सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 1020

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

परभणी दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करताना परभणी जिल्ह्याचे योगदान अनन्यसाधारण असून, राज्य शासन जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याला भरघोस निधी देण्यात आल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय जाधव, आमदार  डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या पिढीला मुक्त‍िसंग्रामाचा लढा कळावा म्हणून, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवून हे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात येत आहे. देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने सामील होण्यास तयार नव्हती. त्यामुळे निजामाविरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारला होता. त्यानंतर 13 महिन्यांनी हा भाग मुक्त झाल्याचे श्री. सावे म्हणाले.

मराठवाडा मुक्तीसंग्रामात परभणीकरांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. कारण निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध प्रत्यक्ष संघर्षाची मुहूर्तमेढ ही परभणी जिल्ह्यातच रोवली गेली होती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे.  या लढ्यात परभणी जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान दिले. या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. या लढ्याचा मुख्य हेतू हा राष्ट्रीयता, निधर्मीपणा व लोकशाहीची भावना वाढविणे हा होता, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्त‍िसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा विभागाचा कायापालट घडविण्यासाठी तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांची विकास कामे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 91 कोटी 80 लाख, जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करुन 400 मुलींना शिक्षण घेण्यासाठी 20 कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा व क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणासाठी 15 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

परभणी शहराची वाढती लोकसंख्या पाहता समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 157 कोटी 11 लाख रुपये तसेच शहरासाठी मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 408 कोटी 83 लाख मंजूर करण्यात येणार आहेत. परभणी येथील नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता महानगरपालिकेस 11 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. सेलू तालूक्यातील निम्न दुधना प्रकल्प आणि पुर्णा तालूक्यातील ममदापूर उच्च पातळी बंधारा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या कामास 728 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाद्वारे परभणी व जालना या दोन जिल्ह्यातील एकूण 34 हजार 438  हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तर ममदापूर उच्च पातळी बंधाऱ्यासाठी 271 कोटी 87 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील 1  हजार 375 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच मराठवाड्यातील पुरातन मंदिरांच्या विकासकामांसाठी तब्बल 253 कोटी 70 लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर, धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिरासह चारठाणा मंदिर समूहाचे संवर्धन आणि विकास करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात जिल्ह्यातील 8 लाख 75 हजार लाभार्थ्यांना 1 हजार 464 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे लाभ दिल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबविले जात आहे. आता ‘आयुष्मान भव’ ही योजना राबविण्यात येत असून, राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले आहे. या योजने अंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान व आरोग्य मेळावे, रक्तदान शिबिर, अवयव दान जनजागृती, आयुष्यमान ग्राम सभा, अंगणवाडी – प्राथमिक शालेय मुलांची आणि 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी असे विविध आरोग्य विषयक कार्यक्रम या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, वारस यांची भेट घेतली. तसेच विष्णू रामभाऊ वैरागड यांनी दिव्यांगाच्या पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, तहसीलदार यांच्यासह पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सहकार मंत्री अतुल सावे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवत तसेच हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी श्री. सावे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 120 फूट उंच ध्वजस्तंभाचे अनावरण

महानगरपालिकेने राजगोपालचारी उद्यानात उभारलेल्या 120 फूट उंच स्तंभाचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परभणी मनपाने प्रथमच 120 फूट उंच राष्ट्रध्वजासाठी हा स्तंभ उभारला आहे. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.

येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रिटीश कालावधीत प्रथम परभणी जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) आवृत्ती सन 1967 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याच गॅझेटिअरची पुरवणी सन 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून त्याचे पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या परभणी जिल्हा मराठी गॅझेटिअरला 32 वर्ष झाल्याने याच जिल्हा गॅझेटिअरची पुरवणी काढून अमुलाग्र बदलांची संक्षिप्ताने नोंद घेवून मागील तीन दशकात लोककल्याणकारी गतिमान शासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विविध योजना व केलेल्या कामांचा आढावा घेणारी पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विशेष कामांची जाणीवपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. ही पुरवणी म्हणजे नवीन ग्रंथ नसुन सांख्यीकीय तक्त्यांच्या आधारे मूळ ग्रंथातील नोंदीनंतरचा टप्पा नोंदविण्यात आला आहे.

परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीसाठी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या मार्गदर्शनात सहसंपादक श्रीमती सा.प्र. पिंपळे, संशोधन अधिकारी दि. वि. भगत, सहायक संशोधन अधिकारी श्रीमती स.सु. गोसावी आणि लघुलेखक वि. प. गुळगुळे यांनी मर्यादित वेळेत काम करुन ही आवृत्ती प्रकाशित केली आहे.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ चित्रप्रदर्शनीला मंत्री श्री. सावे यांची भेट

 मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर येथे परभणी शहरातील जिजाऊ आयटीआयच्या वतीने ‘मराठवाड्याची मुक्तिगाथा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाला भेट देत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ४० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.,मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे, माजी खासदार सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या चित्रप्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे नाव, मराठवाडा मुक्तिसंग्रामात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे गृहनिर्माण, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांना जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. नितीन लोहट, कार्यक्रम समन्वयक सिद्धेश्वर जाधव उपसि्थत होते.

कुरुंदकर स्मारकाच्या कामाला गती देऊ – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड (जिमाका) दि. १७ :- महाराष्ट्राच्या विचारवंतात प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचे नांव आजही आदराचे आहे. महाराष्ट्राला त्यांनी पूर्वग्रहमुक्त व असांप्रदायिक विचार पध्दती दिली.

साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी केलेले तत्त्वचिंतन मोलाचे आहे. त्यांच्या स्मारकाच्या पुढील टप्यातील कामासाठी आम्ही सकारात्मक असून मंत्रालय पातळीवर तात्काळ त्याला गती देऊन प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठाणला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार  प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. दत्ता भगत, श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, लक्ष्मण संगेवार आदि मान्यवर उपस्थित होते.

नरहर कुरुंदकर यांच्या जीवन कार्याला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी येथील ग्रंथालय व इतर सोयीसुविधांना भक्कम केले पाहीजे. याचबरोबर वर्षातून एकवेळा अखिल भारतीय पातळीवरील परिसंवाद व इतर उपक्रम हाती घेता येऊ शकतील असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविले. यावेळी छोटेखानी समारंभात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समयोचित भाषण झाले.

 

000

मराठवाडा मुक्तिसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अनमोल – पालकमंत्री गिरीष महाजन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला सिद्ध करणारा आहे. निझामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान संपूर्ण भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असल्याचे, प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीने, मराठवाडा मुक्तिसंग्रामाने लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृध्द वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहचावा यादृष्टीने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. हा समृध्द वारसा पुढे नेण्यासह भारतातील शेती, शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकासाला गती दिली आहे. जी-20 परिषदेचे अत्यंत समर्थपणे आयोजन करून जगातील सर्व देश प्रमुखांनी भारताला प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वरुपात एका समर्थ नेतृत्वाची अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले.   

मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने विविध विकास कामाचे लोकार्पण

मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विसावा उद्यान येथील मुख्य शासकीय समारोहात प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. यात अर्धापूर आणि भोकर येथील पोलीस स्टेशनच्या नुतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील डायलेसीस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा, नांदेड येथील कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष नुतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर केले. याचबरोबर क्रिडांगण व डिजीटल क्लासरुमचे भूमीपूजन,  इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.

 

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे प्रकाशन

 मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत आधारित या विशेष कॉफीटेबल बुकचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सुरेश सावंत, संजीव कुळकर्णी व शंतनु डोईफोडे यांनी केले आहे. यात माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव, जयप्रकाश दगडे, डॉ. महेश जोशी, डॉ. संपदा कुलकर्णी यांचे लेख आहेत. स्मृतिदर्शिकेत नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर प्रख्यात चित्रकार राजु बाविस्कर यांच्या रेखाटनासह संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत

 गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला शासन खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. सुमारे 8.89 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 472 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. या खरीप हंगामासाठी 1 हजार 812.14 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी 420 कोटी रुपये लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती

योजना 2019 अंतर्गत 15 सप्टेंबर 2023 अखेरपर्यत 31 हजार 181 शेतकऱ्यांना 117.61 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शासनामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 42 हजार 793 बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 21 लाख 68 हजार 863 रुपये  इतका निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्‍यावर वितरीत करण्‍यात आला. पी.एम.किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 32 हजार 587 इतके पात्र शेतकरी असून त्‍यांना आजपर्यत एकूण रूपये 1 हजार 147 कोटी 1 लाख इतकी मदत वितरीत झाली आहे असेही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी नमूद केले.

केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना राबवित आहोत. याला राज्य शासनानेही जोड दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहीर योजनेवर जिल्हा परिषदेने विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील बालकांच्या सुपोषणासाठी आयआयटी पवई यांच्या विद्यमानातून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा दत्तक योजनाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. देणगीच्या माध्यमातून ही दत्तक योजना कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधेत नवीन भर

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी 4 ठिकाणी सिटी स्कॅन यंत्रणा, 6 ठिकाणी डायलेसीस यंत्रणा, 15 ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, टुडी ईको तपासणी, 16 ठिकाणी ब्लड स्टोरेज युनिट या सर्व सुविधा आरोग्याच्यादृष्टिने जिल्ह्यात वाढविल्या आहेत. राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “तीर्थक्षेत्र विकास योजना” राबविण्याचा मानस असून त्या योजनेच्या माध्यमातून माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे 7 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील इतर पर्यटन क्षेत्राचाही विकास करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद

उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 लाख 8 हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण 60 लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे.  यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे 12 लाख 23 हजार  महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व पातळीवर आरक्षणाचा निर्णय टिकलाच पाहिजे यादृष्टिने शासनाची भूमिका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील अंतवरली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. त्यांच्यासह संपूर्ण समाजाला त्यांनी विश्वास दिला आहे.

 

छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडसाठी भरीव तरतूद

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्पासाठी 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील उनकेश्वर (ता. किनवट) येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 232 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यातून किनवट   तालुक्यातील   1 हजार 90  हेक्टर आणि यवतमाळ  जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 370 हेक्टर असे एकूण 1 हजार 460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 14 हजार 40 कोटीची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील विविध स्मारके व मंदिराच्या विकास कार्यक्रमात होट्टल मंदिराचाही समावेश केलेला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वत:च्या कार्यालयासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात 180 कोटी रुपये दिले जाणार आहेत. निझामकालीन शाळांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी 20 टक्के लोकसहभागाची अट शिथील केली आहे. नांदेड शहरात सुरक्षिततेच्यादृष्टिने 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 329 कोटी 16 लाख रुपये, माहूर नगरपरिषदेसाठी 24 कोटी 62 लाख रुपये, माहूर येथे वनविश्रामगृह, साबरमती घाटाप्रमाणे नांदेडच्या गोदावरी घाटाचे सौंदर्यीकरण, रिव्हर फंडसाठी 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड येथे स्वयंमचलित चाचणी पथप्रकल्प, घनकचरा प्रकल्पासाठी 8 कोटी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

या विशेष समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मराठवाडा गौरव गीताचे गीतकार लक्ष्मीकांत तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू लता उमरेकर यांना 2 लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत, व मराठवाडा गीत सादर केले. पालकमंत्री यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाच्या अगोदर प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर, दि.१७: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मीनियार, अलीस पोरे, अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा, भारत कदम, तहसीलदार अरुण पावडे, अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.राजेअर्दड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव; श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले

छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली.

000

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा  शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार  सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य  आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त  जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी  उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या  मुक्तिसंग्रामात अनेकांनी  योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरम’ने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असतांना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी  मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद

ध्वजारोहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी  उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर स्मृतिसंग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय समारंभस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

सिद्धार्थ उद्यानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया आदी उपस्थित होते. या प्रदर्शनास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रधान सचिव विकास खारगे यांनी भेट दिली.

या प्रदर्शनात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाशी निगडीत महत्त्वाची छायाचित्रे व महत्त्वाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉ. मंगला बोरकर यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रेखाचित्रांची मांडणीही प्रदर्शनात करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी संपादित केलेल्या ‘मराठवाडामुक्ति संग्रामाची स्मृतिगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम,एक आकलन’ ही माहिती पुस्तिका, आणि स्मृतिदर्शिका 2023-24 चे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी , शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी भेट दिली.

000

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात अनेकांनी योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरम’ने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असतांना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद

ध्वजारोहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर स्मृतिसंग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ

  • नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच

  • नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी

  • नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ गावे आत्मनिर्भर करणार

  • नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार

  • नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी

  • नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी

  • नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार

  • नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी

  • नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून ७३ शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार

  • नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियानातुन ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा 

  • छत्रपती संभाजी नगर, दि. १७ सप्टेंबर (विमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारत देशाचा गौरव व सन्मान वाढविला आहे. जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. जी 20 ची परिषद राज्यातील अनेक शहरांमध्ये झाली. आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती इतर देशापर्यंत पोहोचविण्याची संधी या परिषदांच्या माध्यमातुन मिळाली. दिल्ली येथे झालेल्या जी 20 च्या बैठकीत प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयांना, ठरावांना विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांनी एकमुखाने संमती दिली. ‘वसुधैव कुटूंबकम’ हा आपला मुलमंत्र आहे. सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास या ठरावावरही एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो महिला सशक्तीकरण अभियान

नमो ११ कलमी कार्यक्रमात नमो “महिला सशक्तीकरण अभियान” राबविण्यात येणार असुन ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यासोबतच २० लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत ५ लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, ५ लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल तसेच 3 लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नमो कामगार कल्याण अभियान

भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून “नमो कामगार कल्याण अभियान” अंतर्गत ७३  हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नमो शेततळी अभियान

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार असुन पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब अन् थेंब याद्वारे साठविण्यात येणार आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच याच शेततळयातून मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.

नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान

“नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान” राबविण्यात येऊन 73 आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार आहेत. बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधुन देणे, घरांमध्ये शौचालय बांधुन त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे, गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे, महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व साह्य, सेंद्रिय उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठ, उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, उत्पादंनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान

गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी “नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान” राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना पक्की घरे बांधुन देण्यात येणार आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी, घरांमध्ये वीज पुरवठा, समाज प्रबोधनाचे काम व्हावे यासाठी समाज मंदिराची उभारणी, गरीब व मागासवर्गीय महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठीही या अभियानातुन मदत करण्यात येणार आहे.

नमो ग्राम सचिवालय अभियान

“नमो ग्राम सचिवालय अभियान” राबवुन प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. सव ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा देण्यात येणार असुन संपुर्ण गावाचे नियंत्रण कक्षाची उभारणीही याद्वारे करण्यात येणार आहे.

नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान

“नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान” राबवुन आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करण्याबरोबरच 73 विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहेत. आधुनिक संसाधनयुक्त शाळांच्या उभारणी, वेगवान इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण, अंतराळविषयक व विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत मार्गदर्शन, महत्वांच्या शोधांबाबत माहिती, प्रशिक्षण वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा तसेच अंतराळ दर्शन आदी सुविधा या शाळांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नमो दिव्यांग शक्ती अभियान

नमो दिव्यांग शक्ती अभियान राबविण्यात येऊन याद्वारे दिव्यांग पुनर्वसन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. अभियान स्वरुपात दिव्यांगांचे सर्व्हेक्षण व ओळख निश्चित करण्यात येणार आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज देण्याबरोबरच दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे या अभियानातुन समुपदेशन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान

नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान राबवुन यातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी करण्यात येणार आहे. यातुन खेळाडुंना मैदानी क्रीडा सुविधा देण्याबरोबरच खेळाडुंचे समुपदेशन करुन त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.

नमो शहर सौंदर्यीकरण अभियान

“नमो शहर सौंदर्यीकरण अभियान” राबवुन ७३ ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातुन सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान

“नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान” राबवुन ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण व स्वच्छता आदी कामे या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लेझर शोच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या जागवल्या आठवणी

छत्रपती संभाजी नगर, दि. 16 :(विमाका) मराठवाड्याचा विकास हाच शासनाचा ध्यास असून मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास ४५ हजारांहून अधिक कोटींच्या विविध विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये पाणी वळविण्यासाठी १४ हजार कोटींची शासनाकडून तरतूद करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा श्री. शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिल्या. तसेच मुक्ती संग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना विनम्र अभिवादन केले.

शहरातील क्रांती चौक येथे ‘गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक संचालनालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त जी.श्रीकांत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे, त्यांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

चांगली काम करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा एका वर्षाची परवानगी देण्याऐवजी पाच वर्षांची परवानगी द्यावी. निर्बंधमुक्त गणेशोत्सव, सण साजरे करण्यात यावेत, अशा सूचनाही महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना यावेळी केल्या.

नाविन्यपूर्ण पद्धतीने लेझर शोद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती या कार्यक्रमात सादर करण्यात आली. महापालिकेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कलावंतांचा गौरवही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमास नामवंत कलकारांची उपस्थिती होती. या कलाकारांनी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार

0
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या...

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 12: सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ' प्रकरणे...

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १२ - भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा...

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...