बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1220

बोरीवली पश्चिम येथे ३ जून रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर

मुंबई, दि. 31 : बोरीवली पश्चिम येथील साईली इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि.3 जून रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवली, जि.मुंबई उपगनर यांनी इयत्ता दहावी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती तसेच याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होण्याकरिता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर साईली इंटरनॅशनल स्कूल, एम.एच.बी. कॉलनी जवळ, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई – 400091 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होईल.

या शिबिरास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री श्री. लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अस्लम शेख आणि संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण दिगांबर दळवी, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई, किशोर खटावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई उपनगर प्रदीप दुर्गे,सहाय्यक आयुक्त, कौशल्य, रोजगार उद्योजकता नावीन्यता विभाग, मुंबई, रवींद्र सुरवसे, यांची प्रमुख उपस्थिती राहील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून पहिल्या आलेल्या डॉ. कश्मिरा संख्ये यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रा.डॉ.दिनेश गुप्ता, लेखक अल्मेडा रॉबर्ट, समन्वय तज्ञ, राज्य कल मापन समिती यांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे. इ.10 वी व इ.12 वी उत्तीर्ण तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवलीचे, प्राचार्य अनिल एम. सदाफुले यांनी केले आहे.

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 31 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती  महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात  प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

मुंबई, दि. 31 : शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून  ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालक श्री. मोहितकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने, राज्यातील तंत्रनिकेतनांद्वारे “स्कूल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी आपले योगदान दिले आहे.

तसेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन 9 शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये  2हजार 460 प्रवेशक्षमतेचे  न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 41 टक्के, 2019-20 मध्ये 50 टक्के, 2020-21 मध्ये 60 टक्के व 2021-22 मध्ये 70 टक्के होती. तर 2022-23 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येची सरासरी टक्केवारी 97 टक्के आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता एकुण 375 संस्थांची प्रवेशक्षमता जवळपास 1 लाख आहे.

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमातून राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहेत.

पदविका प्रवेश प्रक्रिया :

10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.

सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्त्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपटदेखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.

जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिनमधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

*****

काशीबाई थोरात/विसंअ/

पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. ३१ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा – १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक – १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांतील प्रलंबित कामांसह विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

पैठण तालुक्यातील १० गावांमधील प्रकल्पबाधितांच्या २६ नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुतुबखेडा, तांदूळवाडी, तुळजापूर, अमरापूर, पिंपळवाडी पि., तारुपिंपळवाडी, आगरनांदूर, घेवरी, लाखेफळ, इसारवाडी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवाव्यात. प्रकल्पबाधित गावांमध्ये न झालेल्या कामांची चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरून संबंधित कामे तातडीने करण्यात येतील, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

0000000

राजू धोत्रे/विसंअ/

निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निळवंडेच्या कामाला गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 शिर्डी, दि. ३१ (उमाका वृत्तसेवा) :- निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा  विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोगले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी  मंत्री मधुकरराव पिचड, अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड आदी उपस्थित होते.

या शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने ११ महिन्यांच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तत्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ६ लाख ८ हजार हेक्टर  जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकऱ्यांना ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. ‌ एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली  आहे.

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुपटीने मदत देण्यात आली‌ . राज्याने २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा २ सुरू करण्यात आला आहे. ‘निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना ५३ वर्षे वाट पाहावी लागली. आता ही प्रतीक्षा फक्त या शासनाने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

‘निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे.  सुरूवातीला ८ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा  झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची  सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली‌.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम  पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली‌.

महसूलमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे‌. आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करूया. पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.

यावेळी खासदार श्री. लोखंडे, माजी आमदार श्री. पिचड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

मुंबई, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. १ जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, २ जून रोजी राजस्थानी लोककला, ३ व ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दि.2 व 6 जून 2023 रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येणाऱ्या शिवभक्त जनतेसाठी अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसह त्यांच्या स्वागत आणि  तत्पर सेवेसाठी  प्रशासन सज्ज झाले आहे. या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहता रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा

नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 4 तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 16 ॲब्म्युलन्स  सज्ज ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण 24 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून 104 डॉक्टर्स व 350 आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सोहळ्यावर राहणार सीसीटीव्ही, ड्रोनचे लक्ष

सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदि साधन-साहित्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी  नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.

अग्निशमन व्यवस्था सज्ज

पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक  ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

शिवभक्तांच्या वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था; एसटीच्या 150 बसेस तैनात

संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गाने येणाऱ्या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनातर्फे मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे व वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह व शौचालय, स्वच्छता, कचरा, परिवहन, पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचे  नियोजन करण्यात आले  आहे.

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक, विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार – राजदूत डॉ. राल्फ हेकनर

मुंबई, दि. 31 : भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंडसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य असून भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वित्झर्लंड प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ. राल्फ हेकनर यांनी केले आहे.

डॉ. राल्फ हेकनर यांनी मंगळवारी (दि. 30) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथे नुकतीच आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा, याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांसाठी एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.

या व्यासपीठावर आयआयटी सारख्या संस्थांनादेखील घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो 22 देशांमध्ये राबविला जाईल, असेही ते म्हणाले.

“स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाची व्यापार, आरोग्य विषयक कार्यालये आहेत. तसेच दावोस येथे दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद होते. या दोन्ही ठिकाणी भारताचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे भारताच्या मताची  दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते”, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोवर भारताला विकसित राष्ट्र करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे नमूद करून या उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारत – स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार होणे आवश्यक असल्याचे हेकनर यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील, याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ. हेकनर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गानंतर स्विस दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड मात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेकनर यांनी भारताचे आभार मानले. स्वित्झर्लंडला भारताकडून अधिक गुंतवणूक तसेच नाविन्यता व संशोधन सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंड येथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण केल्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन लाख भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड भारताचा 11 वा मोठा गुंतवणूकदार देश असून मुंबईतील वाणिज्य दूतावास 108 वर्षांपासून कार्यरत असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्यप्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल,असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत मार्टिन माईर हे देखील उपस्थित होते.

००००

Swiss Ambassador Dr Ralf Heckner meets Maharashtra Governor

Says Switzerland will create Innovation Platform for businesses, universities

 

Mumbai Dated 31 : Stating that 330 Swiss companies are working in India, with half the companies operating in Maharashtra, the Ambassador of Switzerland to India Dr Ralf Heckner said that country is contemplating on creating an ‘Innovation Platform’ where businesses and universities will work together.

He said such platform will have premier institutions like IITs on board. He said that if the experiment succeeds, it will be replicated in 22 other countries.

The Ambassador was speaking to Maharashtra Governor Ramesh Bais during a courtesy call at Raj Bhavan Mumbai on Tuesday (30th May).

The Ambassador told the Governor that he had met the heads of public and private universities in Pune. He added that Switzerland is looking forward to investment and innovation from India.

The Ambassador told the Governor that Switzerland is working closely with India to ink a Free Trade Agreement (FTA). He said FTA will help India realize Prime Minister Narendra Modi’s dream of making India a developed nation by 2047.

Welcoming the Ambassador to Maharashtra, Governor Ramesh Bais spoke of promoting university level collaboration between Maharashtra and Switzerland and stressed the need to promote student- exchange, faculty -exchange and cultural exchange. The Consul General of Switzerland in Mumbai Martin Maier was also present.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि.31 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकारमंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सहकारमंत्री श्री. सावे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. अहिल्यादेवींनी घाट बांधणे, विहिरी, तलाव, मंदिरे यांचे बांधकाम करून चांगले उपक्रम राबवून समाजकार्य केले. बांधलेली मंदिरे सुरक्षित ठेवण्यासह समाजोन्नतीसाठी प्रयत्न केले असून त्यांचा आदर्श ठेवायला हवा, असे श्री. सावे म्हणाले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.स

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

०००

प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 30 (जिमाका) –  फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालये उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक आहे. या सुविधांचा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यत सर्वांना आनंद घेता येईल व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्कचे नूतनीकरणानंतर लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्यांची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त श्री. नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार्कमधील लेझर शो चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबई व महामुंबई क्षेत्रातील ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठा समुद्रातील महामार्ग असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे मुंबई ते नवी मुंबई, रायगड हा परिसर जवळ येणार आहे.

राज्य शासन लोकांसाठी काम करत असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यात एकाच वेळी ७०० ‘आपला दवाखाना’ सुरु करण्यात आले आहेत. आजच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी नमो सन्मान योजना व एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाही चांगले काम करत आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देत आहे. येथील प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात बैठक घेऊ, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

आमदार व माजी मंत्री श्री. नाईक म्हणाले की, सिडको व औद्योगिक विकास महामंडळाला जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या व इतर मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात यावी.

आमदार श्रीमती म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून कामे केल्यामुळे येथील विकास कामे झाली आहेत. नवी मुंबईत स्वतःचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीचा निर्णय घेण्यात यावा.

आयुक्त श्री. नार्वेकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रस्ताविक केले.

 

नूतनीकृत वंडर्स पार्कची वैशिष्ट्ये

  • प्रवेश तिकिटे व राईडची तिकिटे स्मार्ट कार्ड पद्धतीने देणार
  • पाच खेळण्यांच्या जागी 7 खेळण्यांचा समावेश
  • सीसीटीव्हीची सुविधा
  • एलईडी लाईटची व्यवस्था
  • खुल्या तळ्यातील मल्टिमीडिया लेझर शो प्रमुख आकर्षण

 

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट

  • अमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटची उभारणी
  • ऐरोली व कोपरखैरणे येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 दललि क्षमतेचे प्लांट
  • केंद्र, राज्य व महापालिका यांच्यामार्फत एकत्रितपणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे
  • या प्रकल्पामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन व अल्ट्रा व्हायोलेट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
  • पुनर्प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक संस्थाना देण्यात येणार
  • औद्योगिक संस्थांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये बचत

वाशी बहुद्देशीय इमारत

  • गरीब व गरजू लोकांसाठी वाशी सेक्टर 3 मध्ये बहुद्देशीय मंगल कार्यालयाची उभारणी
  • यामध्ये पार्किंग व्यवस्था, स्टोअर रुम, किचन रुम, तीन वातानुकुलित सभागृहे
  • स्पोर्ट क्लब, नगरवाचनालय, मुक्ती संघटना रुम, एनएममंडळ रुमची व्यवस्था

मध्यवर्ती ग्रंथालय

  • वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती
  • तळमजला अधिक चार मजल्यांची पर्यावरण पूरक हरित इमारत
  • पुस्तकांचा प्रवास दर्शविणारे लक्षवेधी प्रदर्शन
  • ग्रंथविषयक उपक्रमांसाठी 130 आसन क्षमतेचे सभागृह
  • दृष्टिहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग
  • भाषा प्रयोगशाळा
  • व्ह्युईंग गॅलरीची आकर्षक रचना
  • मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्यकृती उपलब्ध होतील.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...