विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ’अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना
घेरावाडी आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह पुनर्वसनाबाबत ७ दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : कर्नाळा (जि. रायगड) पक्षी अभयारण्यातील घेरावाडी या आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि पुनर्वसनाबाबत वन विभागाने 7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
कर्नाळा पक्षी अभयारण्यातील घेरावाडी आदिवासी पाड्याचे पुनर्वसन, कर्नाळा पक्षी अभयारण्याचा निसर्ग पर्यटन आराखडा आदींच्या संदर्भात आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि घेरावाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, घेरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार तेथे रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याशिवाय या आदिवासी बांधवांना पुनर्वसनाचे अन्य पर्याय समजावून सांगावेत. त्यापैकी, जो पर्याय स्थानिक नागरिक निवडतील, त्या पर्यायाची उपयुक्तता तपासावी. यासाठी वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन यासंदर्भात काय पर्याय स्थानिकांना उपयुक्त ठरेल, याबाबत आढावा घ्यावा, असे सांगितले.
कर्नाळा पक्षी अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या अधिक संधी
कर्नाळा पक्षी अभयारण्याचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी निसर्ग पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी चांगली होणे आवश्यक आहे. या आराखड्यात प्रस्तावित केलेली कामे ही दर्जेदार असणे अपेक्षित आहे. ही कामे वेळेवर पूर्ण होणे तितकेच गरजेचे असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
0000
दीपक चव्हाण/विसंअ/
मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, याबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात निश्चितपणे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणी संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे, उप सचिव (मत्स्य) कि. म. जकाते, सहआयुक्त (मत्स्य – सागरी) महेश देवरे, रवींद्र वायडा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य अभियंता आर.एम. गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छिमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. वीज, पाणी, कोल्ड स्टोरेज आदी सुविधाही त्यांना मिळू शकतील. मात्र, या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यावर आणखी काय बाबी अंतर्भूत होऊ शकतात, इतर विभागांशी निगडित परवानगी त्यासाठी आवश्यक आहेत का, याचाही विचार केला जाईल. तसेच, राज्य मंत्रिमंडळासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
रोजगाराशी निगडित ही बाब आहे. त्याचा अनुकूल आणि सकारात्मक परिणाम यावर होईल. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. अतिशय गांभीर्याने यावर निर्णय होईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
0000
दीपक चव्हाण/विसंअ/
स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
मुंबई, दि. 25 : देशातील स्टार्टअप इन्क्यूबेटरची अग्रणी संस्था असलेल्या इस्बा – (ISBA इंडियन स्टेप अॅण्ड बिझनेस इनक्यूबेटर असोसिएशन) या संस्थेच्या इस्बाकॉन २०२३ (ISBACON2023) या १५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन मुंबई येथे २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार असून, या कार्यक्रमासाठी देशभरातील २०० पेक्षा अधिक स्टार्टअप्स इन्क्यूबेटर्सचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन २७ ऑक्टोबर रोजी आयटीसी (ITC) ग्रॅण्ड सेंट्रल, परळ, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.
‘इस्बा’ची वार्षिक परिषद ही भारतातील स्टार्टअप इनक्यूबेटर्सची सर्वात मोठी सभा आहे. यात गुंतवणूकदार, सरकारी प्रतिनिधी, तज्ञ सहभागी होतात. स्टार्टअप्स इकोसिस्टिम करीता महत्वाच्या असलेल्या या परिषदेचे मुंबईमध्ये प्रथमच आयोजन होत असून, ही परिषद महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या (Maharashtra State Innovation Society ) सहकार्याने होणार असून या कार्यक्रमाची सुरुवात 26 ऑक्टोबर रोजी महत्वच्या विषयावर प्री-कॉन्फरन्स कार्यशाळेने होईल. त्यानंतर 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांत १७ परिषद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ऑक्टोबर रोजी परिषदपूर्व कार्यशाळा होईल. यामध्ये 1. उत्पादक इनक्यूबेटर व्यवस्थापन 2. सीड फंड /गुंतवणूक व्यवस्थापन 3. प्रदीप युवराज यांचे लीडर्ससाठी व्यवसाय कथाकथन या सत्रांचा समावेश असेल. तर मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन २७ ऑक्टोबर रोजी आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल, मुंबई येथे होणार असून, या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामस्वामी एन., उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह प्रमुख अतिथी असतील. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होईल.
दोन दिवसीय परिषदेमध्ये 27 ऑक्टोबरला पुढील विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयडिया ते आयपीओ- प्रवास,बिझनेस इनक्यूबेशनची कल्पना करणे- बदलत्या काळाशी संबंधित राहणे, समावेशकता आणि टिकाऊपणाच्या संदर्भात इन्क्यूबेशनमधील संधी, ग्राउंड झिरो आणि क्लस्टर उपक्रमांवर राज्य स्टार्टअप मिशन-योगदानावर सत्र, पॉवर कनेक्ट – सांची कनेक्ट, क्लस्टर उपक्रमांद्वारे इन्क्यूबेशन क्षमता वाढवणे, बायोटेक स्टार्टअपसाठी निधी सक्षम करण्यासाठी बायोटेक इनक्यूबेटर माध्यमातून सर्जनशील उपाय,बिझनेस इनक्यूबेटरच्या चांगल्या पद्धती, अद्वितीय इन्क्यूबेशन कार्यक्रमाचे अनुभव या विषयी चर्चासत्र होणार आहेत तर 28 ऑक्टोबर रोजी नेतृत्व गुण कसे विकसित करावे, डीप टेक इनक्यूबेशन-संधी आणि आव्हाने, सीएसआरच्या पलीकडे कॉर्पोरेट / संलग्नता, भारतीय स्टार्टअप्स आणि इनक्यूबेटर्ससाठी संरक्षण क्षेत्रातील संधी, इनक्यूबेटर-इंडस्ट्री कनेक्ट, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडून स्टार्टअप्स / इनक्यूबेटर्ससाठी पुढाकार. या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्टार्टअप्स इकोसिस्टिम करिता कॅपसीटी बिल्डिंग प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे.
संपूर्ण कार्यक्रम तपशील आणि नोंदणीसाठी, विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.isbacon.in वर भेट द्यावी, असे आवाहन इस्बा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
****
संध्या गरवारे/विसंअ/
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 25 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेकरीता नवीन (Fresh) व नूतनीकरणाच्या (Renewal) ऑनलाइन अर्जाची स्वीकृती सुरू झाली आहे.
ऑनलाइन अर्जाची स्वीकृती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाली आहे. महाडिबीटी ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत सर्व महाविद्यालयांनी कार्यवाहीचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/
पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर
मुंबई, दि. 25 : राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती, पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समितीची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समिती यांच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प सुरु आहे. बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी
बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना / उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण ३५ निकष तयार करण्यात आलेले होते. या निकषाशी संबधित माहितीची संबधित तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण २०० गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची सन २०२२-२३ या वर्षाची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आली आहे.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
‘जनतेशी सुसंवाद’कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण
मुंबई, दि. 25 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊ नका, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी प्रशासनाला दिले.
‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना पाहिजे असलेल्या दाखल्यांचे वितरण तातडीने केले जात आहे. विविध दाखले नियोजित वेळेत मिळत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
आज आयोजित ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, मिळकत प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांचे संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांमधून लाभ मिळावा यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ
मुंबई, दि. 25 : व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून मुंबईसह राज्यभरातून ड्रग्ज हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’ चा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रवींद्र सिंघल, नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. त्याबरोबरच आंतरिक स्वच्छता देखील आवश्यक आहे. विद्यार्थी संवेदनशील असतात, त्यांच्या सहभागातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ड्रग्ज मुक्त मुंबई अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाज हा पोलीस यंत्रणेचे डोळे असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, समाजाने नशा मुक्तीसाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजातील विविध प्रकारच्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी मिळून वाटा उचलू या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी शासनाने नशामुक्तीसाठी विविध पावले उचलली असल्याची माहिती दिली. विद्यार्थी नशेसारख्या सवयींना लवकर बळी पडण्याची शक्यता असल्याने मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी वाईट सवयींना बळी पडू नयेत ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी या अभियानाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत स्टुडंट्स प्रहरी क्लबच्या लोगोचे तसेच सहसाहित्याचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील 450 शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत दहा मुले व दहा मुली यांचा स्टुडंट्स प्रहरी क्लब स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘एक युद्ध नशे के विरूद्ध’ ही या अभियानाची घोषणा असणार आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/
राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा उपक्रम – केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’, ‘मिट्टी को नमन; विरोंको वंदन’ हा उपक्रम राबविला जात आहे. गावागावातून पवित्र मातीचे संकलन करुन गावांगावांतील शहिदांना वंदन करणारा हा उपक्रम देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत करणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
‘मेरी माटी मेरा देश’, ‘मिट्टी को नमन और विरोंको वंदन’ अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पवित्र माती आज ११ कलशांमध्ये भरुन मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर दि.३१ ला दिल्ली येथे हे पथक जाणार आहे. पवित्र कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या पथकास आज डॉ. कराड यांच्या उपस्थितीत मुंबईकडे रवाना करण्यात आले.
यानिमित्त जिल्हा नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, नेहरु युवा केंद्राचे शुक्ला तसेच सर्व स्वयंसेवक व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध गावांमधून पवित्र मातीचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करुन ही माती तालुकानिहाय तसेच महानगर पालिका, नगरपंचायत अशा ११ कलशांमध्ये एकत्र करण्यात आली. हे कलश घेऊन आज जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे पथक मुंबईकडे रवाना झाले. त्यांना डॉ. कराड यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील २३ स्वयंसेवक या पथकात आहेत. उद्या म्हणजे दि.२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मान्यवर या कलशांचे स्वागत करतील. त्यानंतर हे पथक दिल्लीकडे रवाना होईल. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातून प्राप्त या पवित्र कलशांचे स्वागत करतील. देशभरातून गोळा झालेले हे कलश व त्यातील पवित्र माती ही कर्तव्य पथावर अमृत वाटीकेच्या निर्माणात वापरली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्प आहे. त्यात प्रत्येक देशवासियाचे योगदान असावे ही यामागील कल्पना आहे. त्यासाठी शासनाने प्रत्येक क्षेत्रात सुसुत्रिकरण केले आहे. सर्व क्षेत्रात भारत विकसित व्हावा यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रामावत यांनी केले.सहभागी प्रत्येक स्वयंसेवकास पुष्प देऊन निरोप देण्यात आला. राष्ट्र्गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
०००
जिल्ह्यात निर्माण करणार जगातील सर्वात मोठे आणि पहिले मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्त) :- नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळालेल्या सामुहिक वनहक्कांच्या जमिनींवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वप्रथम व सर्वात मोठे १० लाख हेक्टरवरील मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल नरेमदा खोऱ्यातील परिसरात करणार असून, सर्व संबंधित यंत्रणांनी या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजवणी आजपासून करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा अंतर्गत आयोजित बांबू लागवड मोहिमेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी, राज्य कृषिमुल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, भारत सरकार (नवी दिल्ली ) चे फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार, मंत्रालयातील मिशन मनरेगा ते महासंचालक नंदकुमार, नागपूरच्या बांबू बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव, मनरेगा चे राज्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी राजेंद्र शहाडे, कृषी विभागाचे सहाय्यक आयुक्त के. एस. श्रीकांत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींना सामुहिक वनहक्काच्या जमीनी मिळाल्या आहेत. या जमीनी वर्षानुवर्षे पडीक आहेत. या जमीनींवर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू लागवड मिशन अंतर्गत मनरेगा, वनविभाग व आदिवासी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे. त्यासाठी नर्मदा खोऱ्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. बांबू लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण व वनसंरक्षणाचा हेतु साध्य होण्याबरोबरच रोजगार निर्मितीतून आदिवासी बांधवांचे परराज्यात होणारे स्थलांतर थांबेल, वाडेपाडे आणि खेडी स्वयंपूर्ण होण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. तसेच स्थलांतरासोबत कुपोषणही रोखण्यात शासनला यश मिळणार आहे. बांबू लागवड व त्यापासून प्रक्रिया उद्योग व व्यवसायांचे प्रशिक्षण त्यासाठी शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने”असेही म्हटले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड “असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्याची क्षमता आहे.
देशात बांबूची बाजारपेठ मोठी असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड यांचा आहे. बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करुन ग्लोबल वार्मिंगलाही मात देण्याची अमर्यादित क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बांबूचा समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापना केलेली आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना उत्तम बांबू रोपांचा पुरवठा करण्याचे निर्देश यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ०१ गुंठ्यांपासून १ हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येते. बांबू हे शेतकऱ्यांसाठी बुहउद्देशीय उपयोगी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोड धंदा मिळवा म्हणून शासनाचे प्रयत्न आहेत. कपडयापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. सध्या भारतात देखील बांबूपासून १८०० प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन १०० टन व भाव प्रति टन किमान ४००० रूपये भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणास निश्चितच त्यामुळे मदत होणार आहे. तसेच तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. बांबूचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षांचे आहे. पहिली दोन वर्ष त्यामध्ये आंतरपीक घेता येते. क्षारपड व नापिक जमिनीवरही बांबू लागवड करता येते. कृषि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बांबू पासून इथेनॉल निर्मिती केली जाते. केंद्र शासनाने २०१७ पासून बांबू हे गवतवर्गीय असल्याचे घोषित केल्याने आता, वन सरंक्षण कायद्यानुसार बांबू तोडण्यास, कापण्यास व वाहतुकीस आता परवानगीची आवश्यकता नाही. देशातील सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये १० टक्के बायोमास वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता बांबू व बांबूसारखे इतर बायोमासची आवश्यकता भासणार आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीतून औद्योगिक भरारी घेणारा जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
जिल्ह्यात बांबू लागवडीस संपूर्ण वाव-पाशा पटेल
महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयात एक स्वतंत्र बांबू मिशन सेल व त्यासाठी दोन स्वतंत्र विशेष कार्य अधिकारी नेमण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी पूर्ण वाव असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. ही मोहीम सफल करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. कितीही बांबू लागवड केली तरी ते बांबू पूर्ण खरेदी करण्यासाठी एक कंपनी असून सदर कंपनी पूर्ण बांबू खरेदी करते. नंदुरबार जिल्ह्यातील साठी प्रत्येक योजनेसाठी प्रत्येक गोष्टीसाठी अनुदान/निधी हा अमर्याद मिळू शकतो. त्यामुळे इथे प्रत्येक योजना सफल होत असतात. बांबू लागवड कामात सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांनी या कामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी राज्य कृषीमुल्य समितीचे चेअरमन पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.
बांबू लागवड हे शासकीय काम नसून सर्वांची जबाबदारी आहे –डॉ. हिना गावित
जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक विभाग वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. जिल्ह्यातील स्थलांतरित होणाऱ्या लोकांच्या जमिनी या कसण्या योग्य नसल्याने ते मजुरीसाठी दुसऱ्या राज्यात स्थलांतर होतात. त्या जमिनीवर लोकांना तेथेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून
सामुहिक वनहक्कांच्या जमीनीवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करावे. नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात बांबू लागवडीचे काम हे चांगले होईल, जगाला वाचवण्यासाठी आदिवासी बांधव सर्वात जास्त बांबू लागवडीचे काम करतील. बांबू लागवड हे शासकीय काम न समजता आपल्या सर्वांची जबाबदारी म्हणून करावे लागणार आहे भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार असून ऑक्सिजन साठी हे काम प्राधान्याने करावे लागणार आहे, असे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत भारत सरकार (नवी दिल्ली ) चे फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार, मंत्रालयातील मिशन मनरेगा ते महासंचालक नंदकुमार, नागपूरच्या बांबू बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव यांनीही मार्गदर्शन केले.
0 0 0