सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1197

उत्पादित वस्तू विक्रीसाठी महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ – विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे

अकोला, दि. १० (जिमाका): महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार निधी यांच्या माध्यमातून अकोला तालुक्यातील कापशी रोड येथे जिल्ह्यातील पहिले महिला बचत भवन उभारले जाणार आहे. याचे भूमिपूजन विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या आज हस्ते झाले. यामुळे महिलांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे डॉ. पांडे म्हणाल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, जल जीवन मिशन प्रकल्पाचे संचालक मदन सिंह बहुरे आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. पांडे यांनी महिला बचत गटांच्या महिलांची संवाद साधत त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकमेव गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे गॅस व वीज निर्मिती होणार असून आजूबाजूच्या परिसरातील गोधन व शेती उत्पादनातील टाकाऊ घटकांचा वापर या प्रकल्पासाठी होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याची माहिती यावेळी दिली.

कापशी रोड येथील शाळेच्या भिंतीवर बाल सुलभ चित्रांची रंगरंगोटीची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषद यंत्रणेचे कौतुक केले. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत जल शुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिलह. यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक सतीश सरोदे, माजी सरपंच अंबादास उमाळे, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी व  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील राहुल गोडले, सागर टाकले आदी उपस्थित होते.

०००

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन 

नांदेड दि. १० (जिमाका)  : केंद्रीय गृह  व  सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचे  दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.

यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, संजय कोडगे, व्यंकटराव गोजेगावकर, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा-राज्यपाल रमेश बैस

अकोला, दि. १० (जिमाका):  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नऊ अकृषी व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा व विद्यापीठाशी निगडित सामायिक विषयांवर यावेळी चर्चा झाली.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, देशातील विद्यापीठांच्या रँकिंग यादीत महाराष्ट्रातील केवळ दोन विद्यापीठांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक  गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे भवितव्य या निकालावर अवलंबून असते. ही जबाबदारी ओळखून वेळापत्रक गांभीर्यपूर्वक पाळावे. ई-समर्थ या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर व्हावा. उद्योगांची गरज ओळखून नव्या संशोधनाला चालना द्यावी. संशोधन व विकास कक्ष महाविद्यालय स्तरावर कार्यान्वित व्हावेत. कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा. डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. गतिमान कार्यवाहीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरावे, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविलेल्या योजना, संशोधन प्रकल्प आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. आर. गडाख, गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत सोकारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उदय भोसले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनाची पाहणी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाला. विद्यापीठातील ज्वारी, तेलबिया, कडधान्य, कापूस, गहू आदी पिकांबाबतचे संशोधन, उद्यानविद्या, कृषी विद्या, मृद विज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदी स्टॉलची राज्यपालांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून कृषी संशोधनाबाबत माहिती घेतली. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.

दरम्यान राज्यपाल रमेश बैस यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकात आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुप्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदिप घुगे,उपविभागीय अधिकारी शरद जावळे, रामेश्वर पुरी, मंडल रेल प्रबंधक धीरेंद्रसिंह, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. बैस यांच्या आगमनानंतर पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

०००

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणा, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे औक्षण करून स्वागत करण्यात आले. श्री. बैस यांनी सुरुवातीला समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रींच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात मंदिराला मिळालेली देणगी व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि समाजपयोगी विकासकामांची माहिती घेतली. मंदिर प्रशासनातर्फे निळकंठ पाटील यांनी राज्यपाल श्री. बैस यांचा सत्कार केला.

यावेळी आमदार आकाश फुंडकर, विभागीय आयुक्त निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

०००

कामगारांनी ऑनलाईन नोंदणीद्वारे विविध योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि. १० (जिमाका): ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते आज नंदुरबार तालुक्यातील कोळदा, समशेरपूर, कोरीट, शिंदे गावांत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती मोहिनी वळवी (कोळदा ), उपसरपंच आनंद उत्तम गावित, श्रीमती मंदा चौधरी (समशेरपूर ) उपसरपंच रेवता भिल, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, डी.एन.राजपूत, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, प्रधान मंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामागाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कामगारांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यात खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या उज्जवला गॅस योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात गॅस संचाचे वाटप केले. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रत्येकाला घर तसेच  प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी  जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज, भजनी मंडळासाठी साहित्य तसेच इतर विविध योजनांचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नसलेल्या तसेच ज्यांना घर नाही अशा पात्र व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. एका रेशनकार्डवर एकच घरकुल मिळत असल्याने घरकुलाचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डचे विभक्तीकरण करावे, यानंतरच घरकुल योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कामगार उपस्थित होते.

०००

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे, दि. १० : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे,  बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

०००

अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचारांचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची गरज – मंत्री श्री. आठवले

नांदेड (जिमाका) दि. १० : बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचारांचा हा पराभव असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. अक्षयच्या पीडित कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय तरतुदीनुसार केंद्र सरकारच्यावतीने पीडित कुटुंबियांना ८ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली.

           केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजसुधारक महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा प्रत्येक नागरिकाने अधिक जबाबदारीने जपायला हवा.

जाहीर केलेल्या मदतीतील ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी पीडित कुटुंबियांकडे हस्तांतरीत केला. या भेटीनंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, सत्येंद्र आऊलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीडित कुटुंबाला पुन्हा आत्मविश्वास देऊन उभे करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या तरतुदीप्रमाणे सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. आजही या गावात जे कुटुंब भयाच्या सावटाखाली राहत आहे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था होते का हे तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. या गावात पिडित व भयाच्या सावटाखाली जर कोणी कुटुंब असतील तर त्यांचे पुनर्वसनही होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सिडको, मनपाची घरे अथवा बाहेरगावी त्यांच्या निवाऱ्यासाठी नियमाप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे ३३ बाय ३३ आकाराचा प्लॉट / जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्लॉट / मनपाची घरे, सिडकोची घरे यापैकी ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे शक्य असेल त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा, ही भूमिका सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून असून कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, ही भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वांनाच समान विकासाची संधी मिळावी, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी सर्व समाजात परस्पर न्यायाची असलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून सामाजिक सलोखा व एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनीच अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी व्यक्त केली.

०००

 

 

आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १०: संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रविंद्र धंगेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे,  प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, साधुसंतांची विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार धंगेकर म्हणाले की, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केल्या आहेत. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असून वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

०००

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन  

 मुंबई, दि.०९ : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत आज सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

सचिव श्री.भांगे म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी  ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. २६ जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.

“नशा मुक्त भारत” चे स्वप्न साकार करण्यासाठी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मुंबईत १० जून रोजी आयोजन

मुंबई, दि. ९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्यातर्फे शनिवार १० जून २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त र. प्र. सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सेंट ज्यूड हायस्कूल, इंदिरानगर, काजूपाडा, कुर्ला (प.), मुंबई- ४०००७२ येथे हा मेळावा होईल. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

 

 

ताज्या बातम्या

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

0
मुंबई, दि. ४  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व...

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

0
अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप,...

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....