सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1062

युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि पारदर्शकपणे होत आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1)

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी व्यावसायिक अथवा उद्योगासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर या योजनेंतर्गत 4.5 लाख रुपयेपर्यंत व्याज परतावा करण्यात येतो. व्याज परताव्याचा कालावधी 7 वर्षांपर्यंत व व्याजाचा दर दसादशे 12 टक्केपर्यंत आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2)

गट कर्ज व्याज परतावा योजनेत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतले असल्यास 50 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 12 टक्के दराने व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा दिला जातो. दोन व्यक्तींसाठी 25 लाख, तीन व्यक्तींसाठी 35 लाख, चार व्यक्तींसाठी 45 लाख आणि पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास 50 लाखपर्यंतच्या व्यवसाय, उद्योग कर्जासाठी या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी गटाने त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जासाठीही व्याज परतावा दिला जातो.

व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य असून या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी, तसेच ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गासाठी आहे. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. त्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र किंवा पती-पत्नी यांचे आयकर परतावा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक,  कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन राहणार नाही. तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट,  एल.एल.पी., कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट, संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय/ उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येतो. यासाठी 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी केली जाते.

व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रथम ‘एलओआय’ प्राप्त करणे आवश्यक

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ‘एलओआय’ म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी दाखला, वीज देयक, शिधापत्रिका, गॅस देयक, बँक पासबुक यापैकी एक रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर परतावा प्रमाणपत्र (विवाहित असल्यास पती-पत्नी यांचा व अविवाहित असल्यास स्वतःचे आयकर परतावा प्रमाणपत्र), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि एक पानी प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या अहवालाचा नमुना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यासमवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा, उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेबप्रणालीवर सादर करावी. यामध्ये ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्य कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक ईएमआय वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा आदी बाबींचा समावेश असावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. सर्व जिल्हा समन्वयकांचे संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्यासाठी महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीशी याबाबत संपर्क साधू नये. तसेच कोणत्याही खाजगी व्यक्ती, संस्थेच्या अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

तानाजी घोलप,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

उजनी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन व पिण्याचे पाण्याचे माहे फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे नियोजन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दि. 3 (जिमाका):-सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीच्या दूरदृश्यप्रणाली व्दारे आयोजित बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी संचालक श्री. कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे श्री. मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. बागडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम 2023-24 व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले असून त्याची  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहोचेल असेही त्यांनी सांगितले.

तसेच हे पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन माहे फेब्रुवारी 2024 अखेर पर्यंत चे असून त्यानंतरचे पाणी नियोजन कशा पद्धतीने करावयाचे याबाबत जानेवारी अखेरपर्यंत कालवा समितीची पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

*खरीप हंगाम 2023-24 मधील पाणी वापर –

खरीप हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर 6.64 खालील बाजूचा पाणी वापर 5.45 टीएमसी असा एकूण 12.09  टीएमसी पाणी वापर झालेला आहे.

*रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर –

रब्बी हंगाम 2023-24 मधील दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पर्यंतचा प्रत्यक्ष पाणी वापर हा जलाशयाच्या वरील बाजूचा 2.60 टीएमसी तर जलाशयाच्या खालील बाजूचा 0.56 टीएमसी असा एकूण 3.16 टीएमसी झालेला आहे.

उर्वरित रब्बी हंगाम 2023-24 चे पाणी नियोजन

दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी उजनी प्रकल्पातील पाण्याची पातळी 494.580 मीटर इतकी आहे तर एकूण पाणीसाठा 92.99 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 29.33 टीएमसी तर उपयुक्त पाणी साठेची टक्केवारी 54.75 टक्के आहे, अशी माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष अभियंता धीरज साळी यांनी दिली.

उजनी प्रकल्पातून दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर व जलाशयाच्या खालील बाजूचा पाणी वापर करण्याचे नियोजन केलेले आहे.

वरील बाजूचा पाणी वापर 11.92 टीएमसी तर खालील बाजूचा पाणी वापर 32.35 टीएमसी असा एकूण 44.27 टीएमसी इतका पाणी वापर उपरोक्त कालावधीत केला जाणार असल्याची माहिती श्री. साळी यांनी दिली.

अ) जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर –

बाष्पीभवन 2.66 टीएमसी, जलाशय उपसा सिंचन 1.72,  जलाशय बिगर सिंचन पिण्यासाठी 0.83, जलाशय बिगर सिंचन औद्योगिक 0.58, जलाशयातील गाळ 2.26,  सीना माढा उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 2.84 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 1.03 टीएमसी असा एकूण 11.92 टीएमसी पाणी वापराचे नियोजन दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधी केले आहे.

ब) जलाशय खालील बाजूचा पाणी वापर नियोजन

1.कालवा प्रवाही सिंचन आवर्तन 1( मान नदीवरील सात कोल्हापूर बंधारे व सीना नदीवरील नऊ कोल्हापूर बंधाऱ्याच्या फीडिंगसह) कालावधी 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर, 8 टीएमसी पाणी सोडण्यात येणार. 2.कालवा प्रवाही सिंचन आवर्तन 2- एक जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 7 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.

  1. भीमा सीना जोड कालवा आवर्तन एक व दोन 4 नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6.35 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.
  2. भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी) 1 डिसेंबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत 5 टीएमसी तर भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी  हिळ्ळी कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यापर्यंत 1 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, असा एकूण 32.35 टीएमसी पाणी वापर खालील बाजूचा होणार असून जलाशयाच्या वरील व खालील बाजूचा एकूण रब्बी हंगाम पाणी वापर 44.27 टीएमसी असा राहील, अशी माहिती अधीक्षक अभियंता साळी यांनी दिली.

उर्वरित रब्बी हंगामाचे नियोजन झाल्यानंतर 29 फेब्रुवारी 2024 अखेर प्रकल्पाची पाणी पातळी ४८८.६३५ मीटर असेल तर एकूण पाणीसाठा 48.72 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा वजा 14.95 टीएमसी तर उपयुक्त पाण्यासाठी ची टक्केवारी वजा 27.90% इतकी राहील.

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर

मुंबई, दि. 3 : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली असून लवकरच गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले आहे.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईतील 58 गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक क्षेत्र प्रत्येकी एक तृतीयांश प्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि मालक यांना देण्याची तरतूद आहे. म्हाडाचा वाटा निश्चित झालेल्या 37 गिरण्यांपैकी 33 गिरण्यांचा 13.78 हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास प्राप्त असून; त्यापैकी 26 गिरण्यांच्या जमिनीवर तीन टप्प्यांमध्ये 13,636 गिरणी कामगार सदनिका व 6,409 संक्रमण सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.

पाच गिरण्यांच्या एकूण सहा ठिकाणी क्षेत्रफळ आकाराने लहान असल्यामुळे जागा अदलाबदल करून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या सात गिरण्यांच्या भूखंडावर सुमारे 594 गिरणी कामगार सदनिका तर सुमारे 295 संक्रमण सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. जमिनीचा वाटा निश्चित झालेल्यांपैकी चार गिरण्यांच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा प्राप्त झाल्यानंतर सुमारे 984 गिरणी कामगार सदनिका तर सुमारे 492 संक्रमण सदनिका बांधता येऊ शकतात.

टप्पा एक मध्ये एनटीसीच्या आठ गिरण्यांच्या म्हाडासाठी निश्चित झालेल्या वाट्यापैकी 31,501 चौ.मी. क्षेत्र प्राप्त झालेले आहे. उर्वरित क्षेत्रही मिळणे अपेक्षित असून या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी 704 सदनिका तर 352 संक्रमण गाळे अशा एकूण 1056 सदनिका बांधता येऊ शकतील. तसेच सेंच्युरी मिल मधील 13,091 चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला असून उर्वरित चार हजार 888 चौरस मीटर जमिनीचा ताबा प्राप्त झाल्यानंतर सदर ठिकाणी मिल कामगारांसाठी 474 सदनिका व 236 संक्रमण गाळे अशा सुमारे 710 सदनिका बांधता येऊ शकतील. एकूण 58 गिरण्यांपैकी पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त नसल्यामुळे अकरा गिरण्यांच्या जमिनीचा वाटा निश्चित झालेला नाही. तसेच नवीन डीसीआर अंतर्गत दहा गिरण्यांचा म्हाडाचा वाटा निरंक आहे.

डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांना सदनिका वितरण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जमिनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आठ जागांची पाहणी करण्यात आल्यानंतर सहा जागांवरील भूखंड गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यास योग्य आहे, असे अभिप्राय शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. या आठ जागांपैकी दोन ठिकाणच्या जमिनींचे अधिकार महाराष्ट्र शासनाकडे असल्याने त्या जमिनी प्राप्त होण्याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे.

महसूल विभागाकडील जमिनी प्राप्त झाल्यानंतर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याकरिता कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम आखून बांधकाम करण्यात येईल, असेही मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. बोरीकर यांनी सांगितले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

अतुल बेडेकर यांच्या अकाली निधनाने मराठी खाद्यपदार्थ उद्योग सातासमुद्रापार पोहोचवणारा धडाडीचा उद्योजक हरपला –  मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,  दि.3  :- व्हि. पी. बेडेकर अँड सन्स या आघाडीच्या लोणची मसाले उद्योगाचे संचालक अतुल बेडेकर यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. मराठी पारंपरिक खाद्यपदार्थ सातासमुद्रापार पोहोचवणारा पुढच्या पिढीतील एक धडाडीचा उद्योजक आपण अकाली गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पारंपरिक लोणची, मसाले व चटण्या बनविण्याच्या उद्योगात त्यांनी स्वतःची छाप उमटवली होती. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला बेडेकर मसाले हा ब्रँड खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यात अतुलजीं बेडेकर यांचा मोलाचा वाटा होता. “बेडेकर” हा ब्रँड त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलाच, त्याचबरोबर फ्रोजन फूडच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करत उकडीचे मोदक, मसालेभात,  बटाटेवडा यासारखे पारंपरिक अस्सल मराठी पदार्थ फ्रोजन स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळेच हे पारंपरिक मराठी पदार्थ पंचतारांकित हॉटेल्स, एअर इंडियाची विमाने यातही उपलब्ध होऊ शकत आहेत, ही त्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे.

००००

पालकमंत्र्यांच्याहस्ते विकासकामांचे लोकार्पण; ग्रामस्थांकडून पालकमंत्री संजय राठोड यांचा सत्कार

यवतमाळ, दि. ३ (जिमाका) : नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील एकूण ६ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी गावातील विविध विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास बाळासाहेब सोनोने, नामदेव खोब्रागडे, मनोज नाल्हे, वैशाली मासाळ, भाऊराव ढवळे, सरपंच, उपसरपंच, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी गावातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या समस्या, अडचणी तत्काळ सोडविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गावात विविध विकासाची कामे केली जात आहेत. सामाजिक बांधिलकीतून विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य, गोरगरिब आणि सर्व जातीधर्माच्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी विकासकामे केली आहे. यापुढेही जलसंधारण, घरकुल, पाणी पुरवठा, रस्ते, वीज आदी लोकोपयोगी कामे मार्गी लावली जातील, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांना संबोधित करतांना सांगितले.

कारखेडा येथे २ कोटी ४० लाख रुपये, सातेफळ येथे २ कोटी ४७ लाख रुपये आणि घारेफळ येथे १ कोटी १९ लाख रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सातेफळ येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

पालकमंत्री संजय राठोड यांनी निधी उपलब्ध करुन दिलेल्या सातेफळ येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी सभागृहातील भगवान गौतम बुद्ध, डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

०००

पालकमंत्री बाईकने पोहोचले गावात

राज्याचा मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटले तर त्यांचा फौजफाटा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या ताफ्यात सुरक्षेच्यादृष्टीने पोलीसही आणि लोकांच्या प्रशासकीय स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी असतात. मात्र, हा संपूर्ण फोजफाटा बाजूला सारुन मंत्री संजय राठोड बाईकने गावात पोहोचले. ते दिग्रस तालुक्यातील राहटी, पेळू आणि इसापूर गावातील विकासकामाच्या भूमिपूजन व लोकार्पणासाठी दौऱ्यावर होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पेळू गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.

000

मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर

मुंबई, दि. ३ : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिन्याभरात ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची बैठक घेतली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या समवेत काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेतील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आज विभागात कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य शासन गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली  कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी

निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली असून ज्या पद्धतीने मराठवाड्यात नोंदी तपासण्यात आल्या तशीच कार्यपद्धती राज्यभर राबवावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारी, तहसीलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे दोन पातळीवर काम

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटा जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी, असेही त्यांनी सांगितले. इम्पॅरीकल डेटा गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिस्टीक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या संस्थांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

महिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणारे कर्ज तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश देतानाच कर्ज वितरणामध्ये वाढ झाली पाहिजे, महिला उद्योजकांना कर्ज वाटपासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात बँकांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम त्याचा लाभ मराठा समाजातील नागरिकांना द्यावा.

भाडेतत्त्वावर जागा घेऊन तातडीने वसतिगृहे सुरू करा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जेथे वसतिगृह उपलब्ध होत नाहीत अशा महानगर असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व क वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष ५१ हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.

राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा

विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची तातडीने कार्यशाळा घेऊन शिंदे समितीच्या कामकाजाच्या संदर्भात व कोणती अभिलेखे तपासायची याबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील कुणबी नोंदीचे अभिलेखांचे डिजिटायजेशन आणि प्रमाणिकरण करावे. मोडी, उर्दू लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

००००

महिला बचतगटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम उभारणार – पालकमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार

यवतमाळ, दि.३ (जिमाका) : घराचे अर्थचक्र सांभाळणाऱ्या महिलांना उद्योग सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम आणि कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी दिली.

नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, बचत गटातील महिलांच्या मानधनात वाढ केली आहे. कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग संघातील महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. या महिला बचत गटांना गोदाम आणि कार्यालय बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे. याशिवाय उमेदचे ग्रामसंघ, माविमच्या बचत गटांना देखील उद्योग उभारण्यासाठी निधी देण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले.

या योजनेंतर्गत सातेफळ येथे महिला बचत गटासाठी धान्य प्रक्रिया उद्योग गोदाम बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.

०००

अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 3 ऑक्टोबर : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, बेडेकर हे नाव माहित नाही असा मराठी माणूस दुर्मिळ. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती. बेडेकर ब्रँड उभा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांसोबतच सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहोचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये  बेडेकर नाव पोहोचले आहे. त्याचे श्रेय अतुलजींना जाते. त्यांच्या निधनाने एक ध्येयनिष्ठ उद्योजक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

00000

अतुल बेडेकर यांच्या निधनाने प्रयोगशील उद्योजक हरपला

मुंबई, दि. ३ : “व्ही.पी. बेडेकर आणि सन्स उद्योग समूहाचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणारे प्रयोगशील उद्योजक आपण गमावले आहेत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, “लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच त्यात काळानुरुप बदल करून अतुल बेडेकर यांनी बेडेकर ब्रँडला वेगळे स्थान निर्माण करून दिले. शंभर वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या व्यवसायास आपल्या प्रयोगशीलतेने जागतिक ओळख निर्माण करून दिली. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणाऱ्या उद्योग समूहांपैकी असणाऱ्या बेडेकर उद्योग समूहाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.  त्यांच्या निधनानं मराठी उद्योगजगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बेडेकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

०००००

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ : – घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्ही. पी. बेडेकर ॲण्ड सन्स या मसाले कंपनीचे संचालक ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ उद्योजक अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

00000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...