सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 1163

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्षयमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर मध्ये महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भव: योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे  राबवा.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डॉ. प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉ. उमेश डॉ. सावंत, डॉ. बामणीकर, डॉ. गांधी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक आरोग्यसेवा संचालक डॉ  प्रेमानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नासिर नाईक यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी मानले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ‘सारथी’चे बळ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूरमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती. 

महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग

      केंद्रीय लोकसेवा आयोगया उपक्रमांतर्गत सारथी मार्फत UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत UPSC च्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच  प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते.

      केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा : आतापर्यंत मागील तीन वर्षात 2020, 2021, 2022 मध्ये एकूण 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी रुपये 21 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे  देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा : आतापर्यंत UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत: मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख रूपये इतका निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

सारथी अंतर्गत UPSC परीक्षेमध्ये मागील तीन वर्षात IAS  परीक्षेमध्ये 12, IPS परीक्षेमध्ये 18, IRS परीक्षेमध्ये 8  विद्यार्थी उतीर्ण झाले असून इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा एकूण 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच UPSC CAPF सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये  सांगली  जिल्ह्यातील अजिंक्य बाबुराव माने या विद्यार्थ्याची UPSC मधील नागरी सेवेमध्ये निवड झालेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यातील 3  विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रूपये  अर्थसहाय्य केले आहे. तर केंद्रीय  लोकसेवा आयोग(मुख्य परीक्षा) टप्प्यावर  6 विद्यार्थ्यांना एकूण 3 लाख रूपये अर्थसहाय्य केले आहे.

      महाराष्ट्र राज्यसेवा आयोग UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षा MPSC मध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोंचिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC साठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

MPSC पूर्व परीक्षा – आतापर्यंत मागील तीन वर्षात 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रूपये  निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 11 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुलाखत मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 56 लाख 60 हजार रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      सन 2021-22 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, यांत्रिकी सेवा, न्यायालयीन सेवा –दिवाणी न्यायाधीश परीक्षा (CJJD –JMFC) इत्यादी परीक्षांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दहा हजार रुपये इतकी रक्कम एकवेळचे अर्थ सहाय्य म्हणून देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सांगली जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना 4 लाख 40 हजार रूपये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा टप्प्यावरील 368 विद्यार्थ्यांना 55 लाख 20 हजार रूपये अर्थसहाय्य करण्यात आले.

MPSC राज्य सेवा 2020 मध्ये  निवड झालेले सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी तन्वीर संपतराव पाटील ता. शिराळा, निखिल सुरेश पाटील ता. वाळवा, अर्जुन संजय कदम ता. खानापूर, सतीश रामहरी चव्हाण ता. आटपाडी, संग्राम अरुण पाटील ता. तासगाव, शुभम सुधीर जाधव ता. खानापूर, ऋतुजा हिम्मतराव शिंदे ता. कडेगाव.

      छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF) – या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे/विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतू कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे JRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व SRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे. तर 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2019 मध्ये मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थ्यांना तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 58 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८ आणि १९ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे करीता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी  दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.18 आणि मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा! माहितीपटाचे १७ सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण

मुंबई, दि. १५ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने ‘हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

या माहितीपटाचे थेट प्रसारण पुढील लिंकवरुन पाहता येणार आहे.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी सांगता समारंभनिमित्ताने रविवार 17 सप्टेंबरला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे प्रसारण होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी, लेखन अजित दळवी, विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि निवेदन विनय आपटे यांचे आहे.

हा माहितीपट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एक वर्ष, एक महिना आणि 2 दिवसाने उशिराने मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाड्याच्या सहभागाची तेजस्वी कहाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण दक्षिण भारतातल्या हैदराबाद संस्थानातील काळरात्र संपली नव्हती. हैद्राबादचा तत्कालिन निजाम मीर उस्मान अली याने भारतात सामील न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या इराद्याने येथील जनतेवर अत्याचार आणि मुस्कटदाबीचे षडयंत्र आरंभले होते. निजामाच्या या जुलूमशाहीचे तख्त उधळून लावण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची माहिती चित्ररुपाने देण्यात आली आहे.

०००

हृदयविकारग्रस्त बालकांची मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली भेट

मुंबई, दि. १५ : सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील ४६ बालकांना मुंबई येथील एसआरसीसी बाल रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची व पालकांची आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रिया झालेल्या बालकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. मुलांना रुग्णालयात योग्य उपचार मिळतील व बालके रोगमुक्त होऊन घरी जातील याबाबत पालकांनी निश्चिंत रहावे, असा धीर देत मंत्री श्री. खाडे यांनी पालकांना आश्वस्त केले.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या २०५ बालकांपैकी ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले. ‘आयुष्मान भव:’ योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधून ४६ बालकांना एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होतील. रुग्णालयातील बालस्नेही वातावरण, डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि रुग्णालयाने पालकांना दिलेली सुविधा यामुळे बालक आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यासाठी रुग्गालयातील सर्व डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. खाडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री श्री. खाडे, सांगली जिल्हा प्रशासन आणि एसआरसीसी रुग्णालयातील डॉक्टरांचे पालकांनीही आभार मानले. सांगलीपासून मुंबईपर्यंत बालकांची व आमची सर्व काळजी घेतली, असे पालक जगन्नाथ  पाटोळे यांनी सांगितले.

यावेळी एसआरसीसी बाल रुग्णालयाचे संचालक झुबिन परेरा, प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील, अमित केरकर, सिराज शेजवलकर उपस्थित होते. डॉ. प्रिया प्रधान, डॉ. प्रदीपकुमार कौशिक, डॉ. गौरवकुमार, डॉ.सुप्रतिम सेन, डॉ. क्षीतिज सेठ यांनी बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.

०००

मनिषा सावळे/विसंअ

नॉर्वेची कंपनी एफओडी आणि ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

मुंबई, दि. 15 – नॉर्वेची कंपनी फ्लोटिंग ऑफशोर डिसॅलिनेशन (एफओडी) आणि भारतीय कंपनी ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्यासाठी प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारा ‘ऑफशोअर डिसॅलिनेशन शिप प्लांट’ बसवण्यास कंपनीच्या तेर्जे हलवॉरसेन, करण मेनन, जशेर कनियामपूरम यांनी स्वारस्य व्यक्त केले आहे. या जहाजामुळे जमिनीवरील गुंतवणुकीचा खर्च आणि त्याच्याशी संबंधित इतर भांडवली गुंतवणूक खर्च वाचू शकतो. तसेच हा प्रकल्प किनारपट्टीवरील भागात एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येणार आहे. अनियमित मान्सून आणि कमी होणाऱ्या भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही नाविन्यपूर्ण उपाययोजना पुढे आणली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

000

बी.सी.झंवर/विसंअ

पायाभूत विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण            

मुंबई, दि. 15 : राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित “उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०२१-२२ व २०२२-२३” कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) संजय दशपुते, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नागपूर सुधाकर सु. मुरादे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ अनिता खेरडे, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण शरद राजभोज, मुख्य अभियंता, विद्युत सा.बां. प्रादेशिक विभाग संदीप पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, प्रत्येकाला चांगले काम करत प्रगती करण्याची संधी मिळत असते. त्या संधीचा योग्य उपयोग करुन स्वतःसोबतच आपल्या विभागाचा, राज्याचा, देशाचा नावलौकीक आपण वाढवू शकतो. पुरस्कार म्हणजे जबाबदारी असते. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून देशाच्या अमृतकाळात नवीन कामाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय सहभाग घेत या अमृतकाळाला अधिक चांगले करण्यात आपण सर्व आपल्या परीने निश्चितच हातभार लाऊ शकतो. काम करताना प्रत्येकाने आपल्याला जीवनगौरव पुरस्कार प्राप्त होईल, या विचारातून दर्जेदार काम करण्याची वृत्ती वाढीस लावावी.

रस्ते, पूल, इमारती कोणत्याही प्रकारचे काम करताना आपल्या विभागाला एक मानदंड प्रस्थापित करता येऊ शकतो. ज्या माध्यमातून आपल्या विभागाची सोबतच आपली प्रतिमा आपण उंचावू शकतो. उत्कृष्ट काम करत पुरस्कार मिळवलेल्या सर्व विजेत्यांच्या कामातून निश्चितच ही प्रेरणा निर्माण होत जाईल, अशा गुणवत्तापूर्ण कामाची परंपरा ते निर्माण करतील. सर्वांमध्ये क्षमता आहेत,कामाचा अनुभव आहे. त्याला योग्य न्याय देत मिशन मोडवर काम करावे. ते करत असताना आपले स्वास्थ,कामाची गुणवत्ता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन  मंत्री श्री.चव्हाण यांनी केले.

अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, अभियांत्रिकी क्षेत्र प्रगत होत गेले. त्याप्रमाणे आपली संस्कृती प्रगत होत गेली आहे. अभियांत्रिकी हे सर्व संकल्पना, स्वप्नांना प्रत्यक्ष मूर्तस्वरुप देणारे क्षेत्र आहे. त्याच पद्धतीने आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ही एक परंपरा आणि भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांच्या सारख्या अभियंत्याचा वारसा लाभलेला आहे, या पार्श्भूमीवर प्रत्येकाने अधिक चांगले काम करण्याची आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली पाहिजे.

यावेळी सार्वजनिक विभागामार्फत याच वर्षापासून देण्यात येणा-या पहिल्या जीवन गौरव पुरस्काराने संजय श्रीकृष्ण भोंगे, मुख्य अभियंता (स्वेच्छा निवृत्त) यांना गौरवण्यात आले. यावेळी सन २०२१-२२  मधील एकूण ४३, तर तसेच सन २०२२-२३ या वर्षातील ४१ जणांना उल्लेखनीय कामगिरीसाठी  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संकल्पचित्र मंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या नमुना संकल्पचित्र पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच नमुना संकल्पचित्र पुस्तिका तयार करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ येथे केलेल्या उत्कृष्ट कामांबद्दल अभियंत्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साळुंखे यांनी केले. सचिव श्री.दशपुते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रमोद बनगोसावी, अधीक्षक अभियंता, मुंबई सा.बां. मंडळ, मुंबई यांनी मानले.

०००

वंदना थोरात/विसंअ

इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 15 : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान व नाविन्यता या विषयांमध्ये सहकार्य सातत्याने वाढत आहे. भारत – अमेरिका व्यापार वाणिज्य संबंध वाढविण्यासंदर्भात इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या स्थापनेपासून केलेले कार्य प्रशंसनीय आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण: व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास’ या विषयावर आयोजित परिषदेचे उद्घाटन राज्यपाल श्री.बैस यांनी शुक्रवारी (दि. 15) मुंबई येथे केले. त्यावेळी ते बोलत होते.

परिषदेला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अमेरिकेच्या मुंबई दूतावासातील उपमुख्य अधिकारी माइकल श्रेडर, इंडो अमेरिकन चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, मानद सचिव कमल वोरा, महिला उद्योजक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या परिषदेला उपस्थित होते.

आज राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर सरकारतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.  महाराष्ट्रात महिलांसाठी कौशल्य विकास, उद्यमशीलतेला चालना व आर्थिक समावेशन या टप्प्यांवर लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला देखील चालना मिळत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण तसेच संशोधन करण्याकडे कल आहे. या दृष्टीने उभय देशांनी विद्यापीठस्तरावर सहकार्य वाढवून विद्यार्थी व शिक्षक आदान प्रदान वाढविल्यास तसेच किमान एक सत्र परस्पर विद्यापीठात करण्यास अनुकूलता दर्शविल्यास त्याचा उभय देशांच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

आज युवा लोकसंख्येचा लाभ भारताकडे असून अमेरिकन कंपन्यांनी भारतातील युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धनात सहकार्य केल्यास त्याचा लाभ देखील सर्वांना होईल, असे राज्यपालांनी सांगितले.  स्वच्छ ऊर्जा, आरोग्य सेवा, पर्यटन और शाश्वत शेती या क्षेत्रांमध्ये सामूहिक प्रयत्नांमधून परिणामकारक बदल होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत दहाव्या क्रमांकाच्या आर्थिक महासत्तेवरून काही वर्षात पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता झाला असून लवकरच आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

व्यापार व वाणिज्य संबंध हे द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे. आज भारत व अमेरिका संरक्षण, अंतरिक्ष विज्ञान यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करीत असून शासन, खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांनी हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे अमेरिकेचे मुंबईतील उपमुख्य अधिकारी माइकल श्रेडर यांनी सांगितले. कमल वोरा यांनी प्रास्ताविक केले तर राज्यलक्ष्मी राव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

०००

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई, दि. १५ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.
पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

000

असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात.   SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा पात्र असणाऱ्या मराठा व कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी तील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना असतो.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी इयत्ता ११ वी तील मराठा व कुणबी समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा 800 रुपये म्हणजेच एका शैक्षणिक वर्षात 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू किंवा हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Chhatrapati Rajaram Maharaj sarthi scholarship eligibility: छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत.

  • Sarthi Scholarship 2023-24 चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या वर्गात शिक्षण घेत असावा.
  • या शिष्यवृत्तीचा लाभमराठा, कुणबी, मराठाकुणबी व कुणबीमराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
  • राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
  • NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मात्र समजण्यात येईल.
  • इयत्ता १० वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये 55% टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे.  इयत्ता १० वी व ११ वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000/- पेक्षा कमी असावे.

खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती साठी अपात्र आहेत.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  • शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
    सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

: आवश्यक कागदपत्रे

  • छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी आवेदन करताना विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.                                                                                        
  • विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
  • मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.               
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुक च्या पहिल्या पानाची सत्य प्रत ( नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
  • इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
  • इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
  • NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/ निकाल पत्रक.
  • अन्य् अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.
  • शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाइन लिंक वर माहिती भरता येते.
  1. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
  2. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र ४११००४ या पत्त्यावर सादर करावे.

000000

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण विभाग, नवी मुंबई

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १४ : मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या...

विधानसभा इतर कामकाज/निवेदन

0
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,...

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...