शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1078

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई, दि. २३: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.

‘नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा  क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे.साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असून लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ सर्व संबंधित यंत्रणांनी पोहोचवण्यावर भर द्यावा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.

स्मार्ट सिटी कार्यालयात आज मंत्री डॉ. कराड यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंदर्भात छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, संजय खंबायते, बापू घडामोडे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मनपाचे उपायुक्त मंगेश देवरे, नगर प्रशासन अधिकारी अशोक कायंदे यांच्यासह  बँक अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. कराड म्हणाले की, स्वनिधी से समृद्धी या संकल्पनेवर आधारित ही योजना आहे. “या योजनेअंतर्गत, नोंदणीकृत विक्रेत्यांना अत्यंत अल्प व्याजदराने १० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. देशातील लहान विक्रेत्यांना अर्थसहाय्य पुरवून, त्यांना खासगी कर्ज पुरवठादारांच्या कचाट्यातून सोडवणे हे केंद्रसरकारचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे विक्रेते या गरजूंना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. महानगरासह जिल्ह्यातील पथविक्रेते, फेरीवाले यांना योजनेची माहिती देणे, त्यांची नोंदणी करणे यासाठी महानगरपालिका व बॅंकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री डॉ. कराड यांनी केले.

डिजिटल व्यवहारात देश पुढे जात असल्याचे सांगून मंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून कॅशबॅक सुविधा प्रदान करून विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जाते. डिजिटल माध्यमाने केलेल्या व्यवहारामुळे विक्रेत्यांच्या क्रेडिट स्कोरमध्येही वाढ होईल. प्रधानमंत्री स्वनिधी योजना योजनेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोठे लक्ष्य गाठण्यासाठी जनजागृती, तातडीने कर्ज वितरण, बँक अधिकाऱ्यांचा सहभाग, गरिब कुटुंबाला योजनेतून मदत, अर्ज भरण्याची प्रक्रिया यासह योजनेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाली.

महानगरातील योजनेच्या सद्यस्थितीबाबत उपायुक्त श्री. देवरे यांनी तर जिल्ह्यातील स्थितीबाबत नगर प्रशासन अधिकारी श्री. कायंदे यांनी माहिती दिली. जिल्हयातील नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या शहरात सुरू स्वनिधी योजनेच्या स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी सबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर, दि. 23(जिमाका):- यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करावा. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर शेती पिके घेण्यासाठी वापर करून शेती पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

तांबवे(टे)ता.  माढा येथील विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24  च्या 23 व्या गळित हंगाम शुभारंभ व शेतकरी संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे,माजी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे, उमेश पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन उबाळे यांच्यासह संचालक मंडळ व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून यावर्षी पिक विमा योजना ही त्यापैकी महत्त्वाची योजना असून शासनाने एका रुपयात पिक विमा योजना लागू केल्याने यावर्षी राज्यातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. केंद्र व राज्य शासनाने एकूण 8 हजार 16 कोटीचा हप्ता विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या वतीने दिलेला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळालेले असून अशा दुष्काळी परिस्थितीत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची भरपाई रक्कम मिळून बळीराजा उभा राहिला पाहिजे हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊस पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी उसाची रिकव्हरी चांगली होईल यासाठी ऊसाची जोपासना चांगली करावी. ऊस पिकासाठी पाण्याचा कमी वापर होईल यासाठी ठिबक, तुषार या अद्ययावत सिंचन पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. उसाची जोपासना चांगली झाल्यास व साखर कारखान्यांना उसाची रिकव्हरी चांगली मिळाल्यास कारखाने शेतकऱ्यांना उसाचा दर चांगला देतील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याचा उसाचा रिकव्हरी दर 12.5 इतका कमी असून तोच दर कोल्हापूरचा 13.5 व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्याचा दर 13 पेक्षा अधिक असल्याने कोल्हापूर व पुणे या भागातील साखर कारखाने उसाला प्रतिटन चांगला दर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

माढा विधानसभेच्या विकासासाठी शासनाच्या वतीने सन 2022 मध्ये 13 रस्त्याच्या कामांसाठी 27 कोटी, सन 2023 मध्ये 6 रस्त्यांच्या कामांसाठी 30 कोटी, पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस 36 ग्रामीण रस्त्यांसाठी 30 कोटी, प्रशासकीय इमारतीसाठी 13 कोटी, उपजिल्हा रुग्णालयासाठी 20 कोटी असा निधी देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगून सीना-माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना नदीवर बॅरेजेस निर्माण करणे तसेच शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांसाठी बेदाण्याचा समावेशाबाबत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 20 हजार प्रतिटन करण्यास मान्यता देण्यात यावी. मोडलिंब येथे एमआयडीसीची मान्यता देण्यात यावी. कृष्णा फ्लड डायव्हर्सेशन स्कीम योजनेला मान्यता देण्यात यावी भीमा -सीना नदीवर बॅरेजेस निर्माण करावेत त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचा शेती पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, या मागण्या आमदार बबनदादा शिंदे यांनी अध्यक्ष स्थानावरून केल्या. तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 23 व्या गळीत हंगामाचा उसाला पहिला हप्ता प्रति टन अडीच हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज्याच्या शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा याबाबत माढा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी,  त्याचप्रमाणे सकल मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील पाच मुलींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समाजाच्या वतीने निवेदन दिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम ढवळे व संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर रणजीत शिंदे यांनी प्रस्ताविक केले तर आभार रमेश पाटील यांनी मानले.

चिटेघर प्रकल्पग्रस्तांना साखळी उपोषण थांबवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

सातारा दि. २३ (जिमाका): पाटण तालुक्यातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी चिटेघर प्रकल्पबाधित जमिनींचा वाढीव मोबदला देण्यासाठीचा नवीन प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह संबधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांनी आता मंजूर झालेली रक्कम स्वीकारावी असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जलसंपदा विभागाने सध्या जमिनीच्या मोबदल्यापोटी तीन पट रक्कम संबंधीत प्रकल्पग्रस्तांना वितरीत करावी. तसेच ही रक्कम मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यावर व्याज देण्याबाबतचा प्रस्ताव आणि त्यासोबतच आणखी एक पट मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सिंचन विभागाने संपादीत केलेल्या जमिनीची रितसर मोजणी करावी व त्यानुसार शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी घेतल्यास त्या त्यांना परत कराव्यात. जिल्ह्यातील प्रस्ताव मार्गी लावण्यास काही अडचणी येत असतील तर त्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

०००

बोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रमस्थळास मंत्री छगन भुजबळ यांची भेट व पाहणी

नाशिक, दि. २३, (जिमाका) : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारक परिसरात उद्या दि. २४ रोजी विजयादशमीला श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यक्रमस्थळी भेट देवून पाहणी केली.

मंत्री श्री. भुजबळ यांनी आज बोधीवृक्ष रोपणाची जागा, बुद्ध स्मारक तसेच मुख्य कार्यक्रम हॉल व मंच या ठिकाणी भेट देवून उर्वरित अनुषंगिक बाबींची पूर्तता त्वरेने आजच पूर्ण करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भंन्ते सुगत थेरो, माजी खासदार समीर भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

०००

उच्च शिक्षण संचालनालयाच्या नूतन इमारतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २३ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या नूतन इमातीचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे,  प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर,  शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, डॉ.गजानन एकबोटे, माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.

नूतन कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक कार्यक्षमपणे काम होईल, असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

मॉडेल कॉलनी येथील पूर्वीच्या तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून तेथे उच्च शिक्षण संचालनालय कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.

०००

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महिला सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन

महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांवर शासनाचा भर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.२३-उच्च व तंत्रशिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण’ या विषयावर आयोजित महिला सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.

विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव,  शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

 मंत्री श्री.पाटील म्हणाले, महिलांना सक्षम करणे, बरोबरीचे स्थान मिळण्याची प्रक्रिया देशात पुढे जात आहे. जगातील अनेक देशात महिलांना मताधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला असताना देशात स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून मताधिकार मिळाला आहे. महिलांना प्रसूती रजा, नोकरीच्या ठिकाणी पाळणाघर अशा सुविधा देण्यात येत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही महिलांना संघर्ष करावा लागला. परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची महाविद्यालयातील उपस्थिती वाढविण्याविषयी, त्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांविषयी चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिला उत्पन्नाचे साधन मिळवून देणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे कौशल्य देण्याची व्यवस्था उभी करावी लागेल. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘दामिनी पथक’ अधिक सक्षम करणे, महाविद्यालयात विद्यार्थिनींना आपले म्हणणे मांडण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

शाश्वत विकासाच्यादृष्टीने २०२१ मध्ये जगातील मानवजातीच्या कल्याणासाठी १७ उद्दिष्टे मांडण्यात आली आहेत. त्यातील महिला  सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण या संदर्भातील संवाद या परिषदेत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महिला सक्षमीकरणासाठी आठ कलमी कृती कार्यक्रम गरजेचा  – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, शाश्वत विकास उद्दिष्टांचा एकमेकांशी संबंध आहे. उद्दिष्टांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि लिंग समानता या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. शाश्वत विकास  उद्दिष्टांच्यादृष्टीने या विषयावर समाजात चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीत महिलांसमोरील आव्हान आणि महिलांचे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्वाचे आहेत. अशावेळी उच्च शिक्षित महिलांनी आपल्या मनातील सरंजामी कल्पना दूर सारून समाजातील महिलांचे नेतृत्व करण्यास पुढे यायला हवे. राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण परिषदेत सहभागी झालेल्या महिला अध्यापकांनी महिला सक्षमीकारणांच्यादृष्टीने आठ कलमी कृती कार्यक्रम  राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, परिषदेत सहभागी प्रतिनिधींची  समन्वयक अथवा महिला सक्षमीकरण दूत म्हणून नियुक्त करण्यात यावी. उच्च शिक्षण संचालनायाच्या अधिनस्त सर्व महाविद्यालयांमध्ये महिला सक्षमीकरण कक्षाची स्थापना करण्यात यावी. महाविद्यालयीन स्तरावर महिलासाठी रोजगारक्षम किमान कौशल्य कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. महिलांचे आरोग्य या विषयावर महाविद्यालयामध्ये कार्यशाळा, मार्गदर्शनपर व्याख्याने, गटचर्चा आदीचे आयोजन करण्यात यावे.

महाविद्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी, डोंगराळ भागातील महिलांसाठी डीजीटल साक्षरता, जनजागृती कार्यक्रम राबविण्यावर भर द्यावा.  महिलांचा उच्च शिक्षणातील प्रवेशदर वाढविण्यासाठी सर्व महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्याबाबत परिषदेत चर्चा करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, परिषदेत संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांविषयी चर्चा करण्यात येणार आहे.  शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात सर्व समावेशक शिक्षण व महिला शिक्षणाचा प्रसार या उद्दिष्टाचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या २०३० पर्यंत त्या उद्दिष्टांपर्यत पोहचायचे आहे.  महिलांसाठी लैंगिक आरोग्य, नैसर्गिक साधन संपत्ती राखणे, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, मानसिक सक्षमता आणि आर्थिक बचत गट यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे प्रत्येक अभ्यासक्रमध्ये कौशल्य विकासाचे शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. परिषदेत सहभागी प्राध्यापक प्रतिनिधी येथील विषय राज्यभरात पोहोचवतील असा, विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात डॉ.देवळाणकर यांनी परिषदेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. गेल्या वर्षभरात नवे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि नॅक प्रमाणन यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेला राज्यातील उच्च शिक्षण सहसंचालक, राज्यातल्या विविध महाविद्यालयातील  महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.

0000

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने २३,२५ व २६ ऑक्टोबर कालावधीत तीन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र राजपूत, पदनिर्देशित अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023  या कालावधीत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी http://gterollregistration.mahait.org  या संकेत स्थळास भेट देऊ शकता. या शिबिरात कोकण आणि मुंबई मतदार संघातील पदवीधर मतदार नोंदणी करू शकणार असल्याची माहितीही मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

पदवीधर मतदार संघासाठी मतदार भारताचा नागरिक असावा, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2023 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असणे आवश्यक आहे.  यासाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी),  विद्यापीठ किंवा संबंधित संस्था  यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी , विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच  https://rb.gy/thjo6 या लिंकवर अर्ज डाऊनलोड करता येईल.

मुंबई जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभाग भायखळा, जे.जे. हॉस्पिटल,  जी.टी.हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, श्रीमती नाथाबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मरीन लाईन, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंस, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, आर.बी.आय. फोर्ट, सह आयुक्त मुंबई महानगर पालिका या विविध 12 शासकीय कार्यालयांमध्ये या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००

नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर,दि. २२ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रम तुळशीबाग येथील हर्ष लॉनमध्ये पार पडला.  या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना जसे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनाबाबत माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली गेली. सोबत साडेतीन शक्तीपीठांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्राची भूमी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. या शक्तिमातांची  थोरवी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील सहा महसूली  विभागाच्या मुख्यालयी  व  साडेतीन शक्तीपीठाच्या ठिकाणी, या कार्यक्रमाचे आयोजन १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान  करण्यात  येत आहे. भक्ती, लोकसंस्कृती  व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात, महाराष्ट्र शासनाच्या महिला विषयक योजनांविषयी आगळ्यावेगळ्या माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये आघाडीच्या नृत्यांगना, गायिका, अभिनेते, उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव   विकास खारगे,  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  विभीषण चवरे  यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या  प्रिती मानमोडे व मनिषा काशिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, समन्वय श्री. देसाई उपस्थित होते.

०००

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२२:  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे सांगितले.

ठाणे येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्देवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली असून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. ही दिलासादायक बाब असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आधार देणारी आहे. राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी  निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सागितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या आई भवानी मातेचे मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी राज्यावरील, बळीराजावरील संकट दूर करून राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...