सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 1110

२०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर, विकसित बनविण्याचा संकल्प करुया – नितीन गडकरी

      नागपूर, दि. २१ : २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

नागपूर जिल्हा प्रशासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचा आज कोराडी येथील सेवानंद विद्यालय येथून यात्रेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, सामाजिक आर्थिंक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे घटक मागे आहेत, त्यांना पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताची अर्थव्यवस्था येत्या काळामध्ये ३ मिलियन डॉलरपर्यंत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाचा कामाला गती देण्यात येईल तसेच ड्रिप इरिगेशनचा उपयोग करण्यात येईल. शेती समृद्ध करून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यामध्ये १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात संकलित करण्यात आले. तेथून तालुका कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार आहेत. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे अमृत कलश घेऊन युवक रवाना होतील. १ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

अमृत कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच जवळपास ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये सेवानंद विद्यालय, सेवानंद पब्लिक स्कुल, स्मिता पाटील विद्यालय महादुला, तेजस्विनी विद्यालय कोराडी, विद्यामंदिर कोराडी, प्रागतिक विद्यालय कोराडी याचा सहभाग होता. लेझीम पथक, ज्ञानेश्वर महाराज भंजन मंडळ महिला ढोलताशा पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.  सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचा सुरूवातीला उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

नागपूर अपघात मुक्त करण्याचा संकल्प – केंद्रीय मंत्री श्री. गडकरी

देशात रोज दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. यामध्ये १८ ते ३४ वर्ष वयोगटातील युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नियमाचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमामध्ये रूल ऑफ रोडचे पालन करून नागपुरला अपघात मुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२१:  पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचेवेळी दिले.

 यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रो रेल कॉर्पोशनचे  व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 विकास कामांची  पाहणी  करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

 

  मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंड गार्डन परिसरात नदीचे कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातीची झाडे लावावी. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे  इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 खराडी येथील ऑक्सिजन पार्कची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करा. विविधरंगी गवताची लागवड करावी. प्रेक्षक गॅलरीत सुटसुटीत बैठक व्यवस्था करावी. येथील नागरिकांच्या मागणीचा विचार करता परिसरात योगासनांसाठी जागा निश्चित करुन त्याठिकाणी लवकरात लवकर छत्र आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था करा. आरोग्याच्यादृष्टीने पदपथावर पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचा वापर करण्याबाबत विचार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथील सेवा प्रवेश नियमानुसार पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. येथील परिसरात उभारण्यात येणारे रुग्णालय, प्रशासकीय इमारत, वसतिगृह तसेच  त्याअनुषंगाने कामे महानगरपालिकेने गतीने पूर्ण करावीत. आगामी काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत अशाच प्रकारचे महाविद्यालय उभारण्याबाबत विचार येत आहे, असेही श्री. पवार म्हणाले. राज्यशासनाच्यावतीने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

 राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत खराडी येथील मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प, स्वारगेट येथील महामेट्रो प्रकल्प विकास कामांची पाहणी करुन कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

०००

फिनिक्स मॉल – वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल़, मेट्रोसाठी डीपीआर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २१: नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद अशा पद्धतीच्या रस्त्यासाठी व्यवहार्यता तपासणी व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

रस्ते व मेट्रोच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे मेट्रोद्वारे मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत नगर रोड वरील खराडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाणपुलाशी जोडणीबाबत श्री. हर्डीकर यांनी सादरीकरण केले. टप्पा-२ साठी हा विस्तृत प्रस्ताव अहवाल केला असून नगर विकास विभागाकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही गतीने करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

मेट्रोच्या खडकवासला ते स्वारगेटचा प्रकल्प अहवाल करण्यात आला असून स्वारगेट ते लोणी काळभोरपर्यंतचा प्रकल्प अहवाल करण्यात यावा. हे करत असताना सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला ते लोणी कालभोरपर्यंत एकात्मिक रस्ते, उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद करावी लागेल. सोलापूर मार्गावरील मोठी वाहनसंख्या पाहता लोणी काळभोर ते उरुळी कांचन या दरम्यानही भविष्यात मेट्रोचा विचार करावा लागेल असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

नगर मार्गावर वाघोली, खराडी आदी परिसरात प्रचंड लोकसंख्या वाढली असून त्यामुळे रहदारी प्रचंड वाढली असून केवळ वाघोली ते खराडी नव्हे तर फिनिक्स मॉलपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान विचारात घेऊन डीपीआर करावा लागेल, याबाबत एनएचएआय, पुणे महानगरपालिका आणि महामेट्रोने समन्वयाने काम करावे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

श्री. हर्डीकर यांनी मेट्रो कामांबाबत माहिती दिली. वनाझ ते रामवाडीपर्यंत ची पूर्ण मेट्रो मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व कार्यान्वित होण्याचे प्रस्तावित आहे. यावरील स्थानकांना पीएमपीएमएल बसेसची  चांगली जोडणी झाल्यानंतर मोठी प्रवासी संख्या मेट्रोकडे वळेल, असेही त्यांनी सांगितले.

०००

देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब अमृत वाटीकेत दिसेल -पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. २१ (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची आहुती देऊन शहीद झाले. त्यांच्या स्मृती, पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरावा, यासाठी दिल्ली येथे अमृत वाटीकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अमृत वाटीकेत देशातील प्रत्येक गावांमधून अमृत कलशांच्या माध्यमातून माती नेण्यात येणार असल्याने या वाटीकेत देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसणार आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अमृत कलश यात्रा कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील एक हजार ९२६ गावांची माती या अमृत कलशांमार्फत दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या अमृत वाटीकेत मिसळली जाणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान गाव पातळीवर अतिशय उत्साहाने साजरे करून तालुकास्तरावरून आणलेले हे अमृत कलश जिल्ह्यामार्फत येत्या काही दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहीदांच्या स्मृतींना स्मरण करण्यासाठी सुरू असलेली ही अमृत कलश यात्रा जिल्हावासियांच्या सहभागाने यशस्वी झाली आहे. यासोबतच केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजना तसेच आरोग्य विभागाच्या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गोल्डन कार्डचा देखील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या साहित्याबाबत २६ ऑक्टोबर रोजी आयोजित शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले.

तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक म्हणजे अमृत कलश यात्रा केंद्रीय राज्यमंत्री : डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे साकरल्या जाणाऱ्या अमृत वाटीकेमध्ये सर्व देशवासियांचा सहभाग असावा या भावनेतून माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाला ऊर्जा देणारा आहे. कलशांमध्ये असलेली ही फक्त माती नसून स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांची गाथा सांगणारा इतिहास या मातीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर सुरू असणारी ही अमृत कलश यात्रा म्हणजे तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक आहे. असे सांगत असतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केंद्र सरकारमार्फत सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वांच्या सहभागाने यशस्वी होत असल्याचेही सांगितले. तसेच अमृत कलश यात्रा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे देखील यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी कौतुक केले.

शहीदांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी अमृत वाटीका : मंत्री छगन भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश अभियानाच्या माध्यमातून देशाच्या मातीसाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या स्मृती कायम जागरूक ठेवण्यासाठी दिल्लीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती असणारे हे कलश आपल्या देशभक्तीचे प्रतिक आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात देशाप्रती असणारा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. देशाप्रती असलेल्या स्वाभिमानातूनच सर्वांच्या सहभागाने सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी देशासाठी काम करण्याची भावना सातत्याने मनात असणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला अमृत कलश यात्रेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरगाणा, कळवण व नाशिक तालुक्यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणलेल्या अमृत कलशांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलशांची कालिदास कलामंदिरापासून जिल्हा परिषदेपर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.

०००

महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना

महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी शासन अनेकविध योजना राबवते. या लेखात महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना आधार देणाऱ्या, आधार वाटणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर, वूमन हेल्पलाइन, शक्ती सदन, सखी निवास या योजनांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे….

सखी वन स्टॉप सेंटर

अन्यायग्रस्त पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र व कायदेशीर मदत तातडीने एका छताखाली उपलब्ध होण्याकरता सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्र २४ तास सेवा पुरवण्यासाठी उपलब्ध असून केंद्रामध्ये महिलांना त्यांच्या मुलांसमवेत प्रवेश देण्याची सोय आहे. यामध्ये महिलेसोबत तिची १८ वर्षापर्यंतची मुलगी व ८ वर्षापर्यंतचा मुलगा तिच्यासोबत सेंटरमध्ये राहू शकतो अशी तरतूद या योजनेत केली आहे.

वन स्टॉप सेंटरमध्ये पीडित महिलेला जास्तीत जास्त पाच दिवस राहता येते. त्यानंतर आवश्यकतेनुसार या महिलेस स्वाधारगृहात प्रवेश देण्यात येईल. एका वेळेस या केंद्रामध्ये पाच महिलांना राहता येईल.

शक्ती सदन

या योजनेअंतर्गत निराधार, विधवा, परितक्त्या, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त तसेच अनैतिक व्यापारामधून सुटका करण्यात आलेल्या १८ ते ६० वयोगटातील महिलांना तीन वर्षापर्यंत निवासाची सोय उपलब्ध आहे. सांगली जिल्ह्यात भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, यशवंतनगर, सांगली, मदर टेरेसा मागासवर्गीय महिला विकास मंडळ, उज्वलागृह माधवनगर, सांगली या दोन संस्था कार्यरत आहेत.

सखी निवास

नोकरी करणाऱ्या व नोकरी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांकरिता सखी निवास नावाने योजना राबविण्यात येते. ५० हजार पर्यंत वेतन असणाऱ्या महिला या वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकतात. वसतिगृहाचे शुल्क महिलेच्या वेतनाच्या ७.५ टक्के ते १५ टक्क्यांपर्यंत आकारण्यात येते. या योजेअंतर्गत महिलेची १८ वर्षापर्यंत वयाची मुलगी व १२ वर्षापर्यंत वयाच्या मुलास वसतिगृहाच्या पाळणाघरामध्ये प्रवेश देण्यात येतो. त्याकरिता ५ टक्के पाळणा घराचे शुल्क आकारण्यात येते.

वुमन हेल्पलाइन

१८१ हेल्पलाइन क्रमांकावर महिलेस २४ तास ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्यायग्रस्त पीडित महिलेने हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केल्यास महिलेस आवश्यक सेवा तिच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येते.

या योजनांच्या अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर येथे संपर्क साधावा.

  • एकनाथ पोवार, माहिती अधिकारी, सांगली

०००००

 

 

पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी  – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि.२१,(जिमाका)  : दिवसेंदिवस पीक उत्पादकतेत घट होत असून ऊसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीची जबाबदारी घेण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उद्घाटनानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा बावडा येथील वसतीगृहाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यानंतर शेतकरी मेळावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, शेतकरी, निविष्ठाधारक, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने 5-6 महिनेच चालतात, कारखानदारांना काम न करताच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. या वर्षी सर्वात कमी गाळप हंगाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे, असे ते म्हणाले.

बोगस बियाणे, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी शासन कायदा करत असल्याचे सांगितले. बोगस बियाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. शेतकरी हाच आपला वाली आहे, तो राजा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणे गरजेचे आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या शेतात चांगली शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्क येथे शासनाने कृषी विभागास कृषी भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे. यासाठी पुढिल प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

उद्घाटन केलेल्या रामेतीच्या नवीन वसतीगृहात 80 प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी 40 खोल्या, 2 व्हीआयपी सूट, डॉरमेटरी, डायनींग, किचन व लायब्ररीची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

आमदारी सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रामेतीला आता प्रशस्त अशी प्रशिक्षणार्थी निवास व्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आता कृषी भवनाची गरज असल्याचेही ते म्हणाले. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रविण बनसोडे यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे विमोचन पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण – पालकमंत्री श्री. मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम बॅच 3 व 4 मधील स्वप्निल पिरकाने, सुनिल जाधव, सोमनाथ पुजारी, प्रकाश साळोखे, विनोद ननवरे आणि दत्तात्रय पवार यांना गुणवत्ता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कृषी अधिकारी अतुल जाधव यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

०००

पुणे शहरातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २१ :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

सीओईपी विद्यापीठ मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवेगार रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा पहिला टप्पा ९  किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरण्यासाठी चांगली सुविधा मिळणार आहे. या परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षाचा विचार करून विकासकामे करण्यात येत आहेत.

कचरा संकलनासाठी पर्यावरणपूरक विद्युत वाहने घेण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीदेखील विद्युत बसेस घेण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुदतीत मिळकतकर भरलेल्या नागरिकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, नागरिकांनी वेळेत मिळकत कर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून १ कोटी रुपयांची ४५ बक्षिसे देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ६ लाख ६० हजार ७८५ मिळकतधारकांनी मुदतीत कर भरला.  त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३०० कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. इतरही महानगरपालिकांनी अशा स्वरूपाचा  उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी लॉटरी उपक्रमाची माहिती दिली. मिळकतकरातून येणारी रक्कम शहराच्या विकासासाठी उपयोगात आणली जाते. वेळेवर कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याने यावर्षी मिळकतकरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांची किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख असून एका फेरीत १.५ ते २ टन कचऱ्याची वाहतूक होणार आहे.

०००

पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन

नाशिक, दि. २१ (जिमाका): देशाप्रती कर्तव्य बजावतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन पाळला जातो. यानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, २१ ऑक्टोबर, १९५९ रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग याठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता. यात १० शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्यावतीने स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. कर्तव्यावर असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर पोलीस जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीही स्मतिस्थळास अभिवादन केले.

०००

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीद पोलिसांना अभिवादन

मुंबई,दि.२१: देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या १५ पोलीस अधिकारी, १७३ पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी पोलीस महासंचालक श्री. शेठ, आयुक्त श्री. फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर, संतोष कालापहाड यांनी केले.

०००

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, सहसंचालक संजय पाटील, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, चित्रपट परीक्षण समितीचे सदस्य अभिजीत साटम, मधुरा वेलणकर, स्वप्निल दिगडे, विनोद सातव, गीतांजली ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, प्रथमच २९ कोटी ८५ लाख रुपयांचे ८९ चित्रपट निर्मात्यांना अनुदान देण्यात येत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये विविध प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत. पात्र चित्रपटांना अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. चित्रपटसृष्टीचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत यापुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान तर चित्रपटाची महिला दिग्दर्शक असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत डॉक्युमेंटरीसाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून उत्तुंग भरारी घ्यावी.

मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी थिएटरचे परवाने रिन्यू करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, चित्रपटाच्या शूटिंगसाठी राज्यात ६५ ठिकाणे उत्तम असून त्यांचा विकास करून शूटिंगला देण्याचा विचार केला जाईल, यामुळे निर्मात्याचे पैसे वाचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपट निर्मात्यांनी केवळ मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे न पाहता त्यातून संस्कार, ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

श्री. खारगे यांनी सांगितले की, संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग कार्यरत आहे. लोकशिक्षण, समाज प्रबोधन मराठी चित्रपटातूनही होत आहे. यातून रोजगार निर्मिती सुद्धा होत असून कोल्हापूर आणि गोरेगाव येथील फिल्म सिटी अत्याधुनिक आणि कायापालट करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आव्हाने खूप असली तरी दर्जेदार चित्रपटावर भर द्यावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर, कान्समध्येही अधिकाधिक मराठी चित्रपटांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दशक्रिया चित्रपटाच्या निर्मात्या कल्पना कोठारी, अरुण नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.

फेब्रुवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण १७४ चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट ३७, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट ४८, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट ०४ असे एकूण ८९ चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात आले. यामध्ये दशक्रिया, बारडो, बापजन्म, रेडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचंय, मिस यू मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिज, येरे येरे पावसा, मन उधान वारा आदींसह ८९ चित्रपटांना मान्यवरांच्या हस्ते २९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला.

000

धोंडिराम अर्जुन, स.सं

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...