेटेड होमिओपॅथिक असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. शितल पाटील, सेक्रेटरी डॉ. चेतन गुरव तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय परिचारिका व कर्मचारी तसेच रूग्णांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ताज मुल्लाणी तर आभार प्रदर्शन डॉ. मिरगुंडे यांनी केले.

00000

जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’चा लाभ मिळणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक:9सप्टेंबर, 2023 (जिमाकावृत्त): नाशिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीर सावरकर हॉल, सावतानगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, रास्तभाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक रोड येथील पुरवठा अधिकारी कार्यालय आहे त्याच ठिकाणी ठेवून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. गौरी-गणपती, दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांना शिधा पत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणाडाळ व 1 किलो तेल या चार जिन्नसाचा समावेश असलेला संच वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रति शिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे केवळ 100 रूपयांत वितरीत केला जाणार असून जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.  त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांनाही याचा लाभ होणार आहे. शहरातील 230 रास्त भाव दुकानांतून या शिधासंचाचे वाटप होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा हा शिधा पत्रिकाधारकांचा हक्क असून प्रत्येक शिधा पत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोहचला पाहिजे, या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. येत्या दोन ते तीन दिवसांत रास्त भाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा वितरण पूर्ण करावे अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आंनदाचा शिधा वाटपाचा घेतलेल्या निर्णयामुळे सणांचा गोडवा निश्चितच वाढणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा संचाचे विरतण करण्यात आले.

000000

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 9: विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावे. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे. नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही श्री.पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षांपासून 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीत रोजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला कमी वाव होता. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षांपासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर  आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून परंपरेविषयी अभिमान निर्माण व्हावा असा प्रयत्न आहे. संस्कारावर भर, शालेय स्तरापासून व्यवसायाभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण या बाबींवरही लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी   नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्याची गरज आहे.  जगाला ज्ञानवान, कर्तृत्ववान आणि आपल्या कामाप्रति निष्ठा असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. असे विद्यार्थी घडावेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात 3 हजार 668 शाळा असून प्रत्येक गणातून 2 शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाभर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आले.

0000

 

कवठेमहांकाळ एस.टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली दि. 9 (जि.मा. का.):- सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे.  प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन  18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कवठेमहांकाळ बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय पाटील, तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कवठेमंकाळ आगार व्यवस्थापक आश्विनी किरगत, वाहतूक निरीक्षक अजिंक्य पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक शाहिद भोकरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अजितकुमार गोसराडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी या नवीन प्राप्त झालेल्या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.     

००००००

शासन आपल्या दारी उपक्रमामुळे कामगारांना मिळाली सुरक्षेची हमी…

‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरीत मिळावा हाच आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन आता थेट जनतेच्या दारी येत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात 10 जुलै, 2023 रोजी भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, धुळेमार्फत कामगारांना जोखमीचे काम करीत असतांना कामगारास शारिरीक इजा होऊ नये याकरिता मंडळामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमात 1 हजार 19 सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. या योजनेचा धुळे जिल्ह्यातील वंदना पांडुरंग पाटील (कापडणे, ता. धुळे), मंगलबाई संतोष पाटील (बाळापूर, ता.धुळे), विध्याबाई राकेश पाटील, (सौदाणे, ता. धुळे), भाऊसाहेब बापू मासुळे (गोताणे, ता.धुळे), नानाभाऊ शालिग्राम वाघ, नानाभाऊ पाटील (सैताळे, ता. जि. धुळे), आशा पाटील, मगंलाबाई निंबा पाटील (माळीच, ता. शिंदखेडा) यांच्यासह इतर नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीनं अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळाल्यामुळे आता बांधकाम साईटवर काम करताना त्यांना सुरक्षेची हमी मिळाली असल्याची भावना संबंधितानी व्यक्त केली आहे. कामगार विभागाच्यावतीने अत्यावश्यक संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, बॅटरी, मच्छरदाणी व बॅग दिली जाते. तर सुरक्षा संचात हेल्मेट, रिफ्लेक्टिव जॅकेट,सेप्टी हार्नेस, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअर प्लॅग, मास्क व सेप्टीहॅन्ड ग्लोज अस साहित्य दिलं जाते. मजुरी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचाऱ्यांना 10 हजार 240 रूपये किंमतीचे हे साहित्य घेणं परवडणारं नसतं त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. आता मात्र कामगार विभागाने हे साहित्य दिल्याने कामगार हरखून तर गेलेच आहेत पण त्यांना सुरक्षाही मिळालयाने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवयक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://mahabocw.in तसेच जवळच्या जिल्हा सरकारी कामगार कार्यालयात संपर्क साधावा.

 

जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

000000

 

अमरावतीत साकारणार नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

अमरावती, दि. 8 : विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत तोडण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची व अनुषंगिक नियोजनाची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केली. नवीन इमारतीचे बांधकाम कुठल्याही उणीवा न ठेवता, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासंबंधी आढावा डॉ. पाण्डेय यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, सहायक अभियंता तुषार काळे यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विभागीय आयुक्त कार्यालयाची जुनी शिकस्त इमारत पाडण्याचे काम नागरिकांना व कर्मचाऱ्यांना धुळीचा त्रास न होता, अगदी सुरक्षित व सुरळीतपणे करण्यात यावे. सभागृह क्रमांक एक व दोन मध्ये साउंड सिस्टम, एलईडी टि.व्ही. तसेच व्हिडीओ कॉन्फरसिंगकरिता प्रोजेक्टर इत्यादी यंत्रसामुग्री बसविण्यात यावीत. कार्यालयातील कंट्रोल पॅनलमधील चेंज ओव्हर बदलविण्यात यावे. कार्यालयातील सर्व स्वच्छतागृहांत एक्झॉस्ट फॅन बसविण्यात येऊन दर महिन्याला स्वच्छतेचा व किरकोळ दुरुस्तीचा आढावा घेण्यात यावा. दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे-जाणे सोयीचे होण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी विभागीय आयुक्तांनी इमारत बांधकाम करण्यात येणाऱ्या जागेची तसेच बैठक सभागृहाची व तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली.

बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे,दि.८:- असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने ‘पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे एस.आर.कुलकर्णी,  नंदू घाटे,  प्रमोद पाटील, अंकुश आसबे आदी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, बांधकाम क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.  बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देतात.  बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा.  संघटनेने त्यांच्या क्षेत्रातील कामगारांची,  महिला कामगारांची नोंदणी करावी. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळेल. मराठी माणसाने मराठी माणसाला व्यवसायामध्ये सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.सामंत यांनी व्यक्त केली. बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असून याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून लोकाभिमुख कामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व...

जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत बैठक

0
मुंबई, दि. २१ : अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...