मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1214

युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली दि. 1 (जि.मा.का.) : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 607 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून 527 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 171 उमेदवारांची अंतिम अशा एकूण 698 उमेदवारांची निवड केली आहे. रोजगार मेळाव्यातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्रे वितरीत करण्यात आली.

            या रोजगार मेळाव्याचा समारोप समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे,मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. मोहन वनखंडे, तहसिलदार अपर्णा मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध  कंपन्यांचे प्रतिनिधी आणि, रोजगार प्राप्त उमेदवार उपस्थित होते.

युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी

            रोजगार मेळाव्यातून विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शुभेच्छा देवून जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा संदेश दिला. आपल्या निवडीच्या ठिकाणी रूजू होवून प्रामाणिक सेवा बजावा. आपले व आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक करा. या मेळाव्यात कंपन्यांनी आपल्या दारात येवून नोकऱ्या दिल्या आहेत. शासन आपल्या दारी ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारत आहे, असेही त्यांनी सांगितले.

            रोजगार मेळाव्यात 69 कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने टाटा ऑटोकॅम्प सिस्टम लि., एस. के. एफ. इंडिया प्रा. लि., टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा प्रा. लि., सिपला प्रा. लि., भारत फोर्ज लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. मेमन, महाबळ मेटल प्रा. लि., घोडावत कन्झ्युमर लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि.,किर्लोस्कर ब्रदर्स लि. अशा विविध कंपन्यांचा समावेश होता. रोजगार मेळाव्यात कंपन्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी  सर्व सहभागी कंपन्यांना धन्यवाद दिले.  कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

            नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या नोंदविण्यासाठी www.sureshkhade.com  हे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून या वेब पोर्टलचे अनावरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या समस्या या वेब पोर्टलवर नोंदवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000000

दिलखुलास कार्यक्रमात मंडळाधिकारी वैशाली दळवी, तलाठी राजू मेरड यांची मुलाखत

मुंबईदि. १ : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजनांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी करून माणिकदौंडी मंडळ कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामकाजाबद्दल मंडळ अधिकारी वैशाली दळवी आणि तलाठी राजू मेरड यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2022-23 शासकीय कर्मचारी गटातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी दिलखुलास‘ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतशुक्रवार दि. 2 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आहे.

000

आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती करण्याबाबत लवकरच निर्णय – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबईदि. १ : शासकीय नोकर भरतीमध्ये महिलांकरिता ३० टक्के आरक्षण आहे. या पदभरतीमध्ये महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेवून महिला व बालविकास विभागाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईलअशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी महिला आरक्षणासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकरएकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहिला व बालविकास विभागाकडून महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला व बालविकास विभागाने ही कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 

000

संध्या गरवारे/विसंअ/

केंद्र शासनाच्या पथकाने केली जलशक्ती अभियानाच्या जिल्ह्यातील कामांची पाहणी

ठाणे, दि.01 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान -कॅच दी रेन अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या तथा या अभियानाच्या नोडल अधिकारी जागृती सिंगला यांनी आज केली.

            केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी निती आयोगाच्या सदस्या तथा नोडल अधिकारी श्रीमती सिंगला या ठाणे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी काल जिल्ह्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणेची आढावा बैठक घेतली. आज त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत भिवंडी तालुक्यातील कोनगाव, खळिंग, कोशिंबे गावांतील विविध कामांची पाहणी केली.

      जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाकडून अमृत सरोवर अंतर्गत करण्यात आलेल्या गाळ काढणे, बंधारे इत्यादी कामांचा तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेल्या डीप ऍक्वेफेर (खोल भूस्तर) पुर्नभरण कामांची पाहणी केली. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या बोअरवेलद्वारे छतावरील पावसाचे पाणी संकलन (Rooftop Rain Water collection (recharge) through bore well with auto clean centrifugal force operated Filter) या योजनेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.  अशा प्रकारची जास्तीत जास्त कामे घेऊन भूजलस्तर वाढविण्यात यावे, अशा सूचना केल्या. या योजने बाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे व उप अभियंता (यांत्रिकी) संजय सुकटे यांनी माहिती दिली.

            सद्यःस्थितीत या योजनेची 25 कामे पूर्ण झाली असून 13 कामे प्रगतीत असल्याचे सांगितले. यापुढील राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील लघु नळ योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट करुन भुजलाची पातळी वाढविण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी  मनुज जिंदल यांचा मानस असल्याचे सांगितले.

000000000

जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ७५ फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारणीसाठी प्रयत्नशील – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि १(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय येथे 75 फूट तर काही ठिकाणी सुमारे 45 फुट राष्ट्रध्वज येत्या 15 ऑगस्टपर्यंत उभारणीसाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यातील लांजा, दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या तालुका मुख्यालयाच्या तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी एकाच वेळी हा ध्वज उभारणीचा अभिनव उपक्रम राज्यात पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरित्या सामील व्हावे, असे आवाहन करुन        या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी 14 ऑगस्ट पूर्वी करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  याप्रसंगी  पालकमंत्र्यांनी संबंधित प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

 दोषींवर पोलीस विभागामार्फत कारवाई करणार

जिल्ह्यात उमेद अभियानाचे समाधानकारक काम आहे परंतू काही बचत गटांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) चा आढावा त्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकाही शुभांगी साठे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालिका (DRDA) नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.  जिल्ह्यात उमेद अभियानामध्ये कितीजण कार्यरत आहेत अशी विचारणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच या सर्वाचे मानधन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.

राज्यात सन 2012 मध्ये हे अभियान सूरू करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५ हजार ७०९ बचत गट कार्यरत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती घाणेकर यांनी दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या प्रमुखांसह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 विविध विकासकामांचा आढावा

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील वाटद व पावस जिल्हा परिषद गटांच्या विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकासकामे सुरु करण्यात यावीत तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजना संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर सुरु करण्याला प्राधान्य द्यावे. या जिल्हा परिषद गटातील विकासकामे करताना संबंधित यंत्रणेने, अधिकाऱ्यांनी त्या गावातील सरपंचांना कल्पना द्यावी व समन्वयातून विकासकामे पार पाडावी, अशी सूचना करुन या जि.प. गटातील रस्त्याची जी कामे अपूर्ण आहेत ती डिसेंबर महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

श्री. सामंत यांनी यावेळी अपूर्ण व खराब रस्ते, प्रस्तावित नळपाणी योजना, शाळा कम्पाऊंड, दलित वस्ती सुधारणा, समाज मंदिर पेवर ब्लॉक बसविणे, अपूर्ण नळपाणी पुरवठा योजना तसेच प्रस्तावित कामे आदींबाबत संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल ओटवणेकर, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सावंत देसाई यांच्यासह संबंधित गावाचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

——

जून अखेर शिष्यवृत्ती वितरीत करा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि 1 (जिमाका):- येथील शिक्षण संस्थामधील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या 30 जून पर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता येईल याचे सुयोग्य नियोजन संबंधित विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शिष्यवृत्ती वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

ते पुढे म्हणाले सन 2022-23 या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम जमा आहे. या शिष्यवृतीमध्ये 60 टक्के केंद्राचा तर राज्य सरकारचा 40 टक्के इतका वाटा आहे, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. याच्या अनुषंगाने 10 जूनपर्यंत संस्था चालक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली

समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाच्या अनुषंगाने गुगलशीटमध्ये सर्व माहिती भरून ती यादी अद्ययावत करावी, अशी सूचना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केली.  या आढावा बैठकीसाठी अभिजित हेगशेट्ये अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जे. पी जाधव, सहा आयुक्त (समाज कल्याण) यादव गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) श्रीकांत व्हडे, (प्राथमिक) शिक्षणाधिकारी  सुनिता शिरभाते यांच्यासह  संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

——

पर्यटन, कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि‌. १ :- जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग यांचे स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या समवेतच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी जपानच्या भारतातील दूतावास मंत्री श्रीमती हुकुगो क्योको, श्रीमती होम्मा मायू, दूतावास सचिव उसामी कोईची, मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख फुकाहोरी यासुकाटा, राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

या चर्चेत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्राकडे उद्योग आणि गुतंवणुकीची दृष्टीने मोठी क्षमता आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाठबळ मिळत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पाही आम्ही आता त्याच वेगाने गतीमान केले आहे. जपानकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. तर आमच्याकडे कुशल असे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आपण एकत्र आलो तर खूप मोठा बदल घडवू शकतो. हे एमटीएचएल या भारतातील सर्वात लांबींच्या समुद्री सेतुचे उभारणीतून आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील विविध औद्योगीक वसाहती आणि प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्वपूर्ण ठरू शकते. अशाच सहकार्यातून आपण मुंबई हे शहराला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक व उद्योग संधीसाठी जपानचे स्वागतच असेल असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अजंठा लेणी परिसरात बुद्धीस्ट सर्कीट संकल्पनेतून पर्यटन सुविधा उभारल्याचेही माहिती दिली. तसेच राज्यातील विधिमंडळ सदस्यांनी नुकतीच जपानला भेट देऊन विविध क्षेत्रांची उपयुक्त माहिती घेतल्याचे सांगितले.


यावेळी चर्चेत जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ‘स्ट्रांग लीडरशीप’ असा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, मुंबई विषयी आमच्याकडे मोठे कुतुहल आहे. महाराष्ट्रातही आम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या संधी दृष्टीपथात आहेत. विशेषतः पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी या क्षेत्रातील आपल्याला एकत्र काम करता येईल. मुंबई आणि योकोहामा या शहराचे दृढ संबंध आहेत. सिस्टर सिटीज् म्हणून या दोन्ही शहरांमध्ये अदानप्रदानही सुरु आहे. या दोन्ही शहरांच्या विकासासाठी आम्हाला विविध संकल्पना राबवण्यात रस आहे. जपान-भारत संबंध आणि मुंबई-योकोहामा या दोन शहरांचे बंध दृढ व्हावेत यासाठी इन्डो-जपान सोसायटीच्यावतीने आगामी काळात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. एमटीएचएल हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनीही दिल्ली-मुंबई कॉरिडॉर तसेच त्यावर विकसित करण्यात येणाऱ्या औद्योगिक नगरींची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गगराणी, श्रीमती म्हैसकर-पाटणकर, प्रधान सचिव श्री. सिंह यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

जपानचे वाणिज्यीक दूतावास प्रमुख श्री. यासुकाटा यांनीही जपान आणि ‘जायका’च्या वित्तीय सहाय्यातून सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.सुरवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांचे हिमरू शाल आणि भगवान बुद्धांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. श्री. हिरोशी यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना जपानी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र भेट दिले.

000

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारावी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी समाविष्ट करून घेण्यात आले त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको मध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऐरोली – कटाई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या आणि जाण्यासाठी मार्ग, पामबीच – घनसोली ऐरोली रस्त्याचे कामासह मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

तसेच यावेळी बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी वाशी येथे होणारे महाराष्ट्र भवन उत्तमरित्या साकारावे. हे भवन राज्याच्या संस्कृतीचे ओळख करून देणारे असावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : – पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी  दुप्पट केला आहे, हा निधी तत्काळ वितरीत करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियंत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आय़ुक्त सौरभ राव, अक्षय महाराज भोसले तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवावी. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करावे. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्यावी. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्यावी. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवावी. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करावे. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल दिसता कामा नये याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार वारी..

जी-२० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवावे, त्यासाठी उत्तम नियोजन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री श्री. विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग घेतला. वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत पुणे विभागीय आयुक्त श्री. राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता ६० टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती श्री. राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते.

०००

शिवविचारांचा जागर जगभर पोहोचणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकर्पित करण्यात आले. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोधचिन्हाचे कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जिथे – जिथे मराठी माणूस आहे तिथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत यासाठी राज्य शासनाने विविध  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी खास हा लोगो (बोधचिन्ह) वापरण्यात येणार आहे.

शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणारे संदर्भ या बोध चिन्हाचे वैशिष्ट्य असून राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील कदम यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. जगातील कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक शिवप्रेमी या माध्यमातून जोडला जावा आणि महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...