सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1005

‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तक प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे राजभवन नागपूर येथे १२ डिसेंबरला आयोजन :  मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,दि.10 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे 12 डिसेंबर रोजी सायंकाळी  5.00 वाजता राजभवन नागपूर येथे  आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हा आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने आणि विचारान  समृध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला होणे गरजेचे आहे.या महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्त्व यशस्वीपणे अंगिकारले होते.”महापुरुषांचे कौशल्य विचार” या पुस्तकात महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य  वाढण्यासही मदत होणार आहे. आयटीआयच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार” हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीने तयार केलेल्या या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार  आहे असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बहुआयामी व्यक्तीमत्व स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या नावाने  शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणा-या व्यक्तींना स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान  पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईचे उप आयुक्त दि.दे.पवार यासह आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

मुंबई, दि. ९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.
000

मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण

कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

मुंबई, दि.9 सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे.  जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही.देशाच्या, समाजाच्या  कल्याणासाठी मदत  करतो तेव्हा अनेक व्यक्ती,  समाज  आपल्याशी  जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास,माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. सिंह म्हणाले, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. परस्पर अवलंबिताची बंधने तोडून राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीवेळी मदत केली तर मदत करणाऱ्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे हे पहिले जात नाही. तर कोणत्या व्यक्तीने तातडीने मदत केली हेच पाहिले जाते. समाजात बंधुत्वाची,आणि मदतीची भावना असायला हवी जो समाज एकमेकांना मदत करतो तोच समाज देशाला पुढे घेऊन जातो आणि  इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो.त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचे, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुकच केले पाहिजे असेही केंद्रीय मंत्री श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक विकासासाठी  उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या  संस्थाचे महत्त्वपूर्ण योगदान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक दुसऱ्याला मदत करणे ही आपली परंपरा आहे. दान धर्म ही आपली संस्कृती आहे. समाजासाठी काम करणे हे आपले कर्तव्य व उत्तरदायित्व आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक संस्था आणि कंपन्या शासनासमवेत काम करीत आहेत. उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या  संस्थाचे सामाजिक विकासामध्ये महत्वापूर्ण योगदान ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत  देशात मोठ्याप्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास,आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान आज करण्यात येत आहे.

सांस्कृतीकार्य मंत्री  मुनगंटीवार यांनी वने, आणि मत्स्यव्यवसाय या क्षेत्रात विविध योजना राबवून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा सामंजस्य करार केला. हजारो झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज गुड गव्हर्नन्स या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल अभिनंदन करून खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना एंबेसडर फॉर सोशल इम्पॅक्ट हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मला वडील म्हणून अभिमान आहे. असे सांगून दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सामजिक कार्य करणारे  पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे  यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील  सर्व देशांसोबत दृढ संबंध तयार झाले आहेत. पाच ट्रिलियन डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था बनवण्यासाठी  गतीने काम करीत आहोत. यामध्ये राज्याचा वाटा एक ट्रिलियन डॉलर्स असण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर  नौदल दिन साजरा केला हा  अभूतपूर्व क्षण होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा  क्षण होता.असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. भास्कर चटर्जी, आयकर आयुक्त विकास अग्रवाल, सहआयुक्त निधी चौधरी, सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस सहारिया, माजी सनदी अधिकारी दीपक सानन,माजी सनदी अधिकारी  अजितकुमार जैन, एबीपी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर, आयकर विभागाचे आयुक्त सुमित कुमार,एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, माजी सनदी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्र-कुलगुरू बिना पॉल,इरा खान,सुहानी शहा या मान्यवरांना शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल कल्याण, सायबर सुरक्षा, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या अधिकाऱ्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच मुख्यमंत्री  आणि  केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठीकाम करणाऱ्या सामजिक करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे  यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी अभिनेता अमीर खान, सुहानी शहा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते.

00000

समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान – राज्यपाल रमेश बैस

वर्धा, दि. 9 (जिमाका) : समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे मोठे योगदान आहे. या संस्थांनी जनसेवेचे काम निरंतर सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

विकास भवन येथे रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुबोध मोहिते, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणूगोपाल, रोटरीचे प्रकल्प अधिकारी चंद्रेश मांडविया, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीचे अध्यक्ष मनोज मोहता उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमित विविध सामाजिक संस्था चांगले योगदान देत आहे. कोरोना सारख्या काळात रोटरीसह विविध संस्थांनी आपले योगदान दिले. बालकांच्या शस्त्रक्रिया, आरोग्य तपासण्या यासारखे उपक्रम रोटरी राबवित आहे. महिला सामाजिक क्रांती घडवू शकतात. त्यांना आत्मनिर्भर व स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनासह विविध सामाजिक संस्था देखील योगदान देत असल्याचे राज्यपाल म्हणाले.

रोटरी इंटरनॅशनलचे जगभर नेटवर्क आहे. लोकांची सेवा, त्यांची एकजूट आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही संस्था आपुलकीने काम करते. शांतता प्रस्थापित करण्यासह आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच माता व बालके, शिक्षण अशा विविध क्षेत्रात रोटरीचे काम अभिनंदनीय आहे. देशाला कौशल्य विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासोबतच उद्योग व नव विचारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे, मुलींना सशक्त करण्यासाठी रोटरी सारख्या संस्थांची आवश्यकता आहे, असे राज्यपाल श्री.बैस म्हणाले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सुबोध मोहीते यांनी, आपण समाजासाठी काही देणे लागतो याची भावना प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले. वर्धा सारख्या शहरात राहून मोठे उद्योजक झालेल्या व्यक्तींनी आपण आपल्या गावासाठी काय करु शकू याचा विचार करावा, असे ते म्हणाले. यावेळी आशा वेणूगोपाल, चंद्रेश मांडविया यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यपालांच्याहस्ते मुळ वर्धा येथील रहिवासी आणि आता देशभर वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक कमाविलेल्यांना वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात सद्या मुंबई येथे असलेले भरत मेहता, तुषार व्यास, बैंगलूरू येथील शिरीष पुरोहीत तर दिल्ली येथील डॅा.प्रिती बजाज यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोहता यांनी केले तर आभार महेश मोकलकर यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी सदस्य तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

पुणे, दि. १२ : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी  आहे.”

००००

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा  : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 9 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण देशभरात जन जातीय गौरव दिन (15 नोव्हेंबर) पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध 17 योजनांची माहिती घेऊन अधिकाधिक लाभार्थ्यांनी या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

पेठ तालुक्यातील उस्तळे ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित जनजागृती कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उप विभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, तहसीलदार अनिल पुरी, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी जयवंत गारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हॅनमध्ये योजनांची माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. तसेच ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला आहे, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यावर कमीत कमी वेळात कार्यवाही करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवित आहेत. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन केले.


जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा ही 26 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये जाणार आहे. आतापर्यंत ही यात्रा जिल्ह्यातील साधारण 300 गावात फिरली असून त्यामध्ये अंदाजे सव्वालाख लाभार्थी विविध योजनांमध्ये सहभागी झाले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी यावेळी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या विकसित यात्रेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी 14 आयईसी व्हॅन मिळाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या 17 जनकल्याणकारी योजनांची जनजागृती करीत असून विविध योजनांची माहिती नागरिकांना देत आहेत. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे देशातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड व इतर योजनांच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.

0000000

यांनी घेतले श्री अंबा व श्री एकविरा देवीचे दर्शन

            अमरावती, दि. 9 (जिमाका) : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  यांनी आज सायंकाळी  विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. श्री अंबादेवी संस्थानाच्या वतीने श्रीमती तटकरे यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

           माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, तहसिलदार विजय लोखंडे, विधी सल्लागार जितेंद्र चौधरी, बाल संरक्षण अधिकारी अजय डबले तसेच श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव ॲड. दीपक श्रीमाळी, रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, दिपा खेडेकर, मीना पाठक, किशोर बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

0000

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची वन स्टॉप सेंटर व मुलींच्या निरीक्षण गृहाला भेट; महिला व मुलींशी साधला संवाद  

 अमरावती, दि. 9 (जिमाका) : येथील जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ व शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील महिला व मुलींशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .

 

महिला व बालविकास विभागातंर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या भेटी दरम्यान श्रीमती तटकरे यांनी येथील  सोयीसुविधेबाबत माहिती जाणून घेतली. सेंटरमध्ये राहत असलेल्या महिलाशी त्यांनी यावेळी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहातील मुलींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. मुलींनी स्वत: तयार केलेल्या विशेष कलाकृती व साहित्याचे श्रीमती तटकरे यांनी कौतुक केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, तहसिलदार विजय लोखंडे, विधी सल्लागार जितेंद्र चौधरी, बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. मीना र्निमले, शासकीय मुलींचे निरीक्षण व बालगृहाचे अधिक्षक अरुण गांधी आदी यावेळी उपस्थित होते.

00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाची आसेगावकरांनी घेतली अनुभूती 

छत्रपती संभाजीनगर दि. ९: केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आपापल्या भागातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.  या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी साधलेला दुरदृष्य प्रणालीवरील संवादाचे थेट प्रसारण आसेगावकरांना प्रत्यक्ष अनुभवता आले.

आसेगाव (ता. गंगापूर) येथे आज ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, रथ पोहोचला.  तेथे डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मिना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सरपंच सविता राजगुरू, एल.जी. गायकवाड, संजय खांबायते, के.टी. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.कराड  यांच्या हस्ते‘आयुष्मान भारत’ कार्डचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.

लोकसहभाग महत्त्वाचा

आसेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. लोकसहभाग हा यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे. समाजातील महिला, युवक, शेतकरी यासह सर्वच घटकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवावी. प्रशासकीय यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो. आरोग्याची सेवा देण्यासाठी जनतेला आयुष्मान भारत कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतात. डीबीटीद्वारे निधी वितरण,प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.  देशाच्या सर्वांगिण विकासासाठी  व विकसित भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्वाची असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे- आ. बंब

आमदार प्रशांत बंब म्हणाले, आयुष्मान भारत योजनेमुळे गरजूंवर पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जातात. यामुळे गरीबांच्या आजारावरील खर्चात बचत होवून त्यांना दिलासा मिळतो. विकसीत भारत संकल्पपूर्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे, असे आवाहन आ. बंब यांनी केले.

जिल्हावासियांनी योजनांचा लाभ घ्यावा- डॉ. मीना

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती गावागावात पोहचण्यास मदत होईल. जिल्हयातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. ओमप्रकाश रामवत यांनी संकल्प यात्रेचे जिल्ह्यातील नियोजन, यात्रेद्वारे दिले जाणारे लाभ,विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते.या स्टॉल्सला भेटी देऊन ग्रामस्थांनी विविध योजनांचा लाभ घेतला. शेवटी उपस्थितांनी विकसित भारत संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्र्यांच्या संवादाची घेतली आसेगावकरांनी अनुभूती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले. संपूर्ण देशातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले  आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक कुटुंब मनापासून प्रयत्न करत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. आसेगावकरांनी प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची अनुभूती घेतली.

००००

विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १५ हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग– पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

  • प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित
  • जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम नांद्रे येथे झाला. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. तसेच, जिल्ह्यातील अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता. आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस) आणि वडगाव (ता. तासगाव) या ग्रामपंचायतींमध्येही प्रधानमंत्री यांचे संबोधन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विकसित भारत संकल्प यात्रेला देशभरात मिळत असलेल्या अद्भूत व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रशंसा व्यक्त करत दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेल्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून लाभ देण्यात येत आहे. हा लाभ घेण्यासाठी या यात्रेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण होत आहे. त्यांना जीवन जगण्यासाठी नवे बळ, नवी उमेद मिळत आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित भारताकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरातील आढावा व आगामी संकल्प व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात 15 दिवस सुरू असून, 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. आतापर्यंत 216 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 15 हजारहून अधिक लाभार्थींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये घरकुल,  उज्ज्वला गॅस, मुद्रा, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 तास ही व्हॅन थांबेल. योजनांची माहिती उपस्थितांना देईल. त्यासाठी गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करावी. योजनांचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले.

नांद्रे येथील मुख्य कार्यक्रमास सरपंचा पूजा भोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर  पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरजच्या गटविकास अधिकारी संध्या जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सय्यद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, निशिकांत भोसले – पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर, स्वाती शिंदे, शेखर इनामदार, उपसरपंच अमित पाटील, यांच्यासह विविध यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी, ग्रामस्थ, महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित लाभार्थींना दिली. लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले.

०००००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...