शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 111

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी व कृषिमंत्री शिवराजसिंह यांची भेट

नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली.

देशातील एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे 2025 मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसुल करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे आणि पणन मंत्री श्री. रावल यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डिबिटी (DBT) प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर 40-45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल. या प्रमुख मागाण्या करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या तळेगावमध्ये राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT); नोडल एजन्सीचा दर्जा देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँड्सच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली आहे. हरितगृह तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणारी ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन उत्पादनांचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यास मदत करणार आहे. या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कृषीमंत्री ॲड.कोकाटे आणि पणन मंत्री श्री. रावल यांनी दिले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते व्हावे यासाठी पणन मंत्री श्री रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री चव्हाण यांना निमंत्रण दिले.

या हबमध्ये 10,000 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग-ग्रेडिंग युनिट्स, पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनल्स व गोदामाची सुविधा आहे.

यामुळे फार्म-टू-मार्केट साखळी अधिक सक्षम होणार असून, नुकसानही कमी होईल, अशी माहिती श्री रावल यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांना दिली.

000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीसही अनुकूलता दाखवण्यात आली. अकृषी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

विधानभवन येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव श्री. सौरभ, नियोजनचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात तंत्रज्ञान विद्यापीठांची संख्या कमी असून, ही विद्यापीठे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील व गुणवत्ता वाढेल. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात १०५ अध्यापकीय पदे, एक शिक्षक समकक्ष पदांस मंजुरी देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. याचबरोबर इतर विद्यापीठाप्रमाणे तंत्रज्ञान विद्यापीठात आठ कोटी रूपये दैनंदिन व प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी प्रदान करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच ७८८ अध्यापकीय पदे, २,२४२ इतकी शिक्षकेतर पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच व्ही.जे.टी.आय व श्री. गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड यांसह राज्यातील इतर शासन अनुदानित संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठास एकूण ६०३ पदांचा सुधारित आकृतीबंधही मंजूर करण्यात आला.

सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान

ग्रंथालय अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मा. मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच ‘अ’, ‘ब’, ‘क’ ‘ड’ श्रेणीतील ग्रंथालयांची तपासणी करून त्यांच्या श्रेणीवाढीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी लागणाऱ्या वाढीव अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा. याचबरोबर राज्यातील 1,706 ग्रंथालयांची मान्यता रद्द केलेल्या प्रमाणात नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तसेच राज्यातील 50, 75, 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करण्यास मान्यता दिली.

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग स्थापन करावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान काळाची गरज असताना, सर्वच विभागात आपण तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अनेक राज्यात कार्यरत असून, इतर राज्यांतील कार्यप्रणालीचा अभ्यास करून, महाराष्ट्रात हा विभाग कसा सुरू करता येईल याबाबत रूपरेषा तयार करता येईल याबाबत त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, तसेच आदिवासी विकास विभाग व सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, या आदिवासी बांधवांचे अनेक वर्षांपासून सिडकोच्या विकास आराखड्यातील जागांवर वास्तव्यास आहे. या ठिकाणी हे आदिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांच्या पुनर्वसनाकरिता सिडकोमार्फत योग्य धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.तसेच या लोकांचे पुनर्वसन करताना पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता यांसारख्या सर्व मुलभूत सुविधा पुरविल्या जातील याची काळजी घेण्यात यावी. यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने सर्वेक्षण करून तीन महिन्यांच्या आत पुनर्वसन आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी प्रकल्प अधिकारी, पेण हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आढावा बैठकीस आमदार नरेंद्र मेहता, आमदार निरंजन डावखरे, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, वैद्यकीय अधीक्षक जाफर तडवी, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, डॉ. स्वप्नील लाळे, ठाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ येथील शासकीय रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्याचे सूचना निर्देश दिले. नेत्र चिकित्सा अधिकारी, आयुष अंतर्गत आणि अन्य आवश्यक वैद्यकीय पदांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. पंडित भीमसेन जोशी रूग्णालयांतर्गत नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यासाठी प्रस्ताव विभागाकडे सादर करण्यात आला असून या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तो तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या रुग्णालयासाठी स्वतंत्र रक्तपेढी मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे, ETP-STP उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करणे, रुग्णालयातील रॅम्प बनवण्याचे काम मार्गी लावणे, एनसीडी विभाग चालू करणे, रुग्णालयाचे थकीत वीज बिल आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला.

ठाणे येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम व कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी सामाजिक गरज म्हणून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड करण्यात यावेत अशी मागणी केली. याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल सायन्ना सामान्य जिल्हा रूग्णालय इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी दिले.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : नागपूर व अमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावतीमधील वीज क्षेत्रातील कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करावीत. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात वीज मागणीसंदर्भात तातडीने नियोजन करावे, दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला महसूलमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना  बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, आमदार मोहन मते, आमदार प्रविण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्ह्यामध्ये वीज क्षेत्रातील मागणी वाढत आहे. विविध पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढली असून विजेची मागणी देखील वाढत  आहे. नागपूर व अमरावती जिल्हयासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजूनही विविध नवीन प्रकल्प येत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. वीज क्षेत्रातील कामांसाठी नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपये निधीची आवश्यकता भासणार आहे यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विविध यंत्रणांकडून होणारे भूमिगत केबलचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नवीन प्रकल्पांमुळे वीज वितरण क्षेत्रातील वायरिंगचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित केबल डक्ट  वापरावेत जेणेकरून वीज वितरण वायरिंग सुरक्षित राहील. सुधारित वीज क्षेत्र योजना, कुसुम-ब योजना, मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना, ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी, नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यावरण तथा वातावरणीय बदल सचिव जयश्री भोज, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ.कांदबरी बलकवडे यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन ईटनकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित  होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियाकरिता बार्टीमार्फत डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस गती देण्यासाठी शासनाकडून विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र (जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० व नियम २०१२ अन्वये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्जदारांमार्फत संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केला जातो. याकरीता संबंधित समितीमार्फत प्रस्तावासोबत आवश्यक दस्तावेज व पुरावे इ. स्वरुपात जोडलेले आहेत अथवा प्रस्ताव अपूर्ण आहे याची खात्री करुन संबंधित अर्जदारास अधिकचे पुरावे प्रस्तावासोबत सादर करणेबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

अर्जदारांच्या सोईसुविधेकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित केले असून त्यामध्ये पुढील प्रमाणे सोईसुविधा उपलब्ध आहेत. १ ऑगस्ट, २०२० पासून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. ज्यामध्ये अर्जदारांना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी, सादर केलेला अर्ज ट्रॅक करणे, त्रुटींची ऑनलाईन पुर्तता करणे, वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणे. इत्यादी बाबींची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने सेवा शुल्क भरण्यासाठी १२ डिसेंबर २०२० पासून पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जात वैधता प्रमाणपत्र डिजीलॉकरच्या (Digi-locker) माध्यमातून अर्जदार कुठेही कधीही मोबाईलवर पाहू शकतो. समित्यांकडून निकाली काढलेले वैध प्रमाणपत्र ई-मेल द्वारे अर्जदारास प्राप्त होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदारांना सचित्र मदत / मार्गदर्शन आणि समर्पित हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. टोल फ्री क्रमांक: 1800 120 8040, व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्क नंबर : 9404999452, ई-मेल : helpdesk@barti.in असा आहे.

तरीही सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित अर्जावर विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत एसएमएस, ई-मेल, पत्राद्वारे संबंधित समित्यांमार्फत कळविण्यात येऊनही अनेक अर्जदार/विद्यार्थी व पालकांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला दिसून येत नाही. महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र (जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० व नियम २०१२ नुसार, अर्जातील त्रुटी पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारांची आहे. तरी संबंधित अर्जदार, पालक यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीशः संबंधित समितीशी त्वरित संपर्क साधावा व त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरुन समितीला विहित वेळेत निर्णय घेता येईल, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

विधानसभा कामकाज

गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म, मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

मुंबई, दि. ७ : गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय,  उद्योग,  ऊर्जा,  कामगार, खनिकर्म, मराठी भाषा विभागाच्या सन २०२५- २६ च्या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती  विभागांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येऊन त्या मंजूर करण्यात आल्या.

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम चर्चेला उत्तर देताना म्हणाले, पोलिसांच्या निवासा संदर्भात प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार निवास बांधकाम, पुनर्विकासासाठी मान्यता देण्यात येत आहे. राज्यात सर्वात मोठी पोलिसांची भरती करण्यात आली आहे. सध्या एकूण पदांच्या केवळ 10 टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांपैकी 13 हजार पदांची भरती यावर्षी करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन वर्षाच्या कालखंडात 2,46,752 पदांची भरती करण्यात आली आहे. पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी डीजी लोन योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत लवकरच निधीची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.

अमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी संघटित गुन्हेगारीवर आळा घालणारा मकोका कायदा लावण्यात येत आहे. अमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी राज्य शासन झिरो टॉलरन्स नीती अंमलात आणत आहे. अमली पदार्थाच्या गुन्ह्यात पोलिसांचा समावेश आढळल्यास अशा पोलीस कर्मचाऱ्यांना भेट बडतर्फ करण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्को टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ३५० पदांना मान्यता देऊन ती पदभरती करण्यात आली आहे. ई-चलनबाबत सुधारणा करण्यात येत आहे, याबाबतीत आलेल्या तक्रारीचे निरसन करण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रयोगशाळांमधील पुराव्यांच्या तपासांचे असलेले प्रलंबित्व कमी करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यात संपूर्ण प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही गृहराज्यमंत्री यांनी सांगितले.

गृह विभागासाठी सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ४२१ कोटी ७२ लाख ६३ हजार  रुपये  रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागासाठी 4 कोटी 78 लाख 49 हजार रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांना मागील दोन ते तीन वर्षाच्या काळात भरीव मदत करण्यात आली आहे. खताच्या लिंकेज बाबत तक्रारीनुसार कारवाई करण्यात येत आहे. शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून राज्याचे रासायनिक खतावरचे अनुदान कमी होत आहे. यावर्षी 19 हजार कोटी रुपयांचे अनुदान आहे. ते मागील वर्षीपेक्षा कमी झाले आहे.

कृषी विभागाच्या सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाकरिता  एकूण 132 कोटी 33 लाख 10 हजार   रुपये रक्कमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. कामगार विभागासाठी सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 2 कोटी 73 लाख 36 हजार रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

पशुसंवर्धन विभागाच्या मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मत्स्यव्यवसाय याप्रमाणे पशुसंवर्धनालाही कृषीचा दर्जा देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2 हजार 795 पदांची भरती करण्यात येत आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पशुवधगृह, देवनार येथे 15 पदे रिक्त आहेत ही पदे पालिकेकडून भरण्यात येणार असल्यामुळे या पदांच्या भरतीबाबत बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल. येथील अन्य प्रश्नांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल.

यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ देण्यात येत आहे. चराई अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल. राज्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांचा आढावा घेऊन त्यांच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीतून निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. घरपोच पशुधन सेवा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत ॲपची सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत पशुधन विमा योजना राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये केंद्राकडून निधी प्राप्त होतात विम्याची रक्कम देण्यात येईल. दुधाळ जनावरांना कर्ज देण्याबाबत विस्तृत कार्ययोजना तयार करावी लागणार आहे. याबाबत बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन विभागासाठी सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 15 कोटी 2 हजार रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसेच दुग्ध व्यवसाय विकास विभागासाठी सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 66 कोटी 42 लाख रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मत्स्यव्यवसाय विभागासाठी सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 15 कोटी 41 लाख 22 हजार रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

ऊर्जा विभागाच्या मागण्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मांडल्या.  सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 47 कोटी 48 लाख 99 हजार रुपये रक्कमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

उद्योग विभागाच्या सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 88 कोटी 61 लाख 41 हजार रुपये रक्कमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मराठी भाषा विभागासाठी सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण 45 लाख 74 हजार रुपये रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

राज्यात तीन वर्षात ६२ हजार नवउद्योजकांची निर्मिती – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ७ : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. राज्याची टक्केवारी ८५ ते ८७ असून गेली तीन वर्ष सातत्याने राज्यात परकीय गुंतवणुक येण्याचा ओघ वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी गुंतवणूक असलेल्या स्टील उद्योग आल्यामुळे औद्योगिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण होत आहे. या उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत मागील तीन वर्षात ६२ हजार नव उद्योजक निर्माण झाले आहेत, अशी माहिती उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षाच्यावतीने मांडलेल्या ठरावावर उत्तर देताना दिली.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या स्टील हबमुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यात स्टील उद्योगाची परिसंस्था निर्माण होणार आहे.  छत्रपती संभाजीनगर येथे ६० हजार कोटी, रत्नागिरी जिल्ह्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. राज्यात सर्व विभागात समतोल औद्योगिक विकास करण्याची शासनाची भूमिका आहे. उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा उद्योग परिषद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून यावर्षी १ लाख ४५ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. विश्वकर्मा योजना अंमलबजावणी करण्यामध्ये राज्य देशात पहिल्या तीन राज्यांमध्ये आहे. मधाचे गाव योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

राज्यात मागणीनुसार आवश्यकतेप्रमाणे औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी हजारो एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात नवीन औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी,  म्हसवड कॉरिडॉर,  दिघी पोर्ट कॉरिडर राज्याच्या उद्योग समृद्धीत भर घालणार आहे. उद्योजकांना ताकद व उद्योगांच्या विकासासाठी  राज्य शासन तत्पर आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

सप्टेंबर २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होणार – मंत्री उदय सामंत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाच्या विकासाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. या विमानतळाचे सप्टेंबरपर्यंत उद्घाटन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या सत्ताधारी पक्षाच्या ठरावावरील  उत्तर देताना दिली.

मंत्री उदय सामंत म्हणाले,  मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  या अंतर्गत बरीच रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील दोन वर्षांनी मुंबईकरांना खड्डे मुक्त प्रवासाचा अनुभव येईल. या कामामुळे पर्यावरणावर परिणाम होणार नसून याबाबत महापालिकेने काळजी घेतली आहे. ‘बेस्ट’ या उपक्रमाला यावर्षी १ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून आवश्यकतेनुसार आर्थिक मदत महापालिकेच्यावतीने देण्यात येते. महापालिकेने आतापर्यंत बेस्ट उपक्रमाला ११ हजार ४०५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अंधेरी पूर्व भागामध्ये आवश्यकता आणि गरजेनुसार नवीन रुग्णालयाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल.

मुंबई शहराच्या २०३४ च्या विकास नियोजनात (डिपी) मध्ये कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येईल. तसेच म्हाडा यंत्रणेच्या मुंबई शहरातील पुनर्विकासाची पद्धत उपनगरातील आणण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुंबई महानगर प्रदेश विकासासाठी आठ विविध एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सीच्या प्रभावी कार्यासाठी त्यांचा समन्वय करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.

मंत्री उदय सामंत म्हणाले, मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना हक्काचे घर घेण्यासाठी शासन कार्य करीत आहे.  गिरणी कामगारांची घरे बांधण्यात येत असून बीडीडी चाळींचा प्रश्नही सोडविण्यात येत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन करताना नवीन नियमांचा अंमल करण्यात येत आहे. यामध्ये आशिया खंडातील गृहनिर्माणातील सर्वात मोठ्या ‘समूह विकास’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामधून घरांची निर्मिती करण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये मराठी कविता व पुस्तकांच्या गावाची निर्मिती करणार – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

राज्य शासन मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. शासनाने मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी दिल्ली येथील जवाहर नेहरू विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने अध्यासन केंद्रही या विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. तसेच काश्मीरमध्ये मराठी कविता व पुस्तकांचे गावाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या सत्ताधारी पक्षाच्या ठरावावर उत्तर देताना सांगितले.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, मराठी भाषा भावनासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  या भवनाचे काम सुरू करण्यात आले असून ऐरोलीमध्ये उपकेंद्रही सुरू करण्यात येत आहे.  केवळ देशातच नाही, तर जगभरात मराठीच्या प्रचार – प्रसारासाठी राज्य शासन काम करीत आहे.  त्या अंतर्गत विश्व मराठी संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच जगभरात मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व ७४ देशांमध्ये बृहन्मराठी मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ १७ ठिकाणी ही मंडळे कार्यरत आहेत. मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठी अनुदान मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेप्रमाणे प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला आहे.  प्राकृत भाषेच्या संवर्धन व विकासासाठीही केंद्र शासन मराठी भाषेप्रमाणे निधीची तरतूद करणार आहे. मराठी भाषा विकास विभागाच्या निधीमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ऐतिहासिक भोसले तलवार लवकरच महाराष्ट्रात – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 7 :- मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असली ऐतिहासिक तलवार  महाराष्ट्रात परत आणली जात असून ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये मांडलेल्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, इतिहासातील अत्यंत मोलाच्या वस्तूची पुनर्प्राप्ती करून मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवली जात आहे. लंडनमध्ये लिलावात नागपूरच्या भोसले राज घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. ही तलवार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजी भोसले (प्रथम) यांनी बंगाल व ओडिशापर्यंत लढलेल्या लष्करी मोहिमांमध्ये वापरलेली होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, लंडनमधील एका कंपनीच्या लिलावात ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रयत्नातून आणि विशेष पुढाकारातून जवळपास ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपयांना ही तलवार विकत घेण्यात आली.  या तलवारीची मुठ सोन्याची आहे. या तलवारीवर रघुजी भोसले यांचे नाव कोरलेले आहे. या ऐतिहासिक तलवारीचे कस्टम क्लिअरन्स व पॅकिंगचे काम पूर्ण होऊन १५ ऑगस्टपूर्वी ही तलवार महाराष्ट्रात आणली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हरिश्चंद्रगड येथे असणारे मंदिर केंद्र शासनाच्या अखत्यारीत ते संरक्षित असल्याचे सांगून मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले. विश्रामगड हा असंरक्षित किल्ला असून या किल्ल्याच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी राखीव ठेवला जाईल असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले, राज्य शासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातही (AI) भरीव पावले उचलली जात आहेत. Google सोबत करार करून विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.  राज शासनाने मेटा सोबतही सामंजस्य करार केला असून त्याद्वारे शासकीय सेवा WhatsApp वर उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

विधानपरिषद कामकाज

मुंबई पुनर्विकास, कोळीवाडे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांना गती – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ७ : मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी हद्द निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावठाण, कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांसाठी समावेशक गृहनिर्माण धोरण तयार केले जात आहे, ज्यात ३५ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम 260 अन्वये प्रस्ताव मांडला होता. यात सदस्य ॲड.अनिल परब, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, संजय खोडके, विक्रांत पाटील, अमोल मिटकरी, श्रीमती चित्रा वाघ, अमित गोरखे, शिवाजीराव गर्जे, संजय केनेकर, सदाभाऊ खोत आदी सदस्यांनी सहभाग नोंदविला होता.

मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईचा सर्वांगीण पुनर्विकास, कोळीवाड्यांचा विकास, गिरणी कामगारांची घरे, झोपडपट्टी पुनर्वसन, चाळ पुनर्विकास, तसेच मुंबई मेट्रोच्या कामांबाबत माहिती दिली.

गिरणी कामगारांसाठी सुरू असलेल्या योजनांतर्गत 13,161 सदनिकांची लॉटरी पहिल्या टप्प्यात पार पडली असून, आणखी 58,000 घरांची योजना अंतिम टप्प्यात आहे. ठाण्यात ५२ हेक्टर जमीन गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती श्री.देसाई यांनी दिली.

चाळ पुनर्विकासाच्या अनुषंगाने वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील ५५६ घरांचा ताबा लवकरच दिला जाणार आहे. तसेच ना.म.जोशी मार्ग आणि वरळीच्या चाळींच्या प्रकल्पांनाही गती देण्यात येत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी २५९ हेक्टर जमिनीवर काम सुरू असून, ६३ हेक्टर जमीन ताब्यात देण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये २२८ योजनांद्वारे २.१८ लाख घरे उभारली जात आहेत. धारावीसह केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, केंद्राकडून ‘नो ऑब्जेक्शन’ मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीबाबत श्री. देसाई म्हणाले की, एकूण ६४७ किमीपैकी ४५६ किमीचे काम पूर्ण झाले असून १५३ किमी मार्ग कार्यान्वित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचे कामही लवकरच सुरू होणार आहे.

पोलिस वसाहतींबाबत ५६ पैकी २७ ठिकाणी ५६५५ निवास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चांदिवलीतील धोकादायक पोलीस इमारतींच्या पुनर्विकासातून ५८५ क्वार्टर्स उपलब्ध होणार आहेत.

प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकसकांवर दंडात्मक कारवाई होईल, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भोगवाटा प्रमाणपत्राशिवाय दिलेल्या ताब्यांवर ५०० रुपये प्रति चौ.मी. दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत पुनर्वसनाच्या समितीबाबत श्री.देसाई यांनी सांगितले की या समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश करण्यात आला असून यात सुहास आडिवडेकर, किरण पावसकर, ईशान सिद्धिकी आणि महेश पारकर यांचा समावेश केलेला आहे.

0000

संजय ओरके/विसंअ/

महाराष्ट्राने अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा ब्रँड निर्माण करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ७ : दुधाच्या उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुजरात राज्याने ‘अमूल’, दिल्लीने ‘मदर डेअरी’ व कर्नाटकने ‘नंदिनी’ ब्रँड तयार केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने सहकार संस्थांच्या माध्यमातून दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे राजभवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहकार आयुक्त दीपक तावरे, सहकार विभागातील सहसचिव संतोष पाटील यांसह सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सन २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा असेल तर विकास सर्वसामायिक झाला पाहिजे असे सांगून सहकार यशस्वी झाले तरच विकास सर्वसमावेशक होईल. सहकार चळवळीतून नेतृत्व तयार झाले पाहिजे. सहकार चळवळीने महाराष्ट्राला प्रगल्भ राजकीय नेतृत्व दिले आहे. ‘मी’ पणाने सहकार क्षेत्राचा विस्तार होत नाही, तर सहकार क्षेत्रासाठी ‘आम्ही’ ही संघभावना ठेवून काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

सहकार क्षेत्रात अभ्यासू व प्रशिक्षित लोक येणे आवश्यक आहे.  या दृष्टीने राज्यातील ज्या क्षेत्रात सहकार चळवळ सशक्त आहे, त्या परिसरातील विद्यापीठामध्ये सहकार विषयक पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम हे राज्य पूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य झाले आहे. आज सेंद्रिय अन्नधान्याची मागणी वाढली आहे असे नमूद करून सहकार तत्वातून तालुकानिहाय सेंद्रिय शेतीला चालना देण्याबाबत विचार झाला पाहिजे. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांवर लादता येणार नाही, तर ती शेतकऱ्यांची चळवळ झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.  सहकारी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण झाले नाही तर ते टिकणार नाहीत असे राज्यपालांनी नमूद केले.

महाराष्ट्र ही सहकाराची जन्मभूमी असून सहकार चळवळ राज्यात ब्रिटिश काळापासून सुरु आहे. आज देशातील ३० कोटी लोक सहकाराशी जोडले असून देशाच्या १४० कोटी लोकसंख्येपैकी अधिकाधिक लोक या चळवळीशी जोडले जावे असे सांगताना देशात महिलांनी देखील सहकारी संस्था निर्माण कराव्या असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

राज्यात अनेक साखर कारखाने, पतसंस्था व सहकारी बँकांचे जाळे असून ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या सहकार संस्था सक्षम झाल्या पाहिजेत. सहकार चळवळ मजबूत होण्यासाठी सहकार विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे व तेथे अधिकाऱ्यांसह जनप्रतिनिधींचे देखील प्रशिक्षण झाले पाहिजे, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

राज्यात ४२५ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचा सार्वजनिक – खासगी भागीदारीतून कायापालट केला जात असून सहकार विभागाला देखील तेथे अभ्यासक्रम सुरु करता येईल, असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

सहकारावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने देशात स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्याचे नमूद करून गावागावातील सहकारी संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे तसेच सायबर घोटाळे होऊ नये यासाठी ‘वॉर रूम’ तयार केली पाहिजे, असे सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी यावेळी राज्यपालांसमोर सहकार विभागाच्या विविध उपक्रमांबाबत सादरीकरण केले. राज्यात एकूण २,१६,४७२ सहकारी संस्था असून त्यापैकी २१,१६५ प्राथमिक कृषी संस्था, ४२७ नागरी सहकार बँक, २०,५४६ नागरी सहकारी पतसंस्था तसेच १ लाख २६ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून १.२१ कोटी सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार विभागाने वृक्ष लागवडीचे कार्य देखील गांभीर्याने घेतले असून आतापर्यंत १.२५ लाख वृक्षांची लागवड केली असल्याचे सहकार विभागातील सहसचिव संतोष पाटील यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी पालघर जिल्ह्यातील ११२ वर्षे जुन्या माहीम सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला, तर ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.

०००

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 7 : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई यांचे अभिनंदन केले तसेच पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.

0000

ताज्या बातम्या

शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू...

0
पुणे, दि. २२ : शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. २२: ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे...

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत – वनमंत्री गणेश नाईक 

0
ठाणे,दि. २२ (जिमाका):- गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश...

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (जिमाका)- आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा, त्यासाठी रुग्णालयांनी तत्पर...

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

0
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख...