सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1209

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

सातारा,  दि. ४ –  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

      सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर  MH11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे टोल मुक्ती दिल्याची पोस्ट फिरत आहे.

   तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही.  तसेच सदर पोस्ट चुकीची व खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे टाकली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असेही खुलाश्यात म्हटले आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 4 : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

“द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया” च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित “युरोपियन डे” समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल ॲना लेकवॉल, द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडियाच्या डायरेक्टर डॉ. रेणू शोम, अध्यक्ष पियुष कौशिक, उपाध्यक्ष राजीव शर्मा उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत आणि युरोपीय देशांचे संबंध व्यापारिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक दृढ व्हायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही भावना आणि हे विचार जगात पोहोचावे यासाठी मोदीजींनी पुढाकार घेतला आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या पुढे “जय अनुसंधान” चा नारा देत नवीनतम आणि संशोधन (इनोवेशन आणि इन्वेन्शन) याकडे आता भारत लक्ष देत आहे. आपणही यासाठी पुढे यावे; फक्त संशोधन करताना नव्या समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण बदलाचा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत असून पर्यावरण व वन  संरक्षण ही आपण आपली जबाबदारी समजून “ग्लोबल वॉर्मिंग” नावाच्या दानवाचा संहार करु, अशी भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन उपस्थितांना करुन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे या. महाराष्ट्र स्वागताला तयार आहे, यावेळी त्यांनी उपस्थित सर्व देशांच्या अधिकाऱ्यांना व उद्योगपतींना  ताडोबा व्याघ्र सफारीला येण्याचे निमंत्रण देखील दिले.

मध्य प्रदेशचे मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा यांनी भारत आणि युरोपीय देशांनी आपल्या गरजा ओळखून शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेष करुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाण घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

मुंबई, दि.३ जून– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या ११ महिन्यांत कक्षाकडून ९६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिली आहे.

जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७  रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख एप्रिल २०२३ मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख तर मे २०२३ मध्ये विक्रमी १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 3 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लोकार्पण आज झाले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार किरण सरनाईक, प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव तुषार देशमुख यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा संदेश शिल्प येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय उच्चतर अभियानांतर्गत आदिवासी विकास केंद्राकरिता मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमीपूजन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. सूक्ष्मजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र  विभागाच्या विविध स्थापत्य कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी त्यांनी केली.

000

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 :  राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.

मंत्री श्री. पाटील यांनी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, तसेच परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, संचालक डॉ. अंजली देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शैक्षणिक परंपरा मोठी आहे. संस्थेत आवश्यक त्या सर्व सुविधा उभारल्या जातील. भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील युवकांचा टक्का वाढावा यासाठी राज्य शासनाव्दारे सहा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. युपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. त्यात दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या वर्गाला दिल्ली येथील अनुभवी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल व त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, राज्य शानाच्या सारथी, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाज्योती या संस्थांद्वारा विविध प्रवर्गांतील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांतून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढलेली असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहेत

विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील सुमारे 200 मुलांना विविध शिष्यवृत्ती योजनांत पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. याचा सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या येथील प्रशिक्षण केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी शिवम बुरघाटे, वैशाली धांडे,  केतकी बोरकर आदींचा गौरव यावेळी झाला.

000

कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी -केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

इमारतीचे लोकार्पण दसऱ्यापूर्वी होण्यासाठी कामे गतीने पूर्ण करा

 कोल्हापूर, दि.3 (जिमाका) : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन येत्या दसऱ्यापूर्वी इमारतीचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने जलदगतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केल्या.

 कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाची पाहणी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक रमेश कुमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रोजेक्ट प्रमुख प्रशांत वैद्य, समरजीतसिंह घाटगे, महेश जाधव, सत्यजित कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया म्हणाले, विमानतळ टर्मिनल इमारतीचे प्रवेशद्वार हे दगडी बांधकामातून करा, येथील कामानींवर मशालीच्या प्रतिकृती ठेवा, ज्यामधून कोल्हापूरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होईल. इमारतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्रसिद्ध वस्तू, उत्पादने, कला, संस्कृती, उद्योग यांची छायाचित्रे, व्हिडीओ वॉल आदी बाबींचा समावेश याठिकाणी करा, अशा सूचना केल्या.

प्रवेशद्वाराजवळ विस्तीर्ण बगीचा तयार करुन यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा आकर्षक पुतळा बसवावा. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन अधिकाधिक विमान सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून  आतापर्यंत झालेल्या कामाचे श्री. सिंधिया यांनी कौतुक केले.

विमानतळ टर्मिनल परिसरात तयार करण्यात येणारा प्रशस्त बगिचा, याठिकाणी उभारण्यात येणारा छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, पर्यटन स्थळांवर आधारित छायाचित्रे व व्हिडीओ वॉल आदी बाबींबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी चर्चा केली.

61 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अनिल शिंदे यांनी दिली.

 

000

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाव्दारे आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून विविध शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार आहे. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

श्री  शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता, नवीन वास्तूचे लोकार्पण व ‘अमृतघन’ ग्रंथाचे विमोचन या निमित्त संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, माजी  आमदार बी.टी. देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर, शिक्षण संचालक डॉ. शैलैंद्र देवळाणकर, सहसंचालक नलिनी टेंभेकर, श्री. शिवाजी ‍शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्हि. गो. ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री  महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सुरू केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा लाभ विदर्भातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना झाला.

तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. भारतीय तरुण मेहनती आणि प्रामाणिक आहे. आज परदेशामध्ये उच्च पदांवरती भारतीय वंशाचे नागरिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जगात आवश्यक असलेले शिक्षण येथील विद्यार्थ्यांना द्यावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरण शासनाने जाहीर केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष, व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता याचा विचार करण्यात आला आहे. व्यावसायिक कौशल्य प्राप्त केल्यामुळे विद्यार्थी लवकरच आपल्या पायावर उभा राहाणार आहे. यामध्ये व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी योग, ध्यान, नृत्य आदी आवडीचे विषयाही शिकता येतील. या विविध क्षेत्रात मिळविलेले गुण त्यांच्या डिजीटल बँकेत जमा होणार आहेत. या जमा झालेल्या क्रेडीटच्या आधारे विद्यार्थी पूर्ण शिक्षण झाल्यावरही आपली विषय शाखा बदलू शकतो. अशाप्रकारे नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीकेंद्रीत आहे. संस्थेनेही स्वायत्ततेकडे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.

श्री पोटे पाटील व श्रीमती खोडके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभरात महाविद्यालयाने विविध समाजोपयोगी, विद्यार्थीकेंद्रीत उपक्रम घेण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी  संस्थेची कार्यशैली व प्रगतीची माहिती दिली.

पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मंत्री महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.  कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘अमृतघन’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या परिसरात मंत्री महोदयांच्या हस्ते वडाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण  प्राचार्य डॉ. रामेश्वर भुसे यांनी प्रास्ताविक दिलीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले.

शेती मातीचा होणार सन्मान; कांदा पिकाला मिळणार अनुदान

राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन  कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगामातील कांदा काढला की लगेचच विकावा लागतो. कांद्याचे पिक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचे भाव पडतात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याच्या बाजार भावातील चढ-उतार पासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने आता  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कांदे साठवण करण्यासाठी गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

कांदा हा कंदवर्गात जिवंत राहून त्यांत मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे कांद्याचे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यांचे 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना कांदा साठवण गोदामासाठी रुंदी 3.90  मीटर लांबी 12.00 मीटर एकूण उंची 2.95 मीटर (जमीनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमानावर कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायीकरीत्या शेतकरी,गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ देण्यात येईल.

असे असेल अनुदान

 कांदाचाळ संदर्भात मनुष्यदिन संख्या गृहीत धरुन आर्थिक मापदंड निश्चित करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत मनरेगाचे अनुज्ञेय अकुशल मजुरीचे दर रुपये 273 नुसार कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरीता एकूण लागणारे मनुष्यदिन 352.45  नुसार 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 इतकी मजूरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल मनुष्यबळासाठी 40 टक्केच्या मर्यादेत 64 हजार 147 रुपये  इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत असे एकूण 1 लाख 60 हजार 367 रूपये इतका (मजुरीदर रू. 273 असल्यावर) अनुज्ञेय आहे. पुढील वित्तीय वर्षात मजुरीचा दर वाढल्यास यात सुद्धा वाढ होईल. उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 363 रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने कांदाचाळीसाठी एकूण खर्च 4 लाख 58 हजार 730 रुपये  देण्यात येईल.

 लोकवाटा म्हणजे लाभार्थी स्वखर्चाने अतिरिक्त कुशलसाठी निधी उपलब्ध करुन देईल किंवा अभिसरणाच्या माध्यमातून मनरेगाशिवाय अन्य निधीतून कामे करता येतील. याशिवाय कोणत्याही योजना, वैयक्तिक सहभाग तसेच लोकसहभागाच्या निधीसुध्दा वापरता येतील. वित्त आयोग, खासदार आमदार स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जनसुविधांकरिता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी मिळणारे विशेष अनुदान, गौण खनिज विकास निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, जिल्हा परिषद,पंचायत समिती सेस मधुन उपलब्ध होणारा निधी, ग्रामपंचायतींचे स्व उत्पन्न, पेसा अंतर्गत उपलब्ध होणारा निधी (अनुसुचित क्षेत्रातील गावांकरीता), ठक्कर बाप्पा अदिवासी सुधार कार्यक्रम (आदिवासी उपाययोजना गावांकरीता), नाविण्यपूर्ण योजना, इतर जिल्हा योजना, यांसह केंद्र,राज्य शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अन्य योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदाचाळ उभारण्यासाठी पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पणन विभाग हे सर्व विभाग कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कार्य करणार आहेत.

          शासनाने या योजनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून या निमित्ताने शेती-मातीचा सन्मान करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजार हमी योजनेतून शेतकऱ्यांचा गौरवच केला आहे.

  • संदीप गावित, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार

थांबवा फसवणुकीचा प्रकार; अपडेट करा ‘आधार’

देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे.

आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे. याविषयी स्पष्ट सूचना ‘आधार’ च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार अपडेट केल्यास ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे अचूकता वाढेल, असं या सूचनेत म्हटलं आहे.

तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता किंवा ऑनलाईनही ते अपडेट करता येईल. आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीनं अपडेट किंवा दुरुस्त करता येते याचीच माहिती आता जाणून घेऊया.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in  या वेबसाईटवर जायचं आहे. इथं लॉग इन (Log in) पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे केपचा (Captcha) टाकून सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक एटापासून (OTP) पाठवला जाईल. तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. मग लॉग इन (Log in) वर क्लिक करायचं आहे.

पुढे माय आधार (‘My Aadhar’) नावाचं एक नवीन पेज ओपन होईल. इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल. त्यातील आॉनलाईन अपडेट सर्व्हिस (‘Online Update Services’ ) या रकान्यावर क्लिक करायचं आहे. एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथल्या अपडेट आधार ऑनलाईन (‘Update Aadhar Online’) या रकान्यात क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. इथं आधार अपडेट कसं होतं, त्याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. uidai या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.

पण, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकाल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल, अशा सूचना इथं असतील.

पुढे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे. समजा मला पत्ता अपडेट करायची असल्यास ॲडरेस  (address) या रकान्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार ( ‘Proceed to Update Aadhar’ ) या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथे Current Details रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल, डिटेल्स टू बी अपडेटेड (Details to be Updated ) या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकायचं आहे. एरिया (Area) या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे. पुढे पीन कोड (Pin Code) टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.

सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप (Select Valid Supporting Document Type) या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागपदत्र निवडायचं आहे. त्यानंतर व्ह्युव डिटेल्स ॲंन्ड अपलोड डॉक्युमेंट्स (View details and upload documents )वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून कंटीन्यु टू अपलोड (continue to upload ) वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की नेक्स्ट (next) वर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून नेक्स्ट ( next) वर क्लिक करायचं आहे.पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग मेक पेमेंट (make payment)  वर क्लिक करायचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.

पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल. आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

जिल्हा यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करुन यंत्रणा सज्ज ठेवावेत- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

       नाशिक दिनांक २ जून, २०२३ (विमाका वृत्तसेवा) : – पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

          विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात मान्सुन-२०२३ पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील,  जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक आशिमा मित्तल, अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपायुक्त (महसूल) संजय काटकर, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे आदी उपस्थित होते.

          विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करुन सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोहोच करणे आणि ते साहित्य चालुस्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा स्थळांची निश्चिती करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

          पूरपरिस्थितीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतुक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपतग्रस्तभागातील नागरिकांना अन्न धान्य, पिण्याचे पाणी, निवारा, कपडे आदी आवश्यक वस्तुंचा पुरवठा करुन पुरात घरे वाहून गेलेल्या निरश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. महसूल विभागाने मदत व पुनर्वसन आणि पंचनामे करण्यासाठी स्वंतत्र पथकाची नेमणूक करण्यात यावी.

          मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना देवून विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, रस्ते दुरुस्ती, धोका दायक इमारती, दूषित पाण्याच्या तक्रारी, अखंडित वीज पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन पावसाळ्यात साथीचे रोग पसरु नये तसेच संपर्क माध्यमे अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास लगतच्या जिल्ह्यांची मदत घेण्यासाठी नियोजन करावे.

ताज्या बातम्या

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

0
मुंबई, दि. ४  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व...

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

0
अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप,...

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....