सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1210

आवडीच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करुन विकास साधा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

          जळगाव, दि. २ (जिमाका वृत्तसेवा) :- विद्यार्थी व युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्राचे कौशल्य प्राप्त करुन आपला विकास साधावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

          शासन आपल्या दारी अभियानातंर्गत कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागमार्फत शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगांव यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय अॅण्ड लॉन्स, धरणगाव येथे इयत्ता दहावी, बारावी पास विद्यार्थी व बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होणेसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. ना. मुकणे, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, उप जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी. एम. डोळस, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगावचे प्राचार्य नवनित चव्हाण, प्रा. नवनित पाटील, ॲड जुबेर शेख, ॲङ व्ही. एस. भोलाणे, श्रीमती शुभांगी पाटील आदि उपस्थित होते.

          पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासन युवक व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करुन देत आहेत. विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून कौशल्य प्राप्त केले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात जिद्द आणि चिकाटी ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळते असे सांगून या शिबिरांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे युवकांना उद्योजक बनण्याची संधी आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावे. छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

          या शिबीरात श्री. मुकणे यांनी कौशल्य विकास, प्रा. नवनित पाटील यांनी करीअर मार्गदर्शन, ॲड शेख यांनी उद्योजकता विकास, ॲड भोलाणे यांनी विविध विषयावर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. सुरुवातीस कौशल्य विकास विभागामार्फत लावलेल्या प्रदर्शनाची पाहणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. शिबिरास तालुक्यातील युवक, विद्यार्थी, पालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मेळघाटातील नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून त्यांच्या अडचणी सोडवा- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 2 : मेळघाटात कुपोषण निर्मलूनाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योगव्यवसाय, पायाभूत सुविधा आदीसंबंधी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. अधिका-यांनी नियमितपणे मेळघाटातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी गाभा समिती व ‘मिशन मेळघाट’ची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी विजय भाकरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपायुक्त संजय पवार, राजीव फडके हे विभागीय आयुक्त कार्यालयात, तर सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. त्यासाठी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावतानाच तेथील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व विभागांच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिका-यांनी वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर कराव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून योजना राबविणे आवश्यक आहे.

येता पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी दिले. त्या म्हणाल्या, पावसाळ्यात संपर्क तुटणा-या गावांमध्ये धान्य व आवश्यक वस्तूंची, तसेच पुरेसा औषधसाठा आदी तजवीज ठेवावी. प्रदूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक व्यवस्था करावी. जुने रस्ते, पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी व कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसांत द्यावा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

शासकीय योजना, सुविधा व सेवांच्या अधिक परिणामकारकतेसाठी विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मेळघाटसाठी धारणी येथील उपविभागीय अधिका-यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम करावे व मेळघाटातील विविध विभागांच्या कामांचा नियमितपणे घ्यावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

मेळघाटसाठी समग्र विकास आराखडा तयार करणार

अधिका-यांनी नागरिकांमध्ये स्वत: मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यासाठी मेळघाटातील गावांमध्ये विविध विभागाच्या अधिका-यांनी स्वत: मुक्काम करून नागरिकांचे म्हणणे समजून घ्यावे. तेथील शेती, गावपातळीवरील सुविधा, अडचणी, आवश्यक सुधारणा यांची माहिती घ्यावी. या भेटीत प्राप्त सूचना, मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व विभागांच्या अधिका-यांची बैठक चिखलदरा येथे लवकरच घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी सांगितले. मेळघाटातील गावांमध्ये भेटी देणा-या अधिका-यांना तेथील आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदी आवश्यक सुविधांबाबतचा एक प्रोफार्मा तयार करून देण्यात येईल. त्यानुसार प्राप्त माहितीवर समग्र विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे श्री. भाकरे यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर विविध विभागांमध्ये नियुक्त जिल्हास्तरीय अधिका-यांनी दर पंधरवड्यातून एकदा मेळघाटात भेट द्यावी व विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अपेक्षा जाणून त्यानुसार कार्यवाही करावी, असे आवाहनही करण्यात आले.

‘स्मार्ट’ प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादन कंपन्यांना मिळते अनुदान

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत बारामती तालुक्यातील कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या प्रयत्नातून मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे सांगवी येथील नाथसन शेतकरी उत्पादन कंपनीला १ कोटी १२ लाख ६१  हजार रुपयांचे अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मंजूर करण्यात आला आहे.

सांगवी गावात १५ युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नाथसन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. सुरुवातीला पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर औषधे विक्री,  बियाणे विक्री,  खते विक्री असे नियोजन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. शेतकऱ्यांला अधिक लाभ मिळावा म्हणून भाजीपाला आणि फळांवर प्रक्रीया करून तयार झालेली अन्न उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे दीड कोटी आहे. त्याचबरोबर कंपनीच्या मालकीचे कृषि सेवा केंद्र आहे.

नाथसन शेतकरी उत्पादन कंपनीने मुल्यसाखळी उप प्रकल्पासाठी प्रक्रिया कारखाना इमारतीस इतर यांत्रिक सुविधांसाठी एकूण २ कोटी ५३  लाख रुपयांच्या खर्चाचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. कृषि विभागाच्या समितीने शासकीय मापदंडानुसार १ कोटी ८७ लाख ६८ हजार रुपये ग्राह्य धरुन मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत १  कोटी १२  लाख ६१ हजार रुपये अनुदान मंजूर केले. यामुळे प्रक्रीया उद्योगाच्या दिशेने कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहे.

लहान शेतकरी आणि नवउद्योजकांना फायद्याचा प्रकल्प

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषि नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मुल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. जागतिक बँक, राज्य शासन आणि खासगी उद्योग क्षेत्र (दायित्व निधीतून) हे निधीचे स्त्रोत असून प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी 7 वर्षाचा आहे.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्प आणि कृषि विभागाचे अन्य उपक्रमाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी आणि आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाअंतर्गत महिला बचत गटांचे प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत लोक संचालित साधन केंद्र, सहकार विभागाचे उपक्रमाअंतर्गत प्राथमिक कृषि पतसंस्था (सोसायटीच्या स्तरावर गोदाम सेवा घटकासाठी) आणि इतर उपक्रम व योजनेअंतर्गत उत्पादक संघ यांना ‘स्मार्ट’ अंतर्गत अनुदान देय आहे.

पात्रतेचे निकष

स्मार्ट प्रकल्पांतर्गत लाभासाठी संस्था नोंदणीकृत असणे आणि थकबाकीदार नसणे आवश्यक आहे. उत्पादक भागीदार उप प्रकल्पासाठी किमान २५० भागधारक शेतकरी असावेत. संस्थेची किमान वार्षिक उलाढाल ५ लाख असावी. खरेदीदारासोबत करार झालेला असावा. तर बाजार संपर्क वाढ उप प्रकल्पासाठी आणि  फळे, भाजीपाल्याच्या उप प्रकल्पासाठी किमान ७५० भागधारक शेतकरी असावेत. धान्य आधारीत उप प्रकल्पासाठी किमान २ हजार भागधारक शेतकरी असावेत. किमान वार्षिक उलाढाल २५ लाख असावी.

गोदाम आधारीत उप प्रकल्प मुख्यतः विविध कार्यकारी प्राथमिक कृषि पतसंस्था मार्फत राबविले जातील. समुदाय आधारीत नोंदणकृत संस्था, प्राथमिक कृषि सहकारी संस्था, प्रभाग संघ, व लोकसंचलित साधन केंद्र इत्यादी संस्था या प्रकल्पासाठी पात्र राहतील.  वरील तीन प्रकारच्या उप प्रकल्पामध्ये एखादी तंत्रज्ञानाची बाब राबविण्याची असल्यास त्यासाठी स्वतंत्र उप प्रकल्प राबविता येईल.

अनुदानाचे स्वरूप

प्रति समुदाय आधारित संस्था मंजूर उपप्रकल्प मूल्याच्या जास्तीत जास्त ६० टक्के रक्कम व्यवहार्यता अंतर निधी नुसार अनुदान स्वरूपात देय राहील. मात्र फलोत्पादन आधारित प्रकल्पासाठी ३ कोटी रुपयांच्या मर्यादेत, अन्य पिकावर आधारित प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांच्या मर्यादेत व पूरक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आधारित प्रकल्पासाठी ५० लाखाच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

प्रकल्पाची अंमलबजावणी

कृषी, पशुसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बाल कल्याण, ग्राम विकास व नगर विकास या सात प्रशासकीय विभागांच्या अकरा यंत्रणा मिळून हा प्रकल्प राबविण्यात येतो. अधिक माहितीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, शेती महामंडळ भवन, २७०, भांबुर्डा, सेनापती बापट मार्ग, पुणे दूरध्वनी- ०२०-२५६५६५७७ / २५६५६५७८ ई-मेल ऍड्रेस pcmusmart@gmail.com वर संपर्क साधावा.

नितीन तावरे, अध्यक्ष, नाथसन शेतकरी उत्पादन कंपनी: ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत कृषि विभागाच्या ‘स्मार्ट प्रकल्पाच्या’ माध्यमातून कंपनीला उप प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचे अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मंजूर झाला आहे. अनुदानामुळे सहा महिन्याच्या काळात प्रोसेसिंग युनिटचे काम पूर्णत्वास नेण्यास मदत होईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेत मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याचे कार्य करण्यात येईल.

मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली दि. 2 (जि.मा.का.) : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबर अख्रेर पर्यंत पूर्ण करा. या रस्त्यावरील ड्रेनेजचे काम 30 जूनच्या आत पूर्ण करा. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा. काम करताना हलगर्जीपणा होत असल्यास बीले देण्याचे यंत्रणांनी घाई करू नये, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‍दिले.

            मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामकाजाचा पालकमंत्री डॉ. खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी श्री. दिघे, महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूरचे प्रोजेक्ट डायरेक्टर वसंत पंढरकर, राष्ट्रीय महामार्गचे सी. बी. भरडे,  सार्वजनिक बांधकाम  विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, एमएसईबी व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            मिरज शहरातून जाणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम जलदगतीने होवून तो पूर्ण होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्यातील काही ठिकाणी महापालिकेने खोल खुदाई केल्याचे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने बैठकीत निदर्शनात आणून दिले असता  रस्ता खुदाई बाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालकेने रस्ता खुदाई का केली याचे स्पष्टीकरण द्यावे व खुदाई केलेल्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जानुसार पूर्ण करून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            या रस्त्यामध्ये येणारे विजेचे खांब राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने त्वरित काढावेत.  या रस्त्याच्या कामात १९३ पोलचे स्थलांतर करण्यात येणार आहे. विद्युत वितरण कंपनी यासाठी वेळोवेळी सहकार्य करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने या कामास प्राधान्य द्यावे. या रस्त्याच्या कामामध्ये एस. टी. महामंडळाकडील रस्त्यालगतीची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत अडथळा ठरत असून 12 जून पर्यंत हा अडथळा यंत्रणेने दूर करावा. महानगरपालिकेने रस्त्याच्या कामात अतिक्रमण ठरत असलेल्या अन्य इमारतींचेही अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. गटारीच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

सोयाबीनच्या नवीन वाणाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल- महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची ग्वाही

यवतमाळ, दि.२ जून (जिमाका):- सोयाबीनचे नवीन वाण फुले संगम, फुले किमया, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, येलो गोल्ड इत्यादी वाणाचे उच्चतम गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल, अशी ग्वाही महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी दिली.

             कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून महाबीज विक्रेते व व्यवस्थापन यांच्या मध्ये प्रत्यक्ष संवाद न झाल्यामुळे प्रत्यक्ष चर्चा व विक्रेत्यांचे समस्यांचे निवारण करण्याकरिता जिल्ह्यामध्ये संमेलनाचे आयोजन हॉटेल

व्हेनेशियन सेलेब्रेशन यवतमाळ येथे करण्यात आले होते. यात व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी विक्रेत्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच हिरवळीचे खत पिकाचे विक्री करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याकरिता शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यास सांगितले. उत्पादकता वाढवण्याकरीता सर्व शेतकऱ्यांना महाबीज चे जैविक खताचे बिज प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक विपणन प्रकाश टाटर यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकाचे दहा पेक्षा जास्त नवनवीन वाणाचे प्रमाणित बियाणे आवंटीत केल्यामुळे वाण बदल होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल असे सांगितले.

महाव्यवस्थापक उत्पादन विवेक ठाकरे यांनी उच्च गुणवत्तेच्या बियाण्याचे बिजोत्पादन साखळी बाबत मार्गदर्शन केले. विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी विभागातील एकूण बियाणे, जैविक खते, जैविक बुरशीनाशक तसेच केळी व पपई रोपांचे विक्री बाबतचा आढावा घेतला. जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी येणाऱ्या खरीप मधील यवतमाळ जिल्ह्यातील उपलब्ध पिक वाणा बाबतचे नियोजनाचे सादरीकरण केले.

याप्रसंगी महाबीज विक्रेते भैयासाहेब मानकर यांच्या उपस्थितीत सुदर्शन कृषी केंद्र,आर्णी चे कोषटवार,जैन ॲग्री  कल्चर एजन्सी यवतमाळ,दर्डा मकावनी कृषी केंद्र नेर चे शाहरूख, तसेच सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल (व्ही.सी.एम.एस),चे राजगुरू व झरीजामनी तालुका खरेदी विक्री संघ मुकुटबन चे गोंगलवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी क्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले व कार्यक्रमाचे आभार कृषी क्षेत्र अधिकारी विजय भागवत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेकरीता कृषी क्षेत्र अधिकारी, जीवन चव्हाण, केंद्र अभियंता स्वप्निल बुळे व इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

राज्याच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 2 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) झालेल्या या कार्यक्रमात तेलंगणाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर करण्यात आले.

तेलंगणातील लोक अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वास्तव्य करीत असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्य निर्मिती आंदोलनामध्ये व त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तेलुगू समाजाचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

भाषा, सण व सांस्कृतिक विविधतेने नटलेला भारत देश एका पुष्पगुच्छाप्रमाणे सुंदर असून देशाला आसेतु हिमाचल जोडण्यामध्ये आद्य शंकराचार्यांचे योगदान फार मोठे होते असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी तेलंगणातून आलेल्या कलाकारांचे कौतुक करताना, भाषा समजली नाही, तरी संगीत व नृत्यातून भाव समजतो व सांस्कृतिक आयोजनातून परस्पर प्रेम वाढते असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’, ‘बतकम्मा’, ‘बोनालू’ व ‘ओग्गु डोलू’ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तेलंगणा शासनाच्या सहकार्याने करण्यात आले.

कार्यक्रमाला तेलुगू अभिनेते हरीशकुमार यांसह तेलंगणा समाजातील श्रीनिवास सुलगे, अशोक कांटे, पोटटू राजाराम, जगन बाबू गंजी आदी उपस्थित होते.

००००

 

Telangana State Formation Day celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

Mumbai Dated 2 : The ‘Telangana State Formation Day’ was celebrated in Maharashtra Raj Bhavan Mumbai on Fri (2 June).

Maharashtra Governor Ramesh Bais witnessed a programme showcasing the cultural traditions of Telangana and addressed the invitees.

The Telangana State Formation Day was celebrated in Maharashtra Raj Bhavan for the first time. It was organised as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

Dance troupes from Telangana presented ‘Jaya Jaya hey Telangana’, ‘Bathukamma’, ‘Bonalu’ and ‘Oggu Dolu’ dance on the occasion.

Film star Harish Kumar and guests Srinivas Sulge, Ashok Kante, Pottu Rajaram and a large number of people of Telangana origin were present.

The cultural programme was organised in association with the Government of Telangana.

000

‘शासन आपल्या दारी’ व्हाया रुग्णालय, भूसंपादनाचा मिळवून दिला लाभ

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्यात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे वेळोवेळी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन सर्व विभागप्रमुखांना मार्गदर्शन करीत आहे. या अभियानात धुळे जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार विविध खातेप्रमुख आपल्याकडील योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास, धुळे प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे या आपल्या सकारात्मक कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाच्या सुरु असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी आगळा वेगळा आदर्श घालून देत खऱ्या अर्थाने शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत नेले आहे.
  तापी नदीवरील सुलवाडे-जामफळ-कनोली ही उपसा सिंचन योजना महत्वाकांक्षी असून धुळे जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरणार आहेत. त्यामुळेच प्रधानमंत्री कार्यालयाचे या योजनेवर देखरेख आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्वतः लक्ष देत या योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती दिली आहे.
सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजने अंतर्गत मौजे कुंडाणे (वे.) ता. जि. धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव क्र. 81/2018 यातील संपादीत गट नं 9/2/अ चे मूळ जमीन धारक भागवत उत्तम पाटील व गट नं 9/4 यातील मूळ जमीन धारक उत्तम यादव पाटील हे मयत असल्याने त्यांच्या वारसांकडून संपादित क्षेत्राचा मोबदला मिळण्यासाठी मे. दिवाणी न्यायालय, धुळे यांचेकडील कायदेशीर वारस तक्ता श्रीमती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धुळे यांचे कार्यालयात सादर केला होता. त्यानुसार भूसंपादन अधिकारी यांच्याकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करुन, सर्व संबंधीतांना उपरोक्त गटातील संपादीत क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित रहाणेसाठी कळविण्यात आले होते.
  त्यानुसार दि. 1 जून, 2023 रोजी सर्व संबंधीत भूसंपादन अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या कार्यालयात उपस्थित राहीलेत.  परंतु त्यापैकी सदर दोन्ही गटांत वारस असलेले श्री. बबलु भागवत पाटील हे प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने ते जवाहर शासकीय रुग्णालय, धुळे येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने ते कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याचे संबंधीतांच्या नातेवाईकांनी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
  त्याअनुषंगाने श्रीमती धोडमिसे यांनी वस्तुस्थितीची सर्व माहिती घेऊन त्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तात्काळ जवाहर शासकीय रुग्णालय, धुळे येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार कार्यालयातील कर्मचारी डी. बी. पाटील (अव्वल कारकून) व सुरेश वानखेडे यांनी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन रुग्ण बबलू भागवत पाटील यांच्या प्रकृतीची विचारणा केली. वैद्यकीय अधिकारी यांनी परवानगी दिल्याने बबलू भागवत पाटील यांच्या नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासमोर जमीन मोबदलाच्या आवश्यक कागदपत्रावर श्री. बबलू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येऊन पुढील कार्यवाही केली. प्रशासनाच्या या कामगीरीमुळे खऱ्या अर्थाने श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी “शासन आपल्या दारी’’ चा प्रत्यक्ष प्रत्यय आणून दिला.

शिवसृष्टी प्रकल्पाला बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांची भेट

पुणे, दि. २: बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज नऱ्हे, आंबेगाव येथे शिवसृष्टीला भेट देऊन पाहणी केली.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार किरण सुरवसे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पातील सुरू असलेल्या पहिला टप्प्यातील सरकार वाडा अंतर्गत महत्वाचे गडकिल्ल्यांची माहिती असलेले दुर्गवैभव, रणांगण : युद्धक्षेत्र, श्रीमंत योगी आज्ञापत्र, आग्र्याहून सुटका, शस्त्रांची गॅलरी, सिंहासनाधीश्वर, राज्याभिषेकाचे दालन येथे भेटी देऊन उत्सुकतेने माहिती घेतली. त्यांनी श्रीमंत योगी आणि आग्र्याहून सुटका या प्रसंगाचे दृकश्राव्य सादरीकरण प्रत्यक्ष पाहिले.

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याला रायगड येथे उपस्थित राहिल्यानंतर लगेच येथे शिवसृष्टीला भेट देता आली याचा आनंद व्यक्त करून मंत्री श्री. भुसे म्हणाले, स्व. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची आणि पराक्रमाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यतीत केले. त्यांचा संकल्प शिवसृष्टीच्या कामाला गती देऊन महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुढे नेत आहे. हा अवर्णनीय असा प्रकल्प आहे. राज्य शासनाकडून या प्रकल्पाला ५० कोटी रुपये देण्यात आले असून भविष्यातही सहकार्य केले जाईल. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अधिकाधिक तरतूद उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी विश्वस्त श्री. कुबेर यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. हा एकूण ४३८ कोटी रुपये खर्चाचा एकूण ४ टप्प्याचा प्रकल्प असून ६० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेला पहिल्या टप्पा कार्यान्वित आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू असून पुढील वर्षी शिवराज्याभिषेक दिनापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

(Chief Minister Employment Generation Programme- CMEGP)

राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. सुक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे.

राज्यातील युवक/ युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता https://maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली DLTFC समितीमार्फत शिफारस करण्यात येते. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) यांच्या मान्यतेने एकूण २३ सार्वजनिक क्षेत्रातील बँका व ११ खाजगी क्षेत्रातील तसेच १४ सहकारी बँकांचा समावेश या योजनेत आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्य :-

  • उत्पादन उद्योग, कृषी पूरक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेंतर्गत लाभासाठी पात्र.

  • उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी, सेवाक्षेत्रातील आणि कृषी आधारित/ प्राथमिक प्रकल्प मर्यादा २०-५० लाख रुपये आहे.

  • एकूण लक्षांकापैकी किमान ३० टक्के महिला लाभार्थी व किमान २० टक्के अनुसूचित जाती / जमाती.

पात्रता अटी:

  • राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्यांक) ५ वर्षाची अट शिथिल.

  • रु.१० लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ७ वी पास व रु. २५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १० वी पास असावे.

  • अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या / महामंडळांच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

प्रकल्प मर्यादा किंमत :

  • प्रकिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु.५० लाख व सेवा / कृषी पूरक उद्योग / व्यवसाय प्रकल्पांसाठी कमाल रु. २० लाख.

योजना अंमलबजावणी यंत्रणा :

अ) शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र

ब) ग्रामीण भागांसाठी : जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय

एकत्रित समन्वय व सनियंत्रण, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.

पात्र मालकी घटक :

वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट, एकल मालकी कंपनी (OPC) व मर्यादित दायित्व संस्था (LLP).

बँक/वित्तीय संस्था यांचा सहभागः(मार्जिन मनी- अनुदान) :

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत स्वयं गुंतवणूक व राज्य शासनाचे (अनुदान स्वरुपातील) आर्थिक सहाय्य याव्यतिरिक्त आवश्यक ६० ते ७५ टक्के अर्थसहाय्य बँकांमार्फत उपलब्ध होईल. राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड बँका, खाजगी बँका व १४ जिल्ह्यांतील मध्यवर्ती सहकारी बँका इत्यादींमार्फत बँक कर्ज उपलब्ध होईल.

लाभार्थी निवड:

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण: ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. यासाठी अर्जदारांसाठी विशेष CMEGP पोर्टल अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर जिल्हास्तरावरील स्थापित कार्यबल समितीच्या छाननीअंती मान्यता दिलेले प्रस्ताव संबंधित बँकांना शिफारस करण्यात येतील. बँकांमार्फत प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रकल्प मंजुरी व कर्ज मंजुरीबाबत बँक निर्णय घेईल. बँक मंजुरीच्या अनुषंगाने मंजूर प्रकल्प किंमतीस पात्र असणारे अनुदान संबंधित कर्ज खात्यात राज्य शासनाच्या तरतुदीतून वितरित होईल. राज्य शासनाचे अनुदान ३ वर्ष कालावधीसाठी LOCK-IN राहील. प्रकल्प यशस्वीरित्या अंमलबजावणी झाल्याची खात्री झाल्यानंतर राज्य शासनाचे अनुदान वितरित होईल. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने अर्जदारांना कार्यालयात भेटी देण्याची आवश्यकता राहणार नाही.

प्रशिक्षण:

योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या अर्जदारांसाठी निःशुल्क निवासी स्वरुपाचे उद्योजकीय प्रशिक्षण शासनमान्य संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येईल. हे प्रशिक्षण, उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पांसाठी २ आठवडे व सेवा, कृषी पूरक उद्योग, व्यवसायांसाठी एक आठवडा मुदतीचे असेल. कर्ज वितरणापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण आवश्यक कागदपत्रे:

  • जन्म दाखला/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / वयाचा पुरावा/ शैक्षणिक पात्रते संबंधिचे कागदपत्रे / प्रमाणपत्रे.

  • आधार कार्ड

  • नियोजित उद्योग / व्यवसाय जागेबाबतचे दस्ताऐवज, भाडेकरार (साध्या कागदावरील प्राथमिक संमती), बँक मंजुरीनंतर नोंदणीकृत भाडेकरार बँकेस सादर करावा लागेल.

  • जातीचे प्रमाणपत्र (एस.सी/ एस.टी.प्रवर्ग/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त व भटक्या जमाती/ अल्पसंख्यांक)

  • विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग, माजी सैनिक)

  • वाहतुकीसाठी परवानगी व वाहन चालविण्याचा परवाना.

  • स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र (Undertaking)

संगणकीय प्रणालीवर सीएमईजीपी पोर्टल सीएमईजीपी पोर्टल (CMEGP PORTL) आवश्यक माहिती नोंदविल्यास प्रकल्प संकीर्ण अहवाल तयार होईल. त्याची प्रत कागदपत्रांसोबत अर्जासोबत सादर करावी.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्ज व प्रकल्प उभारणींतर्गत टप्पे: –

जिल्हा स्तरावर सीएमईजीपी CMEGP पोर्टलवर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावांची छाननी केली जाते. प्राथमिक पात्र प्रस्तावांची यादी तयार झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रस्तावांची अंतिम निवड व विविध बँकांना कार्यक्षेत्रनिहाय कर्ज प्रस्तावांची शिफारस केली जाते.

बँकस्तरावर प्रस्तावाची आवश्यक शहानिशा कर्ज प्रस्ताव मंजुरीबाबत बँकेकडून अंतिम निर्णय घेतला जातो. प्रस्तावास बँक मंजुरी असल्यास बँकेकडून सादर केलेल्या शासनाच्या अनुदान (मार्जिनमनी) प्रस्तावाची उद्योग संचालनालयाकडून छाननी व मंजुरी दिली जाते. उद्योग संचालनालयाच्या मान्यतेनंतर नोडल बँकेद्वारा संबंधित बँकेस अनुदान वितरणाचे निर्देश दिले जातात. अर्जदारांनी स्वतःची ५ ते १० टक्के रक्कम उपलब्ध केल्यावर व आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मंजूर रक्कमेचे पूर्ण कर्ज वितरण केले जाते.

प्रकल्प उभारणी व कार्यान्वयन

तीन वर्ष प्रकल्प यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाचे अर्जदाराच्या कर्ज खात्यात समायोजन (Settlement of Claim) केले जाते.

अधिक माहिती व संपर्कासाठी :

राज्यस्तरीय संनियंत्रण:

  • विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नविन प्रशासकीय इमारत, २ रा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई – ४०००३२.
  • हेल्पलाईन नंबर १८६०२३३२०२८ / ०२२-२२६२३६१ / ०२२-२२६२२३२२.
  • महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र (संबंधित जिल्हा)
  • जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी (संबंधित जिल्हा)

संकेतस्थळ

https://maitri.mahaonline.gov.in 

www.di.maharashtra.gov.in

 

अर्चना शंभरकर

विभागीय संपर्क अधिकारी

0000

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वृत्तांताचे ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून होणार ३, ५ आणि ६ जून रोजी प्रसारण

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त शुक्रवार दि. 2 जून 2023 रोजी किल्ले रायगडावर झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या भाषणातून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे हे विचार आपणास ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ऐकावयास मिळणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांचे विचार, कार्यपद्धती आणि योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून किल्ले रायगडावरील झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिलेला संदेश, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेले मनोगत शनिवार दि. 3, सोमवार दि. 5 आणि मंगळवार दि.6 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

0000

ताज्या बातम्या

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

0
मुंबई, दि. ४  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व...

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

0
अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप,...

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....