गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1164

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. 11 : राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

आपल्या राज्याला नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक तसेच भौगोलिक पर्यटनाची संपदा विपुल प्रमाणात लाभली आहे. राज्यातील पर्यटनाला जगभरात ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संचालनालयामार्फत विविध उपक्रम, योजना आणि महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे, पर्यटकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, ग्रामीण भागातील पर्यटनाचा विकास, पावसाळी पर्यटन करताना घ्यावयाची खबरदारी अशा महत्वपूर्ण विषयांवर पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.12, गुरुवार दि.13 आणि शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण

मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण झाले. निर्भया वाहन पथकात नव्याने 40 चारचाकी वाहने तर 184 दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत.

नरिमन पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री अतुल सावे, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्विक रिस्पॉन्स टीम या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. नवीन वाहनांचा पथकात समावेश होत असल्याने पथक नक्कीच अधिक कार्यक्षम बनेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

—000—

श्री.केशव करंदीकर/विसंअ/

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 11 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवार 15 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी नियोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक व मालेगाव अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर तालुक्यातील तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येवून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणे करून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत घेवून जाणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळी व पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या दोनवेळच्या जेवणाच्या व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबत देखील नियोजन देखील करण्यात यावे.

संभाव्य पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन शहराच्या नजीकच्या तालुक्यातील लाभार्थी संख्या जास्त असावी. तसेच लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणेमध्ये समन्वय राखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात एखादी मोबाईल ॲप्लीकेशन तयार करण्यात यावे, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या वाहतूकीचे नियोजन करणे सोयीचे होईल, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करतांना, पर्यटन विभागामार्फत पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी किर्तनकार व भारूडांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांच्या धरतीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात येत होती. त्याचप्रमाणे ज्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांमुळे लाभ झाला आहे, अशा लाभार्थ्यांचे अनुभव कथन करणाऱ्या लहान छायाचित्रीकरणाच्या क्लिप्स बनविण्यात येऊन त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखवण्‍याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत साधारण 8 लाख 91 हजार पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. येत्या दोन तीन दिवसांच्या कालावधीत अधिकारी यांनी गावोगावी जावून शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यसाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉल्सवर शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.

शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी त्या दिवशी करण्यात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमधील बदल लक्षात घेवून सर्व नाशिककरांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

या बैठकीनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी डोंगरे वसतीगृह मैदान या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुधंती शर्मा, कार्यकारी अभियंता

उदय पालवे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

नेदरलँड्सचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी घेतली उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

मुंबई दि. ११: भारत आणि नेदरलँड्स देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेदरलँडचे मुंबईतील कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी व्यक्त केले.

श्री. हेल्डन यांनी आज विधानभवनातील उप सभापती यांच्या दालनात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. हेल्डन यांच्यासमवेत नेदरलँड्स उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सौरभ सांगळे हे देखील उपस्थित होते.

युरोपीय देशांमधील संसद, संसदीय समित्या, महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला संरक्षण विषयक कायदे, ज्येष्ठांसाठीचे कायदे, बाल आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींसाठी चर्चा-अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. नेदरलँड्समध्येदेखील अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. नेदरलँड्समधील आगामी अभ्यासभेटीसंदर्भातील नियोजन यादृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. भारत आणि नेदरलँडचे संबंध व्यापार आणि सामाजिक दृष्टीने अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा श्री. हेल्डन यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आरोग्य, कृत्रीम बुद्धीमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात आणखी करारमदार व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रात नगरपालिकास्तरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी सामजंस्य कराराच्या माध्यमातून काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत वातावरणीय बदल, प्रदूषण, महिलांचे सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरूष समानता यासंदर्भात विचार मांडले. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जागतिक महिला धोरणासंदर्भात परिषद होत आहे. त्यात नेदरलँड्सचे प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे, असे निमंत्रण उप सभापती यांनी श्री. हेल्डन यांना दिले.

०००

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

पुणेदि. १० :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जडअवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशनपुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : साताराफलटणलोणंदबारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनपुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जडअवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

सासवड पोलीस स्टेशनपुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण – सातारा बाजुकडे जाणारी जडअवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध  १३  जुलै रोजीच्या शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावेअसे आवाहनही करण्यात आले आहे.

000

नाट्य स्पर्धा आणि विविध पुरस्कारांच्या वितरणाचे निश्चित वेळापत्रक लवकरच – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : राज्यातील नाट्य आणि इतर कलावंतांना प्रोत्साहन देण्याचीच भूमिका राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ हे निश्चित वेळेत आणि कालावधीत होईल, यादृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या हौशी नाट्य कलावंतांच्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या कलावंतांच्या मागण्या ऐकून घेतल्या. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध पारितोषिके आणि पुरस्कार दिले जातात. विभागाने सकारात्मक पुढाकार घेत पुरस्कार वितरणाबाबत निश्चित कार्यक्रम तयार करून त्याच दिवशी संबंधित पुरस्कार अथवा पारितोषिके वितरित होतील, यादृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या पदाधिकारी यांनी केलेल्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. नाट्य प्रयोग निर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात वाढ करणे आदी मागण्यांची व्यवहार्यता तपासून पाहू. राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, रंगभूषा आणि वेशभूषा या तांत्रिक बाबींसाठी तीन पारितोषिके द्यावीत, याचाही विचार करण्यात येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे श्याम शिंदे, सलीम शेख, दिनेश कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. येत्या वर्षभरात हा मोलाचा साहित्य दस्तावेज प्रकाशित होईल, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

दर्शनिका (गॅझेटियर) विभागाच्या वतीने मराठी संगीत रंगभूमीच्या 175 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा ग्रंथ तीन खंडात प्रकाशित केला जाणार आहे. त्याअनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, ग्रंथ खंड निर्मिती समितीचे सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, संजय गोसावी, पं. शौनक अभिषेकी, सुलेखनकार अच्युत पालव आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, संगीत रंगभूमीचा इतिहास जपणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल ही वैभवशाली इतिहासाचे पान आहे. त्यामुळे ती वाटचाल सध्याच्या पिढीसमोर येणे महत्त्वाचे आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून त्या वेळेत तीनही खंड प्रकाशित होण्याच्या दृष्टीने संपादकीय मंडळातील सर्व समिती सदस्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक सहकार्य विभागाच्या वतीने करण्यात येईल.

तीन खंडात हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार असून त्याची माहिती यावेळी डॉ. घांगुर्डे यांनी दिली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नाशिक, दिनांक 10 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आज शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त रमेश काळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नाशिक व कळवण जितीन रहमान, विशाल नरवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 85 टक्के लोकसंख्या ही सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने ग्रामीण भागात या केंद्रीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्याला मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन या योजनेबाबत समाजात माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. ही योजना समाजाला एकत्र आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, असे सांगून नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्याने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे ही श्री. आठवले यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, अनुसूचित जाती उपयोजना, प्री मॅट्रीक व पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना, वृद्धाश्रम  योजना, सफाई कामगारांसाठी असलेल्या योजनांचा यावेळी आढावा घेतला.

000

सर्वसामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न नवीन वाळू धोरणामुळे निश्चितपणे साकार होणार – पालकमंत्री अतुल सावे

जालना दि. 10 (जिमाका) :- नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करुन देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनाने रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाईन प्रणालीव्दारे नवीन वाळू धोरण शासनाने दि. 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहे. या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न सहजपणे साकार होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

अंबड तालुक्यातील मौजे आपेगाव येथे आज पालकमंत्री यांच्या हस्ते वाळू विक्री डेपोचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसिलदार श्री.शेळके, आदींसह  पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, सर्वसामान्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वस्त दरात वाळु उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नवीन वाळू धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार जालना जिल्ह्यातील एकूण 28 वाळुघाटांसाठी पर्यावरण अनुमती प्राप्त झाली होती. त्यानुसार 10 ठिकाणी वाळू डेपो निश्चित करुन त्यासाठी निविदा मागविल्या होत्या. अंबड तालुक्यातील एकूण चार वाळुघाटांसाठीच्या आपेगाव व पिठोरी सिरसगाव या ठिकाणच्या वाळू डेपोतून आजपासून लाभार्थ्यांना स्वस्त दरात वाळू मिळणार आहे. उर्वरित डेपोही लवकरच सुरु करण्यात येतील.  बेघरांना आपले हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जाणार आहेत. वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन दिल्याने  या योजनेतंर्गत  सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न सहजपणे पूर्ण होणार आहे. नवीन वाळू धोरण सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी या धोरणाची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी,असेही श्री. सावे यांनी सांगितले.

आमदार राजेश टोपे म्हणाले की, वाळू हा सर्वांसाठीच महत्त्वाचा विषय आहे. नवीन वाळू धोरण चांगले असून या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. लाभार्थ्यांना सहज व पारदर्शकपणे या धोरणाच्या माध्यमातून वाळूचा लाभ मिळावा. सर्व डेपोत मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध करुन द्यावी. वाळूसाठी सुरु करण्यात आलेले ऑनलाईन नोंदणी पोर्टल अखंडित सुरु ठेवावे. जेणेकरुन लाभार्थ्यांना सुलभ पध्दतीने नोंदणी करणे शक्य होईल.

आमदार नारायण कुचे म्हणाले की, नवीन वाळू धोरणामुळे गरीब व्यक्तीला घर बांधण्यासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन नवीन वाळू धोरणाचा लाभ घेऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, शासनाने जाहीर केलेले नवीन वाळू धोरण सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. जिल्हयात नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी दहा ठिकाणी वाळू डेपो निश्चित करण्यात आले आहेत. अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव व आपेगाव येथील वाळू विक्री डेपो येथे मुबलक प्रमाणात वाळू साठा  करण्यात आलेला आहे. शासन निर्देशानुसार स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी नागरिकांनी त्यांची मागणी ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. नवीन वाळू धोरणाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, ग्राहकांनी नोंदणी केलेली वाळू ही डेपोमधून वाहनाव्दारे घेऊन जाणाऱ्या वाहनाला सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आपेगाव येथील वाळू डेपोचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यासाठी रुपये 600/- प्रती ब्रास वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र,  स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी नागरिकांनी त्यांची मागणी ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक आहे. ऑनलाईन मागणी नोंदविण्यासाठी mahakhanij.maharashtra.gov.in या website वर जाऊन sand Booking | option मधून आपली मागणी नोंदवावी किंवा आपल्या गावातील लगतच्या सेतू अथवा महा ई -सेवा केंद्रात जाऊन रेतीची मागणी नोंदवावी. सेतू केंद्रामध्ये मागणी नोंदविण्यासाठी प्रती व्यक्ती 25/- रुपये (अक्षरी पंचवीस रुपये फक्त ) दर निश्चित करण्यात आला आहे. मागणी नोंदविण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व मोबाइल नंबर देणे बंधनकारक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीतजास्त 50 मे. टन अंदाजे 10 ब्रास रेती अनुज्ञेय राहील. वाळु वाहतुकीचा खर्च ग्राहक नागरीकांना करावयाचा आहे. वाहतूकीचे सर्वसाधारण दर जालना जिल्हयाच्या jalna.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.१० : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. आजअखेर ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला वेग येईल.
राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...