शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 1025

‘आयुष्मान भव:’ मोहीम दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 13 : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘आयुष्मान आपके द्वार’, आयुष्मान सभा, मेळावे, रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ही मोहीम म्हणजे दर्जेदार आरोग्य  सेवा उपलब्ध करून देण्याची संधी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवरील शुभारंभ राजभवन, गांधीनगर (गुजरात) येथून दूरदृश्य संवाद पद्धतीने केला. त्यानंतर ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार मनीषा कायंदे, आमदार भरत गोगावले, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, राज्यात सध्या एकूण लोकसंख्येच्या 11.7  टक्के लोकसंख्या वृद्ध आहेत. तसेच 2031 पर्यंत 15 टक्के लोकसंख्या वयोवृद्ध होणार आहे. त्यामुळे समाजाच्या या मोठ्या घटकाला आरोग्य सुविधा पुरविणे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी वृद्धांना विविध शासकीय रुग्णालयांमध्ये विशिष्ट वॉर्ड, रुग्णवाहिका असल्या पाहिजेत, त्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारली पाहिजे. जगात ‘आयुष्मान भारत’ ही सर्वात मोठी आरोग्य क्षेत्रातील योजना आहे. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वितरण पूर्ण करून सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राज्याचे आरोग्य क्षेत्रातील काम मोठे असून देशात महाराष्ट्र आरोग्याच्या बाबत अव्वल येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयुष्मान भव:मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो.  या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेत वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी “आयुष्मान भव” ही महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ही मोहीम राबवताना  गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहीमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी  नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त  मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आयुष्यमान ग्रामसभा 2 ऑक्टोंबर रोजी होणार असून ती ‘आयुष्मान भारत’ आरोग्य योजनेच्या जाणीव जागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य – प्रा. डॉ. तानाजी सावंत

राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुरुवातीला ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये ४ कोटी ८२ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर ‘सुदृढ बालक – जागरूक पालक’ अभियानात ० ते १८ वर्षे वयोगटापर्यंत लहान मुले, किशोरवयीन मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर आयुष्मान भव: मोहिमेदरम्यान ‘निरोगी आयुष्य तरुणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्‍याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

मंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, की राज्यात शासकीय रुग्णालयांमधून सर्वांना मोफत उपचार देण्यात येत आहे. हा क्रांतिकारी निर्णय असून खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी स्वत:ला झोकून देवून काम करीत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार मर्यादा दीड लाखाहून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. योजनेत १३५० उपचार मिळणार असून रूग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. नवीन ३६० रुग्णालये योजनेत समाविष्ट केले जाणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रथम मुंबईत सुरू करण्यात आला. मुंबईतील दवाखान्याची लोकप्रियतेनंतर संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू करण्यात आला. राज्यातही आपला दवाखाना यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ४३ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला आरोग्य क्षेत्रात देशात अव्वल करण्यासाठी विभागाच्या माध्यमातून काम होत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

आरोग्यविषयक ॲप व आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ

धर्मादाय रुग्णालयांविषयीचे  आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲपचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते कळ दाबून शुभारंभ करण्यात आला.  राज्यात 18 वर्ष व त्यावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणाऱ्या ‘निरोगी आयुष्य तरूणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ या मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

क्षयरोगमुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

क्षयरोगमुक्त भारत अभियान राबवून देशाला 2025 पूर्वी क्षयरोगमुक्त करावयाचे आहे. या अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपूर व  जालना जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महानगर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे धुळे व मुंबई शहर जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनाही सन्मानीत करण्यात आले.  त्याचप्रमाणे निक्षय मित्र म्हणून मॅक्स हेल्थकेअर प्रतिनिधींचा सत्कारही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला.

अवयवदानाची शपथ

सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयव व ऊती दान करण्याबबात जनजागृती करणे आवश्यक आहे.  या राज्यस्तरीय कार्यक्रमात उपस्थित सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.  अवयव दान हे सर्वात मोठे आणि पुण्याचे कार्य आहे. आयुष्मान सभेमध्ये याविषयीही जागृती करण्यात यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ता, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढविण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 13 :- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या राज्यातील 72 वसतिगृहांसाठी साहित्य खरेदी आणि वित्त व विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून  यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील महानगरे, शहरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना आदिवासी विकास विभागाची ‘स्वयंम्’ योजना आणि सामाजिक न्याय विभागाची ‘स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर ‘आधार’ योजना राबविण्यात यावी. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात भत्त्याची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल. या योजनेसाठी विद्यार्थी संख्या निश्चित करून विभागाने सविस्तर प्रस्ताव  सादर करावा.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमतेच्या मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक अशी 72 वसतिगृहे भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी लागणारे आवश्यक फर्निचर आणि इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यास देखील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मान्यता दिली.

इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाबाबतच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सद्य:स्थितीत धनगर समाजातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शहरांमधील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. मात्र, या योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता त्यात वाढ करण्यात येईल. इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची योजना इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल. यासंदर्भात नामांकित शाळेची निवड, विद्यार्थी निवड करण्याबाबतचे निकष, धोरण आखण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (RTE- Right to Education) प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांचा यासाठी प्राधान्याने विचार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविण्यात येते. या महामंडळामार्फत एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. मात्र, या योजनेच्या अस्तित्वातील अटी व शर्तींमुळे अत्यंत कमी प्रमाणात कर्जाचे वितरण होते. यास्तव अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर अटी व शर्ती शिथिल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण, रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने इतर मागास बहुजन कल्याण विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावेत. येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

————–*****——————

आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, दि. 13 : डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आरोग्य क्षेत्रातील उपयोगामुळे भारत या क्षेत्रात जगामध्ये आदर्श ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

आयुष्मान भव: या 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगर, गुजरात येथील राजभवनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेब लिंकद्वारे थेट प्रसारण सह्याद्री अतिथी गृह येथील मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमात  करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना उपस्थित होते.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, की देशाने कोविड साथ रोगाच्या काळात खूप चांगल्या कामाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. देशातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, अन्य आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच कुशल प्रशासन व नेतृत्वाच्या जोरावर यामधून देश बाहेर पडला. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. लोकसहभागातून अशक्यप्राय वाटणारे हे काम शक्य करून दाखविले.

प्रधानमंत्री क्षय रोग मुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कृत करण्याचे काम प्रशंसनीय असून क्षयरोग निर्मूलनात निक्षय मित्र म्हणून काम करणाऱ्या मित्रांचा सन्मानही स्पृहणीय आहे. आयुष्मान भव: मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोहिमेची विस्तृत माहिती देत मोहीम यशस्वी करून प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्य पुरस्कार अमरावतीच्या प्रमोद महादेव पुरी यांना जाहीर

अमरावती, दि. 13 :  राज्य शासन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करीत असते. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान होतो तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही त्याव्दारे प्रेरणा मिळत असते.

सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे सन 2021-22 ची राज्य पुरस्कार प्राप्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी शासन निर्णयाव्दारे नुकतीच जाहीर केली. त्यात मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक अमरावती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रमोद महादेव पुरी यांचा समावेश आहे.

प्रमोद पुरी हे नम्रता, वक्तशीरपणा व कार्यालयीन कामकाजामुळे महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. राज्यात २०१६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला, ह्याची अधिसूचना २०१९ ला निर्गमित झाली. आणि ह्याच वेळेला २०१९ पासून खऱ्या अर्थाने प्रमोद पुरी यांच्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. प्रमोद पुरी यांनी सातवा वेतन आयोगाचे फिक्ससेशन, विकल्प आणि थकबाकी याबाबत सविस्तर मार्गदर्शन संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. प्रमोद पुरी हे अमरावतीला मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून आज राज्यातील हजारो नवतरुण अधिकारी आणि लिपिक यांना प्रशासकीय बाबींचे धडे देत आहेत.

सातवा वेतन आयोगाचे मार्गदर्शन करण्यासाठी यशदा पुणे ह्या संस्थेने त्यांची राज्य मार्गदर्शक म्हणून निवड केली होती. प्रशासकीय कामात गती प्राप्त होण्यासाठी कर्मचारी ऑनलाईन कामात साक्षर असणे गरजेचे आहे. प्रमोद पुरी स्वतः ऑनलाईन कामात अत्यंत कुशल असून राज्यातील हजारो नवतरुण कर्मचाऱ्यांना स्वतःच्या Pramod Puri या Youtube चॅनेल व www.pramodpuri.com ह्या website च्या माध्यमातून प्रशासकीय कामाचे ज्ञान देण्याचे काम ते करत आहेत.

सामाजिक व व्यावसायिक बांधिलकी जपणारे प्रमोद पुरी यांना सन २०२१-२२ चा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व समन्यातून त्यांचे कौतुक होत आहे तर पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याने शासनाचे आभार सर्व सामन्यातून मानले जात आहे.

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी ” अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधुन अभियंता गौरव समारंभ 2023 हा षण्मुखानंद सभागृह, माटुंगा, मुंबई येथे साजरा होत आहे. त्या समारंभात श्री पुरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

000

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 13 : पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान व भरडधान्य प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता ऑनलाईन खरेदी पोर्टलवर शेतकरीनोंदणी तसेच लॉट एन्ट्री करताना आधार प्रमाणीकरण पद्धतीचा वापर करावा, तसेच मागील पणन हंगामात सुरु असणारी खरेदीकेंद्र चालू हंगामात सुरु ठेवण्यात यावीत. तथापि, अशी खरेदी केंद्र सुरु करण्याअगोदर त्या खरेदी केंद्रांबाबत मागील पणन हंगामामध्ये तक्रार नसल्याची खात्री अभिकर्ता संस्थांनी करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात खरेदी करावयाच्या धान व भरडधान्य यांच्या खरेदीपूर्व तयारीच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

धान खरेदीसाठी नवीन खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता अभिकर्ता संस्थांनी त्यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस प्रस्ताव सादर करावेत. समितीने त्याबाबत निर्णय घ्यावा. ज्या जुन्या (पणन हंगाम २०२२-२३ मधील) खरेदी केंद्रांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत चौकशी करुन तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास अशी खरेदी केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्तावही अभिकर्ता संस्थांनी समितीसमोर सादर करावा. समितीने त्याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

मागील हंगामात झालेली खरेदी विचारात घेऊन आवश्यकतेनुसार खरेदी केंद्रांमध्ये वाढ करण्याबाबतही समितीने निर्णय घ्यावा. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत योग्य ती कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करुन धान खरेदी तसेच साठवणूक आणि वितरणप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित ग्रेडर, धान साठवणूक गोदामे, केंद्र शासनाच्या स्वीकृत कार्यप्रणालीनुसार (SOP) बाबींच्या पूर्ततेसह  सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी सूचित केले. तसेच अभिकर्ता संस्थांनी बाजार समित्यांच्या आवारामध्ये सुरु होणाऱ्या खरेदीकेंद्रांवर बाजार समित्यांमार्फत सुविधा उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. धान व भरडधान्य खरेदी करताना धान्याची गुणवत्ता तपासणी करुनच ते स्वीकारले जावे. धान खरेदी करताना खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित ग्रेडरमार्फत तपासणी करुनच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दर्जानुसारच धान खरेदी करावे, असे मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

बैठकीस विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव सतिश सुपे,मार्केटिंग फेडरेशनचे सुधाकर तेलंग, आदिवासी विकास महामंडळाच्या श्रीमती बनसोडे, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह पुरवठा विभागाचे उपायुक्त,जिल्हा पुरवठा अधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

वंदना थोरात/विसंअ/

धान भरडाईसाठीच्या दर सुधारण्यासाठीचा अहवाल सादर करावा – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुबंई, दि. 13 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाच्या भरडाईकरीता केंद्र शासनामार्फत दर निश्चित करण्यात आला आहे. या दराव्यतिरिक्त राज्य शासनाने इतर काही राज्यांप्रमाणेच अतिरिक्त दरवाढ करण्याच्या गिरणी मालकांच्या मागणीबाबत समाधानकारक तोडगा काढणार असून त्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

हंगाम 2021-22 व 22-23 मधील भरडाईच्या अनुषंगाने राइस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.भुजबळ यांनी संबंधितांना निर्दैशित केले. बैठकीस आमदार राजू कारेमारे, तसेच गिरणी मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, धानाच्या भरडाईकरीता गिरणी मालकांच्या अडचणींबाबत विभागाचा सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये वाहतूकदर तसेच हमाली खर्चात प्रती क्विंटल दरवाढ करणे, गोदामाच्या ठिकाणी माल चढवणे तसेच वितरण केंद्रावर माल उतरवण्याच्या प्रक्रियेसाठीचा खर्च, बदलत्या इंधनदर, मजुरीदरानुसार त्यात काय बदल करता येणे शक्य आहे, या बाबींची तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधिताना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ/

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ साठी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून आवाहन

नवी दिल्ली  13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा  गौरव करण्यासाठी  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  (पीएमआरबीपी) प्रदान करत असते.

या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले  तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीद्वारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीद्वारे केली जाते. 26 डिसेंबर 2023 रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. राष्ट्रपती महोदय यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.

अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.

000000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 171, दि.13.09.2023

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलूया अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.

शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.

००००

एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार

मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या.

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीट देखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन- नैनुटिया, IRCTC च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सिमा कुमार आदी उपस्थित होते.

0000

कामगारांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे 

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत  कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार  कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.

कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात  झाली. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिटूचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव कॉ. भरमा कांबळे, उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम व इतर सदस्य उपस्थित होते.

कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या  विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना ‘मध्यान्ह भोजन’ ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.

मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.

०००००

मनीषा सावळे /विसंअ/

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...