सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 1162

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

मुंबई, दि. 15 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत नागपूर येथे दुपारी २ वाजता इंडस्ट्री मिट होणार असून हा कार्यक्रम गुरूनानक भवन, अंबाझरी वळणमार्ग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ समोर अमरावती रोड,नागपूर ३३ येथे होणार आहे.

आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या निवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि.१५ : भूदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण नाशिक येथे मोफत देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील उमेदवारांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबईचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सैन्यदलातील अधिकारी पदासाठीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना प्रशिक्षण, निवास व भोजन नि:शुल्क देण्यात येते. नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे ३ ते १२ ऑक्टोबर  या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबईतील उमेदवारांची निवड चाचणी मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुंबईतील उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरील एसएसबी – ५४ कोर्स संदर्भातील अर्ज सादर करावे, किंवा व्हॉट्स ॲप 9156073306 या क्रमांकावर एसएसबी-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट सादर करावी.

केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढे नमूद केलेली कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून येणे आवश्यक असणार आहे.

अ) उमेदवार हा कम्बाईड डिफेन्स सव्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण असावा. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.

ब) एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

क) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

ड) विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी (University Entry Scheme) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांचा ई-मेल आय डी : training.petenashik@gmail.com अथवा दूरध्वनी क्र. 0253-2451032 अथवा भ्रमणध्वनी क्र. 9156073306 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ

शिवकालीन किल्ले राज्य व संस्कृतीचे रक्षक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 15 : राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड हे शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहेत. राज्यातील किल्ले हे राज्याचे तसेच संस्कृतीचे रक्षक असून विशेषज्ञांच्या मदतीने त्यांचे रक्षण व जीर्णोद्धार केला पाहिजे. तसेच तेथे शैक्षणिक पर्यटन वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) राजभवन येथे देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ गिर्यारोहक व हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेला देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे व संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

पावसाळ्याच्या दिवसांत किल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांबाबत वाचतो, त्यावेळी मनाला वेदना होतात असे सांगून स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारश्याचे जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचे रक्षण होईल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर जातीभेदाचे कडवे विरोधक होते. त्यामुळे जातीभेद समाप्त करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. हिमालयन जर्नलचे संपादक व ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी हिमालय पर्वत शृंखलेच्या केलेल्या अध्ययनाचा गौरव करून राज्यपालांनी त्यांचे ‘शिखर सावरकर जीवन गौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीच्या वर्षी काही गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश येथे आजवर सर केले नाही, असे शिखर सर केले होते. त्या शिखराला 2018 मध्ये ‘शिखर सावरकर’ हे नाव दिले गेले, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी दिली. सावरकर हे साहसाचे पुरस्कर्ते होते. गिर्यारोहण हे साहसी तसेच संघटनात्मक कार्य असल्यामुळे सावरकर स्मारकातर्फे गिर्यारोहकांना 2020 पासून ‘शिखर सावरकर’ पुरस्कार दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करीत असल्याचे यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेश वराडकर व स्वप्नील सावरकर उपस्थित होते.

०००

Maharashtra Governor presents ‘Shikhar Savarkar’ Lifetime Achievement Award to veteran mountaineer Harish Kapadia

 Mumbai 15 : Governor Ramesh Bais presented the ‘Shikhar Savarkar’ Samman to individuals and organisations promoting mountaineering and preserving forts, at a function held at Raj Bhavan Mumbai. The ‘Shikhar Savarkar awards’ have been instituted by the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Mumbai.

Veteran mountaineer and researcher on Himalayas Harish Kapadia was presented the ‘Shikhar Savarkar Lifetime Achievement Award’, while Mohan Hule was given the ‘Shikhar Savarkar Yuva Sahas Puraskar’. The ‘Shikhar Savarkar Durg Samvardhan Puraskar’ was given to Durgveer Pratishthan.

      Executive President of the Smarak Ranjit Savarkar, Treasurer Manjiri Marathe, Secretary Rajendra Waradkar, Joint Secretary Swapnil Savarkar were among those present.

०००

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे जुलमी सत्तेविरुद्ध जनतेचा लढा’

  • मराठवाडा मुक्तिसंग्रामातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा भिन्न
  • मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रत्यकाने समजून घेण्याची गरज
  • महिलांनीही मुक्तिसंग्रामात दिले महत्त्वपूर्ण योगदान

लातूर, दि. 15 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा या लढ्याला होती. निजामाच्या अन्यायी जुलमी सत्तेविरुद्ध जनतेने दिलेले हा लोकलढा होता. या लढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित प्रकट मुलाखत कार्यक्रमात डॉ. वाघमारे आणि डॉ. रोडे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर यांनी ही प्रकट मुलाखत घेतली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, माजी सनदी अधिकारी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हा पूर्णतः भिन्न होता. स्वातंत्र्य लढा हा केवळ राजकीय पारतंत्र्याविरुद्ध होता. मात्र, मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा पाच पातळीवरील गुलामगिरीविरुद्ध होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मराठवाडा मुक्तिसंग्राम हा क्लिष्ट आणि किचकट स्वरूपाचा लढा होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन डॉ. वाघमारे यांनी दोन्ही लढ्यातील वेगळेपण मांडताना केले. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास आजही दुर्लक्षित असून इतिहास अभ्यासकांनी यावर आणखी प्रकाश टाकून हा इतिहास सर्वदूर पोहचवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हैदराबाद संस्थानावर सुमारे 224 वर्षे निजामशाही राजवट होती. या काळात झालेल्या सात निजामांपैकी सातवा निजाम नवाब मीर उस्मान अली बहादूर हा अतिशय वेगळा होता. त्यापूर्वी झालेल्या निजामांच्या राजवटीत सर्वसामान्य जनतेचे शोषण झालेच, पण सातव्या निजामाच्या काळात जनतेच्या आर्थिक शोषणासह शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक निर्बंधही लादले गेले. अतिशय साधे राहणीमान असलेल्या या निजामाला सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड हव्यास होता. त्याचे विचार साम्राज्यवादी होते. त्यामुळे त्याने ब्रिटीश भारतातून परत गेल्यानंतर हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळविण्यासाठी सर्व तयारी अगोदरपासूनच सुरु केली होती. यासाठी त्याने संस्थानाचे स्वतंत्र चलन, उच्च न्यायालय, डाक यंत्रणा सुरु केली होती. तसेच या निजामाच्या काळात रझाकारांनी अतोनात अत्याचार केले, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात विविध जाती-धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या लढ्यात आर्य समाजाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते. आचार्य वेदप्रकाश हे आर्य समाजाचे या लढ्यातील पहिले हुतात्मा. वयाच्या केवळ विसाव्या वर्षी, 1937 मध्ये त्यांना हौतात्म आले. हैदरबाद संस्थानाच्या बाहेरूनही अनेक आर्य समाज बांधव या लढ्यात सहभागी झाले होते. यापैकी अनेकांनी मुक्तिसंग्रामात हौतात्म पत्करले. स्टेट कॉंग्रेस आणि महाराष्ट्र परिषदेनेही मराठवाडा मुक्तिसंग्रामात पूर्ण भूमिका बजाविली. महाराष्ट्र परिषदेच्या लातूर येथे झालेल्या दुसऱ्या अधिवेशनामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व या लढ्याला मिळाले, असे डॉ. रोडे यांनी सांगितले.

रझाकार संघटना 1945 ते 1948 या काळात अतिशय आक्रमक झाली होती. सर्वसामान्य जनता, तसेच मुक्तिसंग्रामाला मदत करणाऱ्यांविरुद्ध अतिशय क्रूरपणे हल्ले केले जात होते. या काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिल्ली येथे जावून महात्मा गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी राझाकारांकडून होणाऱ्या अपरिमित अत्याचाराच्या घटना ऐकून महात्मा गांधी यांनी जशास तसे उत्तर देण्याची परवानगी दिली होती, असे डॉ. रोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण

मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदानाविषयी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. रोडे म्हणाले, या लढ्यात महिलांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. महाराष्ट्र परिषदेसोबत आयोजित होणाऱ्या महिला परिषदेमध्ये ग्रामीण भागातील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत होत्या. स्वातंत्र्य सैनिकांचा निजाम सैन्य, रझाकार यांच्यापासून बचाव करण्यापासून त्यांना जेवणाची सोय करण्याची जबाबदारी महिला स्वातंत्र्य सैनिकांनी पार पाडली. तसेच निजाम सैन्याला माहिती न होता बॉर्डर कॅम्प येथून स्वातंत्र्य सैनिकांसाठी शस्त्रे घेवून येण्याचे कामही महिलांनी पार पाडले, असे डॉ. रोडे यांनी यावेळी सांगितले.

सुमारे दोन तास चाललेल्या या प्रकट मुलाखतीमध्ये डॉ. वाघमारे, डॉ. रोडे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला उजाळा दिला. तसेच मराठवाडा, विशेषतः सध्याच्या लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या घटना, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनाविषयी माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची रूपरेषा अधोरेखित करून या लढ्यात समर्पणाने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांचा सत्कार करण्यात आला.

खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत (ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाली.

आपल्या प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी पालकमंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत किती मोकळे भूखंड आहेत, त्या पैकी किती भूखंडावर उद्याने आहेत, मैदाने किती आहेत, किती जागा दत्तक धोरणात येऊ शकतात या बद्दलची सर्व माहिती ३० दिवसांत महानगरपालिकेच्या संकेस्थळावर प्रकाशित करावी, असे सांगितले. भूखंडाची सद्य:स्थिती तसेच त्याबद्दलचे भविष्यातील नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून पारदर्शकता टिकवता येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक वृध्दिंगत होईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सिटीझन फोरमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी म्हणजे नक्की काय, या मधील तरतुदी काय आहेत, यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, तसेच ह्या धोरणात्मक निर्णयाची गरज आहे का यासारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. पालकमंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व सूचना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाऊले उचलण्याचे सूचवले. त्याचप्रमाणे ओपन स्पेस पॉलिसीचा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी तो व्यवस्थित वाचून आपल्या सूचना द्याव्यात, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी

मुंबई दि.१५ : सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक असून त्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. परदेशातील भारतीय महिलांची फसवणूक होते त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्था आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत करणे आवश्यक आहे त्याकरिता धोरण बनवण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आज दुपारी  विधानभवनात “स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.  यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, आजच्या परिसंवादातून नक्कीच नवीन विचारांची देवाण- घेवाण होण्यास मदत होईल. लिंग समानता, स्त्रियांवरील अत्याचार,  हिंसाचार यावर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी या परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांचे त्यांनी आभार मानले.

मेक्सिकोचे महावाणिज्यदूत अडोल्फो गार्सिया एस्ट्राडा म्हणाले की, स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाची आणि त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्या स्त्रियांना हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या, विधी व न्याय विभागाद्वारे मदत करणे आवश्यक आहे. मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीचे महावाणिज्यदूत एचिम फॅबिग म्हणाले की, जर्मनीतील स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी महिला मंत्र्याच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. याविषयावर एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. लोकांना समजण्यासाठी स्थानिक भाषेत कायदे तयार करण्यात आले आहेत. घरगुती हिंसाचारासाठी विशिष्ट क्रमांकाची  हेल्पलाईन तयार करण्यात आलेली आहे.

ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत मॅजेल हाइंड म्हणाले की, सर्वच क्षेत्रात लिंग समानता असायला पाहिजे. महिलांच्या सशक्तीकरण होणे महत्वाचे आहे. कॅनडाच्या महावाणिज्यदूत दिदराह केली म्हणाल्या की, जेंडर बेस गुन्ह्यांसंदर्भात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कॅनडाने केला आहे. जपानच्या महावाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार हा  सामाजिकतेसोबत सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा विषय आहे. जपानमध्ये स्त्री- पुरुष असा भेदभाव न करता समान कायदा अवलंबला जात असल्याचे सांगितले.

नेदरलॅण्डच्या महावाणिज्यदूत बार्ट डी जोंग म्हणाल्या की, १ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फेमिनिजम कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.  भारतातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे. नेदरलॅण्डमध्ये अत्याचारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी एकच मध्यवर्ती केंद्र आहे. त्याद्वारे महिलांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. रशियाच्या उपमहावाणिज्यदूत एलेना रेमेझोवा म्हणाल्या की, पीडित महिलांना मानसिकदृष्ट्या आणि कायदेशीर मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की,  स्त्रिया आजही आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत. पोलिसांच्यावतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी योजना राबविण्यात येत आहेत. लहानपणापासून मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो. या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलींचे संरक्षण मुंबई पोलिसांकरिता प्राथमिकता असल्याचे श्री. फणसाळकर यांनी सांगितले.

महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, काही देशांसोबत महिलांच्या प्रश्नांवर विचारांची देवाण- घेवाण होणे आवश्यक आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्त्री आधार केंद्र विश्वस्त जेहलम जोशी म्हणाल्या की, कोविड काळात ज्या स्त्रिया विधवा झाल्या आहेत, त्यांना संस्थेच्या वतीने स्त्रियांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याचे काम करण्यात आले. गणेशोत्सव, नवरात्र यादरम्यान लहान मुलींचे अपहरण होऊ नये याकरिता स्त्री आधार केंद्रातील महिला पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. पीडित स्त्रियांना स्थानिक पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. महिलांच्या जागृतीसाठी सरकारच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जावी.    यावेळी जर्मनीचे अचिम फॅबिग, फ्रान्सच्या जो-मार्क सेरे शार्ले, झेलम जोशी यांच्यासह  सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनल जोगळेकर यांनी केले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या प्रेरणादायी व स्फूर्तिदायी लढ्यापासून बोध घेत कार्य करण्याची गरज

औरंगाबाद, दि. १५ (विमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असून यापासून सर्वांनी बोध घेत कार्य करण्याची गरज असल्याचा सूर मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत उमटला.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने वंदे मातरम सभागृह येथे मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ आणि ‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महनगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, व्याख्याते सारंग टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान
-व्याख्याते सारंग टाकळकर
‘मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ या विषयावर व्याख्यान देतांना श्री टाकळकर म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढाईत सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, गोविंद पानसरे, दगडाबाई शेळके, अनंत कान्हेरे, माणिकचंद पहाडे, नारायण पवार अशा विविध स्वातंत्र्य सेनानींचे मुक्ती संग्रामात मोठे योगदान होते. भारतीय सैनिकानी निझामाविरुद्ध ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम राबवून निजामाच्या अधिपत्याखालील सर्व भाग काबीज करत हैद्राबाद संस्थान निजाम मुक्त केले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून हा लढा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन अत्यंत तळमळीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विलक्षण असा लढा लढला गेला. यामध्ये सुमारे ६० हजारापेक्षा अधिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला, २५ सत्याग्रहींनी
तुरुंगवास भोगला तर 102 वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी रणरागिनींची साथ – डॉ. रश्मी बोरीकर
‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा अनेक महिला स्वातंत्र्य सैनिक मुक्ती लढ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतःच्या जीवाची, अब्रूची पर्वा न करता या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम केले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी रणरागिनींनी खंबीरपणे साथ दिली. मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील बालवीर’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १५ : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोफत अन्नदान कक्षाचे उद्धाटन, शारदा गजानन पुरस्कार व जिल्हा स्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आणि शेतकरी बांधवांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम चांगला आहे. शेतकरी कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे. शेतमालातील चढउतार लक्षात घेऊन बाजारभाव शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडण्याच्यादृष्टीने शासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो.

राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून  देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. पणन मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. स्वच्छतेबाबत मार्केट यार्ड आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा. पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

बालेवाडी येथे ऑलिंपिक भवनाच्या उभारण्यासाठी  ७५ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला मूर्तस्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रिडा संकुलासाठी निधी देण्यात येत आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवूण देणाऱ्या स्व. खशाबा जाधव यांचा जन्म दिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण असे ३ संघ क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात. यापूर्वी पुणे जिल्ह्यातून एकच संघ भाग घेत असे. एकंदरीतच राज्यात तरुण तरुणींमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

000

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्षयमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर मध्ये महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भव: योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे  राबवा.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डॉ. प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉ. उमेश डॉ. सावंत, डॉ. बामणीकर, डॉ. गांधी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक आरोग्यसेवा संचालक डॉ  प्रेमानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नासिर नाईक यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी मानले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ‘सारथी’चे बळ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूरमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती. 

महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग

      केंद्रीय लोकसेवा आयोगया उपक्रमांतर्गत सारथी मार्फत UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत UPSC च्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच  प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते.

      केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा : आतापर्यंत मागील तीन वर्षात 2020, 2021, 2022 मध्ये एकूण 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी रुपये 21 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे  देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा : आतापर्यंत UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत: मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख रूपये इतका निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

सारथी अंतर्गत UPSC परीक्षेमध्ये मागील तीन वर्षात IAS  परीक्षेमध्ये 12, IPS परीक्षेमध्ये 18, IRS परीक्षेमध्ये 8  विद्यार्थी उतीर्ण झाले असून इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा एकूण 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच UPSC CAPF सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये  सांगली  जिल्ह्यातील अजिंक्य बाबुराव माने या विद्यार्थ्याची UPSC मधील नागरी सेवेमध्ये निवड झालेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यातील 3  विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रूपये  अर्थसहाय्य केले आहे. तर केंद्रीय  लोकसेवा आयोग(मुख्य परीक्षा) टप्प्यावर  6 विद्यार्थ्यांना एकूण 3 लाख रूपये अर्थसहाय्य केले आहे.

      महाराष्ट्र राज्यसेवा आयोग UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षा MPSC मध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोंचिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC साठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

MPSC पूर्व परीक्षा – आतापर्यंत मागील तीन वर्षात 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रूपये  निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 11 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुलाखत मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 56 लाख 60 हजार रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      सन 2021-22 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, यांत्रिकी सेवा, न्यायालयीन सेवा –दिवाणी न्यायाधीश परीक्षा (CJJD –JMFC) इत्यादी परीक्षांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दहा हजार रुपये इतकी रक्कम एकवेळचे अर्थ सहाय्य म्हणून देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सांगली जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना 4 लाख 40 हजार रूपये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा टप्प्यावरील 368 विद्यार्थ्यांना 55 लाख 20 हजार रूपये अर्थसहाय्य करण्यात आले.

MPSC राज्य सेवा 2020 मध्ये  निवड झालेले सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी तन्वीर संपतराव पाटील ता. शिराळा, निखिल सुरेश पाटील ता. वाळवा, अर्जुन संजय कदम ता. खानापूर, सतीश रामहरी चव्हाण ता. आटपाडी, संग्राम अरुण पाटील ता. तासगाव, शुभम सुधीर जाधव ता. खानापूर, ऋतुजा हिम्मतराव शिंदे ता. कडेगाव.

      छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF) – या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे/विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतू कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे JRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व SRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे. तर 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2019 मध्ये मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थ्यांना तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 58 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...