मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1192

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची दिलखुलास कार्यक्रमात उद्या मुलाखत 

मुंबई, दि. १४: मुंबई येथे उद्या दि. १५ ते १७ जून २०२३ या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’  संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्त्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयांवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, उद्या गुरुवार दि. १५ जून आणि शुक्रवार  दि. १६ जून २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

००००

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. १४ : मुंबई येथे दि. १५ ते १७ जून २०२३ या कालावधीत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. विधिमंडळाचे महत्त्व, लोकप्रतिनिधींचे योगदान, संविधानिक मूल्य अशा विविध विषयांवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विस्तृत माहिती जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या गुरूवार, दि. १५ जून २०२३ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  पुढीलप्रमाणे:

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

स्वच्छ, निर्मल वारीसाठी शासन कटिबद्ध; २१ कोटींचा निधी मंजूर – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

पुणे, दि.१४: आषाढी वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या वारीसाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

ग्रामस्वच्छता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आळंदी ते पंढरपूर मार्गावरील स्वच्छता दिंडीचा शुभारंभ व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विधानभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, वारकऱ्यांसाठी दिवाळी, दसऱ्यापेक्षाही आषाढी वारी हा मोठा उत्सव आहे. राज्यातील विविध भागातून वारकरी पंढरपूरला येत असतात. प्रशासनाच्यावतीने वारकऱ्यांसाठी शौचालये, उष्णतेपासून संरक्षणाकरिता तात्पुरता निवारा, पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा, स्वच्छतेविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्ते व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याने सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. गावांमध्ये प्रत्येकाने शौचालये बांधावित. शौचालय बांधण्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा, आपलेही गाव हागणदारीमुक्त करून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी  प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता पाळावी असे आवाहन त्यांनी केले.  वारीमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार कांबळे म्हणाले, स्वच्छता दिंडीच्या निमित्ताने शासनाने चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छतेविषयी लोकजागृती होईल व संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देऊन वारी स्वच्छ, हरित व निर्मल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी वारीपूर्वी प्रत्यक्ष पालखी तळ व मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावर एकूण २ हजार ७०० शौचायले उपलब्ध असून मागच्या वर्षीपेक्षा ६० टक्के जास्त शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के शौचालये देण्यात आली आहेत.

उष्णतेची तीव्रता कमी झालेली नसल्याने वारकऱ्यांसाठी दीड पट जास्त टँकर तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे केले आहेत. त्याठिकाणी आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत चौथा टप्पा सुरु करण्यात आला असून प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते २०१८- २०१९ व २०१९-२०२० यावर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी, टिकेकरवाडी, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी, सोलापूर जिल्ह्यातील मांडवे व सांगली जिल्ह्यातील कुंडल व चिखली ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच टिकेकरवाडी ग्रामपंयाचतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, मान्याचीवाडी व सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.

आरोग्य, ग्रामस्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या घडीपुस्तिका, माहिती पुस्तिकांचे प्रकाशन आणि शौचालय उपयोजकाचे उद्घाटन यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दिंडी प्रमुखांना औषध किटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनीही स्वच्छता दिंडीविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात उपायुक्त विजय मुळीक यांनी स्वच्छता दिंडीविषयी माहिती दिली. यावेळी विभागातील पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कलापथकांचे प्रतिनिधी, आरोग्यदूत, आशा सेविका,  वारकरी उपस्थित होते.

स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी

स्वच्छता वारीच्या निमित्ताने पालखी मुक्काम, विसावा, रस्त्यावर निर्माण होणारा कचरा, गाव व परिसर स्वच्छ  ठेवण्याबाबत स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ८ चित्ररथाच्या माध्यमातून कलापथकाद्वारे व ५० आरोग्यदूतांमार्फत  स्वच्छतेचा संदेश गावोगावी देण्यात येणार आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विषयक पुस्तिका, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरुक पालक, सुदृढ बालक, नियमित लसीकरण असे स्वच्छता व आरोग्य विषयक संदेशाद्वारे वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 14 : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी,  या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.

पंढरपूरकडे येणाऱ्या दिंडीमध्ये दिंडीच्या सुरूवातीलाच एक हजार आरोग्य किटचे वाटप केले असल्याचे सांगत मंत्री श्री. सावंत म्हणाले, दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दिंडीसोबत प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक असणार आहे. यामध्ये आरोग्यदूत वारकऱ्यांसोबत असतील.  या पथकांची संख्या 127 आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत 24 तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथके कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. तसेच औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत 3 रूग्णवाहिका पथके, तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत 4 रूग्णवाहिका पथके असणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 75 शासकीय रूग्णवाहिका  पालखीसोबत कार्यरत असणार आहेत.

मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले, पालखी मार्गावर सर्व 1921 हॉटेलमधील कामगार व पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालखी मुक्कामाचे ठिकाणी तीन दिवसांपूर्वी व एक दिवस आधी धूरफवारणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेमार्फत जैवकचरा विल्हेवाटीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य संदेश देणारे तीन चित्ररथ, तीन पथनाट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पालखीसोबत 30 बाईक ॲम्बुलन्सही असणार आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदाच एवढ्या सूक्ष्म नियोजन पद्धतीने आरोग्याच्या वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व 65 एकर तिन रस्ता याठिकाणी आयोजित केले जाणार आहे. या शिबिरास राज्यातून खाजगी  व सरकारी असे एकत्रितपणे 9 हजार डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी मोफत आरोग्य सेवा पुरविणार आहे. वारकऱ्यांची सुरूवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून 5 लक्ष चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मोतिबिंदू असणाऱ्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. पालखी तळावर जाऊन सर्व वारकऱ्यांना प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मार्फत मोफत तपासणी व औषधे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

यासोबतच मंत्री श्री. सावंत विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना म्हणाले, “राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात आले. या अभियानातून 2 कोटी 39 लाख माता-भगिनींची तपासणी करण्यात आली. आजारांचे निदान झालेल्या 52 हजार महिलांवर उपचार करण्यात आले. तसेच ‘जागरूक पालक – सुदृढ बालक’ अभियानही राबविण्यात आले. यामध्ये वयानुसार तीन टप्प्यात बालकांची तपासणी करण्यात आली. वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन यांची तपासणी करण्यात आली. भविष्यात 18 वर्षांवरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. उपकेंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान यापुढे राबविले जाणार आहे.”

 

०००००

निलेश तायडे/स.सं

राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम

भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल. कार्ला – आचार्य चाणक्य म्युझियमसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती, अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म नीती व याचसोबत ७  दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरिता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे  निवास व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब

नव्या पिढीला पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचे जतन करावे, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

अंगणवाडीत योग दिवस साजरा होणार

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृद्धींगत व्हावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन)  यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार  करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के  विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.

ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास ४७२.१९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.

सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत

सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१४: राज्यातील वीजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित यंत्रणांनी  राज्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास नियामक मंडळाच्या १०५ व्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास मंडळाच्या (मेडा) महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोळसा आणि पाण्याचा विचार करता सध्या सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. यामुळे महाऊर्जेने मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पावर गुंतवणूक करावी. वीज पुरवठा आणि भारनियमनाबाबत राज्यातील कोणत्याही भागातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी.

यावेळी महाऊर्जाचे संचित आयकर दायित्व अंतर्गत उपाययोजना करून दीर्घकालीन उत्पादक स्वरुपाची भांडवली गुंतवणूक व त्याद्वारे महाऊर्जाचे बळकटीकरण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी केल्या.

यावेळी मेडामध्ये सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढवणे, सौर ऊर्जा प्रकल्प अधिकारी व प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदांच्या सरळसेवा भरतीच्या नियमात सुधारणा, महाऊर्जा कर्मचारी सेवा नियमांतील निवड समिती व पदोन्नती समितीच्या रचनेत सुधारणा करणे, महाऊर्जा आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने संगणक संयोजकाची नेमणूक करणे, महाऊर्जा कार्यालयात वरिष्ठ महाव्यवस्थापक संवर्गात ऊर्जा क्षेत्रातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, ऊर्जांकूर निधी ट्रस्ट अंतर्गत, ऊर्जाकूर श्री. दत्त पॉवर कंपनी लि. यांच्याकडून महाऊर्जाच्या मालकीचे शेअर्स बाय-बॅकद्वारे हस्तांतरीत झालेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यास मान्यता देण्यात आली.

महाऊर्जा स्वनिधीचे वित्तवर्ष २०२२-२३ चे सुधारित अंदाजपत्रकास व वित्तवर्ष २०२३-२४ चे प्रस्तावित वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

महाऊर्जाच्या विविध विभागीय कार्यालय अंतर्गत सौर प्रकल्पासाठी आस्थापित करणेसाठी निधी उपलब्ध करून देणे, महाऊर्जाच्या मालकीच्या जागेवर पवन, सौर संकलित प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महानिर्मिती कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याबाबत ठराव पारित झाला.

महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास मंडळाच्या (मेडा) महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सादरीकरण केले.

००००

धोंडिराम अर्जुन, स.सं

माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 13 :  माथाडी कामगारांना  मुंबईतील दवा बाजार, लोहार चाळ या परिसरात वाहतुकीच्या संदर्भात अनेक अडचणी येतात. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व गृह विभागाने पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगार संघटनेच्या वाहतुकीच्या संदर्भातील मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली.

मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी माथाडी कामगार संघटनेच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. पार्किंग, हातगाडी वाहतुकीचे नियम व अटी याबाबत चर्चा केली.

या बैठकीस सह पोलीस आयुक्त प्रविणकुमार पडवळ, पोलीस उपायुक्त (वाहतूक) गौरव सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उ.बा.चंदनशिवे, माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

शैलजा पाटील/विसंअ

पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटींची योजना – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

नवी दिल्ली, 13 :  देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या  मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये  पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची  महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी येथे केली.

आज येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार झाली. या बैठकीत श्री. शाह यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये  मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन @2047 अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी तसेच देशातील आपत्ती जोखीम कमी करण्याची आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अधिक मजबूत करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणे हा या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यावेळी म्हणाले.

श्री. शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी 8 हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 5 हजार कोटींचे प्रकल्प उभारले जातील. शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी 2,500 कोटींचे प्रकल्प उभारले  जातील.  तसेच भूस्खलन शमन करण्यासाठी 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 825 कोटी रूपयांची राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन असे महत्त्वाचे  प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी यावेळी केल्या.

यासह 350 अति जोखीम आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्‍याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे आपत्ती उद्भवल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आपदा मित्र  आठ हजाराच्या वर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

आज झालेल्या बैठकीत राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर माहितीची देवाण घेवाण केली.

0000

मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित

पुणे, दि.१३ : ढोल, लेझीम, तुतारी, मृदंग आणि टाळाचा गजर….. फडकणारे भगवे ध्वज…..श्वास रोखायला लावणारे मल्लखांब आणि मर्दानी दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके….कळसूत्री बाहुल्या…. विठुनामाचा गजर….. डोक्यावर फेटा बांधलेले आणि हातात बांगड्या घातलेले प्रफुल्लित चेहरे….गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण….अशा उत्साहाच्या वातावरणात परदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या साथीने आनंदसोहळा अनुभवला.

‘जी-२०’ डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० प्रतिनिधींसाठीं महाराष्ट्र शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या अस्सल मराठमोळ्या खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून परदेशी पाहुणे रोमांचित झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात सादर झालेल्या शास्त्रीय नृत्यांनीही पाहुण्यांना मोहित केले.

प्रारंभी राज्य शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले. कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.

निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी क्रीडा हायस्कूलच्या मुलांनी पेटत्या मशाली आणि तलवारी घेऊन सादर केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी पाहुण्यांची मने जिंकली. मल्लखांबावर साकारलेल्या मानवी मनोऱ्यांनाही त्यांनी भरभरून दाद दिली. बाटली मल्लखांब प्रात्यक्षिकातील जोखीम, लवचिकता, एकाग्रता आणि संतुलनाचे प्रदर्शनही पाहुण्यांची दाद मिळवून गेले.

कोल्हापूरच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या मुलामुलींनी सादर केलेले दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिकदेखील तेवढेच चित्तथरारक होते. या प्रत्यक्षिकांना आलेल्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त दाद दिली. युद्धाच्यावेळी वापरायचा पाश, काठी, भाल्याचे मर्दानी खेळही यावेळी सादर करण्यात आले.

मोर आणि कोंबड्याचे आवरण घालून नृत्य करणारे कलाकारांनी ढोल आणि लेझीमच्या तालावर नृत्य करीत परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले. कळसूत्री बाहुल्यांच्या नृत्याचाही प्रतिनिधींनी आनंद घेतला. महाराष्ट्राचा रंगीत फेटा घातल्यावर मोबाईलमध्ये स्वतःची छबी टिपण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आषाढी वारीच्या निमित्ताने टाळ-मृदंग, एकतारीच्या गजरातही पाहुणे तल्लीन झाले.

महिला प्रतिनिधींनी हातात बांगड्या भरून डोक्यावर फेटा घातल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. ही उत्साहपूर्ण वातावरणाची आठवण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी एकाचवेळी अनेक हात पुढे आले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरात जणू कलासंपन्न महाराष्ट्र प्रकटला होता. सिंहासनावर विराजमान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि विठोबाची मोठी मूर्ती साकारण्यात आली होती.

लेझीम आणि लावणीच्या तालावर पाहुण्यांनी धरला ठेका

मराठमोळ्या अभंगांनी आणि गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. विठोबा-रखुमाईच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले. भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्यातील पदन्यास आणि विविध मुद्रांनी पाहुण्यांना अक्षरशः मोहित केले. डोक्यावर समई घेऊन नृत्यात मनोरे रचणाऱ्या महिला कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. डोंबारी नृत्यातील चित्तथरारक मनोऱ्यांनीही पाहुण्यांना रोमांचित केले तर लावणीचा मनसोक्त आनंदही त्यांनी घेतला. शिवराज्याभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमानंतर लावणीच्या सादरीकरणाची पुन्हा एकदा मागणी करत पाहुण्यांनी आधी लावणी आणि नंतर लेझीमच्या तालावर ठेका धरला. पुणे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्व प्रतिनिधींनी भरभरून कौतुक केले.

000

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...