रविवार, मे 4, 2025
Home Blog Page 1205

रोजगारासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. ५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आयोजित महारोजगार मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. रोजगारासाठी नवनवीन क्षेत्र उपलब्ध असून तरुणांनी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांची माहिती करून घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश पुंडे उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, वर्षानुवर्षे पदवी शिक्षण म्हणजेच करिअरची सुरुवात अशी धारणा आहे.  परंतु विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कमी कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातूनही युवकांना स्वत:चा विकास साधता येईल. पारंपरिक प्रशिक्षणाशिवायही अनेक नवनवीन क्षेत्र उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले. राज्य शासनाच्यावतीने २८८ मतदार संघात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात करिअर मार्गदर्शन शिबीर व रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाचे ७५ हजार नागरिकांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याकरता दरवर्षी ३० लाख रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. पाच वर्षामध्ये दीड कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. युपीएससीच्या तयारी राज्य शासनामार्फत दिल्ली येथे शिक्षणाची व राहण्याची सोय करण्यात येते. एमपीएससीसाठी गरीब मुलांचे शुल्क शासन माफ करते. तरुणांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

            गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०१५- २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत होती.  आता राज्य शासनाकडून १९ एप्रिल २०२३ पासून  ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर संपूर्णपणे कृषी विभागाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ३ वर्षे कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी…..

            योजनेची वैशिष्ट्ये –  राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार शेतकरी  म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य ( शेतकऱ्याची पती-पत्नी, आई-वडील, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील दोन जणांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.  योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासासाठी लागू राहील. लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदारांने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत लाभास पात्र असणार नाही.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यपद्धत – 

१) शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर संबधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतकऱ्यांचे वारसदार यांनी निर्धारित कागदपत्रांसह  परिपूर्ण प्रस्ताव संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा.

२)  प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून अहवाल तहसिलदार यांना ८ दिवसात सादर करावा.

३)  तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त अहवालाची छाननी करून पात्र प्रस्ताव तहसिलदार यांना सादर करावा.

४) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधितांना मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा.

५)  तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत संबंधितांच्या बँक खात्यात ईसीएस द्वारे निधी अदा करावा.

            या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत.

            गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना पात्रतेसाठी रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश/विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावल्यामुळे जखमी/मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.  तर या योजनेसाठी नैसर्गिक मृत्यू, पूर्वीचे अपंगत्व,  आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे,  गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, आमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटर्स शर्यतीत अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकांकडून खून या बाबी योजनेच्या पात्रतेसाठी समाविष्ट नाहीत.

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन वृक्षारोपण

ठाणे, दि. 5 (जिमाका) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या किनाऱ्यावरील अधिवासांच्या उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम (मँग्रोव्ह ईनिसेंटिव्ह फॉर शोअर लाईन हॅबीटेंट अँड टंजीबल इन्कम- मिष्टी) योजनेअंतर्गत ठाण्यातील काल्हेर येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कांदळवन वृक्षारोपण करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश दिला.

            यावेळी सहायक वनसंरक्षक अधिकारी गिरीजा देसाई, भिवंडीचे तहसिलदार अधिक पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, जिल्हा परिषद सदस्य जयराम पाटील, काल्हेरच्या सरपंच रुपाली पाटील व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

            किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. देशातील एकूण 75 स्थळांवर व त्यातील महाराष्ट्रातील पंधरा ठिकाणी कांदळवन रोपण केले जाणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील काल्हेर आणि वडूनवघर क्षेत्रावर हे रोपण करण्यात येत असून श्री. पाटील यांच्या हस्ते काल्हेर येथील कार्यक्रमात सुरूवात करण्यात  आली. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होवून स्थानिकांना नवीन उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील तसेच निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार आहे.

            यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असून पर्यावरणावर होणारे अत्याचार करणे थांबवले पाहिजे. पर्यावरणांचे रक्षण करणे हे मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी आहे. भिवंडी तालुक्यात 550 हेक्टरवर राखीव वन घोषित झाले आहे. आपल्याला शुध्द हवा मिळावी म्हणून हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे संतुलन रोखण्यासाठी खारफुटी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे या परिसरातील लोकांसाठी गरजेचे झाले आहे. आता सिमेंटची जंगले झाल्याने वातावरणावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संपूर्ण काल्हेर गावाची वीज सौरऊर्जावर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

            यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व नागरिकांना कांदळवन संरक्षणासाठी आवाहन केले.

0000000000

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

मुंबई, दि. ५ : भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात. मात्र, ज्या बालकांच्या शौर्याची नोंद घेण्यात आलेली नाही, अशा मुलांचे धाडस आणि पराक्रमाचे कौतुक व्हावे म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३ च्या पुरस्कारांची अधिक माहिती आणि नामांकन अर्जासाठी www.iccw.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवाला धोका किंवा शारीरिक दुखापत होण्याचा धोका असताना असामाजिक तत्व, गुन्हेगारांविरुद्ध धाडसाने कृती करणाऱ्या बालकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यांच्यापासून अन्य बालकांना नि:स्वार्थ सेवेची प्रेरणा मिळावी, म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अर्जदाराने अर्जासमवेत त्याने बजावलेल्या शौर्याची माहिती देणारे वर्णन २५० शब्दांत द्यावयाचे आहे. त्याच्या पुराव्यासाठी वृत्तपत्रीय कात्रण, प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत, घटनेविषयी दोन सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे जोडावीत. बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असावे. बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य बालकल्याण परिषदेचे सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी दोन जणांची शिफारस जोडणे आवश्यक आहे. १ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घटना घडलेली असावी.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची निवड भारतीय बालकल्याण समितीतर्फे गठित उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून करण्यात येते. अर्ज सादर केला म्हणजे निवड होईलच, असे नाही. कोणत्याही कारणास्तव नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आलेला अर्ज निवड समितीला योग्य वाटला, तर ते आपल्या विवेक बुद्धीनुसार अटी, नियम शिथिल करण्याचा विचार करू शकतात. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. सुवर्ण, रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप राहील. पुरस्कारांची  सविस्तर माहिती अशी (कंसात पुरस्काराची रक्कम) : भारतीय बालकल्याण परिषद भारत पुरस्कार (१ लाख रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद ध्रुव पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद मार्केंडेय पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद श्रावण पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद प्रल्हाद पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद एकलव्य पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद अभिमन्यू पुरस्कार (७५ हजार रुपये), सर्वसाधारण पुरस्कार (४० हजार रुपये). एकूण २५ पुरस्कार देण्यात येतील.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते. अर्जाची प्रत राज्याच्या बालकल्याण समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. त्याचा पत्ता असा : सचिव, महाराष्ट्र राज्य बालकल्याण परिषद, बाल भवन, चौधरी संकुल नाशिक- पुणे महामार्ग, पळसे, ता. जि. नाशिक” ४२२२१०१ (महाराष्ट्र), ई- मेल आयडी : presidentmsccw@gmial.com, rkjadhav1948@gmail.com येथे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

गोपाळ साळुंखे/ससं/

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात  वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक टपाल  तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये  समारंभपूर्वक या  तिकिटाचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवारपर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरपोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे,  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेराज्यपालांचे सचिव संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज‘ हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात  जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून  महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावनासंकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणीगडकिल्लेअष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहेया प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे”, या शब्दांत राज्य शासनाच्यावतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावे अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल”, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी विनम्र श्रद्धाजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सुलोचनादीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

0000

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

पुणे, दि.५: पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहर पोलीस मुख्यालय मैदान येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, प्रविणकुमार पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम अभिनव असून त्याद्वारे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो, विश्वासाची भावना निर्माण होते. त्यासोबत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळते.

एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करण्यासोबत झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावून गुन्हेगाराला शिक्षा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण होते. गुन्ह्याच्या मागे एकप्रकारचे मानसशास्त्र असते. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना खूप परिश्रम करावे लागतात.  त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्याप्रकारे करतात. पोलिसांना अद्ययावत शस्त्र, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले,  गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते. पोलीस अधिकारी परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. असा  सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल या कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला आणि चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देऊन या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

0000

राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ मंजूर केलेला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवीच्या कार्याचा आढावा सादर करणाऱ्या मिरवणुकीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मिरजकर टिकटी येथून करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे व धनगर समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्य शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील योजना लागू केलेले आहेत त्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून समाजातील सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराविषयी व सामाजिक व धार्मिक कार्याविषयी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी माहिती दिली. तसेच अहिल्यादेवींचा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला राज्य कारभार हा संपूर्ण देशभरात आदर्शवत असाच होता. त्याप्रमाणे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

         प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणूक रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्याचा आढावा सादर करण्याऱ्या मिरणुकीचे उद्घाटनही संपन्न झाले. समाजातील पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजातील विविध मागण्यांचे निवेदन सादर तुमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली. तसेच राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल राज्य शासनाचे आभारही मानले.

      पालकमंत्री श्री. केसरकर व मान्यवर यंनी स्वतः धनगरी ढोल वाजवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सादर करणाऱ्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दिनांक 4 (जिमाका):- राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2023 रोजी कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अकरा जून रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवावी. लाभार्थ्यांची ने-आण करणे, नाष्टा-पाणी, जेवण ओआरएस पावडर या बाबींचे योग्य ती व्यवस्था करावी व ते सर्व वेळेवर व जागेवर लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या गावापर्यंत व घरापर्यंत लाभार्थी वेळेवर पोहोचेल याबाबतचे सूक्ष्म नियोजन प्रशासनाने करावे असेही त्यांनी सूचित केले.

        तपोवन मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यक्रमाचे नियोजन तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल, आरोग्य विभागाचा कॅम्प तसेच पार्किंगची व्यवस्था याबाबत प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. प्रत्येक तालुक्याला लाभार्थी योजनेचे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करावी व जिल्ह्याला देण्यात आलेल्या 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थी निवड करून त्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याची संपूर्ण खबरदारी प्रशासनाने पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

     प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यामध्ये प्रशासनाने दिनांक 31 मे अखेरपर्यंत जवळपास सव्वा लाख लाभार्थ्यांची निवड केलेली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पुन्हा 75 हजार लाभार्थी निवडून त्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून कार्यक्रमापूर्वी 75 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

        तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी आणणे व त्यांना त्यांच्या गावी सोडणे यासाठी तालुक्याला प्रत्येकी  60 बसेस देण्यात येणार आहेत तर गगनबावडा तालुक्यासाठी 35 बसेस देण्याचे नियोजन केलेले आहे. याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून अडीच ते तीन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थी ने-आण करणे, नाष्टा-पाणी व जेवण तसेच वाहनाच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून एकाही लाभार्थ्यांला कोणतीही अडचण येणार नाही याकरिता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून शासन आपल्या दारी उपक्रमाचे प्रशासनाच्या वतीने यशस्वी आयोजन केले जाणार असल्याची माहिती श्री. रेखावार यांनी दिली.

          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, कौशल्य विभागाचे संजय माळी यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत केली. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे व विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांची ही उपस्थिती होती व त्यांनीही कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले व सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेले उद्देश पूर्ण करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

00000

सुलोचनादीदी यांच्या निधनाने एक महान कलाकार गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि.4 :  तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आणि महान कलाकाराला आज महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

00000

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...