शनिवार, मे 17, 2025
Home Blog Page 1173

आरोग्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याचा पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा

पुणे दि. ८: पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, जोखीमग्रस्त गावे ओळखून तिथे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी. पूर्वतयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत आणि पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

जिल्ह्यातील समनव्यक अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी. साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अहवाल तयार ठेवावा. आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात.

डास उत्पत्ती ठिकाणांवरही लक्ष द्यावे व पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे  नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी  त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रमशाळांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत.  पाणी गुणवत्ता नियंत्रण ७६ हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.

परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा, शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतरविभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

०००

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. ८: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो  वाहनांच्या  लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे,  दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल.  पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

विश्रामगृहातून उलगडणार चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ८ : नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, भूषण येरगुडे, शाखा अभियंता श्रीकांत भट्टड, राखी कंचर्लावार, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘चंद्रपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आकर्षक विश्रामगृह तयार होत आहे. या नवीन विश्रामगृहात चंद्रपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील विश्रामगृहाचे आकर्षण असेल. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा कायम पुढे राहावा, याच संकल्पनेतून नाविन्यपूर्ण कामे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.’

नवीन विश्रामगृहाची वैशिष्ट्ये :

विश्रामगृह परिसरात नवीन विश्रामगृहाचे बांधकाम व अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाची दुरुस्ती करणे व पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे, ही कामे होणार आहेत. नव्याने साकारण्यात येणाऱ्या विश्रामगृहाकरिता 16 कोटी 89 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्याच्या विश्रामगृहाच्या बाजुला दोन मजली अतिविशिष्ट व्यक्तींकरिता बांधकाम करण्यात येत आहे. तळमजल्याचे क्षेत्रफळ 1394 चौ.मी. असून पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ 953.40 चौ.मी. आहे. तळमजल्यावर सहा व्हीआयपी सुट, मिटींग हॉल, डायनिंग हॉल व पहिल्या मजल्यावर चार व्हीआयपी सूट आणि मिटींग हॉल आहे. हे बांधकाम 15 महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शाळांमधील सुविधा वाढणार :

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संरक्षण भिंत, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर सोयीसुविधा उत्तमोत्तम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी निधीची कमतरता मुळीच पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

विकासकामे अन् योजना :

– अडीच वर्षे रखडलेले चंद्रपूर बसस्थानकाच्या कामाला वेग

– ताडोबा परिसरातील बसस्थानकांवरील सुविधांमध्ये वाढ

– बाबुपेठ येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र

– सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय प्रस्तावित

– चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जलसंधारणाची होणार कामे

– या कामांसाठी अर्थसंकल्पात होणार 400 कोटींची तरतूद

– नोवल टाटाकडून जिल्ह्यासाठी  10 कोटींचा सीएसआर निधी प्रस्तावित

०००

मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

मुंबई,दि. ८: भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना  रुग्णालयाकडे मार्गस्थ केले.

भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णांचे नातेवाईक देखील गहिवरून गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसही नेहमीप्रमाणे व्यस्ततेचा होता. गडचिरोलीचा दौरा आटोपून ते मुंबईत परतल्यानंतर ते ठाण्याकडे जात होते. या दरम्यान चुनाभट्टी- कुर्ला येथील पुलावर एक रुग्णवाहिका बिघाडामुळे खोळंबल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. रुग्ण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा , गरजूंना औषधोपचारासाठी मदत या गोष्टी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. रुग्ण आणि रुग्णवाहिकेतील नातेवाईकांची अडचण ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या वाहनातून उतरले आणि थेट बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेजवळ पोहचले. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत त्यांनी तिथूनच ठाण्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले. या रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्ण आणि नातेवाईक ठाण्यातील रुग्णालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतरच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ताफा रवाना झाला.

 

प्रचंड वर्दळीच्या घाईत मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आल्याचे पाहून, त्यांनी दिलेल्या धीरामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे हात आपसुकच जोडले गेले.

०००

रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांसाठी पालकमंत्री आले धावून

चंद्रपूर,दि. ८- रेल्वे लाईनच्या परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना कोणतीही सुचना न देता रेल्वे प्रशासन दडपशाही करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही, अशी तंबी त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिली.

नियोजन भवन येथे रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांच्या समस्यांवर आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाची दादागिरी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट बजावले. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मरुगानंथम एम., बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जतळे , नामदेव डाहुले, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

शहरातील महाकाली कॉलनी, आनंद नगर, रयतवारी कॉलनी, बुधाई बस्ती, पडोली आदी ठिकाणी रेल्वे प्रशासनकडून घरांच्या अतिक्रमणासंदर्भात धमकावले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले. ‘रेल्वे समस्यांबाबत प्रशासनाने संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवावे. तसेच यापुढे जिल्हा प्रशासनाला विचारल्याशिवाय कोणत्याही घरावर मार्किंग करू नये. प्रकिया सुरू करण्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी. अतिक्रमण नोटीस आणि घरांच्या मार्किंगवरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तशी नोटीस रेल्वे प्रशासनाला द्यावी,’ असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पूरपरिस्थितीचा आढावा :

गेल्यावर्षी चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी काठावरील माजरी, बेलसनी, देगुवासा, पाटाळा, चारगाव, पळसगाव आदी गावांना पुराचा फटका बसला होता. यावर्षीसुद्धा ही परिस्थिती उद्भवल्यास कोणत्या उपाययोजनांचे नियोजन आहे, यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. वेकोलीच्या ओव्हर बर्डन आणि डंपिंगमुळे वर्धा नदीचे पाणी गावांमध्ये घुसले, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी वेकोलीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला का, तसेच लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचीही पालकमंत्र्यांनी विचारणा केली.  

सोयीसुविधांमध्ये उणिवा नको:

गेल्यावर्षी ज्या शाळांमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते, त्या शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शौचालये, बाथरूम, पंखे, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी आदींची चांगली व्यवस्था असायला हवी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

०००

प्राथमिक शाळा मुले घडवण्याचा पाया – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. ७ ( जिमाका):  मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते.

निधी खर्चाच्या बाबतीत बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज होती असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, शाळा चांगल्या करणे गरजेचे आहे. शाळांसाठी चांगला निधी दिला जाईल. आपल्या शाळा आदर्श करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनीही सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी लोकांमध्ये याविषयी माहिती द्यावी. आजच्या या कार्यक्रमात पहिल्या टप्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळे सोबतच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात जिल्हा अग्रेसर बनवूया. ग्रामीण जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या प्रत्येक कामात शासन आपल्या सोबत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम राबवूया.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. आदर्श शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, किचन गार्डन या सुविधा असणार आहेत. त्यासह संरक्षक भिंत, क्रीडांगण, सौर ऊर्जा यांचाही अंतर्भाव असणार आहे. मुलांच्या कौशल्य विकासासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच शाळांमध्ये ई – लर्निग स्टुडिओ उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांनी आभार मानले. यावेळी ई – लर्निग व ई – कामवाटप यांचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आदर्श शाळा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता

मुंबई दि. ८ : परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी  संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे 25 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीष महाजन म्हणाले की,  स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. तर  2014 ते 2023 पर्यंत 9 वर्षात 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स तयार होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे. परभणी येथील वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील 9 वर्षातील 11 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा 9 जिल्हांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये  सुरू होणार आहेत.

मागील 09 वर्षात 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा अनोखा उपक्रम शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानंकानानुसार 1000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे तरीही प्रत्येक नागरीकाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील  बहुतांश डॉक्टरांची  पदे रिक्त असल्याने राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे  दरवर्षी नवीन 100 प्रशिक्षित डॉक्टर राज्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार होतील.  परभणी येथे 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू झाल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

०००

शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
गडचिरोली, दि.८: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे आज जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना निवडायचे उद्दिष्ट होते. मात्र गडचिरोलीने सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास ७ लाख लोकांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के लाभार्थी हे अति दुर्गम भागातील आहेत असे सांगून छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच हे धोरण अवलंबिले. ३० हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देवून कृषी विद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले. तसेच गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, सर्वांना योजनेतून घरकुल उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार


जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील युवकांना जास्तीत- जास्त रोजगार मिळाल्यास इतर घटकांकडून होणारा त्रास होणार नाही. तसेच लोकांच्या डोक्यातून नक्षलवादही संपेल असेही ते म्हणाले.

मंत्री धर्मराव आत्राम यानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारीक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.

योजनांच्या लाभ वितरणासह विविध मान्यवर, युवकांचा सन्मान


‘शासन आपल्या दारी’ निमित्त आयोजित महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ट कलाकार परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. १० मीटर शुटींगमध्ये राष्ट्रीय विजेता महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टमधील एंजल देवकुले यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, सायकल, रिक्षा, घंटागाडी, शेतीपयोगी यंत्रसामुग्री, दिव्यांगांना सायकली आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयू, पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ४२ खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत ५० खाटांचे मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

०००

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

नांदेड दि. ८ (जिमाका): नांदेड येथील १८ भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील १ असे १९ भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाड वरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोहोचून पुढे दिनांक ६ जुलै  रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. तथापि, खराब हवामानामुळे ते अमरनाथ गुफेपासून ६ किमी अलीकडील पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भात आढावा घेवून तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे  जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून संबंधितांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. अनिल पांपटवार, २. संजय मनाठकर,  ३. राजेंद्र मनाठकर, ४. मंजुषा दमकोंडवार, ५. अरुण दमकोंडवार, ६. प्रवीण सोनवणे, ७. विजया सोनवणे, ८. विजयनाथ तोनशुरे, ९. शिवकांता तोनशुरे, १०. सुरेखा पत्रे, ११. शामल देशमुख, १२. प्रमोद देशपांडे, १३. मंजुषा देशपांडे, १४. मिसेस कडबे, १५. तुकाराम कैळवाड, १६. पंकज शीरभाते, १७. प्रणिता शिरभाते, १८. आकुलवार, १९. निलेश मेहेत्रे अशी आहेत.

अधिक माहितीसाठी नातलगांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांच्याशी +91 94228 75808 या मोबाईल क्रमांकावर साधावा.

०००

मनोरुग्णांना घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. ८ (जिमाका):  प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात. या रुग्णांची अवहेलना होवू नये. डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली .

जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस .एम. कलगुटकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, या रुग्णालयाच्या दुरुस्ती तसेच सुधारणा विषयक कामांकरीता २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयालय स्तरावर पाठवावा. त्याचा पाठपुरावा करू अशी ग्वाही देऊन या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या १६१ मनोरुग्णांना उद्यापासून सकाळच्या न्याहरीमध्ये दूधाचा समावेश करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या रुग्णालयाच्या सुधारणेकरिता जिल्हा नियोजनमधून सुमारे १ कोटी ८० लाख रुपये मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कलगुटकी यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील मंजूर व पेडिंग वैद्यकीय बिलांचा सविस्तर आढावा घेतला. आज दिवसभराच्या मॅरेथॉन दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय (माहिला रुग्णालय ), प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथील इमारत पाहणी करून या सर्वांचा आढावा घेतला.

०००

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम...

0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर सोलापूर, दि. 16- पुण्यश्लोक...

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी...

‘भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा...

0
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग; तिरंगा यात्रेत हजारो लोकांची गर्दी नागपूर  दि. 16 : पाकिस्तान विरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशानंतर भारतीय लष्कराचे आभार आणि त्यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे...

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई करणार –  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय नागपूर,दि. 16 : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज...

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्याच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गटशेती,...