शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1153

इटली येथील प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास महामंडळाचा पुढाकार

मुंबई, ‍‍दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इटलीमधील मिलान येथे 124 व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठया प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे.

या प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी  भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी कोल्हापुरी चप्पलची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी विपणन व प्रसार करावे, असे सांगितले. प्रदर्शनातील चर्मवस्तू व पादत्राणांच्या विविध स्टॉलला भेट देऊन, अशाच प्रकारचे उत्पादने महामंडळाच्या उत्पादन केंद्रात तयार करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

०००

‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन ‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मेजर जनरल सचिन मलिक, कारगिलचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत सुसे,  कारगिलचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनायत अली, ‘सरहद’ चे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, ‘अरहम’ समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, ‘सरहद’ चे सदस्य अनुज नहार, ब्रिगेडियर सुमित, कर्नल शशांक, लेफ्टनंट कर्नल संदीपसिंग दुल्लत, मॅरेथॉनचे संचालक वसंत गोखले, तांत्रिक संचालक सुमित वायकर,  फिजिओथेरपिस्ट अली इराणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी कारगिलच्या बारू येथे सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ होणार होता, मात्र, खराब हवामानामुळे ते बारू येथे पोहोचू शकले नाहीत. मात्र, या मॅरेथॉनमधील स्पर्धक द्रास येथे स्मारक बघण्यासाठी आले असता तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली, मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय लष्करातर्फे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.

कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले. या युद्धात आपले अनेक जवान शहीद झाले. या जवानांच्या पराक्रमाची महती द्रास युद्ध स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू असून त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला, असे सांगून प्रधानमंत्री श्री.मोदी यांना महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा लष्करी जवानांशी संवाद

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील लष्करी जवानांशी संवाद साधला आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी द्रास वार मेमोरियल येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पाय गमावलेल्या श्री.पिसाळ जिद्दीच्या आधारे सातारा ते संपूर्ण भारतभ्रमण करण्यासाठी दुचाकीवरून निघाले आहेत. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुमारचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ पुस्तकाचे प्रकाशन

जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या ‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

००००

प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.18 : उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वांत मोठी संपत्ती आहे. तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कही आहे, परंतु पैसा कमविताना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत ही वस्तुस्थिती आहे.  आरोग्याची वेळेवर तपासणी होणे गरजेचे असून, जिल्ह्यात सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार  यंत्रणेचे जाळे उभे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘आयुष्यमान भव’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे  संवाद साधला. तत्पूर्वी राष्ट्रीय स्तरावर देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मा. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, परिविक्षाधीन आयएएस रणजीत यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अंजली घोटेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘आयुष्मान भारत’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेंतर्गत देशातील 50 कोटी नागरिकांना आरोग्याचे विमा कवच प्राप्त झाले आहे. तर राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचाराची मर्यादा दीड लक्ष रुपयांवरून पाच लक्ष रुपये केली आहे. आरोग्य सेवेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा उत्तमोत्तम राहावा, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईश्वरीय सेवा म्हणून कार्य करावे. जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, संसाधने, औषधे आदींसाठी एक रुपयाही कमी पडणार नाही.

इतर शासकीय विभाग भौतिकदृष्ट्या संपन्न असू शकतात, मात्र आरोग्य विभाग हा लोकांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता ‘हॉस्पीटल ऑन व्हील’ सुरू करण्याचे नियोजन आहे. आयुष्मान भारत कार्ड वाटप संदर्भात जिल्हाधिका-यांनी एक समिती गठीत करावी. याअंतर्गत कॉल सेंटर, आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती, नागरिकांमध्ये जनजागृती, आरोग्यमित्र आदींमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर असावा. यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन आणि सामाजिक संघटनांची मदत घ्यावी, अशा सुचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. कार्यक्रमाचे संचालन योगिता आंबेकर यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी मानले.

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे जाळे : एम्सच्या धर्तीवर चंद्रपुरात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार होत आहे. तसेच कॅन्सर हॉस्पीटलकरीता उद्योगपती रतन टाटा यांनी 100 कोटी रुपये दिले आहेत. सोबतच येथील कॅन्सर हॉस्पीटलला मदत करण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलचे सहकार्य लाभत आहे. बल्लारपूर येथे कामगारांसाठी 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तयार होत आहे. तसेच 100 खाटांचे स्त्री रुग्णालयसुध्दा लवकरच कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्तापूर्वक व दर्जेदार व्हावे, यासाठी नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या सेवेत रुजू झाले असून मूल येथे 5 एकरमध्ये 100 खाटांचे सुसज्ज हॉस्पीटल उत्तम बांधण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आशा स्वयंसेविकांचे कार्य उत्तम : आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य व्यवस्थेच्या महत्वाच्या घटक आहेत. त्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्यात येत आहे. आशा स्वयंसेविकांचे काम उत्तम असून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी त्या कार्यरत असतात, अशी कौतुकाची थाप पालकमंत्र्यांनी दिली.

उत्तम आरोग्यासाठी क्रीडा सुविधा : आरोग्य बिघडू नये यासाठी रोज योगा व व्यायाम करणे तसेच खेळ खेळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात सुसज्ज क्रीडांगणे, आणि क्रीडा विषयक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. राज्यात केवळ चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून व्यायाम व खेळामुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले

तत्पूर्वी लाभार्थ्यांना 5 लक्ष रुपयांपर्यंत विमा कवच असलेले आभा गोल्डन कार्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात माधव आत्राम, रामचंद्र लक्ष्मण, अनिता रामचंद्र, शंकर कन्नूर, लक्ष्मी आत्राम यांचा समावेश होता. सिकलसेल प्रमाणपत्र जयंती दिवटे, सुचिका उपरे आणि आरोही उईके यांना तर प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान निक्षय मित्र प्रमाणपत्र इनरव्हील क्लब, चंद्रपूर आणि गणपतराव पाझारे बहुउद्देशीय संस्था यांना तर टी.बी. चॅम्पियन प्रमाणपत्र योगिता मिश्रा यांना देण्यात आला.

०००

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना

बांधकाम कामगारांची नित्य आरोग्य तपासणी होण्याच्या दृष्टीने विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा काल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमिवर या योजनेची माहिती देणारा लेख…

बहुतेक बांधकाम कामगार हे निरोगी आणि सुरक्षित कार्यपद्धतीबद्दल जागृत पूर्णपणे जागरूक नसतात, त्यांना कार्य-संबंधित जोखीम व इतर विविध भौतिक, रासायनिक, जैविक जोखीम आणि मानसिक-सामाजिक घटक अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याकारणाने अनेक बांधकाम कामगार हे त्रस्त आहेत. त्यांना अनेक विकारांचा सामना करावा लागतो, जसे की मस्क्यूकोस्केलेटल विकार, कमी ऐकू येणे, हातात कंपन जाणवणे, त्वचा आणि श्वसन रोग इत्यादी. या सर्वांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी नित्य नियमाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे केल्यास त्यांना अशा प्रकारच्या विविध आजारापासून दूर राहता येईल किंवा अशा प्रकारचे काही जुनाट आजार असल्यास त्यावर त्वरित उपचार करता येतील व त्यांचे स्वास्थ चांगले राहील. त्यांची कार्यक्षमता वाढेल व त्यांना त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल. एकंदरीत त्यांना सुरक्षित, निरोगी आणि समृद्ध जीवन जगता येईल.

बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना त्वरित उपचार मिळावेत, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या वेळोवेळी तपासण्या झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर प्राथमिक स्तरावर उपचार करणे शक्य होणार आहे.  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगार यांच्याकरिता ही योजना असून, याअंतर्गत तपासणी ते उपचार अशी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, रोगाचे त्वरित निदान, वैद्यकीय उपचारांसाठी सुलभ प्रवेश, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यास मदत, आरोग्य सेवा आपल्या दारी असे या योजनेचे प्रमुख फायदे आहेत.

योजनेचे लाभार्थी

या योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या सक्रिय (जिवित) नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पात्र राहील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार अथवा त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासकीय योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, त्या बांधकाम कामगाराचा अथवा कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांच्या उपचारावरील खर्च 5 लाख रूपयापेक्षा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुक्त संस्थेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहमतीने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत उपचाराकरीता लाभार्थी पात्र राहील. ही योजना मंडळाकडे नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांकरीता ऐच्छिक स्वरूपाची राहील.

ही योजना प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी व वैद्यकीय उपचार या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येईल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार यांच्याकरीता “तपासणी ते उपचार आरोग्य योजना” राबविण्याकरीता एच.एल. एल. लाईफकेअर.  लि. (भारत सरकार उद्योग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघातप्रकरणी वैद्यकीय सहाय्य

बांधकामाच्या ठिकाणी नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारास अपघात झाल्यास ती व्यक्ती या योजनेंतर्गत उपचारास पात्र राहील. बांधकाम कामगारास आवश्यकतेनुसार व सोईनुसार ज्या रूग्णालयामध्ये उपचाराकरीता भरती केले असेल, असे रूग्णालय खाजगी असल्यास तात्पुरत्या स्वरूपात सूचीबद्ध करून पुढील उपचार नियुक्त संस्था करेल. अपघातानंतर उपचाराकरीता असलेल्या रुग्णालयांची माहिती लाभार्थी / कामाची आस्थापना / नातेवाईक / इतर व्यक्तींनी नियुक्त संस्थेस टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हा / तालुका कामगार सुविधा केंद्रास देणे आवश्यक राहील.

सूचीबद्ध रुग्णालये

नियुक्त संस्थेने प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे निश्चित ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य तपासणी केंद्रे निर्माण किंवा सूचीबध्द केलेल्या ठिकाणी लाभार्थी भेट देवून प्राथमिक आरोग्य तपासणी करू शकेल व तपासणी अहवाल (प्राथमिक व प्रगत पुष्ठीकरण) मिळवू शकेल. पृष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी तसेच, वैद्यकीय उपचाराकरीता नियुक्त संस्था रूग्णालये सूचीबध्द करतील. प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये किमान तीन रूग्णालये मंडळाच्या मान्यतेने सूचीबध्द  करून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल.

फिरते वैद्यकीय कक्ष

फिरते वैद्यकीय कक्ष नियुक्त संस्थेमार्फत प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये 24 X 7 कार्यरत राहील. या कक्षावरील होणारा खर्च नियुक्त संस्थेमार्फत करण्यात येईल. नियुक्त संस्थेमार्फत फिरते वैद्यकीय कक्ष वाहन विनाशुल्क उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या फिरते वैद्यकीय कक्ष वाहनामध्ये डॉक्टर, परिचारक व मदतनीस उपलब्ध राहतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त असून यामध्ये लाभार्थ्यांना द्यावयाची औषधे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारी अत्यावश्यक औषधे, प्रथमोपचार इ. सुविधा देण्यात येतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन हे या योजनेकरीता तयार केलेल्या समर्पित बांधकाम कामगार आरोग्य क्रमांकाशी संलग्न राहील.

या योजनेचा निःशुल्क टोल फ्री क्रमांक १८००-२-६६ ६६ ६६ ६६  हा असून यावर कामगारांना संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी  संपर्क साधावा.

संकलन  जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

गौरी आगमनापूर्वी सर्व पात्र लाभार्थींपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

सातारा दि.१८(जि.मा.का) : राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 48% पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरित झाला असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थींपर्यंत गौरी आगमनापूर्वी आनंदाचा शिधा संच पोहोचवावेत. त्यासाठी यंत्रणेने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजीन्नस समाविष्ट असलेला संच अर्थात आनंदाचा शिधा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याहस्ते वितरित करण्यात आला.
देगाव रोड, एमआयडीसी कोडोली, सातारा येथील एम.बी. पिंगळे यांच्या रास्त भाव धान्य
 दुकानात आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, सरपंच सतीश माने, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री. चंद्रकांत जाधव, श्री. आनंदराव कणसे, एम.बी. पिंगळे यांच्यासह लाभार्थीं, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील गोरगरीब , सर्वसामान्य नागरिकांना आनंदात आणि उत्साहात सण साजरे करता यावेत यासाठी शासन आनंदाचा शिधा योजना राबवत आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे चार लाख लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात येत आहे . जिल्ह्यात गत आठवड्यात तीन दिवस इंटरनेट सुविधा बंद असल्याने आनंदाचा शिधा संच वितरणाला काहीसा विलंब झाला असला तरी गौरी आगमनापूर्वी हा शिधा सर्व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी यंत्रणेने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकांसाठी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजींन्नस संच प्रति शिधापत्रिका धारकास रुपये शंभर या दराने वितरित करण्यात येत आहे‌ . सातारा जिल्ह्यामध्ये 3 लाख 88 हजार 907 इतक्या शिधापत्रिका धारकांना जिन्नस वाटप करण्यात येणार असून आज अखेर 1लाख 88 हजार 523 इतक्या लाभार्थींना शिधाजीन्नस वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींना वितरणाचे काम सुरू आहे.

दिग्रसच्या विकासासाठी शंभर कोटींचा डीपीआर तयार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. १८ (जिमाका) : दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाच्या कामांसह भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. या ७ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव सुपारे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय बंग, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे, तहसिलदार सुधाकर राठोड आदी उपस्थित होते.

दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. या विकास आराखड्याच्या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार आहे. मागच्या काळात विविध विकासकामे केले आहेत. येणाऱ्या काळात शहरामध्ये भूमिगत विद्युत व्यवस्था, पाईपलाईन यासह सिमेंट रस्ते, ई-लायब्ररी, युवकांसाठी व्यायामशाळा, दिग्रसवासियांना मुलभूत सोयीसुविधा, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विकासाची कामे केली जाणार आहेत, असेही पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

दिग्रसमध्ये आदर्श मोक्षधाम करण्याचा आराखडा तयार करा

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ५ कोटी ७ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. दिग्रस येथील मोक्षधाम परिसर सर्वदृष्टीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यामध्ये जेवढे मोक्षधाम विकसित झाले आहे. त्यांचा विकास आरखडा एकत्र करुन दिग्रसमध्ये आदर्श ठरेल, असा मोक्षधाम निर्माण करण्याचा आराखडा तयार करावा. जेणेकरुन दिग्रस येथील मोक्षधाम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतील. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

भाजी मार्केटचे भूमिपूजन

नगरपरिषदेमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी ५५ लाख १४ हजार रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेचे भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. हे भाजी मार्केट नागपूर विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. या भाजी मार्केटमध्ये १६ ओटे, शेड, महिला पोलिसांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहे. या भाजी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांनी प्रास्ताविक केले.

०००

दारव्हात सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकामाचे भूमिपूजन

दारव्हा नगरपरिषद हद्दीतील जुन्या बचत भवनाच्या क्षतीग्रस्त इमारतीच्या जागेवर सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे आदी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकाम केले जाणार आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ६५६ इतकी आहे.

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक 18 सप्टेंबर, 2023  (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४  मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लासलगाव बाहय वळण रस्ता, सावरगाव साठवण तलाव, राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, पुणेगाव डावा कालवा व दरसवाडी पोहोच कालवा भूसंपादन मोबदला, तसेच नाशिक येथील कृषि टर्मिनल मार्केट बाबत आढावा बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.

बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, पणन महामंडळाचे सहव्यवस्थापक एस. वाय पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, चांदवड प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, भूसंपादन अधिकारी रविंद्र भारदे, सीमा अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे येथे भाजीपाला, फळे व अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नाशिक येथे अद्ययावत कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास नाशिक

विकास पॅकेज अंतर्गत शासनाने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नाशिक येथे कृषी टर्मिनल मार्केट उभारणीसाठी मौजे पिंपरी सैय्यद, ता. जि. नाशिक येथील

गट क्र. १६२१ व गट नं १६५४ मधील शासन मालकीच्या जागेपैकी १०० एकर जमीनीची मागणी केलेली होती. या विषयावर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली असून या जागांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणीही केलेली आहे. त्यानुसार गट नं. १६५४ मधील क्षेत्र योग्य असून हे क्षेत्र वाणिज्य वापर विभागात अंतर्भुत असल्याने या गटातील १०० एकर जागा या प्रकल्पाला उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झालेला असल्याने ही जागा कृषी टर्मिनल मार्केटसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला लवकरात लवकर हस्तांतरित करण्यात यावी. त्याचबरोबर लासलगांव-विंचूर रामा क्र.७ या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा पोहोच मार्ग या कामांच्या भूसंपादनाबाबत 31 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. नागरीकांची गैरसोय होवू नये याकरीता शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी नाहरकत असल्याचे कळविल्यास पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच सावरगाव, ता. निफाड येथील साठवण तलावासाठी भूसंपादित होणारी सावरगाव ग्रामपंचायतची जमीन हस्तांतरण करणे व खडकमाळेगाव येथील भूसंपादनासाठी सर्व यंत्रणांची नाहरकत लवकरात लवकर मिळवून कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.

राजापूर सह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १७ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत 62 किमी पैकी 15 किमीचे काम सुरु असून नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील कामांसाठी वन विभागाची मान्यता लवकरात लवकर प्राप्त करुन घ्यावी. पुणेगाव  डावा कालवा व  दरसवाडी पोहोच कालव्यासाठी दिंडोरी, चांदवड, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा दर मान्य नसल्याने त्यांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री भुजबळ यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

यावेळी निफाड-कुंदेवाडी येथील पुल तयार असून रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भुसंपादनाची कार्यवाही करणे तसेच ड्रायपोर्ट प्रकल्पाला चालना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना आमदार बनकर यांनी बैठकीत केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या कामांबाबत जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे बैठकीत सांगितले.

000

पूरामुळेबाधित शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

जळगाव,दि. 18 सप्टेंबर (जिमाका) – तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत‌.

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी, रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. ‌लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी दिलेल्या आहेत.

०००

इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवीमुंबई महापालिकेचा विक्रम; एकाच वेळी १ लाख १४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी

नवी मुंबई, दि.18 : ‘इंडियन स्वच्छता लीग’ कार्यक्रमा अंतर्गत नवीमुंबई महापालिका क्षेत्रात 1 लाख 14 हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी एकात्मता आणि स्वच्छता विषयक शपथ घेण्याचा विक्रम केला आहे.

गतवर्षी नवीमुंबई महानगर पालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले होते. हे नामांकण कायम रहावे यासाठी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्ता तथा प्रशासक श्री.राजेश नार्वेकर यांनी शहरातील विविध भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उपक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याठिकाणी आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छता शपथ सामुहिकरित्या घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकरांचा उत्साह बघून भारावून गेलो असल्याची भावना व्यक्त केली. नवी मुंबईकर विद्यार्थी, युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी यांची स्वच्छतेविषयीची ही जागरूकता व शहराविषयीचे प्रेमच नवी मुंबईला कायम नंबर वनवर ठेवेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

शहरात विविध विभागांमध्ये 9 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या भागात स्वच्छता मोहीमा राबवून त्याठिकाणीही स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.

पाच ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून खारफुटी स्वच्छतेत सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहित केले. यामध्ये 10 हजार 500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले होते. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.

लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून रिचा समित यांच्या पुढाकाराने वाशी विभागात 235 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली.

स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर विद्यार्थी, नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरूकता आणि शहराविषयी असणारे प्रेम यांचे दर्शन घडविणारा हा भव्यतम उपक्रम नवी मुंबईला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा व शहरात स्वच्छतेची चळवळ निर्माण करणारा ठरला.

श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.

श्रीनगरमधील लाल चौकात मराठी सोनार समाज राहतो. पूर्वी घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण 24 वर्षांपूर्वी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्थानिक मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग असतो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी समाज गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. श्रीनगरमधील मराठी समाजामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आज या मंडळास भेट देऊन त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणाले की, श्रीनगर येथील लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि काश्मीरमधील सौहार्दाचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन स्थानिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...