रविवार, मे 4, 2025
Home Blog Page 1201

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : पारंपरिक ऊर्जेला भक्कम पर्याय

ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर उर्जेला व्यापक चालना देणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ही योजना शासनाने अंमलात आणली आहे. त्यात  जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा 12 तास वीजपुरवठ्याबरोबरच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे.

सौर ऊर्जा स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कुठल्याही प्रकारच्या ज्वलन होत नाही. उष्ण कटिबंधातील आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असलेला स्त्रोत आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा पर्याय भक्कमपणे उभा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ व्यापकपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.

वीज क्षेत्रात गेल्या दशकात मोठे बदल झाले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाने भविष्याचा वेध घेणारी महत्त्वाकांक्षी योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. किफायतशीर सौर ऊर्जेचा फायदा औद्योगिक ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही कसा करून देता येईल याचा विचार त्यात करण्यात आला. योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार असून सिंचनासाठी ते उपयुक्त ठरेल. गावांतील विविध सुविधा, कार्यालये पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत. ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जेच्या संदर्भातली इकोसिस्टीम साकारण्याचा योजनेचा हेतू आहे. प्रकल्पासाठी सुयोग्य जमीनी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

‘मिशन २०२५’

देशाने अपारंपरिक ऊर्जावापरासाठी 2030 पर्यंत 450 गिगाव्हॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. साधारणत: एका राज्यात सात हजार मेगावॅटपेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. वीजेच्या मागणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील वीज पंपांची संख्या 45 लाख आहे. एकूण वीजेच्या वापरापैकी 22 टक्के शेतीसाठी होतो.

शेतीला परवडणाऱ्या दरात वीज मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. वीजेची वाढती मागणी पाहता भविष्यात क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून शेतीचे वीजदर मर्यादित ठेवण्यावर मर्यादा येऊ शकते. त्यादृष्टीने वीज ग्राहक, शेतकरी व वीज निर्मिती क्षेत्र अशा सर्वांसाठी ही योजना उपयुक्त आहे. त्यानुसार डिसेंबर 2025 पर्यंत 30 टक्के कृषी वीजपुरवठा सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे. ‘मिशन 2025’च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची वेगाने व व्यापक अंमलबजावणी करण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत व त्यादिशेने वेगाने प्रयत्न होत आहेत.

योजनेत शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याबरोबरच अनेक प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पांसाठी जमीन भाड्याने द्यायला तयार असणा-या शेतकरी बांधवांना दर हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये दरवर्षी एवढा भाडेपट्टा देण्याची तरतूद आहे, महावितरणच्या सब स्टेशनजवळ उपलब्ध जमिनींमध्ये असे प्रकल्प उभे राहतील. सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या उद्योजकांनीही तयारी दर्शवली आहे. असे प्रकल्प उभे राहिलेल्या ग्रामपंचायतींना देखील पहिली तीन वर्षे पाच लाख रुपये प्रति वर्ष असे अनुदान दिले जाणार आहे. योजनेमुळे सौर ऊर्जेबाबत आवश्यक कौशल्यांचा विकास होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी तयार होणार आहेत.

राज्यात साधारणत: 30  हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या अभियानात होणे अपेक्षित आहे. योजनेची अंमलबजावणी केवळ राज्यातच नव्हे तर देशातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

हर्षवर्धन पवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

अमरावती

वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सातारा दि. 8 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि.23 जून 2023  या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणंद  पालखीतळ व फलटण पालखी तळाची पालखी वारीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र  दुडी,  मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख आणि विशस्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी मुक्कामस्थळाच्या पाहणीवेळी श्री. विखे पाटील म्हणाले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्य पालखीच्या सोबत नोंदणीकृत दिंड्या असाव्यात व त्यानंतर नोंदणी नाहीत अशा इतर दिंड्यांचा समावेश करावा म्हणजे प्रशासनाला सोयी सुविधांचे नियोजन करताना सोयीचे होईल. भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने  काळजी घ्यावी. पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली असता सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले आहे. लोणंद पालखी तळावरील विद्युतवाहक तारांमुळे वारकरी व भाविकांना त्रास होणार नाही यासाठी या विद्युतवाहक तारा  पालखीतळापासून दूर उभाराव्यात,  अशा सूचनाही श्री  विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

लोणंद पालखीतळ येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

000

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे,दि.8 : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,  वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रशासनाला दिले.

आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री.विखे पाटील यांनी सासवड, जेजुरी आणि वाल्हे येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी थांबा आणि निरा येथील पालखी तळाला भेट देऊन प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला उपस्थित होते.

वडकी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणे ते पंढरपूर आषाढी वारी पालखी मार्ग पाहणी दौऱ्याला श्री.विखे पाटील यांनी सुरुवात केली. यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा औषधांचा साठा, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे याची खात्री करावी. नियोजन करताना प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या विचारात घ्यावी, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवावी, त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे अशा सूचना श्री.विखे पाटील यांनी केल्या.

विभागीय आयुक्त श्री.सौरभ राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्यादृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी वारीकरिता अधिकच्या मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यात करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

झेंडेवाडी प्रथमोपचार केंद्राची महसूल मंत्र्यांनी केली पाहणी

दिवे घाटातून जाणाऱ्या पालखी मार्गात वारकरी मंडळींना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने ग्रामपंचायत झेंडेवाडी यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्राची पाहणी महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांनी केली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी अशी सूचना त्यांनी केली.

000

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बारामती पालखी मुक्कामस्थळाला भेट

बारामती दि. 8: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पालखी मुक्काम  स्थळ व बेलवाडी येथील रिंगण स्थळाची आज  पाहणी केली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती आणि इंदापूर तालुक्यातून मार्गस्थ होतात. पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची सर्व कामे शासकीय यंत्रणेने समन्वयाने आणि  वेळेत पूर्ण करून हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी करावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

श्री.पाटील यांनी बारामतीतील शारदा प्रांगण आणि  इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पालखी थांबा आणि बेलवाडीतील रिंगण परिसराची पाहणी केली. ते म्हणाले, पालखी सोहळ्यात  महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यातील लाखो भाविक सहभागी होत असतात. यावर्षी पालखी सोहळा नेहमीपेक्षा अगोदर होत आहे. उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यादृष्टीने  सर्वच यंत्रणांनी दक्षता घेवून पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करावे.

पालखी मुक्कामाच्या विसाव्याच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा, आरोग्य सेवक, रुग्णवाहिका इत्यादी सोयी सुविधा देण्यात याव्यात.

बऱ्याच दिंड्या मुख्य पालखी सोहळ्याच्या पुढे असतात. यावेळी मुख्य पालखीनंतर त्या दिंड्या मार्गस्थ होतील याबाबतचे नियोजन करावे. दिंड्यांची नोंदणी करावी. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. पालखी विसावा मुक्कामाच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांची संपर्क निर्देशिका तयार करण्यात यावी. अधिक चांगल्या प्रकारच्या नियोजनासाठी मानक कार्यरत प्रक्रिया (एसओपी) तयार करावी. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्याधिकारी महेश रोकडे आणि इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबतची माहिती दिली.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापूरचे गट विकास अधिकारी विजय कुमार परिट, मुख्याधिकारी महेश रोकडे, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

000

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 8 : वसंतदादा शेतकरी सहकारी बँक (अवसायनात) ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात. यामध्ये 1 लाख ते 5 लाख पर्यंतच्या ठेव रकमांची निश्चिती करुन तत्काळ परत करण्याचे प्रमाण निश्चित करावे, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.

मंत्रालयात सहकार मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे, आयुक्त सुनील पवार, अपर निबंधक शैलेश कोतमिरे, उपनिबंधक आनंद कटके, समित कदम उपस्थित होते.

सहकार मंत्री  श्री. सावे म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या देणे रक्कमांबाबत  बँकेच्या ताब्यातील व महानगरपालिकेस उपयुक्त ठरणाऱ्या मालमत्तेची विहित प्रक्रिया पूर्ण करुन खरेदी करण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी प्रस्ताव तयार करावा. तसेच सहकार आयुक्त स्तरावर दरमहा बँकेच्या कर्जवसुली व ठेवी परत करण्याबाबत बैठक घेऊन कार्यवाही करावी आणि अवसायकांनी याबाबत कृती आराखडा तयार करून एकरकमी परतफेड योजनेस मान्यता देऊन कर्जवसुली करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ८ : जळगाव जिल्ह्यातील  मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.

खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील खेळाडू विविध स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 36 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटूसाठी ट्रॅक, बास्केटबॉल, व्हॉलीबॉलसाठी मैदान, टेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

राज्यात महाराष्ट्र  प्राणी  रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीकाम, ओझी वाहणे व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, कालांतराने शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असल्याने या सर्व पशुधनाचा सांभाळ / संगोपन करणे आवश्यक असल्याने शासनाने सुधारीत ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे….

राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच यापूर्वी २६ एप्रिल, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये ज्या ३२ तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आले आहे, ते तालुके वगळून ३४ जिल्ह्यातील ३२४ तालुक्यांमधून प्रत्येकी १ याप्रमाणे ३२४ गोशाळांची अनुदानासाठी निवड करण्यास मान्यता देण्यात येत आहे.  नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (अक्राणी) या तालुक्यांची गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात सन २०१७ च्या योजनेत पांजरपोळ गोशाळा सेवा मंडळ, कोठडे, ता. नवापूर या संस्थेस अनुदान मंजूर करण्यात आले असल्याने सुधारीत योजनेमध्ये नवापूर तालुका वगळण्यात आला आहे.

असे असेल अनुदान

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजने अंतर्गत ५० ते १०० पशुधन असलेल्या गोशाळेस  १५ लाख, १०१ ते २०० पशुधन असलेल्या गोशाळेस २० लाख आणि २०० पेक्षा अधिक पशुधन असलेल्या गोशाळेस २५ लाख एवढे अनुदान. प्रथम टप्प्यात ६० टक्के व निर्धारीत निकषाच्या पूर्तीनंतर द्वितीय टप्प्यात ४० टक्के अनुदान अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल. मुंबई व मुंबई उपनगर या २ जिल्ह्यातील अनुत्पादक / भाकड गायी व गोवंश असल्यास, त्यांना लगतच्या ठाणे जिल्ह्यातील यापूर्वी अनुदान मंजूर केलेल्या, त्याचप्रमाणे अनुदानासाठी निवड करण्यात येणाऱ्या गोशाळेकडे वर्ग करण्यात यावे.

योजनेचा उद्देश

दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशु-पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या / असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे. या पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे. गोमूत्र, शेण इ. पासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप-पदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.

तसेच विविध विभागाच्या/संस्थांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विषयक उपक्रम राबवून पशुपैदाशीच्या प्रचलीत धोरणानुसार देशी गायीच्या जातीचे संवर्धन व त्यांच्या संख्येत वाढ होण्याकरीता, संस्थेकडील देशी तसेच गावठी गायींमध्ये शुद्ध देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करुन घेणे. कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नर वासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. कृत्रिम रेतनाने पैदास झालेली उर्वरीत नर वासरे व कालवडी यांची मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यात येतील. संस्थेमधील पशुधनामध्ये आंतरपैदास झाल्यास निर्माण होणाऱ्या नर वासरे / कालवडी यांची वाढ खुंटणे, कालवडी उशिरा माजावर येणे, वेळीच गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे इत्यादी विपरीत परीणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी संस्थेमधील वळूचे खच्चीकरण करण्यात यावे. यासाठी संस्थेने प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे स्वतंत्र हिशोब ठेवावेत व सनदी लेखापालाच्या प्रमाणपत्रासह आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करणे आवश्यक राहील.

लाभार्थी निवडीचे निकष

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र  योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा. केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण / चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा ३० वर्षाच्या भाडेपट्ट्यावरची किमान ५ एकर जमीन असावी. संस्थेने या योजनेंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी १० टक्के एवढे खेळते भाग- भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संस्थेचे नजीकच्या मागील ३ वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोसेवा / गो-पालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील. संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

संस्थेवर कार्यरत कर्मचारी / मजूर यांचे वेतन इ. चा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. या योजनेंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. ज्या संस्थांकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचे साधन आहे, अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. शासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेऊन, केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरीताच, अनुदान अनुज्ञेय राहील. प्रशासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मूलभूत सुविधा निर्माण केल्यास, अशा बाबींसाठी सदर योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही.

या योजनेमध्ये प्रामुख्याने खालील मुलभूत सुविधाकरीता अनुदान देय ठरेल पशुधनासाठी नवीन शेडचे बांधकाम, चाऱ्याची, पिण्याची पाण्याची व्यवस्था व वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धेकरिता विहीर बोअरवेल, चारा कटाई करण्यासाठी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र, मुरघास प्रकल्प, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, गोमूत्र, शेण यापासून उत्पादन निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र इत्यादी, अशा प्रकारच्या मुलभूत सुविधांकरिता अनुदान देण्यात येईल याकरिता संस्थांच्या प्रस्तावामध्ये वरील बाबींचा समावेश करण्यात यावा. जुन्या शेडच्या दुरूस्तीकरिता या योजनेमधून अनुदान मिळणार नाही.

कृषि / पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हास्तरीय विविध योजनांमधून, चारा उत्पादनांच्या योजनांमधून या गोशाळांना वैरण लागवडीसाठी बियाणे, खते, ठोंबे, हायड्रोपोनीक, वाळलेला चारा उत्पादन / ओला चारा उत्पादन करण्यासाठी लाभ अनुज्ञेय राहतील. विद्युत जोडणी आवश्यक असल्यास “कृषि / कृषिपंप” या बाबी अंतर्गत प्रचलित योजनेमधून या गोशाळांनी विद्युत जोडणी प्राप्त करुन घ्यावी. या लाभासाठी प्रस्तुत योजनेमधून अनुदान देय होणार नाही.  याशिवाय या गोशाळांनी रुग्ण पशुधनास आवश्यक असलेल्या पशुवैद्यकीय सेवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपलब्ध करुन द्यावीत.  “सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र” या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज व माहितीसाठी उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

  • संदीप गावित, उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार

 

ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणेदि. 7 (जिमाका) : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईलअशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरमाजी महापौर नरेश म्हस्केमाजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवकपदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पणदिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्रदातिवली गावातील व्यायाम शाळाखुला रंगमंचसाबे गावातील शाळादेसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीदिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटीदिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटीदिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटीआगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटीदेसाई खाडीपूलसाठी 67 कोटीआगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटीखिडकारीदातिवलीदेसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कीदिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावायासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावीअशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेमहापालिका आयुक्त अभिजित बांगरखिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतनसंवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोटकिल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागेल तो देण्यात येईल.

०००००

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र ही संतांची, थोरपुरुषांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. या भूमीत जन्माला आलेले बाळासाहेब दौलतराव देसाई यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी सर्व सामान्य जनतेसाठी केलेले कार्य कायमच आठवणीत राहील. त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे होते, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालकल्याण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, लेखक मधुकर भावे व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, दौलतराव श्रीपतराव देसाई ऊर्फ बाळासाहेब देसाई यांनी सामान्य परिस्थितीशी संघर्ष करीत आपले नेतृत्व विकसित केले. त्यांचे कार्य सह्याद्री पर्वतासारखे आहे. त्यांचे कार्य सुवर्णअक्षरात नोंदविण्यासारखे आहे. अशा व्यक्तींचे चरित्र सर्वांसमोर आले पाहिजे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची माहिती नव्या पिढीला होते. त्याबरोबरच विधायक कार्य करण्यास प्रेरणा मिळते. राज्याच्या विकासासाठी बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य नेहमीच आठवणीत राहील.

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर बाळासाहेब देसाई यांनी विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभागात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून राज्यभर दळणवळणाचे जाळे विकसित केले. त्यांचे आयुष्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांनी राज्यात मजबूत संसदीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर यावे म्हणून त्यांच्या जीवनावरील पाठ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

विधानसभेचे अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यातून कर्तृत्व घडविले. त्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान दिले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे इबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा होय.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत गरिबीतून पुढे येत शिक्षण घेतले. त्यांनी कष्टातून पुढे आपले विश्व निर्माण केले. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध विभाग सांभाळले. प्रत्येक विभाग सांभाळताना निर्णय घेत त्यांनी आपला ठसा उमटविला. गरिबांच्या मुलांसाठी घेतलेल्या मोफत शिक्षणाच्या निर्णयामुळे तत्कालिन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यांना शाबासकी दिली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली. लेखक श्री. भावे यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण, ग्राम विकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रकाश सुर्वे, गीता जैन, बालाजी कल्याणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, देसाई कुटुंबीयातील सदस्य, पाटण येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

 

आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

ठाणे, दि. 7 (जिमाका) :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक उपस्थित होते. वारकरी भवनसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. महानगरपालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार असून यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचे काम करत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी मला आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. वारकऱ्यांची पंढरी असलेल्या पंढरपूर देवस्थानच्या सुशोभीकरण व इतर कामांसाठी व वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष विकास आराखडा बनविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 83 कोटींचा निधी वर्गही केला आहे. पंढरपूर वारी मार्गावर आरोग्य तपासणी व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावर्षीची आषाढी वारी ही मंगलमय, आनंददायी व सुखकारक होईल.

संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पुरातन देवस्थानांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य शासनामार्फत घेत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परदेशी गुंवतणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून आगरी कोळी वारकरी भवन हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल. येत्या वर्षभरात हे भव्यदिव्य वारकरी भवन उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याण येथे संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल.

यावेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

०००००

ताज्या बातम्या

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....

भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे, दि. ०४: केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

0
छत्रपती संभाजीनगर, दि.०४ (जिमाका): पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. वृक्ष...