मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1018

क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक : 3 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.

मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, स्कूल गेम फडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक के एस मूर्ती, कनक चतूर्धर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत यांच्यासह देशातील विविध राज्यांचे खो खो खेळाडू उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिकला लाभलेली नैसर्गिक संपन्नता व आरोग्यदायी वातावरण सर्वच प्रकारच्या खेळांसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी याचा योग्य वापर करून जिल्ह्याचे नाव विविध खेळ प्रकारात जागतिक पातळीवर उंचावले आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत यांच्यासह विधीत गुजराती, दत्तू भोकनळ, अंजना ठमके, मोनिका अत्रे, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, ताई बामणे यासारख्या नामांकित खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे. क्रीडा विश्वाला समृद्ध करणाऱ्या या खेळाडूंमुळेच नाशिकची ओळख आता क्रीडानगरी म्हणून नावारूपाला येत असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही वर्षांत खेळाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच पालक देखील अभ्यासासोबतच मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देत असल्याने नवीन खेळाडूंचा विविध खेळ प्रकारात सहभाग वाढत आहे. तसेच शासनाच्या नव्या क्रीडा धोरणानुसार तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलासाठी देण्यात येणाऱ्या निधीत देखील दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून खेळाडूंना खेळासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि ते जिल्ह्याच्या नावसोबतच राज्याचे व देशाचे नाव उंचवतील. खेलो इंडिया आणि टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांचे शासनाकडून आयोजन करण्यात येत आहे. त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करून २०२८ ऑलिंपिकसाठी त्यांच्याकडून तयारी करून घेण्यात येत आहे. आज नाशिकचे खेळाडू टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, मैदानी खेळ, खो-खो, बॅडमिंटन, सायकलिंग, स्वीमिंग, तलवारबाजी, नौकानयन, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, शूटिंग, पॅरा ॲथलेटिक्स, रोइंग, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक यांसारख्या अनेक खेळांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आपले नैपुण्य सिद्ध करीत आहेत, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, स्पर्धाच्या आयोजनामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. खेळांमध्ये होणारी हार- जीत ही खेळाचाच एक भाग असते. खेळामुळे संघशक्ती वाढते. असे सांगून जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशातील 28 राज्यांच्या खेळाडूंनी संचलन केले. मंत्री श्री भुजबळ यांनी कार्यक्रम संपल्यावर सर्व उपस्थित खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धा 7 डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहेत. यामध्ये देशातील 28 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याचे क्रीडा  उपसंचालक रविंद्र नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
000000

‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

नागपूर ,दि. 3 :  व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे(नासुप्र) सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि  किराणा मर्चंट असोसिएशनने  त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने  या प्रकल्पासाठी  जमीन उपलब्ध करून दिली असून वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला हेही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि  कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

******

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिडास हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर, दि.3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिडास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.

वर्धा रोडवरील परसोडी गावा शेजारी स्थित अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी वने, पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री.फडणवीस आणि श्री. मुनगंटीवार यांनी या हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देवून पाहणी केली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मिडासचे प्रमुख डॉ.श्रीकांत मुकेवार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सौरभ मुकेवार यांनी हॉस्पिटलची माहिती  देत सादरीकरण केले.

******

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन

नागपूर ,दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.

शनिवार, २ डिसेंबर रोजी रात्री  नलिनी कुंभारे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजार व वृद्धापकाळाने निधन झाले. ड्रॅगन पॅलेस परिसरातील ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री. फडणवीस यांनी ॲड.  कुंभारे यांचे तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे सांत्वन केले.

यावेळी उपस्थित आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही आदरांजली वाहिली.

******

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

मुंबई, दि. 3: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी चैत्यभूमी येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

सकाळी धारावी येथे मुंबई सखोल स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करून मुख्यमंत्री श्री. शिंदे दादर येथील चैत्यभूमीवर आले. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून ते सहा डिसेंबरपर्यंत आलेल्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्याठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली आहे त्याची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. आरोग्य व्यवस्था, स्वच्छता यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.

महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी राज्य आणि देशभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधेची माहिती घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी आमदार सदा सरवणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

मुंबई, दि. 3: तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.

सायन हॉस्पीटलमध्ये 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर औषध, जेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर एका वॉर्डात तर एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.

000

संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.3- मुंबई स्वच्छ, सुंदर प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यात मुंबईकरांनी सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबई महापालिकेतर्फे आयोजित संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी डी वॉर्डातील कमला नेहरू उद्यान, बाणगंगा तलाव, गिरगांव चौपाटी, बी.आय.टी. चाळ परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी बी.आय.टी. चाळ परिसरात नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला, त्यांनी हातात झाडू घेत सर्व देशवासियांना अभियानात सहभागासाठी प्रेरित केले. त्यानंतर बघता – बघता ही लोकचळवळ बनली. त्याच धर्तीवर मुंबईचा कायापालट करण्यासाठी ही मोहिम महत्वाची आहे. मुंबईतील रस्ते स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण अशा विविध पातळीवर या मोहिमेत काम करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट दिली. या वसाहतीत असणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम सुरू झाले आहे. जे सफाई कर्मचारी बांधव मुंबई स्वच्छ ठेवतात त्यांच्या वसाहती देखील स्वच्छ सुंदर असायला हव्यात, असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिसरातील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिलावर्गाने औक्षण करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

कमला नेहरू उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ कमला नेहरू उद्यानातून मुख्यमंत्र्यांचे हस्ते वृक्षारोपनाने करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्यानाची पाहणी केली. तसेच या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट विद्यार्थ्यांनी धरला असता मुख्यमंत्र्यांनी आवर्जून फोटो काढून घेतले.

बाणगंगा तलाव परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी         

मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा तलाव परिसरातील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तलाव परिसरात सुशोभिकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासोबत फोटो देखील काढून घेतले.

000

गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई दि.3- मुंबई महापालिकेचा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिम पाहणी दौर्‍यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव परिसरातील धरम पॅलेस या आगग्रस्त इमारतीला भेट दिली. गिरगांव चौपाटी लगतच्या परिसरात असणाऱ्या या इमारतीला दि. 2 डिसेंबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीवर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले होते.

स्वच्छता मोहीम पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दुर्घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

000

लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

मुंबई दि.3- मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली. दुसऱ्या बाजूला या मोहिमेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, त्यांच्यांशी बोलण्याची उत्सुकता दिसली.

सुरुवातीला कमला नेहरू उद्यान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले असता त्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मग मुख्यमंत्र्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करत फोटो काढले. नंतर कमला नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या विविध विद्यालयाच्या आणि स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हाक मारली. त्यांनीही मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत मुलांच्या आग्रहास्तव फोटो पण काढले. हाच प्रकार गिरगांव चौपाटी आणि बी.आय.टी. चाळ येथे ही घडला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचा हट्ट पुरवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

गिरगांव चौपाटीवर लुटला क्रिकेटचा आनंद

गिरगाव चौपाटी येथे पाहणीसाठी गेले असता तेथे क्रिकेट खेळणारी मुले मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून पुढे आली. तेव्हा वाहनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरलेले पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांना जवळ बोलवून त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढलेच. याचवेळी या मुलांनी मुख्यमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह ही केला. मग मुख्यमंत्र्यांनी देखील या मुलांचे मन राखून हाती बॅट घेत फटकेबाजी केली. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत क्रिकेट खेळतांना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आपल्या विकासाभिमुख कामांमुळे जनतेत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लहान मुलांचेही तितकेच लाडके असल्याचे आजच्या मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या दौर्‍यात दिसून आले.

००००

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ

मुंबई, दि. 3:  मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्ते, गटारी, नाले सफाई, रस्त्यांची सफाई कामांची पाहणी केली जागोजागी सफाई कामगारांनी त्यांनी संवाद साधला. सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो आहेत असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ झाला. धारावी टी जंक्शन येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधत मुंबईची स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नालेसफाई, रस्ते धुणे याकामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी पायपीट केली.

मुंबईत असलेल्या 24 वॉर्डमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाच वेळी एका वॉर्डमध्ये अन्य चार ते पाच वॉर्डातील सफाई कर्मचारी बोलावून सुमारे तीन ते चार हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून रस्ते, गटारी, पदपथ, नालेसफाई या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सफाई कामगारांचे जथ्थे आज मुंबईच्या एफ उत्तर, जी उत्तर, डी वार्ड मध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या हातात झाडू आणि जोडीला रस्ते धुणारी यंत्रे, फॉगर, स्मोक गन या अत्याधुनिक साहित्याच्या मदतीने स्वच्छतेचा जागर सुरू होता.

प्रदुषणमुक्तीवर उपाय योजना म्हणून मुंबईचे रस्ते धुताना आधी त्यावरील माती उचलून मग उच्च दाबाने पाणी मारून रस्ते धुवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आज पासून सुरू झालेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच बघायला मिळेल. सफाई कर्मचारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर असून मुंबईचे खरे हिरो ते आहेत असे सांगत त्यांनी ठरवले तर मुंबई, स्वच्छ, निरोगी आणि प्रदुषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करा

धारावी भागात मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी असे निर्दोश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, पदपथ यांची देखील साफसफाई करा. संपूण मुंबईत सखोल स्वच्छता मोहिम यशस्वी राबविली तर आमुलाग्र बदल दिसून येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट

मुंबईतील सफाई कामगारांच्या 48 वसाहतींचा कायापालट करण्यात येणार असून गौतम नगर, कासरवाडी येथील वसाहतींना भेटी दिल्या आहेत. यासर्व वसाहतींमध्ये दर्जेदार सोयीसुविधा देण्यात येतील.. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईचे नाव देशात नव्हे तर जगात अग्रक्रमावर येवू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना केले.

सायन हॉस्पीटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. धारावी, शाहू नगर, एकेजी नगर, धारावी, टी जंक्शन, कमला नेहरू पार्क, बाणगंगा तलाव, गिरगाव चौपाटी येथील स्वच्छतेची पाहणी केली. जागोजागी मुख्यमंत्री सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री रंगले क्रिकेटमध्ये

गिरगाव चौपाटीवर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीने छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यांनी छायाचित्र घेतल्यानंतर मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅट दिली आणि आमच्या सोबत खेळा अशी विनंती केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलां सोबत काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हंसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार , जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

००००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...