शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 1024

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा तयार करताना कोल्हापूरचा बाज राखला जावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करताना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्पना स्पर्धा (आयडिया कॉम्पिटीशन) घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अंदाजे 1600 कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्पर्धकांनी तयार केले असून या आराखड्यांचे सादरीकरण पालकमंत्री श्री. केसरकर यांनी पाहिले. तसेच येथे होणाऱ्या विविध विकास कामांविषयी चर्चा करुन सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, उप अभियंता सचिन कुंभार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, जोतिबा प्राधिकरणाचा अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर येथील विकास कामे करताना दगडी बांधकामावर भर द्या. मराठा वास्तूशैलीचा वापर करा. कोल्हापूरी परंपरा प्रतीत होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करावा, असे सांगून यासाठी आवश्यक निधीची तरतूद होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत सहा स्पर्धक सहभागी झाले. यातून तीन क्रमांक अंतिम करण्यात येणार असून या आराखड्यांचे सादरीकरण पालकमंत्री श्री केसरकर यांनी आज पाहिले.

गरिबांच्या कल्याणासाठी चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 13 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षात आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. जनहित हेच सर्वतोपरी मानून शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. गरीबांच्या कल्याणासाठी या योजना असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

नियोजन भवन येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार ज्योती कुचनकर, हरीष शर्मा, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, अंजली घोटेकर, रवी गुरनुले, संध्या गुरुनुले, अजय सरकार, श्रीराम पानेरकर, प्रवीण उरकुडे, दिवाकर पुद्दटवार, मुद्गा खांडे, दिनेश पाझारे, प्रवीण उरकुडे, विलास टेंभूर्डे आदी उपस्थित होते.

गरिबांपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार पोहचविण्यासाठी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे आणि समितीच्या सर्व सदस्यांनी सेवाभावी वृत्तीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुंबईमध्ये कल्याणकारी योजना तयार होतात, मात्र समाजातील वंचित घटकापर्यंत त्या पोहचल्या पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. आपण आमदार असतांना निराधारांसाठी विधानसभेत आवाज उठविला होता. तर अर्थमंत्री झाल्यावर निराधारांसाठी असलेले 600 रुपयांचे अनुदान 1200 केले. तर यात पुन्हा वाढ करीत हे अनुदान आता 1500 रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.

जनहित हेच सर्वतोपरी आहे. यासाठीच शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट सवलत दिली. बाजारभावापेक्षा कमी दराने राज्यातील 1 कोटी 62 लक्ष कुटुंबांना गणेशोत्सवात आपण आनंदाचा शिधा देत आहोत. गरीबांची सेवा हाच राज्य शासनाचा धर्म आहे. त्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करून गरीबांच्या घरांपर्यंत योजना पोहचविल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

प्रास्ताविकात ब्रिजभुषण पाझारे म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरीब, निराधार, कॅन्सरपिडीत, दिव्यांग, परितक्त्या आदींचे काम करण्याची मला संधी दिली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून गत दोन महिन्यात 268 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. निराधारांना मिळणारे 1500 रुपयांचे मानधन पाच हजार रुपये करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लता मांडवकर, गुलखान आलमखान पठाण, साबिरा बी पठाण, पल्लवी राजपुरोहित, गुणवंत दुर्योधन, प्रवीण दडमल, निशांत शेडमाके, अमन उईके, संदीप खोब्रागडे आदींना मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

०००

वने ही धनापेक्षाही मौल्यवान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 13 : वन विभाग हा मनुष्याला प्राणवायू देणारा विभाग आहे. प्राणवायू आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळेच वन हे धनापेक्षाही मौल्यवान आहे, असे विचार राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी चंद्रपूर आणि गडचिरोली या वनसंपन्न जिल्ह्यांमध्ये शुध्द पर्यावरणासोबत शुद्ध विचार आणि शुद्ध कृतीचे अधिष्ठान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

रामबाग वनवसाहतीमधील अंतर्गत रस्ते, नाली व इतर बांधकामांचे भूमिपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, राहुल पावडे, संध्या गुरनुले, अंजली घोटेकर, संजय कंचर्लावार, रवी आसवानी, अरुण तिखे, रवी गुरनुले, मनोज सिंघवी, बी.बी.सिंग, अजय सरकार, संदीप आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाघांच्या संरक्षणात आणि संवर्धनात महाराष्ट्राचा वनविभाग देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, 1972  पासून वाघांच्या संरक्षणाची सुरवात झाली. संपूर्ण देशात महाराष्ट्रातच वाघांची संख्या वेगाने वाढते आहे. तसेच सहा सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी तीन व्याघ्र प्रकल्प आपल्या राज्यातील आहेत. त्यात चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पाचा सुद्धा समावेश आहे, ही वनविभागासाठी अभिमानाची बाब आहे.’ वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले. वनविभागात आमूलाग्र बदल होत आहे. कार्यालये, विश्रामगृह अतिशय दर्जेदार करण्यात आली आहे. चंद्रपुरातील वन अकादमीची वास्तू तर हेवा वाटावी अशी आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. गेल्या काळात राज्यात 33 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यातून महाराष्ट्रात 2550 चौ. कि.मी. वनक्षेत्र वाढले असून मँग्रोजच्या क्षेत्रात 104 चौ. कि.मी.ने वाढ झाली आहे. यामागे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनविभागाच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात राशी ढुमणे, वेदांती रामटेके, रेश्मा कुमरे, आर्यन पिंपळकर, स्वप्नील सिडाम यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार आदेशकुमार शेंडगे यांनी मानले.

वनशहीदांच्या कुटुंबाला निधी व नोकरी : वनांच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झाल्यास 10 वर्षांपूर्वी केवळ 2 लक्ष रुपये सानुग्रह अनुदान मिळत होते. मात्र अनुदानाची ही रक्कम वाढवून 25 लक्ष रुपये करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांना प्राधान्यक्रमाने नोकरी उपलब्ध करून देण्यात येते. परभणीत जंगलातील वनव्यामध्ये जीव  गमाविणाऱ्या कुटुंबातील सदस्याला या विभागाचा प्रमुख म्हणून केवळ तीन दिवसात नोकरी उपलब्ध करून दिली. शहीद कुटुंबातील मुलगा / मुलगी अल्पवयीन असेल तर मृत व्यक्तिला जे लाभ निवृत्तीपर्यंत मिळणार होते, तसेच गृहीत धरून निवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ कुटुंबियांना देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

वनांच्या संरक्षणाचा निर्धार : राजस्थानमध्ये बिष्णोई समाजाच्या पर्यावरणप्रेमी, वनप्रेमी नागरिकांनी तत्कालीन राजाच्या विरुध्द उठाव करून वनांच्या संरक्षणासाठी झाडांना आलिंगन देत आंदोलन केले होते. या झाडांची तसेच आंदोलकांची राजाने अतिशय निर्दयीपणे कत्तल केली. तेव्हापासून 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांच्या संकल्पनेतील वनांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कृतीतून आणि आचरणातून नागरिकांनी समोर यावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले. वाघाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे आणि हत्तीच्या पायाखाली चिरडलेले महुत जानकीराम मसराम यांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

वन विभाग एक कुटुंब : वसुंधरेच्या रक्षणासाठी वन विभागातील अधिकारी – कर्मचारी कार्यरत आहे. हा केवळ एक शासकीय विभाग नाही, तर एक कुटुंब आहे आणि कुटुंबप्रमुख म्हणून पूर्ण शक्तीने आपण पाठीशी उभे आहोत. वनांपासून लोकांच्या मनापर्यंत इश्वरीय भावनेतून अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे. कोणत्याही परिस्थितीत वन विभागाचे नाव बदनाम होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

गवताची नर्सरी आणि टिश्यू कल्चर लॅब : आपल्या जिल्ह्यातील लाकडाचा उपयोग अयोध्येतील राममंदीर आणि नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारांकरिता करण्यात आला आहे. जिल्ह्यात आता 25 प्रकारांपेक्षा जास्त गवताची नर्सरी तसेच टिश्यू कल्चर लॅब उभारण्यात येणार आहे. सोबतच कॅम्पामधून निवासी वसाहतींकरीता 100 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

कामाच्या गुणवत्तेवर जनतेने लक्ष ठेवावे : रामबाग वनवसाहतीतील नागरिकांच्या मागणीनूसार येथील अंतर्गत रस्ते, नाली व इतर विकासकामांसाठी 2 कोटी 41 लक्ष 87 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक काम होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवावे. लोकांच्या सोयीसाठी हे काम होणार असल्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष द्या, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

०००

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार आहे, याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सेवा रुग्णालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी 3.0, आभा कार्ड नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, 18 वर्षावरील पुरुष आरोग्य तपासणी मोहीम, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्रा.शाळांमधील तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सिपीआर अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव, उपसंचालक डॉ.प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ.अशोक गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.

या अगोदर आयुष्यमान भव या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झाला. त्यानंतर राज्य स्तरावरील आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ मा.राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकमात प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील टीबी चॅम्पीयन, निक्षय मित्र यांचा सन्मान तसेच आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, सर्वसामान्यांना व गोरगरीबांना चांगले आरोग्य मिळावे या हेतूने पंतप्रधान यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ही मोहीम संपुर्ण देशात राबविली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हयाने आयुष्यमान कार्ड व आभा कार्डचे वाटप येत्या काळात 100 टक्के पुर्ण करून जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. या कालावधीत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून रक्तदान शिबीर, अवयव दान जनजागृती मोहीम यशस्वी करावी. यावेळी त्यांनी सेवा रूग्णालयाची स्वच्छतेबाबत प्रशंसा करून येथे 100 खाटांचे रूग्णालय येत्या काळात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

खासदार धनंजय महाडिक यांनी या मोहिमेबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे आभार मानून आयुष्यमान मोहिमेची प्रशंसा केली. त्यांनी आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानून चांगली सेवा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कोविड, क्षयरोग यासारख्या आजारांवर अखंड सेवा देत त्यांनी लोकांना सुखरूप घरी सोडले. त्यांचे निरोगी समाज निर्मितीसाठी चांगले योगदान आहे. आयुष्यमान भव ही मोहीम सर्वांनी घराघरात पोहचवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांचा केला सन्मान

टीबी चॅम्पियन सन्मान : व्ही डी चौगुले, वैजनाथ पवार, ओमकार पवार, हरी ईश्वरा माळी, बाबासो शंकर पाटील, सोमनाथ करंबळी.

निक्षय मित्र सत्कार : माजी आमदार अमर महाडिक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर, होप फाउंडेशन गडहिंग्लज, अथणी शुगर लिमिटेड, लोटस फाउंडेशन कोल्हापूर.

आभा कार्ड वितरण : पांडुरंग आंबे, पद्मा ढीसाळ, खुशी वळकुंजे, गोपाल खोटरे.

गोल्डन कार्ड : निवास कांबळे, उत्तम नवले, यशवंत पाटील.

000

स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व शाश्वत स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या श्रृंगारवाडी (आजरा), देवकेवाडी (भुदरगड), खेरीवडे (गगनबावडा), माणगांव (हातकणंगले), पिराचीवाडी (कागल), पाटेकरवाडी (करवीर),  राजगोळी खुर्द (चंदगड), हिटणी व नेसरी (गडहिंग्लज), बाजारभोगाव, कोडोली व पोर्ले तर्फ ठाणे (पन्हाळा), येळवण जुगाई (शाहूवाडी), मजरेवाडी व नांदणी (शिरोळ) या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छतेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गौरविण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींची राज्य स्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. श्रृंगारवाडी तालुका आजरा, पिराचीवाडी, तालुका कागल, पाटेकरवाडी, तालुका करवीर. या गावांची निवड राज्य स्तरावर करण्यात आली असुन, या गावांची केंद्र समिती मार्फत पडताळणी पुर्ण करण्यात आली.

000

विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते भूमिपूजन

येत्या सहा महिन्यात विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा देणार – पालकमंत्री

 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती केली जाणार आहे. याचे भूमिपूजन जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या व्यायाम शाळेसाठी सीएसआर अंतर्गत इंडोकाउंट फाउंडेशन तर्फे 55 लक्ष रूपये देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक माणिक वाघमारे,  आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्वीनी सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, इंडोकाउंट फाउंडेशनचे शैलेश सरनोबत, संदिप कुमार, अमोज पाटील व इतर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदाच विभागीय क्रीडा परिसराची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले येत्या सहा महिन्यांमध्ये येथील संकुलात असणाऱ्या विविध सोयीसुविधांचा विकास करून येथील चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. जलतरण तलावही येत्या काळात उत्कृष्ट दर्जाचा तयार होईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिले. जिल्ह्यातील पारंपारिक खेळ तसेच आत्ताच्या पिढीतील नवे क्रीडा प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे खेळले जातात या अनुषंगाने उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी त्या पद्धतीचे सुविधा जिल्ह्यात येत्या काळात तयार होतील.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध व्यायाम प्रकार मार्गदर्शन होण्यासाठी सर्वसामान्यांकरिता फलक लावण्यात येणार आहेत. याचेही उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी विभागीय क्रीडा संकुलात केले.

000

डॉ. नीलम गोऱ्हे  राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.13 डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचा जीवनप्रवास  राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि सदैव प्रेरणादायी राहील, असे उदगार  राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी काढले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच कायम आघाडीवर  राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास आहे. या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्दबद्ध करण्यात आली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे समान योगदान असणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33 टक्के आरक्षण देण्यात आले. आज संसदेत, विधिमंडळ स्थानिक राजकारण यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला विविध क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेवर पुढे येऊन  आपली कर्तबागारी सिद्ध करत आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामीण,दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य  कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. त्यांचे कार्य, विचार या पुस्तकातून समाजापुढे आले असून नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे  प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नीलमताई  गोऱ्हे या  ध्येयवादी विचारसरणीच्या  विचारवंत आहेत. समाजासाठी, महिलांसाठी काय करू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील असतात.नेहमी मदतीसाठी सहानुभूतीची भावना त्यांची असते.

या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव देखील आहे जे मनात असते ते स्पष्ट बोलतात. विधान परिषदेच्या उपसभापती या महत्त्वाचे पदावर काम करत असतानाही विधान परिषदेत सर्वांना न्याय देण्याची व मदतीची त्यांची नेहमीच भूमिका असते. देशात महाराष्ट्र हे  महिला धोरण आणणारे पहिले राज्य आहे. या धोरणात त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत व नवीन तयार होणाऱ्या धोरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतात. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली महिला शिवसेना नेता नीलमताई आहेत. त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. महिला आरक्षण विषय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा यावेळी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाला, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ ही खूप महत्त्वाची असते.  वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते परंतु लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खुप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि  या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला.

कोणतेही कार्य आपण सांगितले नाही तर ते कळणार नाही  सामजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचा प्रवास आणि अनुभव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली.

00000

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :  नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया  सेठी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘सिग्नेट’चे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात विशेषतः कोकण परिसर, डोंगरी भाग आणि प्रमुख नदी परिसरात आपत्तींना अटकाव करणाऱ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागासह आयआयटीमधील तज्ज्ञांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या  आधुनिक, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. त्याचा आपल्या राज्यात कसा वापर करता येऊ शकतो, याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

—–*****—–

संध्या गरवारे/विसंअ/

‘वाघ’ हा जैवविविधतेचा मानबिंदू; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 13 : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्य शासनाचा वन विभाग प्रस्तूत दै. लोकसत्ता प्रकाशित ‘वाघ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाळ रेड्डी, महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर , दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील उत्तम व्याघ्रप्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथील वाघांची संख्या वाढली आहे. वाघ संख्या वाढीच्या वेगात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशांत वाघ आढळतात. त्यापैकी 65 टक्के वाघ हे केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासन, वन विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाघ आणि इतर प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले जात आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वन्यप्राण्यांची शिकार होऊच नये, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. सर्व प्राण्यांच्या संरक्षणाचे प्रतीक हा वाघ आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे काम वन विभाग करीत आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेने हरित पट्टा क्षेत्रात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी ‘वाघ: अधिवासाचं आव्हान’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये प्रधान सचिव श्री. रेड्डी यांच्यासह श्री. टेंभुर्णीकर, श्री. लिमये, श्री. काकोडकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रधान सचिव श्री. रेड्डी म्हणाले की, राज्यात आपण 6 व्याघ्र संवर्धन क्षेत्र घोषित केले आहेत. वाघ ज्याठिकाणी आहे, तेथील कोअर एरिया मधील नागरी वस्ती पुनर्वसनाला आपण प्राधान्य दिले आहे. याशिवाय, वाघ संरक्षणासाठी राज्य व्याघ्र राखीव दल आपण तयार केले. या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याने त्यांची मदत घेऊन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. वाघाला त्याच्या अधिवासामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले, तर तो त्या बाहेर येणार नाही. यासाठी तेथील पीक पद्धतीचा विचार करुन काही बदल करण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता साधनांचा वापर करुन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करता येईल का, यासाठी आयआयटी, मुंबई यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. टेंभुर्णीकर यांनी, वाघांचा अधिवास सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनीही पर्यावरण आणि वन्यजीवांना नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनजागृती आणि शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. श्री. लिमये आणि श्री. काकोडकर यांनीही स्थानिकांच्या सहकार्याने आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने हे काम करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

‘बैल पोळ्या’निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा

मुंबई दि. 13 : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे.

राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठिशी उभे राहील. शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

संकट असले तरी पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा राहिली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, सोबतच शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात देखील आम्ही सहभागी आहोत, असेही यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

००००

ताज्या बातम्या

डिजिटल युगात कामात सुलभता आणि सुरक्षेसाठी संगणक सजग असणे आवश्यक – प्राजक्ता तळवलकर

0
मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या...

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

0
मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल...

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
मुंबई, दि. ९ : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला  'सोने की चिडिया' म्हटले जात होते....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

0
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला....

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0
सातारा दि. 9 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी...