शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1077

दीक्षाभूमीवर सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून आधुनिक सुविधा

  • पोलिस, अग्निशमन दल ठिकठिकाणी तैनात
  • पिण्याचे पाणी, शौचालय, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था
  • www.deekshabhoomiinfo.in  संकेतस्थळावर सर्व माहिती

नागपूर, दि. २३ : दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. १०० डॅाक्टर २४ तास उपलब्ध असून ४ हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती दिली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठी १ हजार कर्मचारी पुढील ३ दिवस उपलब्ध असतील.

दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. उद्या ही संख्या वाढण्याची शक्यता असून आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २ तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महानगरपालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उद्घाटन केले. याठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या यावर्षी सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात www.deekshabhoomiinfo.in हे विशेष संकेतस्थळ सुरू केले असून सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये माहितीदर्शक नकाशादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल बोर्डद्वारे अनुयायांना सर्व सूचना देणे सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष उघडला असून दीक्षाभूमीवर असणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांमध्ये अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी पुस्तकांचे स्टॅाल उभारण्यात आले आहेत. यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठिकठिकाणी स्वच्छता दूत तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी नळ बसविण्यात आले आहेत. परिवहन व्यवस्थेचीही काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष बसेसची व्यवस्था वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणापर्यंत करण्यात आली आहे.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

उद्या सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील.  तर प्रमुख अतिथी श्रीलंका येथील रेव्ह. डब्ल्यू. धम्मरत्न थेरो असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

दीक्षाभूमीवर प्लास्टिक फ्री झोन पाळण्याचे आवाहन

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्री झोन’ उपक्रम ठरावा. पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २३:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे  कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली आहे.

या दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. आधुनिक भारत या पायावर उभा आहे. त्यांची शिकवण जगालासुद्धा मार्गदर्शक आहे. डॉ. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज हे स्थान जगासाठी ऊर्जास्थान ठरले आहे. इथे लाखो नागरिक, अनुयायी भेट असतात. म्हणून या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे २०० कोटींचा विकास आराखड्याला मान्यता दिल्याचे  नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे.

रुग्ण सेवांप्रती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजगता बाळगावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. २३ (जिमाका) : सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये आधार वाटतात. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये व महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्र सामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. शासकीय रुग्णालये व तेथील रुग्ण सेवांप्रती डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांनी सजग राहून गरजू सर्वसामान्यांची आरोग्य सेवा करावी. यासाठी रुग्णालयास आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

           मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देवून केलेल्या पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

            श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज हे वैद्यकीय सेवा व उपचारांचे हब आहे. या ठिकाणी चांगल्या आरोग्य सेवा मिळतात, असा नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासकीय रुग्णालयातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सांगली येथील ५०० खाटांच्या रूग्णालयास निधी व मिरजेतील २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लवकरच मान्यता देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी सर्जिकल साहित्य, औषधे खरेदी, विविध सेवा व यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिल्याबद्दल  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांचे अभिनंदन केले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याबरोबरच या ठिकाणी अत्यावश्यक यंत्रसाम्रगी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रुग्णालयात लागणारी ४० टक्के औषधे खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. तर जिल्हा नियोजनमधून घेण्यात येणारी औषधेही खरेदी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले असल्याचे सांगून, रुग्णालयात अपुरे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन देवून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, नर्सिंग अध्यापक व कर्मचारी निवास आणि नर्सिंग महाविद्यालय कार्यालयीन खर्चासाठी पाठविण्यात आलेल्या 47.25 कोटी रुपयांच्या प्रस्तावास विभागाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली असता या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            प्रारंभी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय  मिरज मधील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा याबाबत मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

          यावेळी मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील अद्ययावत करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याहस्ते व पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

            बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मिरज शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा, वॉर रुम, स्त्री रोग, प्रसुतिशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, आय.सी.यु, डायलेसिस विभागांना भेट दिली. तसेच, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्किल लॅबची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. खाडे उपस्थित होते.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २३ : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्यानं, अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान एकजुटीनं, एकदिलानं परतवून लावण्याचा निर्धार करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा

राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी विजयादशमीदिवशी बोधीवृक्ष रोपण कार्यक्रम आणि ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबोधीवृक्ष महोत्सवास, तसंच यानिमित्तानं नाशिकला येणाऱ्या देशभरातील बुद्ध उपासक, अनुयायांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. २३ (जिमाका) : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय  सर्वोपचार  रुग्णालय परिसरात होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावास लवकरच निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णालयामार्फत पाठविण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून येथील आरोग्य सेवा बळकट केल्या जातील. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय सर्वोपचार रुग्णालयास भेट देवून तेथील आरोग्य सेवा व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू, गरीब रुग्णास आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार यासारखे विभाग सुरु असणे आवश्यक वाटते. सांगली येथे होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयास आवश्यक सर्व मदत केली जाईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून औषधे उपलब्ध करुन द्यावीत. आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्या रुग्णालयात करण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारे रुग्णांची हेळसांड होवू नये याची आरोग्य प्रशासनाने दक्षता घ्यावी. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल, असे ते म्हणाले.

सांगली येथील रुग्णालयात एसटीपी सिस्टीम करण्याकरिता पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही देवून वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सांगली व मिरज येथील रुग्णालयात आय.सी.यु. बेड वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. याबरोबच फायर ऑडिटही करण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीपूर्वी श्री. मुश्रीफ यांनी रुग्णालयात विविध विभागांना भेट देवून आरोग्य व्यवस्थेची पाहणी  करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

०००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!

मुंबई, दि. 23 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचे, अन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगिकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करुया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि (दारिद्र्य कमी होऊन) कुटुंब आर्थिकरित्या सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगातून रोजगार निर्माण करून देणे आणि आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. हे अभियान नेमके काय आहे, याची अंमलबजावणी आणि नियोजन; स्वयंरोजगारासाठी होणारे प्रयत्न, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जयवंशी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट

मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गाष्टमीनिमित्त राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Governor visits Navratri Mandal  in the Raj Bhavan staff quarters premises 

Mumbai, Date 23 : Governor Ramesh Bais visited the Raj Bhavan Navratri Mandal in the Raj Bhavan staff quarters premises on the occasion of Durgashtami. The Governor performed the aarti and interacted with those present.

राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. २३ : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे.  सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.  दसरा व विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख-शांती, समाधान व समृद्धी घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000 

Governor greets people on Vijaya Dashmi

Mumbai, Date 23 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the auspicious occasion of Vijaya Dashmi (Dassera). In his message, the Governor has said:

“The festival of Vijaya Dashmi or Dussera symbolizes the victory of the eternal over the ephemeral and of good over the forces of evil.  The festival reassures that Truth will always prevail.  May the festival bring happiness, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई, दि. २३: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.

‘नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा  क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे.साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...