रविवार, मे 4, 2025
Home Blog Page 1204

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र २०२३ साठी १,५४,३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार

मुंबई, दि. ५ : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808,  इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत.   याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.

2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.

वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण  संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

किल्ल्यांचे जतन, संवर्धनावर भर देणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ५ : राज्यातील गडकिल्ले इतिहासाचे साक्षीदार असून नव्या पिढीला त्याचे महत्त्व समजावे यासाठी किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनावर राज्य शासन भर देत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघही किल्ले जतन, संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करत आहे, असे मत पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृतींचे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष माधव फडके, कार्याध्यक्ष ऋषिकेश फडके उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास, आरमाराची माहिती देण्यात आली आहे. सोमवार दि. 5 जून ते मंगळवार दि. 6 जून 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण करावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : लोकसंख्येचा वाढता वेग पाहता जैवविविधता संवर्धनाचा वेग कमी आहे. अशा परिस्थितीत मानवाने स्वत:चा विचार न करता पर्यावरण रक्षणाचाही विचार करावा. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम आनंद, ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारे आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण करावे, असे आवाहन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे आयोजित आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग, अपर मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, शोमिता बिस्वास, क्लेमेन्ट बेन आदी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ‘ग्रीन स्टेप’ या पॉइंटवर सेल्फी घेतली.

 

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरण संवर्धनाचे संकल्प करणारा दिवस आहे. वन विभागाने आयोजित केलेल्या आभासी प्रदर्शनाची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. अशाच प्रकारे वन विभागाने प्रत्येकाच्या मनामनांत वन विभागाचे महत्व रुजवावे. सर्वे ऑफ इंडियाने अलिकडे केलेल्या सर्वेक्षणात राज्यात २५५० चौरस किलोमीटर हरित क्षेत्र वाढले आहे. याशिवाय १०४ चौरस किलोमीटर कांदळवनाची भर पडली आहे. कांदळवनाचा उपक्रम आता देशभर राबविण्यात येणार आहे. तसेच वाघांच्या संख्येतही भर पडली आहे. आता वन विभागाच्या माध्यमातून ‘अमृत वन, पंचायत वन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे. शुद्ध हवा मिळण्यासाठी प्रत्येकाने लावलेले एक रोप सुद्धा भव्य- दिव्य काम ठरणार आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन

मंत्रालयातील वन विभागाच्या डिस्प्लेमध्ये पर्यावरण व वन्यजीव संवर्धन तसेच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी नवीन फ्रेम तयार करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना वन आणि पर्यावरणाविषयीची माहिती देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे स्वरूप मिआयामी (आभासी) असल्याने त्यात नैसर्गिक वनांचा आभास होईल. तसेच एका आभासी घड्याळ्याच्या माध्यमातून वेळेबरोबर होणारे नैसर्गिक घटनाक्रम व त्यात बदल दर्शविले जाणार आहेत.

000

गोपाळ साळुंखे/ससं/

खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी पालिका जागा देणार – मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी, तर राज्यात १५ ठिकाणी विस्तारित केंद्रांसाठी जागा

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून यासंदर्भात विविध योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय अतिरिक्त सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, सहसचिव अतिश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची क्षमता मोठी असून ते प्रत्येक क्षेत्रासाठी फायदेशीर आहे. उद्यम नोंदणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून २९ लाखांहून अधिक उद्योगांनी एमएसएमई पोर्टलवर नोंदणी केली आहे असे सांगून एमएसएमई क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे पायाभूत सुविधांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत, त्यात एमएसएमई उद्योग सुरू करुन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगून एमटीएचएल, मुंबई-पुणे महामार्ग विकासाचे राजमार्ग ठरणार आहेत. यामुळे उद्योग त्यातून उत्पादने आणि त्यांची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियनचा सहभाग देण्याचा निश्चय केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसह या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाचे मोठे सहकार्य लाभणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. खादी ग्रामोद्योग आणि काथ्या (कॉयर) उत्पादनांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देतानाच मरोळ येथे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाच्या प्रदर्शन केंद्राला मान्यता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यात जास्तीत-जास्त तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून तंत्रज्ञान केंद्र (टेक्नॉलॉजी सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान केंद्रे यापूर्वीच कार्यरत झाली असून नागपूर, पुणे येथे या केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग येथील केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्याशिवाय अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अतिरिक्त तंत्रज्ञान केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली. विस्तारित केंद्रांसाठी  दिंडोरी, सुपा, केसुर्डी, बिडकिन, बुटीबोरी, यवतमाळ, कृष्नूर, नरडाणा, ताडाळी आदी १५ ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विस्तारित केंद्र सुरू करण्यासाठी तसेच ग्रामोद्योग विकास योजनेमध्ये ॲग्रो टुरिझमचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नारायण राणे

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सवलती दिल्यास उद्योग महाराष्ट्रात येतील त्यातून राज्याचा विकास दर, दरडोई उत्पन्न आणि सकल उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी दिली.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागासाठी सुमारे २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध प्रकारच्या योजना विभागाने तयार केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम विभाग कार्यरत असून या विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचल्या पाहिजेत, तिथे उद्योग सुरू झाले पाहिजेत, मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती उद्योग विभागाने तरुणांना देऊन प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उद्योग महाराष्ट्रात येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी केले. खासगी जमिनीवर उद्योगाची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे सांगून बंद पडलेल्या उद्योगांचे सर्वेक्षण करा आणि ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही श्री. राणे यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उद्योग विभागाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांचे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम विभागाच्या योजनांची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

000

 

 

पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ५ : विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्त्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील नागपूर, मुंबई,  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून सन 2024 पर्यंत 5 हजार कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात 18 नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत. नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ३.०’  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वीत्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयर, आबासाहेब जऱ्हाड, विजय नाहटा  यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण महत्त्वाचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. देशात पर्यावरणीयदृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे आगळे – वेगळे स्थान आहे. निसर्ग सौंदर्यानी नटलेले आपले राज्य असून हा अनमोल ठेवा आपल्याला जतन करावयाचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. देशात पर्यावरणीय दृष्टीने राज्याचे महत्त्व आगळे – वेगळे असून निसर्गाचे वरदान आपल्याला लाभले आहे. पश्चिम घाट, समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांग हा आपला अनमोल ठेवा असून  त्याचे जतन ही काळाची आणि समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास महत्त्वाचा असून आर्थिक विकास करताना निसर्गाचे संवर्धन व समतोल राखून प्रकल्प आपण करतो आहोत. पर्यावरण पूरक विकास हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा अविभाज्य अंग आपण मानले आहे. राज्यात सौरऊर्जा, जल, पवन ऊर्जा या क्षेत्रात सरकारने तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया तसेच पवन ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, माझी वसुंधरा 3.0 च्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्या या सकारात्मक कामगिरीमुळे आज 174 कोटी रुपयांचे बक्षीस या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांचा पुढाकार निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. पंचमहाभूतांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करून माझी वसुंधरा अभियान 3.0 आपण राबविले. या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली, ही कौतुकास्पद बाब आहे. 16 हजार 714 नवीन हरित क्षेत्र राज्यात तयार केली आहेत.

जागतिक स्तरावर वातावरणीय बदलाची चर्चा सुरू आहे दावोस मध्ये झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेवेळीही हाच चर्चेचा विषय होता. तापमान वाढ, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ, जैव प्रजाती नष्ट होण्याच्या घटनेत वाढ, अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबतच्या समस्या असे धोके निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन आपण काम करत आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पर्यावरण पूरक समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा 33 लाख झाडे आपण लावणार आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमावेळी ‘माझी वसुंधरा 4.0’ च्या लोगोचे अनावरण, नोंदणीसाठी पोर्टलचे अनावरण, युनिसेफच्या पुस्तिकेचे प्रकाशन, विज्ञानधारा मासिकाचे प्रकाशन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, महसूल मंत्री श्री. विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सेंटर फॉर वॉटर सॅनिटेशन यासह विविध सामंजस्य करार करण्यात आले.

माझी वसुंधरा ३.० पुरस्कारांचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध संस्थांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे (१० लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.

अमृत शहरे (३-१० लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपा, अहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

  • अमृत शहरे (१-३ लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिका, बार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
  • नगरपरिषद आणि नगरपंचायत (५० हजार ते १ लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
  • नगरपरिषद आणि नगरपंचायत (२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लज, मोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
  • नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या) गटात दहिवडी, मालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.
  • नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पाचगणी, पन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
  • ग्रामपंचायत ( १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर), गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर) आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
  • ग्रामपंचायत ( ५ ते १० हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे), धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
  • ग्रामपंचायत ( २.५ ते ५ हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर), जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
  • ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक), सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

भूमी थीमॅटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, गडहिंग्लज नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, पांचगणी नगरपरिषद, सोनई ग्रामपंचायत, बोराडी ग्रामपंचायत, वाघोली ग्रामपंचायत, शिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.

यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे),  राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली), आशिष येरेकर (अहमदनगर) आणि श्रीमती आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. दराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ३ जुलै रोजी परतफेड करणार

मुंबईदि. ५ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.९५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची परतफेड करण्यात येणार आहे. कर्जाच्या अदत्त शिल्लक रकमेची २ जुलै २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ३ जुलै २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाच्या सचिव शैला ए (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाने ३ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ३ जुलै २०२३  पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी७.९५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करीलअसे वित्त (वित्तीय सुधारणा) विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

०००

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची १ जुलै रोजी परतफेड करणार

मुंबईदि. ५ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ४.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची परतफेड करण्यात येणार आहे. अदत्त शिल्लक रकमेची ३० जून २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १ जुलै २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाच्या सचिव शैला ए (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचने महाराष्ट्र शासनाने १ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १ जुलै २०२३  पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियमानुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी४.६३ महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करीलअसे वित्त (वित्तीय सुधारणा) विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

०००

नागरिकांनी पोलिसांना प्रोत्साहन देणे गरजेचे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.५ : पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहर पोलीस मुख्यालय मैदान येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, प्रविणकुमार पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम अभिनव असून त्याद्वारे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो, विश्वासाची भावना निर्माण होते. त्यासोबत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळते.

एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करण्यासोबत झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावून गुन्हेगाराला शिक्षा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण होते. गुन्ह्याच्या मागे एकप्रकारचे मानसशास्त्र असते. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना खूप परिश्रम करावे लागतात. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्याप्रकारे करतात. पोलिसांना अद्ययावत शास्त्र, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते. पोलीस अधिकारी परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. असा सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला आणि चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देऊन या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
0000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.५: शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा त्रास कमी होऊन त्यांच्या मनात समाधानाची भावना आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोथरूड येथे आयोजित  ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, किरण दगडे पाटील, अपर्णा वरपे, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम, रोजगाराची माहिती मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचतो, त्यांना होणारा त्रास कमी होतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कामकाज पारदर्शक आणि गतिमान झाले आहे. शासनाने जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.आसवले यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून एकाच छताखाली शासनाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ देण्यात येत आहे.  आतापर्यंत हवेली उपविभागांतर्गत ७३ हजार दाखले वितरित करण्यात आले आहे. येत्या काळात हवेली तालुका ई-चावडी योजनेअंतर्गत आणण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध सेवा आणि लाभाचे वितरण करण्यात आले.

१ हजार ३८१ लाभांचे वितरण:

मेळाव्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) यांच्याकडील १५, कृषि विभाग- १८, ग्रामविकास- २१, अन्न धान्य वितरण (रेशनिंग)- ३००, संजय गांधी निराधार योजना, राज्य परिवहन मंडळ, पुणे मनपा समाजकल्याण विभाग यांचे प्रत्येकी ३४, पंचायत समिती- २०, पुणे मनपा आरोग्य विभाग-२३, महिला व बालकल्याण- ४३, मतदार नोंदणी अधिकारी- ३५, महावितरण- ७, पुणे मनपा- १० याप्रमाणेच उत्पन्न दाखले- ५५२, अधिवास प्रमाणपत्र-८० आणि आधारकार्ड- १८५ अशा एकूण १ हजार ३८१ विविध सेवा आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

0000

वारस नोंद लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष मोहीम – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि ५ ( जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारस नोंद लावण्याबाबत दिनांक 12 ते 30 जून या कालावधीत तहसीलदारांच्या सहायाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या अल्पबचत सभागृहात आज ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका श्रीमती नदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. ओटवणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तक्रारदारांच्या अडचणीची सोडवणूक पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेवाईकपणाने केली.

पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सध्या सुरु असलेल्या विकास कामांची प्रक्रिया थांबता कामा नये तसेच जिंदाल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.  त्याचबरोबर जिल्ह्यातील विकास कामे सुरू असताना त्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मुलाहिजा ठेवण्यात येवू नये.  विकास कामांच्या आड येणाऱ्यांवर पोलीस विभागांनी कडक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

जिल्ह्यातील सुमारे पन्नासहून अधिक अर्जदारांनी या जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडल्या.   त्यातील 35 हून अधिक तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनी तत्काळ घेत जागेवरच तक्रारदारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली.  तत्पूर्वी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या जनता दरबाराची स्थिती सांगताना ते म्हणाले, मागील जनता दरबारात जिल्हा प्रशासनाला सुमारे 303 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 278 अर्ज कार्यवाहीसाठी ठेवण्यात आले होते त्यातील 268 अर्ज प्रशासनाने निकाली काढून संबंधितांना जिल्हा प्रशासनाने न्याय दिला.

चौकट:

नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या जनता दरबारात शासकीय अधिकाऱ्यांकडून तक्रारदारांचे 278 पैकी 268 अर्ज निकाली काढण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेची पाठ थोपटली. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरीमध्ये हेल्मेट सक्ती करण्याऐवजी हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर द्यावा अशी सूचना केली.

या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या जनता दरबाराद्वारे संबंधितांचे जागेवर प्रश्न सोडवण्याची पालक मंत्र्यांची ही हातोटी बघून नागरिक अत्यंत समाधानी चेहऱ्याने या जनता दरबारातून परतत होते.

लांजा येथेही जनता दरबाराचे आयोजन

अल्पबचत सभागृह येथील जनता दरबार आटोपून आज दुपारी दोनच्या सुमारास पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे राजापूर व लांजा तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार घेतला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत खेडगे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते.

या जनता दरबारामध्ये सुमारे 35 हून अधिक नागरिकांनी आपली निवेदने प्रशासनासमोर मांडली. ही सर्व प्रकरणे निकाली काढून संबंधित विभागाने तक्रारदारांना न्याय द्यावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत

जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदुषणाचा विचार करता, पर्यावरणाचे रक्षण करणे हे आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यच आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीने कादंळवन जतन व लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

मौजे आरे येथे वनविभाग महाराष्ट्र शासन व कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण  दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, आरे काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कांदळवन हे इतर यंत्रणेपेक्षा सहापट कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेऊन तेवढयाच पटीने ऑक्सीजन बाहेर टाकते. कोविड सारख्या रोगांवरही कांदळवन लागवड व जतन करुन प्रतिबंध करता येऊ शकते.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कांदळवनाची संकल्पना समजली पाहिजे. कांदळवन लागवड व विकसीत का करतो आहोत? हे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांना कांदळवन लागवडीमध्ये पुढाकार घ्यावा यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा अशा सूचना करुन ते म्हणाले, रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता  आपण कटिबद्ध असून मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे या हेतूने रत्नागिरी येथे तारांगण उभे करण्यात आले. कोकणातील पहिले प्राणी संग्रहालय मालगुंड येथे 50 एकर जागेवर होत आहे. बर्ड पार्क, स्नेक पार्क, साऊथ अफ्रिकेशी अथवा जयपूरशी टायअप करुन पांढऱ्या रंगाचा पाढंरा पटेरी वाघ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि ते वाढल्याने येथील रोजगार वाढेल. सिंधुरत्न योजनेतून यासाठी 75 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच पुढील जागतिक पर्यावरण दिनी प्राणी संग्रहालय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

जलजीवन मिशन आढावा बैठक

कांदळवन रोप लागवडपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सकाळी 8.30 च्या सुमारास जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली आणि प्रलंबित कामे  ही उत्तम गुणवत्तेची आणि वेळवर पूर्ण करा अशी सूचना केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कीर्ती किरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

——

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...