गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1026

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३५ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. १ : राज्य शासनामार्फत ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १ जानेवारी, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १ जानेवारी, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे,  त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे  सचिव  (वित्तीय सुधारणा) शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक

नवी दिल्ली, 01: भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

एअर मार्शल श्री.रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी  36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. रणनीती आणि हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. काबूल आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयात त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर कार्यरत राहिले आहे. या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

एअर मार्शल श्री. रानडे यांना वर्ष 2006 मध्ये वायु सेना (शौर्य) पदक आणि वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. एअर मार्शल संजीव कपूर यांचा हवाई दल सेवाकार्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्यानंतर एअर मार्शल श्री. रानडे यांनी त्यांच्याकडून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.

0000

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार

मुंबई, दि. 1 (रानिआ) : ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे.

सर्व उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे आता ज्यांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक दाखल करणे शक्य नाही, त्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने देखील निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतींची राजभवनात घेतली भेट

नागपूर दि. 1 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे आज भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवी सोहळ्यावरून परत आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजभवनात पोहोचल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री नागपूर येथे आल्यानंतर विमानतळावरून थेट राजभवनात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲण्ड‌. आशिष जायस्वाल उपस्थित होते.

0000

विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 01 : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधानचे आहे. आजही विद्यार्थ्यांमधील न्यूटन जागा होणे आवश्यक आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण करून त्यामागचे शास्त्रीय कारण शोधण्याची प्रवृत्ती वाढली तरच विद्यार्थ्यांचा प्रवास भविष्यात संशोधक म्हणून होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती कायम जागृत असली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बामणी (ता. बल्लारपूर) येथील सेंट पॉल हायस्कूल येथे आयोजित 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप, गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके,संस्थेचे अध्यक्ष अविनाश खैरे, निना खैरे, गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडूला, काशिनाथ सिंह आदी उपस्थित होते.

शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात येणा-या नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे, हा या प्रदर्शनीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या डोक्यात अभ्यासक्रमासोबतच प्रश्नांची निर्मिती कायम होत राहिली पाहिजे. विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी व्हावा. विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आयुष्यात निर्भय व्हावे. त्यासाठी अभ्यास व मेहनत दोन्ही करून आयुष्य सार्थकी लावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर यांनी तर संचालन सरोज चांदेकर यांनी केले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक कलाकृती बघितल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

जय जवानजय किसानजय विज्ञानजय अनुसंधान’ : भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. त्यानंतर श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ हा नारा दिला. तर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हा नारा दिला आहे.

भारत कोव्हीड व्हॅक्सीन निर्यातदार देश : कोरोनाच्या काळात भारतामध्ये संशोधन करण्यात आलेली व्हॅक्सिन जगातील जवळपास 50 देशांनी वापरली. तर व्हॅक्सिन प्रमाणपत्र देण्याचे भारताचे सॉफ्टवेअर ब्रिटनने वापरले. या काळात भारत हा इतर देशांसाठी व्हॅक्सिन निर्यातदार देश म्हणून जगात नावारुपास आला.

मुल्यमापन हे धनावर नाही तर गुणांवर : घरांच्या नावफलकांवर संबंधित व्यक्तिची संपत्ती, धन दौलत, जमीन या बाबींचा उल्लेख आढळत नाही तर त्या व्यक्तिच्या पदव्या लिहिलेल्या असतात. मुल्यमापन हे कधीच धनावर होत नाही तर गुणांवरच होत असते. मुलांची मेरीटची गुणवत्ता हीच आई-वडीलांसाठी सर्वात मोठी भेट आहे.

जिल्ह्यात सायन्स पार्कचे नियोजन : विद्यार्थ्यांना संशोधकांची नावे माहित होण्यासाठी व त्यांचा आदर्श घेण्यासाठी सायन्स पार्क असणे आवश्यक आहे. या सायन्स पार्कच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती, वेगवेगळ्या विषयात करण्यात आलेले संशोधन, त्याचा उपयोग आदींची माहिती मिळण्यास मदत होईल.

०००

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि.१ : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. त्यानुसार राज्यात नुकसानाचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

२ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानींचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.

००००

मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – उद्योगमंत्री उदय सामंत

ठाणे, दि.01 (जिमाका) :- हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावे आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

लक्ष्यवेध इन्स्टिटयूट आयोजित ठाणे येथील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी “बिझनेस जत्रा २०२३ – सोहळा उद्योजकतेचा, उत्सव महाराष्ट्रीय लघुउद्योजकांचा..!”  या बिझनेस जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही बिझनेस जत्रा दि. 1 आणि 2 डिसेंबर 2023 रोजी, टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे सुरु असणार आहे.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, संजीव नाईक, ॲड.संदीप केकाणे, श्री.अरुण सिंह, श्री. निनाद जयवंत, श्री. निलेश सांबरे, श्री. गणेश दरेकर, अतुल राजोळी, डॉ. अतुल राठोड हे मान्यवर उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभिर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत गेल्या वर्षात 5 हजार 16 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या नऊ महिन्यात 13 हजार 256 नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत 1 कोटी 37 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. रत्नागिरीत कोकाकोला चा पहिला मोठा प्रकल्प उभा करीत आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कोका-कोला च्या सीईओंना सांगितले की, आमच्याकडे तज्ञांपासून ते कामगारांपर्यंत सर्व काही आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका-कोला च्या सीईओ नी 1 हजार 500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.

गडचिरोली सारख्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रकल्प उभा राहत आहे. तेथे सर्वात मोठी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहणार आहे. यासाठी 5 हजार एकर जागा भूसंपादित केली जाणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अत्यंत प्रयत्नशील असून ते यशस्वी सिद्ध झाले आहेत.  स्मॉल स्केल इंडस्ट्री बळकट होण्यासाठी शासनही पूर्ण क्षमतेने नवउद्योजकांच्या पाठीशी उभी आहे, यापुढेही राहील असे सांगून श्री. सामंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना राज्यात मिशन मोड मध्ये राबविली जाईल. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून देश निश्चितच बलवान होईल. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात लघुउद्योजक तयार होतील. ही योजना राबविण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी लागलीच मंजूरही केला आहे. यातून गावेही बळकट होतील.

या बिझनेस जत्रामध्ये व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई चे सहसंचालक श्री. गावित, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, ठाणे महेश जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागाचेही स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनास उभारण्यासाठी आयटीआय, वागळे इस्टेट च्या प्राचार्य श्रीमती माने, आयटीआय मुलींची, कोपरी, ठाणे च्या प्राचार्य श्रीमती सरला खोब्रागडे, शिल्प निदेशक श्रीमती शर्वरी दुर्गाळे, सुधाकर राठोड, आशिष बावचिकर, शिवाजीराव पालव, प्रशांत घनघाव यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

बिझनेस जत्राचे हे तिसरे पर्व असून, या उपक्रमाचे MSME क्षेत्रात आणि महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये विशेष स्थान आहे. बिझनेस जत्रा 2023 साठी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड Joy e-bike मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत.  त्याचप्रमाणे Quik Shef, Urban Ayureved, Voltas Air Conditioners आणि पितांबरी उद्योग समूह यांनी सहप्रायोजकत्वाच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले आहे.

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट आयोजित बिझनेस जत्रा २०२३ मध्ये 120 पेक्षा अधिक उद्योगांचे प्रदर्शन स्टॉल, 10 हजार पेक्षा अधिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC), लघु सूक्ष्म मंत्रालय (MSME), राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC), ठाणे महानगरपालिका, विविध बँका आणि 50 हून अधिक व्यावसायिक संघटनाचे विशेष सहकार्य बिझनेस जत्रा 2023 साठी लाभले आहे.

बिझनेस जत्रा 2023 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ( MIDC ), लघु सूक्ष्म मंत्रालय (MSME) अधिकारी, कौशल्य विकास मंत्रालय मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा या सर्वांचा सक्रिय सहभाग असणार आहे. बिझनेस जत्रा 2023 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीचे व्हिजन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध उद्योगस्नेही धोरणांचे आणि योजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.तसेच कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सहायता निधी योजना व उपक्रम याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

बिझनेस जत्रा 2023 मध्ये Industry 4.0, ब्रँडींग, महिला उद्योजकता, व्यावसायिक संघ व्यवस्थापन, व्यवसायाचे आर्थिक नियोजन आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना यासंदर्भात चर्चासत्र आणि परिसंवादाच्या माध्यमातून दिग्ग्ज व्यक्तींचे मार्गदर्शन उद्योजकांना लाभणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्योग तथा अन्य क्षेत्रातील दिग्ग्ज व्यक्तींच्या हस्ते नवीन उत्पादने व सेवा यांचे अनावरण करण्यासाठी बिझनेस जत्रा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून यंदाही Lahs Green India Pvt Ltd निर्मित विशेष सेवेचे – Tow – Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go चे अनावरण करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने Tow – Go या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

000

मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील कामे त्वरीत मार्गी लावावीत – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 1 :- मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, या कामांमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर तात्काळ मार्ग काढून कामे त्वरीत मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील मंजूर सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक कामे, मातोश्री ग्राम समृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेतील कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.   यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा नियोजन शशिकांत माळी, प्रातांधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक आणि पाणंद रस्ते आदी विषयांचा आढावा घेतला. यामध्ये पाटण तालुक्यात सन 2021-22 मध्ये शासनाकडून सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉकची 44 कामे मंजूर आहेत.  यामध्ये 4 कामे सुरु असून 38 कामे पूर्ण आहेत.  2 कामे अद्यापही सुरु झाली नाहीत.  सन  2022-23 मध्ये 69 कामे मंजूर असून अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत.  मातोश्री ग्राम समृध्दी शेती/पाणंद रस्ते अंतर्गत 2021-22 मध्ये 21 कामे मंजूर असून 9 कामे सुरु आहेत. तर सन 2022-23 मध्ये शासनाकडून 75 कामे मंजूर असून यातील 19 कामे सुरु आहेत.  या सर्व बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेवून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदर योजनांमधील प्रलंबित असणारी कामे तात्काळ मार्गी लावावीत, गावांतील अस्वच्छता पूर्णत: नष्ट करुन सिमेंट काँक्रीटकरण रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

 

पुनर्वसनासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनींसाठी प्रस्ताव तात्काळ तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 1 :- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना धरण प्रकल्प अशा दोन्ही प्रकल्पांमध्ये  ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, असे शेतकरी दुहेरी प्रकल्प बाधित आहेत. त्यांना जमीन वाटपामध्ये प्राधान्य द्या, त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असणा-या जमिनींसाठी प्रस्ताव तात्काळ तयार करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे बाळकृष्ण हसबणीस,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मनोहर गव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, प्रातांधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांसाठी ज्यांच्या जमिनी शासनाने घेतल्या आहेत, त्यापैकी एक रकमी मदत स्विकारलेल्या व भुमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार प्रत्येकी एक एकर जमीन द्यावी, या विषयाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.  यावेळी नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयानंतर ज्या गावांचे, कुंटुंबांचे पुनर्वसन पर्याय क्रमांक 1 नुसार झाले आहे व ज्यांना केवळ 10 लाख प्रति कुटुंब दिले आहेत परंतू त्यांना कोणतीही शेतजमीन दिलेली नाही व जे कुंटुंब शेत जमीन गेल्यामुळे भुमिहीन झालेले आहेत अशा कुटुंबांना त्याच जिल्ह्यात शेती योग्य शासकीय जमीन उपलब्ध असल्यास संबंधित जिल्हाधिकारी जास्तीत जास्त एक एकर जमीन उपलब्ध करुन देतील, असा निर्णय शासनाने जानेवारी 2018 मध्ये घेतला आहे.  शासनाच्या  या धोरणानुसार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या कोयना धरण प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अशा दोनही प्रकल्पांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना जमीन वाटपात प्राधान्य द्या. पुनर्वसनासाठी जवळपास 70 ते 80 हेक्टरची आवश्यकता आहे.  यासाठी जमीन मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

संपादीत जम‍िनी, घरे यांचे मुल्यांकन वन खात्यामार्फत करण्यात आले असून त्या मुल्यांकनाची रक्कम मिळावी अशी मागणी प्रकल्प बाधितांकडून करण्यात आली आहे.  मुल्यांकन करतेवेळी रेडीरेकनरचे दर कोणत्या वर्षीचे विचारात घ्यायचे याबाबत शासनस्तरावर मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याची माहिती उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड यांच्यामार्फत  देण्यात आली.

000

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1 ‍(जि. मा. का.) :  जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षे, ज्वारी आदि पिकांची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विविध ‍ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार,  मिरज प्रांताधिकारी उत्तम  दिघे, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, तंत्र अधिकारी (विस्तार) एन. डी. माने,  ‍मिरज तालुका कृषि अधिकारी श्री. मिलींद निंबाळकर व तासगाव तालुका कृषि अधिकारी श्री. सर्जेराव अमृतसागर, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तलाठी, कृषि सहायक उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा घडवून आणू व पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा ‍दिलासा दिला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील काकडवाडी, कदमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव, कोंगनोळी, तासगाव तालुक्यातील कुमठे आदि ठिकाणी नुकसान झालेल्या ज्वारी व द्राक्षे पिकांची पाहणी केली. तसेच कोंगनोळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर लक्ष्मण वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

000

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...