गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1042

शासन आपल्या दारी : ‘योजना कल्याणकारी’

जनकल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित असते. मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करणे, त्यातील त्रुटी दूर करणे, योजनेचा लाभ मिळवणे अशी विविध कार्ये पार पाडावी लागतात. काही वेळा नागरिकांना योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचत नाही. पर्यायाने योजनांचा उद्देश सफल होत नाही.

 हे टाळण्यासाठी आणि नागरिकांना मोठया प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी दारी’ हा लोकाभिमूख उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभांची ही थोडक्यात माहिती.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्हयामध्ये किमान पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली थेट लाभ देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. जनतेला २०० हून अधिक योजनांचा लाभ देतानाच कमीतकमी कागदपत्रे आणि लाभास जलद मंजुरी दिली जाते. शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदाच ‘हर घर दस्तक’ च्या माध्यमातून दिली जात आहे. प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत या उपक्रमाचे राज्यस्तरीय समन्वयन केले जाते. मंत्रालयस्तरावर सर्व प्रशासकीय विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रमापूर्वी तालुकास्तरावरही विविध मेळावे घेऊन नागरिकांना योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.

विविध शासकीय विभागांच्या योजना, रोजगार मेळावा, महाआरोग्य शिबीर, रक्तदान व अवयवदान शिबीर, चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यांगतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रवेश, कृषी प्रदर्शन, महिलांना ‘सखी किट’ वाटप, स्वयं रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल, विविध सरकारी विभाग व महामंडळांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, सामाजिक उत्तरदायित्व योजनेंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, नवमतदार नोंदणी करणे व इतर लोकाभिमुख योजनांचा लाभ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना देण्यात येतो. जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या धर्तीवर स्थानिक प्रशासनाच्यावतीने अशाप्रकारचा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील दौलत नगर (मरळी) येथे स्वत: मुख्यमंत्री यांच्या हस्ते 13 मे रोजी झाला.

शासन जनतेच्या दारापर्यत

शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होत असून, हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा, अशी प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करत आहेत. शासकीय यंत्रणा या उपक्रमामुळे सक्रिय झाल्याने ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ ही परिस्थिती बदलत असल्याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन नागरिकांच्या घरापर्यत पोहोचले असून योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सहज उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे हसू फुलले आहे. याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा जागर होत आहे. अभियानातील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रशासन गाव-खेडयांत जाऊन जनतेच्या घरापर्यत पोहोचले आहे. त्यामुळे आगामी काळात सुमारे 7 ते 8 कोटी जनतेला याचा निश्चित फायदा होणार आहे असा विश्वास आहे.

पुणे-सातारा

पुणे विभागात सातारा जिल्हयात सुमारे 2 लाख 85 हजार लाभार्थ्यांना सुमारे 669 कोटी रुपयांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हयात जेजुरी येथे आयोजित या उपक्रमात जवळपास 23 लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. लाभार्थ्यांना सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यात नाशिक, पुणे, पालघर, अहमदनगर जिल्हयातील शिर्डी, परभणी, बुलडाणा येथे आतापर्यत जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे आतापर्यत सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. राज्य शासन, शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहभागातून शासकीय योजना यशस्वी होते. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे ते महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले आहे.

जयंत कर्पे,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, पुणे 

कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, राज्यकर उपआयुक्त(जनसंपर्क) यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या अन्वेषण भेटीत मे. निमा वर्ल्ड प्रा. लि. या व्यापाऱ्याने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली असल्याचे आढळून आले. तसेच या व्यापाऱ्याशी संबंधित मुकुंद अर्जुन झा यांनी अन्य काही बनावट कंपन्या स्थापन करुन बोगस करदात्यांकडून 19 कोटी रुपयांची बनावट बजावट (इनपूट टॅक्स क्रेडीट) घेतल्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने मुकुंद अर्जुन झा याला 31 ऑगस्ट, 2023 रोजी विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली. मा. महादंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी  मुकुंद अर्जुन झा यांस दि.13 सप्टेंबर 2023 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुढील तपासात संदीप चंद्रभूषण शुक्ला, संचालक याचा सहभाग निदर्शनास आला असून त्याने बनावट कंपन्या स्थापन करुन रु. 9.18 कोटी रुपयांची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली. तसेच रु 9.19 कोटी रुपयांच्या कराची बनावट विक्री देयके दिली.  या प्रकरणात बोगस करदात्यांकडून बनावट वजावट (इनपूट टॅक्स क्रेडीट) घेतल्यामुळे व बनावट विक्री बिले दिल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाले असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने संदीप शुक्ला, यास दि.8 सप्टेंबर 2023 रोजी विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली. मा. महादंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी शुक्ला यांस दिनांक 13 सप्टेंबर 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खोट्या कंपन्या स्थापन करुन, खोटी बिले देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करुन करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या मोहिमेअंतर्गत सन 2023-24 मध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

गणेशोत्सव काळात पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

मुंबई, दि. 11 : गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 20 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. 5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवाससाठी 23 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 25 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासकरीता 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 29 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी राहील.

तसेच 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून ते 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या वेळेत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतूक करतील.

निर्बंध बंदी दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्व‍िड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलिसांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्यास्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात – निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरीता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

‘जैविक इंडिया ॲवार्ड’ ने कृषी विभाग सन्मानित

पुणे, दि.११ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागास राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा “जैविक इंडिया ॲवार्ड २०२३” नवी दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी विभागाच्यावतीने आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” या राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सेंद्रिय शेती आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष कार्याबद्दल देण्यात आला, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

“डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” कार्यक्षेत्र विस्तारून संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आले असून योजनेचा कालावधी  २०२७-२८ पर्यंत वाढविण्यात आला आहे. योजनेअंतर्गत तीन वर्षात राज्यात  १३ लाख हेक्टर नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणावयाचे आहे. समूह  संकल्पनेद्वारे १८ हजार ८२० उत्पादक गट व १ हजार ८२५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त, नैराश्यग्रस्त अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या ६ जिल्ह्यात २०१८-१९ पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत ९ हजार २६८ शेतकऱ्यांचे १५ हजार ६८२ हे. क्षेत्र  सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. योजनेअंतर्गत २० हे. क्षेत्राचे ४३५ गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या ४० शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण रु. २ कोटी ८२ लाख भागभांडवल जमा झाले आहे. योजनेअंतर्गत १२ किरकोळ विक्री केंद्र, १७ समूह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून सदर ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.

नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.

0000

शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिकचा निधी देऊ – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 11 (जि.मा.का.) :- आदर्श व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याने शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे  प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास खासदार संजय पाटीलमाजी आमदार  भगवानराव साळुंखेमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवालसहायक जिल्हाधिकारी अमित रंजनउपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळेमुख्य  लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाणमाध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढेप्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद विभाग प्रमुखपुरस्कार प्राप्त सन्माननीय शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणालेशिक्षक हा फक्त विद्यार्थीच घडवत नाही तर समाजाला सुद्धा घडवण्याचे व दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे त्याच्या कामाचे कौतुक होणे आवश्यक असते. अशा पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने पुढील कार्य  करण्यास त्यांना बळ  व प्रेरणा मिळेल.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी मॉडेल स्कूल योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 314 शाळा मॉडेल स्कूल करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्वच शाळा टप्प्याटप्प्याने मॉडेल स्कूल करण्यात येणार आहेत. मॉडेल स्कूल मुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्या सोयीच्या ठिकाणी  करण्यासाठी प्राधान्य द्यावेअसेही पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.

खासदार संजय पाटील म्हणालेविद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी नेहमीच उत्तमरीत्या पार  पाडतो. सामाजिक भान जपत तो मुलांना घडविण्याचे काम करतो. स्पर्धात्मक युग सुरू असून यामध्येही जिल्हा परिषद शाळा पुढे आहेत ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

शिक्षक हा नेहमीच उपक्रमशील असतो. गुणवत्तेचा ध्यास घेतलेला शिक्षक भावी पिढी निर्माण करण्यासाठी सदैव तत्पर असतो.  जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात मॉडेल स्कूल निर्माण करण्यात येत आहेत.  गुणवत्तेत  सांगली जिल्हा राज्यदेशात अग्रेसर रहावा यासाठी  शिक्षकांनी आणखी अधिक योगदान द्यावे, असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी केले.

प्राथमिक शिक्षण विभाग विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे.  जिल्हा यंदा १७० शाळांमधे रोबोटिक  व कोडिंग  लॅब१४१  शाळांमधे सायन्स किट देण्यात आले आहे. या बरोबरच शाळेत स्मार्ट  टिव्ही देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक तानाजी कोडग व श्रीमती करुणा मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

कार्यक्रमात महाराष्ट्र गीत गायन केलेल्या सी.टी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात  मिरज तालुक्यातील जि. प. शाळा सिध्देवाडी चे विष्णू ओमासेकवठेमहांकाळ तालुक्यातील जि. प. शाळा ढालेवाडी चे तानाजी कोडगजत तालुक्यातील जि. प. कन्नड शाळा लगांटेवस्ती हळ्ळी चे अण्णासाहेब सौदागरतासगाव तालुक्यातील ‍जि. प. शाळा नं. 1 सावळज चे सुनिल तावरेखानापूर तालुक्यातील जि. प. शाळा घोटी बु. चे अविनाश दाभोळेआटपाडी तालुक्यातील जि. प. शाळा घरनिकी चे भिमराव सांवतवाळवा तालुक्यातील जि. प. शाळा नरसिंहगाव च्या श्रीमती संगिता परीटशिराळा तालुक्यातील जि. प. शाळा निगडी च्या श्रीमती करूणा मोहितेकडेगाव तालुक्यातील जि. प. शाळा उपळेवांगी चे बाबासो शिंदेव पलूस तालुक्यातील जि. प. शाळा नं. 1 पलूस चे राम चव्हाण यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

०००

विकास कामे मुदतीत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

सांगली दि. 11 ( जि.मा.का.) :- जिल्हा परिषद मार्फत ग्रामस्तरापर्यंत विविध विकास कामे राबविली जातात. विकासकामे करताना ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी योग्य नियोजन करून  केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता संबधित विभागांनी घ्यावीअशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या.

जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारी विविध विकास कामे व योजनांचा आढावा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज घेतला. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवालसहायक जिल्हाधिकारी अमित रंजनउपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळेमुख्य  लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले,  ज्या विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत त्याची माहिती द्यावीया प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल.  तसेच ज्या कामांना स्थगिती दिली आहे त्याची माहिती देण्यात यावी. अंगणवाडी बांधकामाचा आढावा घेऊन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितलेजागे अभावी ज्या अंगणवाडीच्या बांधकामामध्ये अडचण येत आहे याबाबत सुधारित प्रस्ताव करून यासाठी मंजूर निधी खर्च करावा.  जल जीवन मिशन अंतर्गत होणारी कामे प्राधान्याने व्हावीत.

ग्रापंचायतस्तरावर मंजूर कामे  विहित मुदतीत  पूर्ण करण्याबाबत ग्रामपंचायत विभागाने नियोजन करावे. यासाठी, गटविकास अधिकारीविस्तार अधिकारी,  ग्रामसेवक यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा. १५ व्या वित्त आयोगातील निधीही वेळेत खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.  बैठकीत बांधकामसमाजकल्याणकृषीपाणी पुरवठा व स्वच्छतामहिला व बालकल्याणसमाज कल्याणआरोग्यपशूसंवर्धनशिक्षण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भव योजनेतंर्गत लाभार्थीना अभा कार्ड तसेच त्यांना एक महिन्याच्या औषधाचे किट वितरणमहिला बाल विकास विभागाकडे नियुक्ती मिळालेल्या अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेतून पात्र लाभार्थीस अनुदान वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

000

महिलांना रोजगाराच्या संधींसह स्वच्छ, सुरक्षित इंधन पुरविण्यासाठी ‘उमेद’ पुढाकार घेणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी

नवी मुंबई, दि. 11 : ग्रामीण कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरवठा व्हावा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या समूदाय संसाधन व्यक्तींना अधिकचे उत्पन्न व्हावे या हेतूने उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) यांच्यातील सामंजस्य करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी, उपजीविका स्त्रोत निर्माण करणे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधील ग्रामीण भागातील कुटुंबांना एलपीजी गॅस बाबत विविध सेवा पुरविणे, त्यांना स्वयंपाकाकरिता स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरविणे, बंद पडलेल्या गॅस जोडणीचे पुनरुज्जीवन करणे, नवीन जोडणी देणे, स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचे महत्व व गरज तळा-गाळापर्यंत पोहोचविणे इ. बाबींचा समावेश यात आहे. या उद्देशाने आज हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद (MSRLM) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, एचपीसीएल चे कार्यकारी संचालक अबुजकुमार जैन, व्ही. एस चक्रवर्ती, मुख्य महाव्यवस्थापक, पश्चिम विभाग, ‘उमेद’ अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांच्यासह दोन्ही कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘उमेद’ अभियानातील कार्यरत समूदाय संसाधन व्यक्ती (CRP) ची एचपी सखी म्हणून निवड करण्यात येणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी एचपी सखी यांना ठराविक दराने सेवाशुल्क देण्यात येईल. या सामंजस्य करारामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना निरंतर स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा पुरवठा होण्यास व व त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण होऊन त्यांच्या उपजीविकेत वाढ होणार असल्याबाबत श्री. जयवंशी यांनी समाधान व्यक्त केले. उमेद्च्या समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला उत्कृष्ट कार्य करतील, अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर राज्यात जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या ५ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढे याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

००००

संजय ओरके/विसंअ/

सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच सरकारचे ध्येय – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ११ : पुढील आठवड्यापासून गणरायाच्या आगमनाने सणासुदीला सुरुवात होत आहे. हे दिवस आनंद आणि उत्सवाचे असून या उत्सवात गरीब कुटुंब देखील सहभागी व्हावे, या उद्देशाने राज्यातील १ कोटी ६२ लक्ष कुटुंबांना (५ कोटी लोकसंख्या) आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शहरातील जटपुरा गेट येथील स्वस्त धान्य दुकानात गणेशोत्सवनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, चंद्रपूरचे तहसिलदार विजय पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवाड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, छबु वैरागडे, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवि गुरनुले, राहुल घोटेकर, रवि लोणकर, स्वस्त धान्य दुकानदार विजय बेले, अनिल बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बाजारभावापेक्षा कमी दराने केवळ १०० रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य सरकारने गेल्यावर्षी दिवाळीमध्ये आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, उत्सवाच्या दिवसात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्य सरकार पूर्ण शक्तीने सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे असून नागरिकांनी सुद्धा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पदाधिकाऱ्यांनी या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या.’ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट वाटप करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे १ लक्ष ३९ हजार ७५० लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लक्ष ७७ हजार २५० लाभार्थी असे एकूण ४ लक्ष १७ हजार लाभार्थी आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याकरीता ४ लक्ष ४ हजार ४९० आनंदाचा शिधा संच उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमाला चांद सय्यद, शीतल गुरुनुले, सविता कांबळे, सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, अरूण तिखे, शिला चव्‍हाण,  यांच्यासह वॉर्डातील नागरीक उपस्थित होते.

८९० कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा

जटपुरा वॉर्ड क्रमांक १, रामनगर रोड, चंद्रपूर येथील वॉर्डात जवळपास ८९० कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. ८९० कुटुंबांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आले. दुकानदारांनी संबंधित कुटुंबांना आनंदाचा शिधा देताना त्यांच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

असा आहे आनंदाचा शिधा

चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो आणि पामतेल १ लीटर अशा चार पॅकेटचा हा आनंदाचा शिधा आहे. मशीनवर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पॅकेट असल्याची लाभार्थ्यांनी खात्री करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप

गणेशोत्सवानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक १ मधील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यात लता सिडाम, शहनाज हुसैन, प्रभुदास तेलमासरे, मरीयम शेख, मोहसीन शेख, लता बेले, मिरा तिवारी, संगिता लोखंडे, वासुदेव इटनकर, संजय रामटेके, अशोक शेंडे यांचा समावेश होता.

गरिबांसाठी विविध योजना

केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुरुवातीला मानधन ६०० रुपये होते. अर्थमंत्री झाल्यानंतर यात वाढ करून १२०० रुपये करण्यात आले. तर आता राज्य शासनाने हे अनुदान १५०० रुपये केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून आता ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून नागरिकांना ५ लक्षपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

000

कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक

मुंबई, दि. ११ : अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांप्रमाणेच वीज ही मानवाची अत्यावश्यक मुलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) धनंजय सावळकर, महापारेषणचे मुख्य व्यवस्थापक सुधीर वानखेडे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) भूषण कुलकर्णी उपस्थित होते.

श्री. पाठक म्हणाले की, भारताचा वेगाने विकास होत आहे. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे.

परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक श्री. गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विशद केली. तीनही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे, दि. ११ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मुलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.


भाविकांच्या दर्शनात कोणताही खंड न पडता मुख्यमंत्री महोदयांची पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री महोदयांकडून पूजा सुरू असताना भाविकांचे दर्शनही अखंडपणे सुरू होते.


0000

ताज्या बातम्या

समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील – पंकजा मुंडे

0
पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश! पुणे, दि. १५ - पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची...

वयस्कांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
रत्नागिरी, दि. १५ (जिमाका): निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या...

नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १५: राज्यात जास्तीत जास्त नागरीकांनी नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. पोलीस कुटुंबातील माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस बॉईज...

लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा अहवाल सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. १५: पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल...

नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारणी; शासन निर्णय निर्गमित

0
सातारा दि. १५:  मौजे नायगाव ता. खंडाळा, जिल्हा सातारा येथे  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले...