बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1219

शाश्वत पाणी पुरवठयासाठी अटल भूजल योजना

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली पाण्याची गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यावस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल  व्यवस्थापन अधिकाधिक सक्षम करण्यासाठी केंद्रशासन व जागतिक बँक यांच्या  संयुक्त विद्यमाने 100टक्के निधी पुरस्कृत अटल भूजल योजना दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी घोषणा करण्यात आली. राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक आहे. फळ बागायत तसेच कृषी क्षेत्राकरिता होणारा उपसा देखील मोठया प्रमाणावर आहे. परिणामी या भागाची भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्यामुळे या क्षेत्रातील पाणलोट क्षेत्र अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट होतात. अशा भागातील सिंचन विहिरीची क्षमता कमी झाल्यामुळे खोल विंधन विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भूजलाच्या उपलब्धतेवर मागणी आधारित व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने जिल्हयात केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना लागू करण्यात आली आहे. अटल भूजल योजनेमध्ये सातारा जिल्हयातील एकूण 97 ग्रामपंचायत व 115 गावांचा समावेश आहे.

अटल भूजल योजनेचे उदिष्टे

(1) मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना ) व पुरवठा (जलसंधारण व भूजल पुनर्भरण) व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठयात शाश्वतता आणणे.

 (2) सद्यःस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना मनरेगा, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, इत्यादीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्राभिमुखता साध्य करणे.

(3) भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता राज्य, जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे.

 (4) सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे.

 5) सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे.

अटल भूजल योजनांमधून एककेंद्रांभिमुखता साधण्यासाठी व अटल भूजल योजनेच्या प्रगतीचा जिल्हास्तरावरील आढावा घेण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अटल भूजल योजना समिती गठीत करण्यात आली आहे. अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमुळे केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्राभिमुखता (Convergence) साधावयाची असल्याने या योजनेची अंमलबजावणी 13 जिल्हयामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

अटल भूजल योजने अंतर्गत माहिती शिक्षण संवाद अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम

  1. अटल भूजल योजनेचे स्वागत फलक 2.गाव सहभागीय मूल्यांकन (PRA )सर्वेक्षण 3. शिवार फेरी 4. ग्रामसभा 5. जनजागृती बैठका ६ गृहभेटी ७.कोपरा सभा ८. शालेय विद्यार्थ्याची प्रभातफेरी 9. शालेय स्तरावर जनजागृती 10. चित्ररथ 11. प्रदर्शन 12. विशेष दिन साजरा 13. फिल्म शो 14. समाजमाध्यमे 15. पोस्टर 16 घडीपत्रिका17. पॅम्लेट 18. पथनाटय 19. कार्यशाळा 20. प्रशिक्षण आदि सामाजिक उपक्रमाची अंमलबजावणी करून लोकसहभाग व महिला सहभाग मोठया प्रमाणामध्ये साध्य करण्यात आलेले आहे.

लोकांना माहिती देणे, त्यांना शिक्षित करणे व त्यांच्याशी पाणी वापरासाठीचे पद्धती बदलासाठी संवाद साधणे यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात आला. लोकांना प्रभावी संवादाद्वारे शिक्षित करणे हा एकमेव उद्देश आहे. लोकांना एकत्रित करणे, त्यांच्यात वर्तन बदल घडवून आणणे, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेणे अशी अनेक कामे माहिती, शिक्षण व संवादातून घडत असतात. शासनाकडून पुरवठा आधारित धोरण बंद करून मागणी आधारित कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे माहिती, शिक्षण व संवादाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकांनी स्वतः निर्णय घ्यावेत, त्यांच्या वर्तनात सकारात्मक वृद्वी व्हावी आणि त्यांच्या सामाजिक स्थितीत बदल व्हावेत हे अपेक्षित आहे.

  1. समर्थन– कार्यक्रमाची उद्दिष्टे व विकासाचे लक्ष साध्ये करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती साठी नेतृत्वाला माहिती देणे व लोकांना प्रोत्साहित करता आले.
  2. सामाजिकगतीशीलता -मागणी वाढविण्याकरिता किंवा विकासाच्या उद्देशाच्या दिशेने प्रगती करताना समाजाला, समाजातील संस्थांना, समूहांना, संलग्न करता आले व त्यांना माहिती देता आली.
  3. वर्तणूक बदलासाठी संवाद– लोकांच्या शाश्वत वर्तन बदलासाठी त्यांच्या प्रत्यक्ष सहभागासाठी समोरासमोर

वैयक्तिक व गटस्तरावर अंतर व्यक्ती संवाद साधता आले. यामुळे लोक व महिला सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये साध्य करता आले.

एकंदरीतच गावपातळीवर विविध विकास कामामध्ये व वर्तन बदलासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करत असताना नियोजन, अभ्यास व योग्य धोरणाची अंमलबजावणी करता आली व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोईचे झाल्याचे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक व्यक्त करतात.

राज्यात आजपासून उन्हाळी कांदा नाफेड मार्फत खरेदीचा शुभारंभ – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक दि. 31 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू झाली असून आज 1 जून 2023 रोजी देवळा तालुक्यातील उमराणे  येथे  कांदा खरेदी केंद्रावर उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असून या समारंभास  आमदार डॉ. राहुल आहेर, कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून नाफेड व भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे.

नाफेड मार्फत कांदा खरेदी व्हावी यासाठी अनेक शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या वारंवार होणाऱ्या पाठपुरवाची दखल घेऊन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी, यासाठी मंत्री गोयल यांच्याशी चर्चा करून कांदा खरेदी सुरू करण्याबाबत आग्रहाची मागणी केली होती. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात १४ फेडरेशन व नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत त्याचप्रमाणे पुणे, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव,

अहमदनगर या जिल्ह्यातही प्रत्यक्ष कांदा खरेदीला सुरवात होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

नाफेड व एनसीसीएफ ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून भाव वाढावा म्हणून नाफेड खरेदी करीत नसून कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग, (DOCA), ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.

महाराष्ट्रात यावेळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे नाशिक जिल्ह्यात राज्यातील ८० टक्के कांदा खरेदी विक्री केला जातो. याचा परिणाम भावावर होत असून दर घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा  कमी दराने विक्री लागत होता. अशा  प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपभोक्ता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे देखील पाठपुरावा केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी कळविले आहे.

000

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेच्या आढाव्यासाठी स्वतंत्र समिती नेमणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ३१ : जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेच्या आढाव्यासाठी जिल्हास्तरावर शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र समिती नेमण्यात येईल आणि समितीकडून दर तीन महिन्यांनी योजनेच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या आढाव्याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, शेळ्या मेंढ्यांचे गट पुरविणे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वास्तविक मिळालेल्या लाभाबाबत माहिती घेण्यात यावी. पुढील बैठकीत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत नागरिकांना दिलेल्या लाभाची सविस्तर माहिती देण्यात यावी. लोकप्रतिनिधींकडून आदिवासी भागातील विकासकामांची माहिती घेऊन तेथील सुविधा निर्मितीकडे लक्ष देण्यात यावे. यासाठी निधी कमी पडल्यास सर्वसाधारण योजनेतून निधी देण्याबाबत विचार करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी झालेल्या खर्चाची आणि २०२३-२४ च्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000

शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ३१ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली शाळा आणि अंगणवड्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शाळा वर्गखोली, स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, वाचनालय आदी सुविधांच्या प्रस्तावित ४०० कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी. १५ जूनपर्यंत कामांना सुरुवात करण्यात यावी. मनरेगा, स्वच्छ भारत अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाडी कामाबाबत गावनिहाय माहिती सादर करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित खर्च सादर करण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल. जुलैच्या प्रारंभी शाळा व अंगणवाडी कामांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्तावही सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात साथजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या कालावधीत रजेवर जाऊ नये याबाबत सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. वाघमारे यांनी गतवर्षी झालेल्या शाळा, अंगणवाडी बांधकाम तसेच रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000

जुने रस्ते-पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल पंधरा दिवसांत सादर करा – विभागीय आयुक्त निधी पाण्डेय

अमरावती, दि. 31 : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सूनपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय पवार तसेच पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे यावेळी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जुने रस्ते, पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. ज्याठिकाणी दुरुस्ती करावयाची आहे त्याठिकाणी आताच दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्यात यावा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हाणी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. त्यानुसार पावसाळ्यातही जलद सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने तयारी ठेवावी. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफ ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषदेची की जलसंधारण विभागाची याबाबत स्पष्टता निर्माण होण्यासाठी ही बाब वरिष्ठ स्तरावरून तपासून स्वतंत्रपणे आदेश तत्काळ निर्गमित करण्यात येतील. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी.जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी.

धरणातील जलसाठ्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी यावेळी बैठकीत माहिती दिली.

000

सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि.३१ : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूरची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हाणी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे,  तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामू तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांनी आज सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

000

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 31 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. डॉ. संखे यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. संखे या महाराष्ट्रातून पहिल्या, तर देशातून 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 1 जून, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

मुंबई दि. 31 : बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान

मुंबई,दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये  सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ

मुंबई, दि. 31 : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना त्रिमूर्ती प्रांगणात तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

सामाजिक न्याय विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्ती सापशिडीचे  आयोजन करण्यात आले होते. तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, पोस्टर्स, पत्रक  मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात लावण्यात आले होते. नशाबंदी मंडळ व आरोग्य आयुक्तालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

******

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...