शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1154

महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय : काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीनगर, दि. १७ :- महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्थेचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील ७३  नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना वन इंडिया रिंग ने सन्मानीत करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काश्मिरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दृढ ॠणानुबंध होते, याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. सरहद या संस्थेच्या माध्यमातून आपले जूने नाते आणखी मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. ‘सरहद’ संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ज्या- ज्यावेळी काश्मीरला आलो त्यावेळी येथील बांधवानी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी आपण सदैव काश्मिरी बांधवांच्या प्रगतीसाठी  सज्ज राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.

काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मीर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पनवेल येथे काश्मीर नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो ११ कलमी कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच जी-२० च्या निमित्ताने भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले. यात काश्मीरसह अनेक राज्यांना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे ते म्हणाले.

ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन – सिन्हा

यावेळी नायब राज्यपाल श्री.सिन्हा यांनी मुख्यमंत्री श्री‌. शिंदे यांना तत्काळ प्रतिसाद दिला. आपण येत्या नवरात्रोत्सवात काश्मीर दौऱ्यावर याल त्यावेळी या महाराष्ट्र भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले जाईल. त्यासाठी आपल्याला जाहीर निमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सुरवातीला अनंतनाग येथे चकमकीत शहीद झालेल्या लष्करी तसेच पोलीस अधिकारी, जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

000

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- थोर समाजसुधारक, पत्रकार प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

सिद्धार्थ उद्यानातील स्मृती संग्रहालयात हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार,आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट तसेच विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त  जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण ही करण्यात आले.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

• संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय

लातूर, दि. 17 (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा बैठकीत ना. मुश्रीफ बोलत होते. अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, प्राध्यापक डॉ. शैलेन्द्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता डी. बी. नीळकंठ यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य असून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा सामान्य रुग्णालयांशी त्या त्या वेळी जोडले गेले.तसेच काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या असल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध पदांची पदभरती प्रक्रिया सुरु असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.

गरीब, गरजू कुटुंबांसाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून औषध उपचाराची सुविधा आता 5 लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील खासगी रुग्णालयातही रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. तसेच सध्या राज्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून कॅन्सर होऊच नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपुलकीने वागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. मुश्रीफ यांनी लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते बौद्धिक दिव्यांग मुलांना टीएलएम कीटचे वितरण करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे दिव्यांगासाठीचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे ना. मुश्रीफ यावेळी म्हणाले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वैजनाथ व्हनाळे, सुरज बाजूळगे, पारस कोचेटा, व्यंकट लामजने, योगेश बुरांडे उपस्थित होते.

तरुणांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीवर भर – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :- शासनामार्फत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमधील कौशल्य विकसित करून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येवला, जि. नाशिक येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला यांच्यातर्फे पीएम स्कील रन तसेच सन २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगाव ता. येवला येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करत असलेल्या महायुती सरकार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी देश पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार व बदलत्या आधुनिक गरजांनुसार विविध योजना नव्याने आणल्या जातात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. याव्दारे रोजगार निर्मिती अथवा स्वयंरोजगार पुरवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवलेले आहे. राज्यातील युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी एमईटी भुजबळ नॉलेज सिटी मध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. भारतासारख्या लोकसंख्येसह वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत एकीकडे उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची कमतरता असून, दुसरीकडे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याच्याकडे थोडी किंवा अजिबातच नोकरीविषयक कौशल्ये नाहीत. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करणे आवश्यक आहे.
कोणतेही विशिष्ट कार्य करण्यासाठी कौशल्य एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कौशल्य निर्माणाकडे उत्पादनाची परिणामकारकता आणि कामगारांचे त्यातील योगदान सुधारण्याचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. कौशल्य निर्माण हे उत्पादन क्षमता व अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढविण्यासाठीचे ते एक महत्त्वपूर्ण घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असून भारताकडे जगभरातील विविध अर्थव्यवस्थांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. तसेच स्वतःच्या वाढीच्या क्षमतेमुळे स्वतःच्या गरजा पुरविण्याची क्षमता भारतात आहे. वाढती बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विषयक शिक्षण घेणे काळजी गरज बनली असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मंत्री भुजबळ यांच्या  हस्ते रन फाॅर स्कील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. राठोड यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.

कार्यक्रमास प्राचार्य वाय. के. कुलकर्णी, सदस्य सचिव आर. एस. राजपूत, यांच्यासह संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना; कारागिरांच्या सक्षमीकरणाची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा):  भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’ चा शुभारंभ नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सर्व कारागिरांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने गावामधील शेवटच्या गरजू घटकांपर्यंत ही योजना पोहचविण्यात यावी, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

आज भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण कालिदास कलामंदिर येथे प्रक्षेपित करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार बोलत होत्या. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, एनएचएआय नाशिक चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, एनएचएआय नाशिक चे व्यवस्थापक डी. आर. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यवसाय करणारे कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जिल्हावासियांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक योजना ही लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय व सहकार्यातून यशस्वी होत असते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य व प्रयत्न आवश्यक असल्याचे ही यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले.

या योजनेच्या माध्यमातून 18 प्रकारचे विविध पारंपरिक व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच या योजने अंतर्गत 2027-28 पर्यंत देशातील साधारण 30 लाख कारागिरांना लाभ देण्यात येणार आहे. असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, 18 विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना या योजनेच्या माध्यमातून 15 हजार रुपयांचे टूलकीट देण्यात येणार आहे. तसेच मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यांनतर लाभार्थ्यांना विनातरण कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा हस्त कौशल्याद्वारे विविध साधनांचा वापर करून स्वयंरोजगाराची निर्मीती करणारे कलाकार आणि कारागीर असणे गरजचे आहे असून लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, नाभिक असे विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू

जिल्ह्यात दिव्यांगांना ई-सायकली वाटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

जळगाव दि.१७ सप्टेंबर (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिली.
महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम,  समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग अधिकारी भरत चौधरी, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, संभाजी सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य मार्गदर्शक व आमदार बच्चू कडू म्हणाले,  जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होत आहे.याचा मनस्वी आनंद आहे. पूर्वी दिव्यांगाच्या पाच टक्के राखीव निधी खर्चासाठी आंदोलन करावे लागत होते. आज शासन स्वतः दिव्यांग अभियान राबवित आहे. ज्याला दोन पायी नाहीत त्यांना सशक्त माणसांसोबत लढावे लागते. मूकबधीर बांधवांला अनेक अडचणी आहेत. दहावीनंतर शिक्षणासाठी फक्त चार शाळा आहेत‌. अंधांना अनेक अडचणी आहेत. त्यांचा अभ्यास असला तरी परिक्षेसाठी लेखनिक भेटत नाही.  अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे. त्यांची निश्चितच प्रशंसा होणार आहे. दिव्यांगासाठी आपल्याला  प्रचंड काम उभे करायचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला थेट पगार मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू आहे.
राज्यात तीन कोटी दिव्यांग बांधव आहेत. तकालानुरूप दिव्यांगासाठी पारंपरिक सायकली वाटप न करता आत ई-सायकली वाटप करण्याची गरज आहे.  गावातील चांगल्या लोकांनी एकत्र येत दिव्यांगाचे उद्योग स्थापन व्हावेत यासाठी बचतगट तयार केले पाहिजेत. असे आवाहन ही श्री कडू यांनी केले.
प्रत्येक आमदारांनी आपल्या निधीतून दिव्यांगासाठी ३० लाख रूपये खर्च करण्याची गरज आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची गरज नसून खऱ्या खुऱ्या मदतीची गरज आहे. असेही श्री कडू यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिव्यांगांना ई-सायकली वाटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांगांना जळगाव जिल्ह्यात सीएसआर फंडाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत बॅटरीवर चालणाऱ्या २ कोटी रूपयांच्या ई-सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. मात्र या सायकलींच्या माध्यमातून दिव्यांगांनी रोजगार केला पाहिजे.अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ओबीसीमधील विकलांग लोकांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे‌. शासन आपल्या बरोबर आहे. समाजासुध्दा दिव्यांगांकडे आदराने पाहतो‌. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पगारसुध्दा थेट त्यांच्या बॅंक खात्यावर शासन येत्या काळात वितरित करणार आहे. दिव्यांग मतदारांची लोकशाहीत ताकद मोठी असते. लोक प्रतिनिधींनीना निवडून आणण्याची व पाडण्याची ताकद त्यांच्यात आहे. शासनाने दिलेल्या मदतीचा चांगला उपयोग केला तर तुम्ही तुमचे भले करू शकतात, असे ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील दिव्यांगांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे‌.
आपल्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की, एडीआयपी या योजनेंतर्गत आतापर्यंत ५००० दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुरूप अडीच कोटी रूपयांच्या साहित्य साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आलेले आहे.
यावेळी लाभार्थ्यांच्या वतीने स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रातिनिधिक दिव्यांग लाभार्थ्यांना लाभांचे वितरण

आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी ही मिळाली. यामध्ये जिल्हा परिषद दिव्यांग निधीतून उद्योगासाठी १५ लाख रूपयांची मदत देण्यात आलेले लाभार्थी मिनाक्षी निकम ,  दिव्यांग प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले लाभार्थी दाम्पत्य हर्षल काशिनाथ गवळी व वनिता हर्षल गवळी, पालकत्व प्रमाणपत्र लाभार्थी नंदकुमार रोकडे, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संदीप सुनिल कोळी, रोजमीन मजीद ली, बीज भांडवल कर्ज लाभार्थी अरूण ज्ञानेश्वर पाटील, युडीआयडी कार्ड लाभार्थी दिव्या बेहरे,हिमांशी किरण पाटील, दिव्या पुंडलिक पाटील, राजेश शंकर ओझा, एमआर कीट लाभार्थी उमेश जाधव, सारिका शत्रुघ्न पाटील, निकिता संतोष चौधरी, सारंग गोरे, प्रणव पाटील, कर्णयंत्र लाभार्थी देवेश्वरी निलेश माळी, हुमेरा मेहमूद खान पठाण, आधारासाठी काठीचे लाभार्थी शेख अजमद अजीज, पीएम स्वनिधी लाभार्थी वसंत नथ्थू शिंपी, वैयक्तिक कर्ज योजनेचे लाभार्थी बापू प्रभाकर सपकाळे यांना बच्चू कडू यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

दिव्यांगांना भेट, समस्यांचे निवारण

मेळाव्यासाठी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना समाजकल्याण विभागाने अर्ज वाटप केले होते. त्यावर कुठल्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलाय, याची माहिती व वैयक्तिक माहितीचा समावेश होता. हे अर्ज घेण्यासाठी स्वतः बच्चू कडू व्यासपीठावरून उतरून त्यांच्याकडे गेले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत हे अर्ज स्वीकारले. दिव्यांगांना कार्यक्रम समजावा, यासाठी दुभाषिकांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

असे होते विविध विभागांचे २५ मदतकक्ष (स्टॉल्स

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार धर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था आदींच्या मदत कक्ष – स्टॉल्सचा समावेश होतो.
या कक्षांच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली. योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात आली.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग सघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार आमदार सुरेश भोळे यांनी मानले‌.

नाशिक जिल्ह्यातील ३६ लाख नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.17 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा): गौरी गणपती सणानिमित्त आगामी दोन दिवसात राज्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांना याचा लाभ होणार असल्याने यामुळे लाखो गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव गोड होणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

आज मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह, आंबेडकर नगर येथे आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा.  देवयानी फरांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश निसाळ, तहसीलदार कैलास पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गौरी गणपतीनिमित्त सप्टेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यातील दोन हजार ६०९ दुकानांमार्फत साधारण ७ लाख ७८ हजार शिधा संच वाटप होणार असून त्याचा लाभ ३६ लक्ष लाभार्थ्यांना मिळणार आहे. गौरी गणपतीसह दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे.  नाशिक शहरात २२९ दुकानांमार्फत ९७ हजार ६१६ शिधा वाटप संचाचे वितरण सुरू असून त्या माध्यामतून साधारण ४ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आनंदाच्या शिधा वाटपात एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकारी व रेशन दुकानदारांनी घ्यावी. त्याचप्रमाणे या आनंदाच्या शिध्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर सर्वप्रथम श्रीलंकेत वृक्षारोपण झालेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण 24 ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा चा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत असून गणपतीच्या अगोदरच सर्व नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप होत आहे. त्यामुळे राज्यातील गोर गरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी महिलांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.

000

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ व फिरत्या वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, एचएलएल लाईफ केअर कंपनीचे डीजीएम रणजीत एम., सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर आदि मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या आरोग्य सेवेशी निगडित महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय योजनेचे आज सांगली जिल्ह्यातून उद्घाटन होत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त एक फिरता वैद्यकीय कक्ष देण्यात येत आहे. त्याचे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी आज प्रातिनिधीक स्वरूपात लोकार्पण करण्यात येत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. त्याचा खर्च बांधकाम कामगार मंत्रालय उचलणार आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी मात्र एक रूपयामध्ये केल्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात 13 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ शकली, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन उभारण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 100 खाटांचे ईएसआय रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना सेफ्टी किटस् देण्यात आली आहेत. बांधकाम कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करणे, पाणी, बैठकव्यवस्थेसह नाका शेड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, बांधकाम कामगारांनी नोंदणी करून त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायांच्या नोंदीत कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. टूल किट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे व तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे.

विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, बांधकाम कामगार प्रतिकूल, आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर बांधकाम कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी ही योजना उपयुक्त आहे. फिरत्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. टोल फ्री क्रमांकावर बांधकाम कामगारांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, या योजनांचा लाभ घ्यावा व इतर बांधकाम कामगारांपर्यंत या योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांसाठी “विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या संगणकीय प्रणालीचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. योजनेचा निःशुल्क १८००-२-६६ ६६ ६६ ६६ टोल फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला.
यावेळी पुणे विभागातील सांगलीसह, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यातील फिरत्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आणि वाहनचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रदान करून बांधकाम कामगारांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट) चे लोकार्पण करण्यात आले. पात्र नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांना, त्यांच्या वारसांना अर्थ सहायाचे धनादेशही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेची माहिती देणारा पोवाडा शाहीर बजरंग आंबी व पथकाने सादर केला. विवेक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राणी यादव यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून आलेले बांधकाम कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ ३० लाख कारागिरांना होणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि. १७ : पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून ३० लाख कारागिरांना लाभ होणार आहे. ही योजना १३ हजार कोटींची असून योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अण्णाभाऊ साठे सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीएम विश्वकर्मा योजना सर्वसामान्य कारागिरांसाठी आहे. देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. त्यासाठी त्याला ५ टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबत कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज ५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे. उत्पादित वस्तूंना बाजार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवितांना सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेतले. ३२ कोटी नागरिकांचे जनधन खाते सुरू झाले आहेत. नागरिकांच्या सहभागातून देशात स्वच्छतेची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. कोविड काळात ८० कोटी गरिबांना मोफत धान्य देण्यात आले, असेही पालकमंत्री म्हणाले. पीएम विश्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पीएम विश्वकर्मा योजना ही सामान्य कारागिरांसाठी योजना आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांना आवश्यक साधने देण्यात येणार आहेत. कारागिरांसाठी पुरस्कारही देण्यात येणार आहेत. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार तापकीर म्हणाले, जनधन योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान निधी योजना अशा अनेक कल्याणकारी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आल्या आहेत. देशात पायाभूत सुविधांचा विकासही मोठ्या प्रमाणात होत असून मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण, व्यवसायासाठी १५ हजारापर्यंत साहित्य आणि कर्ज सुविधा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा देशात शुभारंभ

  • केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

  • छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी नगर, दिनांक १७ (विमाका) : भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, बँकांकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते द्वारका (नवी दिल्ली) येथून झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये करण्यात आले. या योजनेच्या शुभारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, संजय केणेकर, शिरिष बोराळकर, संजय खंबायते, बापू घडमोडे आदींची उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत सुतार, नौका कारागीर, अस्त्रकार, लोहार, हॅमर आणि टूल किट कारागीर, कुलुप कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, राजमिस्त्री, बास्केट, चटई, झाडू, कॉयर विणकर, बाहुली आणि खेळणी कारागीर, नाभिक, पुष्प कारागीर, धोबी, शिंपी, मत्स्य जाळे कारागीर या १८ व्यवसायांचा समावेश आहे. देशाच्या जडणघडणीत या कारागीरांचा समावेश होतो. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या पारंपरिक कलाकार आणि कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार यांसारख्या व्यवसायात गुंतलेले हे कारागीर आपली कौशल्ये व व्यवसाय पिढ्यानपिढ्या पुढे चालवतात. या कुटुंबांमध्ये आजही पारंपरिक गुरू-शिष्य पंरपरा अस्तित्त्वात आहेत. या पारंपरिक व्यवसायांना पीएम विश्वकर्मा योजनेतून अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मतही त्यांनी मांडले.

पीएम विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभधाकांना बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. देशाच्या जडणघडणीत पारंपरिक व्यावसायिक ‘विश्वकर्मा’ यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक व्यावसायिकांचा विकास झाल्यास देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. म्हणून बँकांनी देशाच्या विकासाची भूमिका लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. आमदार बागडे, केणेकर, श्रीमती रहाटकर यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमात ‘विश्वकर्मा’ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन सानिका निर्मळ यांनी केले.

दिल्लीतून योजनेचा शुभारंभ

विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी दिल्लीत पीएम विश्वकर्मा योजनेचा देशभरात शुभारंभ झाला. देशातील इतर ७० ठिकाणी विविध मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे यशोभूमी कन्वहेंशन सेंटरचे लोकार्पण केले. त्यासह पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रतिक चिन्ह, टॅगलाइन, ऑनलाइन पोर्टल, डाक तिकिटे, टूलकिट बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे प्रधानमंत्री मोदी यांनी दिली. पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री.मोदी यांनी भाषणातून केले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...