सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1196

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. शोमा घोष यांच्या परंपरा संगीत महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई, दि. 12 : सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने तसेच ‘मधू मूर्च्छना’ संस्थेद्वारे आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगशारदा सभागृह, वांद्रे मुंबई येथे रविवारी झाले.

ज्येष्ठ गायिका,  ‘मधू मूर्च्छना’ ट्रस्ट संस्थेच्या संस्थापिका डॉ. शोमा घोष यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात संगीत व नृत्याच्या माध्यमातून देशाच्या कलावैभवाचा अविष्कार दाखविण्यात आला.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, संगीताला धर्म, जात व भौगोलिक सीमा नसतात.  संगीताची भाषा कोणतीही असली, तरी थेट हृदयाला भिडण्याची शक्ती त्यामध्ये असते. तानसेन यांच्या संगीतात दीप प्रज्वलित करण्याची शक्ती होती, असे सांगतात. डॉ शोमा घोष यांचे संगीतदेखील श्रोत्यांना संजीवनी देणारे आहे.

कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह, अभिनेते धीरज कुमार, विनोद शेलार, अमरजित मिश्र व इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates Dr Soma Ghosh’s Parampara Sangeet Mahotsav 

Mumbai, १२th June :  Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the ‘Parampara Concert’ depicting the journey of the Indian Heritage through music and dance at Rang Sharda auditorium in Mumbai on Sun (11 Jun).

The programme was organised by the Ministry of Culture in association with ‘Madhu Murchhana’ an organisation headed by Padmashri Dr Soma Ghosh, vocalist and Founder Trustee of Madhu Murchhana Trust.

Speaking on the occasion, the Governor said music transcends the boundaries of language or region. He said good music has the power to transport the audience to a higher plane. He complimented Dr Soma Ghosh for her work to promote Indian musical heritage.

Former Minister Kripa Shankar Singh, actor Dheeraj Kumar, Vinod Shelar, Amarjit Mishra and others were present.

0000

शबरी योजनेतील घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावित; प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार, दि.१२ : (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करुन प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात शबरी आदिवासी घरकुल योजनेतील पात्र लाभार्थी समितीची बैठक आज पालकमंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार) ,मंदार पत्की (तळोदा), परिविक्षाधिन अधिकारी अंजली शर्मा, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  यांच्या सह आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी उपयोजनेत अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नाही तसेच ज्यांना स्वत:चे घर नाही अथवा जे नागरिक कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. या योजनेत  जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश करावा. गट विकास अधिकाऱ्यांनी  घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व्हे करावा. ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज सादर केले असतील अशा अपात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची त्रुटींची पुर्तता त्वरीत करावी. ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकाऱ्यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांकडून घरकुलाचे अर्ज प्राप्त करुन  प्रतिक्षा यादी तयार करुन घरकुल योजनेचे प्रस्ताव सादर करावेत.

येत्या काळात शासनामार्फत अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, रमाई आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार असल्याने अशा सर्व घरकुलांचे बांधकाम दर्जेदार व चालू आर्थिक वर्षात पूर्ण होण्यासाठी गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले. या  बैठकीत नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यातील २ हजार ५६३ तसेच तळोदा,अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार २०२ पात्र  घरकुल प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.

00000

 

भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १२: जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते आणि परदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले.

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि उपस्थित प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली. भारतातील डिजिटल प्रगतीसंदर्भात सदस्यांनी माहिती घेतली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विशेष रुची दाखवली.

प्रदर्शनातून भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन

भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून बैठकीसाठी उपस्थित परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले. या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीट प्लॅटफॉर्म बाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली. यामध्ये डिजिटल इंडिया जर्नी हा सिम्युलेटरद्वारे भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी अनुभव दर्शविणारे साधनही आकर्षण ठरले आहे.

‘आधार’बाबत जाणून घेतले

भारत सरकारने राबविलेल्या आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती सर्वांनी बारकाईने जाणून घेतली. जगातील हा एक मोठा आणि यशस्वी उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. आधार ओळख प्रणालीच्या सहाय्याने जगातील सर्वाधिक बँक खाती भारतात काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधार क्रमांकाचा, ई- केवायसी चा उपयोग करुन थेट लाभ हस्तांतरण, अर्थसहाय्याचे थेट बॅंक खात्यात हस्तांतरण तसेच अनेक ई सुविधांशी आधारची जोडणी याबाबत यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती सांगण्यात आली.

पुणे शहराची डिजिटल क्षेत्रातील प्रगती प्रदर्शित

पुणे महानगरपालिका व पुणे स्मार्ट सिटी, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या प्रकल्पांचे आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी डिजिटल सादरीकरण स्क्रीनद्वारे तसेच चित्रफीतीद्वारे केले आहे. पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या दालनातून पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दर्शविण्यात आली आहे. अत्याधुनिक स्काडा यंत्रणेचा उपयोग केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, एंटरप्राईज जीआयएस प्रणाली, पुणे मनपाचे संकेतस्थळ व नागरिक सहभागाचे विविध डिजिटल उपक्रम, बहुविध उपयोगाचे चॅटबोट यांचे सादरीकरण यातून करण्यात आले असून मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाविषयी चित्रफीतीद्वारे माहिती देण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महानरगपालिकेने आपल्या दालनातून

शहरातमध्ये १२३ शाळांत राबविलेल्या ई-क्लासरुम प्रकल्प, जीआयएस आधारित मालमत्ता मॅपींग प्रकल्प, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मार्ट पाणी व्यवस्थापन, नागरिकांना सूचना देण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणीचा प्रकल्प आदी प्रकल्पांची माहिती सादर केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण केले.

00000

 

महर्षी कर्वे महिला ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ११ : आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्वल व्हावे. महिला आत्मनिर्भर व्हावी. स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल तसेच महिला फक्त जॉब सिकरच नव्हे तर जॉब क्रियेटर व्हावी, यादृष्टीने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाची निर्मिती करण्यात आली. या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून येथील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण व विविध अभ्यासक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, अल्का आत्राम, जिल्हाधिकारी विनय गौडा, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, बल्लारपुरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार कांचन जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कुलसचिव विलास नांदावडेकर, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. नितीन तेंडूलकर, मुख्याधिकारी विशाल वाघ, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे अधिकृत लोकार्पण बल्लारपूर शहराची गुणवंत विद्यार्थिनी आस्था सुरेश उमरे या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते झाले.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने चंद्रपूरमध्ये भेटी दिल्या. या ज्ञानसंकुलासाठी सकारात्मक भूमिका घेत महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्वल व्हावें हा ध्यास घेतला. सुसज्‍ज संकुल विसापूर येथे उभे राहत आहे. जिल्ह्यातील व शहरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेसाठी या संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. या ज्ञानसंकुलात कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यात येत असून महिला आत्मनिर्भर व्हावी. स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल असे ज्ञान या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, बल्लारपूर-विसापूर रोडवर ५० एकर जागेमध्ये ५६० कोटी रुपये खर्च करून, राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना गौरव वाटेल, असे अप्रतिम विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. ज्यांनी महिलांचा सन्मान वाढविला त्या सर्वांच्या ज्ञानाचा दीपस्तंभ प्रतिकाच्या रूपामध्ये त्या संकुलात लावण्यात येईल. तसेच महान महिलांची मार्गदर्शक मूल्ये पुतळ्यासह लावण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. महिलांचे पारंपारिक खेळ आहेत. या पारंपारिक खेळांचे वातानुकुलीत इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल.

जिल्ह्यात विकासाची अनेक कामे करण्याची संधी प्राप्त झाली. साधारणतः मध्यम आणि मोठी अशी २०५ कामे मागील पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण केली.  रामसेतू, स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, वनअकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, सैनिक शाळा, बल्लारपूर बसस्थानक, पोलीस स्टेशन, रस्ते, शाळांचे नूतनीकरण, जिल्हा परिषदेच्या १५०० शाळांना ई – लर्निंगची व्यवस्था, ६०० च्यावर अंगणवाडी आयएसओ प्रमाणित, टाटाच्या माध्यमातून पाच संगणक प्रशिक्षण वाहने, बल्लारपूर येथे पाणीपुरवठा योजनेसाठी निधी तसेच अनेक योजना दिल्या. यामाध्यमातून हा जिल्हा मागे राहता कामा नये हे ध्येय होते.

नुकतेच बल्लारपूर येथे ११.३० कोटी रुपये स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट केंद्रासाठी उपलब्‍ध करून दिले. या केंद्राची इमारत एक वर्षात पूर्णत्वास येईल. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूल येथे महिला महाविद्यालयाला मंजुरी दिली. हे विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत दोन वर्षात एमओयु करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत न जाता मुलमध्येच महिलांना उत्तम शिक्षण घेता येईल. यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी चंद्रपूरमध्ये नुकतेच रात्रपाळीच्या महाविद्यालयाला मान्यता आणली. महाराष्ट्रात १ कोटी ७५ लक्ष निरक्षर आहे. यात सर्वाधिक महिला आहेत. यासाठी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा मंत्र दिला. ९ वर्षात ‘’बेटी बचाओ बेटी पढाओ’’ चा फायदा झाला. १ हजार  पुरुषाच्या मागे १ हजार २० महिला झाल्या. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे राहिले आहे. जिल्ह्यात अनेक शैक्षणिक व्यवस्था उत्तम करण्यात येत आहेत. जिल्हा वेगाने पुढे जात आहे. त्यासोबतच तीनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक चंद्रपूरच्या वाघाच्या भूमीत आहेत. कुटुंबात ज्या मुली शिक्षण घेत आहे. त्या मुलींनी या ठिकाणी भेट द्यावी व अभ्यासक्रमाची माहिती घेत या ठिकाणी शिक्षणासाठी यावे असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव म्हणाल्या की, या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महर्षी कर्वे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचून त्या मुलीला शिक्षित करणे व ती मुलगी शिक्षणासाठी विद्यापीठापर्यंत येत नसेल तर तिच्यापर्यंत पोहोचणे हे महर्षी कर्वे यांचे स्वप्न होते. १०७ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९१६ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून विद्यापीठाला सक्षम केले. पहिले कॅम्पस पुणे येथे सुरू झाले. त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व आता चंद्रपूरमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नाने, पाठिंब्याने व पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणेच अतिशय कमी कालावधीत हे केंद्र सुरू झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या भालेराव यांनी संचालन तर विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदावडेकर यांनी आभार मानले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापिठाच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यासोबतच १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये आस्था उमरे, सतीश मिश्रा, प्राची वर्मा, मंथन आवळे, गौरव आकरे, तृप्ती देवगडे, जानवी पाटील आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस डिजिटल मुलींची शाळा येथे सुरू करण्यात आलेल्या महर्षी कर्वे महिला ज्ञान संकुलाची पाहणी केली.

०००

 

वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

चंद्रपुर, दि.११ : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष ठिकाणी पंचनामे करून तात्काळ आपद‌्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी रविवार  दि. ११ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

०००

श्री कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी नियोजन समितीतून एक कोटीचा निधी देणार -पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका): श्री क्षेत्र कुंथुगिरी हे शांततेचा संदेश देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विकास कुंथूसागर महाराजांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे. या परिसराचा अधिक चांगला विकास व्हावा व भाविकांसाठी अधिक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजन समितीतून या क्षेत्राच्या विकासासाठी एक कोटीचा निधी देणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 

आळते (ता. हातकणंगले) येथील श्री कुंथूगिरी क्षेत्रावर श्री गणाधिपती गणधराचार्य कुंथूसागर विद्या शोध संस्थेच्यावतीने श्री कुंथूसागर महाराज यांचा जगद्गुरु वर्ष वर्धन महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार सर्वश्री कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, कोषाध्यक्ष हिरालाल गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर जैन धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मियांचे राज्याच्या विकासात ही मोठे योगदान दिलेले आहे. या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया असे आवाहन ही त्यांनी केले.

गणाधिपती कुंथूसागर महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सर्व जैन बांधवांना शुभेच्छा देऊन श्री कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्यार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी गणाधिपती कुंथूसागर महाराजांचे या खडकाळ डोंगरावर मंदिर बांधण्याचे स्वप्न होते ते पूर्ण झाले असून मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम अपुरे राहिलेले आहे त्या कामासाठी पालकमंत्री महोदयांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

ज्या गावात तीर्थक्षेत्र विकसित केले त्या आळते गावाचा विकास करण्याचे कामही कुंथूसागर महाराजांनी केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

प्रारंभी पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणाधिपती कुंथूसागर महाराज अन्नछत्राचा शिलान्यास समारोह संपन्न झाला.

०००

शासन कोयना प्रकल्पग्रस्तांप्रती संवेदनशील व सकारात्मक -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. ११ : शासन  कोयना  प्रकल्पग्रस्तांप्रती संवेदनशील व सकारात्मक असल्यामुळे मागील तीन महिन्यात कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न वेगाने निकाली काढण्याप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे गांभीर्याने पालन करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी मागील तीन महिन्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासनस्तरावर झालेल्या कार्यवाहीबाबत माहिती देताना म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या समवेत दि. १३ मे २०२३ रोजी पाटण येथे समक्ष चर्चा करून याकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन उच्चाधिकार समितीस तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

कोयना प्रकल्पाच्या अनुषंगाने गठीत उच्चस्तरीय समन्वय  समितीच्या मंत्रालय मुंबई येथे दोन बैठका माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या होत्या. या  बैठकांमध्ये प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली, तसेच सातारा जिल्ह्यातील उपलब्ध जमीन पसंती कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे तात्काळ वाटप करण्याची सूचनाही केली.

३१८ प्रकल्पग्रस्तांनी सांगली येथे जमीन पसंत केली त्याची पडताळणी करण्याकामी प्रस्ताव सांगलीकडून सातारा कार्यालयास प्राप्त झाला त्याबाबतची  पडताळणी झालेली असून अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना कळविण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण, दहिवडी व खटाव तालुक्यात श्रमिक मुक्ती दलाच्या  मागणीप्रमाणे पसंती कार्यक्रम राबविला त्यानुसार मागील ३  दिवसांत ७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याबाबत पुढील महिन्याभरात कार्यवाही पूर्ण होईल व वाटप प्रकिया सुरळीत होईल.

डॉ.भारत पाटणकर यांनी येत्या १९ जूनला आंदोलन करू नये, पालकमंत्र्यांचे आवाहन

शासन आपल्या स्तरावरुन कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रत्येक शक्य ते पाऊल उचलत असताना डॉ. भारत पाटणकर यांनी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती प्रकल्पग्रस्तांना देऊन सहकार्य करावे व येत्या १९ जून रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला स्थगिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

०००

वृक्ष लागवड, संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.११:  देशात विविध महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणाने ३ कोटी ५० लाख झाडे लावली असून ६१ हजार झाडांची पुनर्लागवड केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी आज पैठण येथे औरंगाबाद – पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड प्रकल्पाची पाहणी केली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, सिने अभिनेते सयाजी शिंदे, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रविंद्र इंगोले, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले की, पैठण येथे ५१ वृक्ष पुनर्लागवडीचा झालेला यशस्वी प्रयोग पाहून आनंद झाला. समाजात पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रयोग प्रेरणा देणारा ठरेल. वृक्ष लागवडीचे हे ठिकाण गार्डन म्हणून विकसित करा, जेणेकरून पैठणला आलेले भाविक भक्त येथे येतील व प्रेरणा घेतील. याच प्रेरणेतून गावागावात असे प्रकल्प उभे राहतील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलेले काम नक्कीच प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.

पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले की, सामजिक, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थानी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. देशात वृक्षलागवड चळवळ उभी रहावी. बांबू लागवडीमुळे अनेकांना रोजगार मिळाला. गवतवर्गीय पीक असलेल्या बांबूची लागवड पडीक जमिनीतही केली जाते. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर बांबूची लागवड केल्यास वर्षानुवर्षे त्यापासून उत्पादन मिळेल. बांबूला चांगला भाव न मिळाल्यास ऊसाप्रमाणे दर ठरविण्याची शासनाची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक ट्रक व ट्रॅक्टर लवकरच येत आहेत. आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण तयार करायचे आहे, त्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण येथे ५१ वृक्षांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग झाला. हे नक्कीच मोठे काम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, यातून दळणवळण सुलभ होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन यांनी प्रास्ताविक केले. राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्याने सुरू असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग, महसूल तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

०००

जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी ५० प्रतिनिधींचे आगमन

पुणे दि. ११:  पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी  विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व प्रतिनिधीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

आगमन झालेल्या  प्रतिनिधींमधे ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही  यात  समावेश आहे.

आगमनप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. ढोल ताशाचा गजर आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करताना खास महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही पाहुण्यांना दर्शन घडविण्यात आले. स्वागतासाठी पुणे महानगरपालिका उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा पथक, तुतारी वादाक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे आणि स्वागतपर संदेशाचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

’नमस्ते इंडिया’म्हणून पाहुण्यांचा प्रतिसाद

आगमन झालेल्या प्रतिनिधींचे ‘अतिथी देवो भव:’ या संकल्पनेवर महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू विषद केला असता, स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ असा प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला. आगमनाप्रसंगी झालेल्या अनोख्या पद्धतीच्या स्वागतामुळे प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आगमन

‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’च्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे पुणे येथे आज सायंकाळी आगमन झाले. याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने त्यांचे पुणेरी पगडी, शाल देऊन स्वागत करण्यात आले.

०००

नाला खोलीकरण भूमिपूजन, पाणंद रस्त्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर दि. ११ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या रामटेक व मौदा उपविभागाच्या व्यस्त कार्यक्रमात जलयुक्त शिवार कार्यक्रमाला प्राधान्य देत नाला खोलीकरणाचे भूमिपूजन केले, तर अन्य एका कार्यक्रमात पाणंद (पांदण) रस्त्याचे लोकार्पण केले.

उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी रामटेक व मौदा उपविभागाच्या दौऱ्यावर होते.

रामटेक येथील बैठकीनंतर मौदाकडे जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. याच मार्गावर चाचेर गावापुढे मातोश्री पाणंदरस्ते योजनेअंतर्गत नवेगाव आष्टी शिवारातील पाणंद रस्त्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर काहीच अंतरावर नवेगाव आष्टी ग्रामपंचायत खंडाळा येथील नालाखोलीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले. एनटीपीसी यांचा सामाजिक दायित्व निधी व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या सहभागात हे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबीद्वारे खोलीकरणाचे काम सुरू होते. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी या कामाच्या कालमर्यादेबाबत विचारपूस केली.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जायस्वाल,खासदार कृपाल तुमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, उपविभागीय अधिकारी संजय पवार, कामठी तहसीलदार अक्षय पोयाम, मौदा तहसीलदार मालिक विराणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी

0
मुंबई, दि. ०५ : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा

0
मुंबई, दि. ०५: मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. मंत्रालय येथे...

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ०५: रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता- एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

0
मुंबई, दि. ०५: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे शासकीय कामकाजात...