रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 1046

सार्वजनिक विकासाच्या कामांना प्राधान्य – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यातील सार्वजनिक विकासाची कामे प्रामाणिकपणे केली आहेत, यापुढेही अशाच कामांना प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिग्रस तालुक्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात केले.

यावेळी पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते वाई, मेंढी आणि लोणी येथील रस्ते, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत रोहित्र, पांदण रस्ते अशा विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, लोकांची कामे करताना कोणताही भेदभाव करत नाही. संविधानानुसार लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेले काम करीत आहे. शासनामार्फत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, बेरोजगार युवक, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, त्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सातत्याने काम करत आहे.

निराधारांच्या मानधनात वाढ, विविध समाज घटकातील गरजूंसाठी घरकुल योजना, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग प्रकल्प, महिलांना उद्योगासाठी सुविधा, स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाटप, मॉडेल शाळांची निर्मिती, गोरगरिबांना आनंदाचा शिधासह साड्या, शेतकऱ्यांसाठी विविध योजना यासह वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबविल्या जात आहेत. गावात या योजनांच्या लाभासाठी गरजूंनी प्रस्ताव किंवा अर्ज करावे, त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेकवेळा आवश्यकता असल्यास शासनस्तरावरील निर्णयात बदलही केले आहेत. यापुढेही लोकहिताची विकासकामे प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले.

यावेळी मेंढी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम, गावांतर्गत नळ जोडणी, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, लोणी येथील रस्त्याची सुधारणा, पाणी पुरवठा योजना, सिमेंट व पांदण रस्ते, अंगणवाडी बांधकाम, सामाजिक सभागृह बांधणे आणि वाई येथील रस्त्याची सुधारणा, सिमेंट रस्ता, सामाजिक सभागृह सौंदर्यीकरण करणे, श्री बलखंडी महाराज संस्थानाला संरक्षण भिंत व शौचालय बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून त्याबाबत चर्चा केली. ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अडीच कोटींच्या वाई ते कलगांव फाटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

दिग्रस तालुक्यातील वाई ते कलगांव फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

उर्वरित निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी समन्वयाने सर्व संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. 24 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 मध्ये अद्यापपर्यंत 104.32 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याची नोंद घेण्यात आली. तसेच उर्वरित निधी विहित वेळेत खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, खासदार रामदास तडस, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार राजकुमार पटेल यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले की, जिल्ह्यात दिव्यांगांसाठी लवकरच दिव्यांग भवन निर्माण करण्यात येईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी धर्मशाळेची निर्मिती करण्यात येईल. या अनुषंगाने जागेची पाहणी करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक उपयोजना) विविध विकास कामांसाठी सन 2023-24 मधील 600.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनांचे नियोजन करताना शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचे व्हिजन, पायाभूत सुविधांमध्ये भर देण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विहित कालावधीमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने कामे करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022-23 मधील माहे मार्च 2023 अखेर झालेला खर्च 350.00 कोटी रूपयास मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपाययोजनेंतर्गत सन 2022-23 मधील माहे मार्च, 2023 अखेर झालेला खर्च 101.18 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. आदिवासी घटक कार्यक्रम सन 2022-23 मधील माहे मार्च, 2023 अखेर झालेल्या 96.54 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

सन 2022-23 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना उपक्षेत्रनिहाय विविध विकासात्मक बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अर्थसंकल्पीत नियतव्यय 350.00 कोटी असून एकुण खर्च 350.00 कोटी रुपये झाला आहे. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 101.20 कोटी अर्थसंकल्प नियतव्यय असून एकूण खर्च 101.18 कोटी रुपये झाला आहे. तसेच आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पित नियतव्यय 96.55 कोटी रुपये असून एकुण खर्च 96.54 कोटी रुपये झाला आहे. अशा प्रकारे सन 2022-23 मधील अर्थसंकल्पित नियतव्यय 547.75 कोटी रुपये असून एकूण 547.72 कोटी रुपये विकास कामांवर खर्च करण्यात आले आहे.

सन 2022-23 मध्ये जिल्हा वार्षिक योजनांव्दारे विविध लोकोपयोगी विकास कामे करण्यात आली. जिल्ह्यातील विकास कामे करताना शाश्वत विकासाची ध्येय नजरेसमोर ठेवून सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 15.43 कोटी रूपयांचा निधी हा ग्रामपंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी सुधारणा, घाट सुधारणा, गटार बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम इत्यादी कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आला. ग्रामीण रस्त्यांसाठी 19.13 कोटी रूपयांचे ग्रामीण रस्ते मंजूर करण्यात आले असून यातील 96 कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत 66 कि. मी. लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. इतर जिल्हा मार्गासाठी 20.42 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात 65 कामे पूर्ण झाली आहेत.  यातून एकुण 66 किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहे.

नागरी क्षेत्राच्या विकासांतर्गत जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती व एक महानगरपालिका यांच्या विकासासाठी 53.71 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 51.11 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उर्जा विभागाच्या विकासांतर्गत ग्रामीण व नागरी भागातील ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळास 17 कोटीची रुपयांची भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण विकासासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधासाठी  25.82 कोटी रूपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्ह्यातील क्रीडा कला गुणांच्या संवर्धनासाठी तसेच युवकांच्या क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना चालना मिळण्यासाठी 4.10 कोटी रुपये इतका निधी व्यायाम शाळा साहित्य, ओपन जिम, क्रीडा साहित्य तसेच क्रिडांगणाचा विकासासाठी तसेच साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी 65 कामाकरीता 4.41 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शेती क्षेत्रातील सिंचन क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होण्यासाठी लघु व पाटबंधारे व कोल्हापूर पध्दतीचे बंधारे या योजनाकरीता 6.41 कोटी रुपये इतका निधीची मदत करण्यात आली आहे.

पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी पोलीस अधीक्षक ग्रामीण पोलीस, अमरावती व अमरावती शहर आयुक्तालय यांना वाहन खरेदी तसेच इमारत बांधकाम,फर्निचर तसेच अनुषंगीक कामासाठी 5.79 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सन 2023-24 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना उपक्षेत्रनिहाय अर्थसंकल्पित नियतव्ययामध्ये (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक उपयोजना) 600.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सन 2022-23 च्या तुलनेत या वर्षी रूपये 52.84 कोटी इतकी वाढ जिल्हा वार्षिक योजनांच्या नियतव्ययामध्ये झलेली आहे.

सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) 395.00 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पित नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 102.00 कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमांतर्गत  103.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. असे  एकुण 600.59 कोटी रुपये सन 2023-24 मधील अर्थसंकल्पित नियतव्ययात मंजूर करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्यामध्ये महिला बचत गटांना मेळघाट हाटच्या धर्तीवर वस्तू विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी उपलब्ध जागेनुसार नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अर्थ संकल्पिय तरतूदीसोबतच सीएसआर फंडामार्फत अर्थ सहाय्य करण्यात येईल. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन वाढीव निधीची मागणी करण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी देण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष दक्षता बाळगावी. महावितरणच्या मंजूर निधीमध्ये 20 कोटी रुपयांची वाढ देण्यास नियोजन करण्याचे यावेळी ठरले. शेतीला वन्य पशू प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

 केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

नागपूर,  दि.24 :  महानगरपालिकेच्या विकसित संकल्प यात्रेचा प्रारंभ आज दाभा येथील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिकेच्या उपायुक्त आंचल गोयल, माजी आमदार आशिष देशमुख, अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून ही मोहीम आखण्यात आली असून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि नगर परिषद प्रशासनातर्फे या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

जिल्हास्तरावर नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर प्रशासन शाखेतर्फे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध योजनांची माहिती असलेले प्रत्येकी दोन असे सहा चित्ररथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून योजनांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यात येणार आहे.

या चित्ररथाद्वारे केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येईल. तसेच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे, अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

यात्रेची उद्दिष्टे : आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक दुग्धव्यवसाय करावा  – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर,  दि. 24 : विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना येत्या काळात राबविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनीही अधिकाधिक दुग्धोत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीसोबतच शेतीपूरक दूग्धव्यवसाय करावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

मदर डेअरीच्या बुटीबोरी येथील दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय मंत्री श्री. गडकरी आणि मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील बोलत होते.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेट बोर्ड अध्यक्ष मिनेश शाह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन संबंधित विभागाचे केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, विदर्भ व मराठवाड्यातील विविध भागातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात सुमारे 53 लाख लिटर दूध उत्पादन होते. राज्याच्या तुलनेत ही सरासरी लक्षणीय आहे. 200 ते 225 मिली  सरासरी पाऊस हा नगर जिल्ह्यात दरवर्षी पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांनी शेतीबरोबरच दूग्धव्यवसायाकडे पूरक व्यवसाय म्हणून लक्ष देत आपली प्रगती साधली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांनीही दुग्धव्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे श्री. विखे पाटील म्हणाले.

महानंदाच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्मचा-यांची स्वेच्छानिवृत्ती आणि इतर आर्थिक बाबीसंदर्भात शासन स्तरावरून कार्यवाही सुरू असल्याचे श्री. विखे पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील शेतक-यांसाठी हा प्रकल्प मागासलेपणा दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. येत्या काळात या प्रकल्पातून 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात यावी, असे श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

ॲग्रोवन प्रदर्शनाला भेट

पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाभा येथील ॲग्रोवन कृषी प्रदर्शनीला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महिको, पशुसंवर्धन विभाग, वारणा, ट्रेडकेअर आदी स्टॅाल्सला भेट देत माहिती जाणून घेतली.

केंद्र शासनाच्या योजना लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.24(जिमाका):- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लक्षित लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी आज येथे व्यक्त केला.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित, वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत  यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 7 एलईडी व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, त्याद्वारे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 871 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण,शहरी,नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे.  सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन  वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती

विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक यशकथा ,अनुभव कथन, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे  आहेत. गावागावातून शासकीय योजना लाभासाठी  नागरिकांची नोंदणी या अत्याधुनिक चित्ररथच्या माध्यमातून  मिळणार आहे,याचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री कराड यांनी केले.

फिरत्या एलईडी वाहनांद्वारे प्रसिद्धीचे नियोजन

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करत जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना भागवत कराड यांनी यावेळी दिल्या.

या मोहिमेत ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास मीना आणि शहरी भागासाठी मनपा आयुक्त, जी. श्रीकांत हे नोडल अधिकारी आहेत. तसेच या मोहिमेच्या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी जिल्हाधिकारी, जनार्दन विधाते, अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश रामावत यांच्यासह तालुका स्तरावर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यात्रेचे नियोजन करतील. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम शहरी, आणि गावपातळीवर राबविण्यात येणार असून यासाठी रुटमॅप तयार करण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी सक्रियपणे सहभागी होऊन आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात. केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ते गावपातळीवर चित्ररथाद्वारे जिंगल्स, पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनी-चित्रफिती, पथनाट्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार –प्रसिद्धी करण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरावर मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती भागवत कराड यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे.

बृहन्मुंबई हद्दीत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संघटना यांच्या बैठका यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

पुणे दि.२४: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (आस्थापना/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सचिव के.टी. पाटील, एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, पंचायत राज संचालक आनंद भंडारी, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विविध जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही. ते सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. गावातील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

पंचायत राज विभाग ग्रामीण भागाचा आत्मा असल्याचे नमूद करून श्री. महाजन म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तंत्रज्ञानामुळे कामकाजात सुलभता येत असताना शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुलभता झाली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत समाज आणि देशासाठी आपण काय योगदान देऊ शकू या भावनेने ग्रामीण माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. कार्यशाळेच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होईल आणि त्याचा फायदा ग्रामीण भागासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अभिनव कल्पना राज्यस्तरावर राबविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘उमेद’सारखी महत्वाची योजना राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. गरीब माणसाला हक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजना आहे. अशा विविध योजनांचा माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे, त्याला त्याच्या हक्कच्या मूलभूत सुविधा आणि त्याचे जीवनमान उंचाण्याचे कार्य ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मंत्री श्री.महाजन यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कामकाज सुलभीकरण, संगणकीकरण आणि विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याची भावना विकसित करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी  केले.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), ग्रामीण गृहनिर्माण, पंचायतराज, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, त्रिस्तरीय विकास आराखडे, विविध योजनांचे अभिसरण-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना व इतर योजनांची अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, शाळा विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकास ध्येये, पंचायत विकास निर्देशांक, पर्यावरणपुरक ग्रामीण विकास, प्रशासनातील नैतिकता व नितीमत्ता आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांचे सादरीकरणही यादरम्यान करण्यात येईल. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय बाबींसंदर्भातही कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

मुंबई, दि. 24 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 18 डिसेंबर 2023 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी अपवाद राहील, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

नीलेश तायडे/विसंअ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २८ व २९ नोव्हेंबर तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ३० नोव्हेंबरला मुलाखत

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

चौथ्या महिला धोरणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच बेघर बालकांच्या संरक्षणासाठी कोणती धोरणात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत, याबाबतची माहिती मंत्री कु. तटकरे यांनी ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून मंत्री कु. तटकरे यांची मुलाखत मंगळवार दि. 28 आणि बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

जयश्री कोल्हे/स.सं

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

26 जानेवारीपर्यंत चालणार मोहीम

जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रमोद काळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 6 व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, ती जिथे जिथे जाईल, तिथे तिथे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे. तरी सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे ते म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती

विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे  आहेत.

यात्रेंतर्गत पहिल्या टप्प्यात 6 तालुक्यांमध्ये व्हॅन फिरणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 4 तालुक्यामध्ये व्हॅन फिरणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत आज दि. 24 व उद्या 25 नोव्हेंबर रोजी सदर व्हॅनचे तालुकानिहाय मार्गक्रमण पुढीलप्रमाणे – शिराळा – दि. 24 नोव्हेंबर – रेड, बेलदारवाडी, दि. 25 नोव्हेंबर – खेड, भटवाडी

मिरज – दि. 24 नोव्हेंबर – सावळी, कानडवाडी, दि. 25 नोव्हेंबर – मानमोडी, रसूलवाडी

कडेगाव – दि. 24 नोव्हेंबर – कोतवडे, नेर्ली, दि. 25 नोव्हेंबर – अपशिंगे, खंबाळे औंध

जत – दि. 24 नोव्हेंबर –अंकले, डोर्ली, दि. 25 नोव्हेंबर – बाज, बेळुंखी

विटा – दि. 24 नोव्हेंबर –गार्डी, घानवड, दि. 25 नोव्हेंबर – हिंगणगादे, नागेवाडी

कवठेमहांकाळ – दि. 24 नोव्हेंबर –अलकूड एम, बोरगाव दि. 25 नोव्हेंबर – जायगव्हाण, मळणगाव

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...