सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1208

राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ मंजूर केलेला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीच्या कार्याचा आढावा सादर करणाऱ्या मिरवणुकीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मिरजकर टिकटी येथून करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे व धनगर समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्य शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील योजना लागू केलेले आहेत त्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून समाजातील सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराविषयी व सामाजिक व धार्मिक कार्याविषयी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी माहिती दिली. तसेच अहिल्यादेवींचा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला राज्य कारभार हा संपूर्ण देशभरात आदर्शवत असाच होता. त्याप्रमाणे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

         प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणूक रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्याचा आढावा सादर करण्याऱ्या मिरणुकीचे उद्घाटनही संपन्न झाले. समाजातील पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजातील विविध मागण्यांचे निवेदन सादर तुमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली. तसेच राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल राज्य शासनाचे आभारही मानले.

      पालकमंत्री श्री. केसरकर व मान्यवर यंनी स्वतः धनगरी ढोल वाजवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सादर करणाऱ्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दिनांक 4 (जिमाका):- राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2023 रोजी कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अकरा जून रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवावी. लाभार्थ्यांची ने-आण करणे, नाष्टा-पाणी, जेवण ओआरएस पावडर या बाबींचे योग्य ती व्यवस्था करावी व ते सर्व वेळेवर व जागेवर लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या गावापर्यंत व घरापर्यंत लाभार्थी वेळेवर पोहोचेल याबाबतचे सूक्ष्म नियोजन प्रशासनाने करावे असेही त्यांनी सूचित केले.

        तपोवन मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यक्रमाचे नियोजन तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, आरोग्य विभागाचा कॅम्प तसेच पार्किंगची व्यवस्था याबाबत प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. प्रत्येक तालुक्याला लाभार्थी योजनेचे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करावी व जिल्ह्याला देण्यात आलेल्या 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थी निवड करून त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याची संपूर्ण खबरदारी प्रशासनाने पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

     प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यामध्ये प्रशासनाने दिनांक 31 मे अखेरपर्यंत जवळपास सव्वा लाख लाभार्थ्यांची निवड केलेली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पुन्हा 75 हजार लाभार्थी निवडून त्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून कार्यक्रमापूर्वी 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

        तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी आणणे व त्यांना त्यांच्या गावी सोडणे यासाठी तालुक्याला प्रत्येकी  60 बसेस देण्यात येणार आहेत तर गगनबावडा तालुक्यासाठी 35 बसेस देण्याचे नियोजन केलेले आहे. याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून अडीच ते तीन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थी ने-आण करणे, नाष्टा-पाणी व जेवण तसेच वाहनाच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून एकाही लाभार्थ्यांला कोणतीही अडचण येणार नाही याकरिता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून शासन आपल्या दारी उपक्रमाचे प्रशासनाच्या वतीने यशस्वी आयोजन केले जाणार असल्याची माहिती श्री. रेखावार यांनी दिली.

          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, कौशल्य विभागाचे संजय माळी यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत केली. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे व विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांची ही उपस्थिती होती व त्यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले व सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेले उद्देश पूर्ण करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

00000

सुलोचनादीदी यांच्या निधनाने एक महान कलाकार गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि.4 :  तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आणि महान कलाकाराला आज महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

00000

शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस

  डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित

मुंबई, दि. ०४ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा रविवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपालांच्या हस्ते भौतिक शास्त्रज्ञ व शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते वैज्ञानिक पद्मभूषण डॉ दीपक धर, पद्मश्री विजेते भिकूजी इदाते, झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार डॉ परशुराम खुणे, कुष्ठरुग्ण सेवक गजानन माने, पत्रकार व विचारवंत रमेश पतंगे, संगीत नियोजिका कुमी नरिमन वाडिया व भरतनाट्यम गुरु पद्मश्री कल्याणसुंदरम यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जागतिक हवामान बदलांमुळे अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला असून खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात व्यापक संशोधनाची गरज आहे, असे सांगून शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

स्थापनेपासून गेल्या ६३ वर्षांमध्ये राज्याने सामाजिक, आर्थिक व मानव विकास निर्देशांकात लक्षणीय प्रगती केली असून आज राज्य १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच सांस्कृतिक राजधानी देखील असून राज्याने संगीत, नृत्य, ललित कला, लोककला, आदिवासी कला व इतर कला व साहित्य क्षेत्रात देशाला नेतृत्व प्रदान केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य तसेच दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना आज देखील मार्गदर्शक आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील सर्व पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राज्यपालांनी वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

शेअर बाजार तज्ज्ञ दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा झुनझुनवाला यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता रोहन रामचंद्र बहिर याचा देखील सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा परिचय असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.

00000

Padma Awardees from Maharashtra felicitated  

Maharashtra Governor Ramesh Bais today felicitated the Padma Awardees from Maharashtra at a public reception held at Raj Bhavan Mumbai on Sun (4 June). The public felicitation was organised by the Vasantrao Naik Agricultural Research and Rural Development Foundation.

Padmabhushan recipient Dr Deepak Dhar and Padmashri recipients Bhikuji Idate, Dr Parshuram Khune, Dr Gajanan Mane, Ramesh Patange and Guru Kalyanasundaram Pillai were felicitated. The felicitation for late Padmashri Rakesh Jhunjhunwala was accepted by his wife Smt Rekha Jhunjhunwala. Recipient of Pradhan Mantri National Bravery Award Rohan Ramchandra Bahir was also felicitated.

MLC Neelay Naik, MLA Indranil Naik, Chairman of the Vasantrao Naik Foundation Rajendra Barwale, Executive President Avinash Naik, trustees Mushtaq Antulay, Deepak Patil and invitees were present.

00000

सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

मुंबई, दि. ४ : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे  दुखः आहे, अशी शोक संवेदना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. मराठी व हिंदी अशा ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांना अभिनयाची भुरळ घालणाऱ्या सुलोचना दीदींनी या क्षेत्रात स्वतःच्या मृदू स्वभावातून आदर्श निर्माण केला.

हिंदी चित्रपट सृष्टीत १९४३ मध्ये सहकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या दीदीचे वैशिष्ट्य म्हणजे एका परिवारातील तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. शांत, सोज्वळ आणि नम्र अभिनेत्री म्हणून त्या कायम सर्वांसाठी आदरणीय होत्या व कायम स्मरणात राहतील.

अडीचशे हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टी व महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. सुलोचना दीदी यांना ईश्वर सद्गती देवो अशी प्रार्थना करुन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

0000

सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. ४ : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000000

Governor Ramesh Bais condoles demise of Sulochana Didi

Maharashtra Governor Ramesh Bais has expressed condolences on the demise of veteran actress Sulochana Didi. In a condolence message the Governor wrote:

“Smt Sulochana Didi epitomised a kind and loving mother. She immortalized many characters through her stellar performances. She was a noble soul both on and off the screen. Convey my deepest condolences on her demise.”

000

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना श्रद्धांजली

मुंबई, दि‌. ४:- “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसत, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी “आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

0000

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि. 4 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे  यांनी दिली.

शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात 9 उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने  विकासाचा महामार्ग होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यातील रस्त्यांच्या कामाला चालना

राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी ‘वंदे भारत’ रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी 11 उड्डाणपूल याप्रमाणे 16 हजार कोटींची कामे करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी श्री.गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 11 उड्डाणपूलांसाठी 100 टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून 9 उ्डाणपूल पूर्ण केले आणि 11 पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी 11 पूल याप्रमाणे 16 हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या  काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल.

पालखी मार्गाचे काम राज्याच्या वैभवात भर घालणारे होईल

महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली  प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.

महारेलगुणवत्तापूर्ण काम करेल

‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे.  योजनेअंतर्गत एकूण 91 पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 25 आणि दुसऱ्या टप्प्यात 66 पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी  देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

440 कोटी रुपयांच्या 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या राज्यातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या 8 पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. 92 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 20 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या रहिमतपूर-सातारा रोडवरील रहिमतपूर ते तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.81 येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-चोपडा राज्य महामार्गावरील अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 136 येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या सिंदखेडा-चिमठाणा राज्य महामार्गावरील सोनशेलू ते शिंदखेडा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 112-ए येथील दोन पदरी उड्डाणपूल, दक्षिण मध्य रेल्वेच्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली ते धामणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 144 बी येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या डोंगरगाव-गुमगाव रोडवरील बुटीबोरी ते अजनी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 116 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या उमरेड- बुटीबोरी रोडवरील बुटीबोरी ते सिदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 111 येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा आणि सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उमरेड बस स्टॅन्ड जवळील उमरेड ते भिवापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.34 येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा समावेश आहे.

700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यातील तेवडीरोडवरील दिवा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 10 येथील दोन पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 8 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील बुधगाव-सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 129 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 52 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच 458/5 येथील दोन पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंबरोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 34 येथील दोन पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 2 येथील दोन पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी उड्डाणपूल आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 24 येथील दोन पदरी उड्डाणपूलांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 6 येथील भुयारी मार्ग, ठाणे जिल्ह्यातील कळमगाव जवळील आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच 98 /2 येथील भुयारी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

00000000

पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार ‘वनवार्ता’ कार्यक्रमातून संवाद

मुंबई, दि. 04 – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८.४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पद्धतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार देणार आहेत.

एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठ्या समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समूहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.

वननिती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.  वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला. सन 2016 ते सन 2019 मध्ये झालेल्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

“वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार माहिती देणार आहेत.

05 जून 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.  हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर 15 दिवसांनी रविवारी (दि. 18/06/2023 पासून पुढे) सकाळी 7.25 वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे.

000

राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न

मुंबई, दि. 4 :  खारघर येथे २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व अध्यात्मिक महत्त्व आहे.  सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते, असे राज्यपालांनी सांगितले.

आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत.  अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलिकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून  पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh

Maha Yagya in Mumbai

 

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June).

The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024.

Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa Vidyalaya Chinmay Pandya, Director of the Akhil Vishwa Gayatri Parivar Manubhai Patel, business leader Dr Niranjan Hiranandani, Radhika Marchant and others were present.

000

ताज्या बातम्या

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

0
मुंबई, दि. ४  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व...

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

0
अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप,...

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....