मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1000

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

विधानसभा इतर कामकाज

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर, दि. १४: राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.

यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात बैठक घेण्यात घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की,  दिनांक ३१ मे २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे २६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच ८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे, सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविणे, निवृत्तीवेतन,अंशराशीकरण पुनर्रस्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवाप्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीने सुचविलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन, आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनास सादर करतील. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल.

संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक असून संघटनेने सुरु केलेला संप त्वरीत मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्मंत्र्यांनी यावेळी केले आहे.

यासंदर्भातील निवेदन विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

००००

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे आपल्या व्यथा मांडल्या, शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

सोलापूर,दि.14(जिमाका):- दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झालेले असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीक आलेले नाही, हे सांगत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे थांबत नव्हते. दुष्काळी परिस्थितीची दाहकता व त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्व ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने आज करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधला.

या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावत यांनी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रब्बी पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना खरीप पिकाच्या नुकसानीचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. दुष्काळ पाहणी पथकातील सदस्यांशी संवाद साधत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिके नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

केंद्रीय पथकाने बुधवारी माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, डाळिंब पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी तसेच शासनाच्या जलसंपदा विभागाकडील पाझर तलावाची ही प्रत्यक्ष पाहणी केली व या भागातील पाण्याची व चाऱ्याची सद्य परिस्थिती व शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची ही माहिती त्यांनी जाणून घेतली.

केंद्रीय पथकाच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यात प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीची तसेच यामुळे झालेल्या खरीप व रब्बी पिकाच्या नुकसानीची माहिती दिली.

यावेळी माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव  टिळेकर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. के. वाघमोडे, सोलापूर लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो  चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए .जे शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन एस नरळे यांच्यासह करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी देवा सारंगकर, उपविभागीय कृषी अधिकारी शहाजी कदम, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते

केंद्रीय पथकाचा दोन दिवसाचा दौरा

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवार 13 डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी व शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तर 14 डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, सालसे व नेरले या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. केंद्रीय पथकाकडून या पाहणीचा अहवाल केंद्र शासनाला सादर झाल्यानंतर त्या अहवालानुसार केंद्र शासन आपली मदत जाहीर करू शकते.

चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५७ कोटी निधी मंजूर

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे खेळाडूंना मोठा दिलासा

  • चंद्रपूरचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 14 : जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी  5718.30 लक्ष रुपये  निधी मंजूर झाला आहे. शहरात सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या यादीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भर पडली असून क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत   महत्त्वाचा मानला जात असून विविध क्रीडा संघटनांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, क्रीडामंत्री तसेच शासनाचे आभार मानले आहेत. यापूर्वी या संकुलाकरीता 20 कोटी रुपये खर्च झाले असून 7718.20 लक्ष रुपयांची सुधारीत मान्यता प्रदान करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

मैदानी खेळात चंद्रपूरचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, त्यांना यश मिळाले पाहिजे यासाठी त्यांना क्रीडानुकूल वातावरण मिळावे म्हणूनच पालकमंत्री म्हणून मी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. राज्य सरकारने याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी मागणीची दखल घेत सुमारे 57 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशा भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत.  त्यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानले आहेत.

जिल्हा क्रीडा संकुल सुसज्ज असावे आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा प्राप्त व्हाव्यात, अशी मागणी खेळाडूंनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. श्री. मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. चंद्रपूर या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये अनेक गुणी खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सरावासाठी सुसज्ज मैदान उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच जिल्ह्यातील आदिवासी व इतर सर्व तरुणांना क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेता यावी म्हणून माझा प्रयत्न सुरु आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मिशन ऑलम्पिक 2036 ची तयारी करत असताना, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेची जबाबदारी चंद्रपूरवर सोपविण्यात आली ही अतिशय अभिमानाची बाब आहे . याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही जिल्हा क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीर केलेला निधी हा खेळाडूंचे मनोबल उंचाविणारा आहे, अशी प्रतिक्रियाही ना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

सदर क्रीडा संकुलामध्ये प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, ड्रेनेजसह मुला-मुलींचे वसतिगृह, फर्निचर, मल्टीपर्पज इंडोअर गेम बिल्डिंग, बास्केटबॉल, टेनिससह सर्वच खेळांची सोय, प्रशासकीय इमारत, प्रेक्षक गॅलरी, कोचेस रूमसह जलतरण तलाव, जिम्नेशियम साहित्य, उत्तम शिल्पकला इत्यादींची निर्मिती होणार आहे.

याशिवाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन यापूर्वीच विकासकामांचा धडाका लावून आणलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपूरसह विदर्भाचा अभिमान ठरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन;  त्यामुळे देशात वाढलेला चंद्रपूरचा गौरव याचे श्रेय सुधीर मुनगंटीवार यांचेच आहे.

या सोबतच प्रामुख्याने देशाचा मानबिंदू असलेली वन अकादमी,  देशाच्या संरक्षणासाठी लढणारे वीर जवान घडविण्यासाठी देशाचा वैभव वाढविणारी सैनिक शाळा, बल्लारपूर येथील सुसज्ज क्रीडा संकुल, आंतरराराष्ट्रीय दर्जाचा स्मार्ट  सिंथेटीक ट्रॅक, मूल येथील कृषी महाविद्यालय, मूल, पोंभुर्णा येथील क्रीडा संकुल, चंद्रपूर शहरातील सर्व सुविधायुक्त बॅडमिंटन हॉल,  बांबू संशोधन केंद्र,  शहरातील आकर्षक रामसेतू, बाबुपेठ येथील उड्डाणपूल या आणि अशा अनेकविध कामांमुळे  ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराला प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर स्थान प्राप्त करून दिले आहे.

00000

विधानसभा प्रश्नोत्तरे :

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मंत्री धनंजय मुंडे

नागपूर, दि. 14 : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला, तरी ती राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.

कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके, नाना पटोले, ॲड. आशिष शेलार, बबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

 

00000

श्री. दिपक चव्हाण/विसंअ/

——————————————————————————-

‘किसान’ योजनेतून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही– कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपूर दि. 14: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही. यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे ९६ लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी १२ ते १३ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.  पीएम किसान योजनेच्या  १४ व्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी, महसूल व भूमीअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या या अटींची पूर्तता करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

जे शेतकरी अल्प भूधारक  किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र, या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, अशी माहितीही मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या विषयावर सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही उपप्रश्न विचारले.

000

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

—————————————————————————–

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील अनियमिततेबाबत कारवाई करणार – मंत्री दिलीप वळसे पाटील

 नागपूर, दि. 14: राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात येईल. तसेच बँकेतील अनियमिततेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अधिकची माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, बँकेची अशा प्रकारची चर्चा झाल्यामुळे भितीपोटी बँकेतील सभासदांनी 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या. बँकेत 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत 1844 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेला कुठल्याही प्रकारे क्षती पोहचणार नाही, याची काळजी शासन घेईल. बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन पूर्णपणे बँकेच्या पाठीशी आहे.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाला कर्जाचे व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार संचालक मंडळाने कर्जाचे व्याजाचा दर ९ व १४ टक्के वरून ७ टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने एकूण १४ ठराव मंजूर केले आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेला ठराव दुरुस्त करायला सांगितले असून बँकेने सदर ठराव रद्द केले आहेत.

या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य श्रीमती यामिनी जाधव, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, हरिभाऊ बागडे, अजय चौधरी, बाळासाहेब पाटील यांनी भाग घेतला.

0000

श्री. निलेश तायडे/विसंअ/

 

विधानसभा लक्षवेधी

महाराष्ट्र – कर्नाटक पाणी वाटप करारासाठी शासन प्रयत्नशील– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकार महाराष्ट्राकडे पाणी मागते. त्यानुसार महाराष्ट्र सरकार पाणी कर्नाटकला देते. मात्र राज्याला पाणी आवश्यक असल्यास कर्नाटककडे पाणी मागितले जाते. तेव्हा कर्नाटक कडून  सहजरित्या मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यासाठी कर्नाटकसोबत कायमस्वरुपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,  अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

याप्रकरणी सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, कोयना धरणात ८६ टी.एम.सी पाणी उपलब्ध असून १४ टी.एम.सी पाण्याचा तुटवडा आहे. सांगली जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडत असताना खंड पडला. मात्र सद्यस्थितीत कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ताकारी योजनेचे पंप नियमित सुरू आहे. नदी कोरडी पडल्यानंतर जमिनीत पाणी मुरण्याची शक्यता लक्षात घेता पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी सोडताना खंड न पडण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. दुष्काळ असल्यामुळे एप्रिल – मे महिन्यात गरज पडल्यास वीज निर्मिती कमी करून पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात येईल. आंतरराज्य पाणी वाटप असल्यामुळे याबाबत नियमात बसून कार्यवाही करण्यात येईल.

पाणी वाटपाबाबत कुठेही संघर्ष होवू दिला जाणार नाही. सगळीकडे सुरळीत पद्धतीने पाणी वाटप करण्यात येईल. पाणी देताना सर्वप्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला देण्यात येईल. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू राहतील, याची खबरदारी शासन घेईल. कर्नाटक राज्याकडे शिल्लक असलेले पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना मिळण्यासाठी कर्नाटक सरकारला तसे पत्रही देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, संजय शिंदे, विक्रम सावंत, शिवेंद्रराजे भोसले, विश्वजित कदम यांनी भाग घेतला.

00000

निलेश तायडे/विसंअ

—————————————————————————–

सोशल मीडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४ : ‘महादेव ॲप’ या ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या विरोधात विविध राज्यात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महादेव ॲप ही मूळ कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर ६७ वेगवेगळ्या वेबसाइट्स तयार करण्यात आल्या. या वेबसाइटचे मालक वेगवेगळे असले तरी त्यांची भागीदारी या महादेव ॲपमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, या ॲपची नोंदणी ही दक्षिण अमेरिकेत करण्यात आल्याचे निदर्शनास आले. राज्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने यात कोणाकोणाची गुंतवणूक आहे, हा पैसा कुठून आला आहे, याचा तपास विशेष पथक करीत आहे.  याप्रकरणी दोन महिन्यांत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती अनेक नामांकित व्यक्ती करत असल्याचे दिसते. त्यांनी अशा जाहिराती टाळाव्यात. तसेच या ऑनलाइन गेमिंगसंदर्भात काही प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रण आणणारी पावले केंद्र सरकारने टाकावीत, अशी विनंती केंद्र शासनाला केली जाईल. त्यानंतर यासंदर्भात उशीर होत असेल तर राज्य शासन राज्यापुरती अशी नियमावली निश्चितपणे करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासन सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसंदर्भात एकत्रित धोरण आणत आहे. त्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे सहकार्य घेतले जात आहे. यासंदर्भात राज्य शासनाने निविदाही प्रसिद्ध केली असून पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यापर्यंत हा प्लॅटफॉर्म तयार होईल. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग, डीपफेक अशा आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकू, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदस्य बच्चू कडू, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ॲड. वर्षा गायकवाड आणि आदित्य ठाकरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000

श्री. दीपक चव्हाण/विसंअ/

——————————————————————————–

नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी ऑनलाईन रिपोर्टिंग व्यवस्था उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: राज्यामध्ये रोहित्र नादुरुस्त होणे, रोहित्रांची क्षमता वृद्धी करणे तसेच विजेचा दाब वाढल्यामुळे रोहित्र जळणे आदी प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नादुरुस्त रोहित्र तीन दिवसांत दुरुस्त करून देण्यासाठी नवीन जलद प्रतिसाद मिळण्यासाठी ऑनलाईन रिपोर्टिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रोहित्र नादुरुस्तेची सूचना किंवा तक्रार ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी एका ॲपची निर्मिती करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून कुठलाही नागरिक रोहित्राबाबत ऑनलाईन तक्रार करू शकतो. तक्रार केल्यानंतर तीन दिवसांत नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात येईल. दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. ऑटो पॉप्युलेटेड पद्धतीवर ॲप असल्यामुळे वापरण्यास सुलभ आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रथमच अर्थसंकल्पात प्रथमच नादुरुस्त रोहित्र बदलवून देणे, रोहित्रांची क्षमता वृद्धी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आर.डी.एस.एस (रेव्हॅम्पड डिस्ट्रिब्यूशन सेक्टर स्कीम) या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज वितरण यंत्रणा अद्ययावत व नवीन यंत्रणा उभारण्यात येईल.  राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून  39 हजार कोटी रुपयांची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध कामे निविदा प्रक्रियेत आहेत. येत्या काळात वीज वितरण क्षेत्रात अतिरिक्त पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे . प्रत्येक जिल्ह्याला,  तालुक्याला या योजनेतून निधी दिला आहे.  औसा विधानसभा मतदारसंघात आरडीएसएस योजनेअंतर्गत  ३३/११ केव्ही क्षमतेची ७ उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहे. तसेच आर. डी. एस. एस योजनेंतर्गत ११ उपकेंद्राचे क्षमता वृध्दी करण्यात येणार आहे. नादुरुस्त 723 रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहे.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्राजक्त तनपुरे, राम सातपुते, बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांनी भाग घेतला.

0000

श्री. नीलेश तायडे/विसंअ/

—————————————————————————–

पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 14 : पुणे महानगरपालिका हद्दीत 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला तर 2021 मध्ये 23 गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नव्याने विनापरवाना अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेऊन अशी बांधकामे होतानाच ती थांबवण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील टिंगरे यांनी बांधकामे पूर्णत्वास जात असताना त्यावर कारवाई करण्यात येत असल्याने नुकसान होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या 11 गावांसाठी पुणे महानगरपालिका नियोजन प्राधिकरण आहे. तर, 23 गावांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाली आहे. या गावांसाठी विकास आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी देणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे इत्यादी बाबी नियोजन प्राधिकरणामार्फत करण्यात येतात.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमातील तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे अनधिकृत बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसार नियमान्वित करणे शक्य असल्यास सदर बांधकाम ‘प्रशमित संरचना’ म्हणून नियमान्वित करण्याची तरतूद केलेली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून 104 अनधिकृत बांधकामे नियमान्वित करण्यात आलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अस्तित्वात आला असून यामध्ये 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनधिकृत बांधकामे व मोकळे भूखंड नियमान्वित करण्याची संधी 31 डिसेंबर 2023 पर्यंत पुणे शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर अधिनियमान्वये सन 2021 पासून पुणे महानगरपालिकेकडून 24 बांधकामे नियमान्वित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या मान्य एकत्रित विकास नियंत्रित व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार अल्प भूखंडधारकांना बांधकाम करण्याकरिता तरतूद उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

००००

श्री. बी.सी. झंवर/विसंअ/

—————————————————————————-

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 14 : महाराष्ट्राला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जमिनीवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य श्रीमती जयश्री जाधव यांनी शाहू स्मारक कधी पूर्ण होणार यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारावयाची जागा वस्त्रोद्योग विभागाच्या मालकीची आहे. सदर जागा कोल्हापूर महानगर‍पालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत महानगरपालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शाहू मिलची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची ग्वाही दिली असून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येऊन या कामाला गती देण्यात येईल, असे श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

श्री. बी.सी. झंवर/विसंअ/

——————————————————————————- 

हिंगणा तालुक्यातील इसासनी, निलडोह, डिगडोह पाणीपुरवठा योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर, दि. 14 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या कामांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, ही कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समीर मेघे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.  मंत्री श्री. पाटील म्हणाले, इसासनी-वागधरा योजनेला 28 डिसेंबर 2018 रोजी तर निलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला 4 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता देण्यात येऊन 17 सप्टेंबर 2019 रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. या योजनांचा मूळ कालावधी 18 महिन्यांचा होता. तथापि, कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे कामे बंद असल्याने कामांना उशीर झाला. कंत्राटदाराने कोरोना कालावधी वगळता इतर कालावधीमध्ये बारचार्टप्रमाणे कामे पूर्ण न केल्याने कंत्राटदारावर 16 सप्टेंबर 2021 पासून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. आता ही कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल.

०००००

श्री. बी.सी. झंवर/विसंअ/

———————————————————————————— 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार मंत्री गुलाबराव पाटील 

नागपूर,दि.14: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे यासाठी राज्य सरकार शिफारस करेल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य सुनील कांबळे, मोहनराव हंबर्डे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठित करण्यात आला होता. या आयोगाच्या ६८ शिफारशींची शासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्जपुरवठा वितरित केला जात आहे. राज्य सरकारने महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटीं रुपयांवरून १ हजार कोटी केले आहे. बीज भांडवल ४५ टक्के आणि थेट कर्ज मर्यादा २५ हजारांहून एक लाख रुपये करण्यात आले आहे. कर्ज पुरवठ्याबाबत जिल्हा व तालुक्यातील अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले जाईल. कर्जासाठी पात्र असलेल्यांना कर्ज पुरवठा केला जाईल, अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

राज्य सरकार मातंग समाजाच्या पाठिशी आहे. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गायकवाड नवीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना जमीन देण्याचे धोरण आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. मातंग समाजासाठीच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. राज्य सरकार मातंग समाजाच्या कायम पाठिशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मातंग समाजाचे काही प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांसाठी अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांत बैठक घेतली जाईल. तसेच राज्यातील प्रत्येक न्यायालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

०००

श्री. पवन राठोड/विसंअ/

 ——————————————————————————–

निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त गावातील अतिक्रमणासंदर्भात प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव ठेवणार- मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील

नागपूर, दि. 14 : निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त गावांमधील अतिक्रमणधारकांना न्याय देण्यासंदर्भात राज्य प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत दिली.

सदस्य दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील निंबोली, अहिरवाडा, इठलापूर, सर्कसपूर, वाठोडा, भाईपूर, अंबिकापूर, वागदा, नेरी, पिपरी, अल्लिपूर, टोणा, राजापूर, बोरगांव, बाभूळगांव व आष्टी तालुक्यातील सावंगा या गावातील भूमिहीन, बेघर व अतिक्रमित नागरिकांना नवीन पुनर्वसनमध्ये भूखंड मिळाले नसल्याबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत एकूण २० गावे बाधित झालेली असून २३ नवीन पर्यायी गावठाणे वसवून पुनर्वसन करण्यात आलेले आहे. नवीन पुनर्वसित गावठाणात पात्र प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आल्याचे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत ४ हजार ४४४ बाधित कुटुंबे असून बाधित कुटुंबातील सदस्य संख्या विचारात घेऊन पुनर्वसन अधिनियमातील निकषानुसार त्यांना ५३८४ भूखंड वाटप करण्यात आले आहेत. बाधित गावठाणातील भूमिहीन व बेघर कुटुंबांना १८४ भूखंड वाटप करण्यात आले आहेत. या प्रकल्पातील अतिक्रमणधारकांना भूखंड देण्याची मागणी होत आहे. केवळ अतिक्रमित क्षेत्रामधे घरे असल्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, याबाबत नक्कीच विचार केला जाईल. प्रकल्प बाधित गावांना १८ नागरी सुविधा दिल्यानंतर २०१७ मध्ये ग्रामविकास विभागाकडे वर्ग केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना नियमित करण्याचे काम सुरू आहे ते लवकरात लवकर केले जाईल. बाभूळगाव येथील भूखंड आणि त्या व्यतिरिक्त काही मागण्या असतील, तर त्यासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन मार्ग काढू, असे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सभागृहात सांगितले.

०००

श्री. पवन राठोड/विसंअ/

संसदीय परंपरेत महाराष्ट्र विधिमंडळाचे उच्चस्थान- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर, दि. १४ :  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय, कायदे, विधेयकांवर पक्ष विरहित वैचारिक चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्र विधीमंडळ हे संसदीय परंपरेत उच्चस्थानी आहे आणि ही परंपरा निर्माण करण्यात विधिमंडळाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परातील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात मार्गदर्शन करताना श्री. दानवे बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिव श्री. विलास आठवले उपस्थित होते.

श्री. दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ तर विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. दोन्ही सभागृहे एकमेकास पूरक असून विधिमंडळात वरिष्ठ सभागृहाला महत्वाचे स्थान आहे. कनिष्ठ सभागृह नेहमीच वरिष्ठ सभागृहाचा सन्मान ठेवते. कनिष्ठ सभागृहाने घेतलेल्या निर्णयावर या सभागृहात चिकित्सक पद्धतीने चर्चा घडवून आणली जाते. एखाद्या विधेयकांवर, कायद्यांमध्ये वरिष्ठ सभागृह बदल सुचवून ते पुन्हा कनिष्ठ सभागृहाकडे पाठवते. कनिष्ठ सभागृह याचा आदर करून याबाबत सकारात्मक प्रतिसाद देते. यातूनच द्विसभागृह पद्धतीचे महत्व अधोरेखित होते.

द्विसभागृहाचे वैशिष्ट्य सांगताना श्री. दानवे म्हणाले, दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाने अभ्यास वर्गाच्या माध्यमातून, ‘राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन’ या  विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विधिमंडळाचे कामकाज समजून घेण्याची संधी दिली आहे.  विद्यार्थ्यांनीही या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा श्री. दानवे यांनी व्यक्त केली.  राज्य, देशाचे भवितव्य तरुणांच्या खांद्यावर असून युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने लोकशाहीच्या बळकटीकरणास तरुणांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी मोहिनी वानखडे हिने आभार मानले.

००००

श्री. एकनाथ पोवार / ससं/

पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूरदि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी मॉरिशस येथे बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारण्याकरीता आठ कोटी रुपयांचा निधी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मॉरिशसचे मंत्री ॲलन गानूराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपर्यटन मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विकास महामंडळाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील,मॉरिशसचे हसन गानूउपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जगात नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होत आहे. मॉरिशसमध्ये उभारण्यात येणाऱ्या पर्यटन संकुलामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांसह ऐतिहासिकसांस्कृतिकधार्मिक स्थळांची माहिती होईल. यापुढेही मॉरिशसला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मॉरिशसबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील आणि मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाईल.

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभारत आणि मराठी संस्कृतीची जोपासना करणारा सुंदर असा मॉरिशस हा देश आहे. तेथे महाराष्ट्रातील संस्कृती रुजली आहे. मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या संकुलासाठी ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मॉरिशस हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा देश आहे. या संकुलामुळे राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

मॉरिशसचे मंत्री श्री. गानू यांनी सांगितले कीमॉरिशस आणि महाराष्ट्रातील संस्कृतीत साम्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्त्रोत आहे. मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशस आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिकसामाजिककला क्षेत्रातील संबंध आणखी दृढ होतील. मॉरिशसमध्ये गणेशोत्सवशिवजयंतीसह विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुल वेळेत पूर्ण होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. महाराष्ट्रातून मॉरिशसमध्ये येणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेतअसेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती भोज यांनी प्रास्ताविकात बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची माहिती दिली. पर्यटन विकास महामंडळाचे संचालक डॉ. पाटील यांनी आभार मानले. यावेळी राज्य आणि मॉरिशसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘क’, ‘ड’ संवर्गातील भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने संपन्न

नागपूर, दि.१३ : आरोग्य विभागातील गट ‘क ‘ आणि ‘ ड’ संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये तीन सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

२०२१ मध्ये या संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु नव्याने जाहिरात देऊन पदभरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रक्रियेनुसार टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स व्यवस्था करण्यात आलेली होती.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदांसाठीची परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली. ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रा. डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन प्रत्येक परीक्षा केंद्रावर संनियंत्रण ठेवण्यात आले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये आरोग्याच्या संदर्भात तातडीच्या वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी स्वतःचे लेखनिक किंवा विभागाकडील लेखनिक उपलब्ध करुन देण्यात आले होते. संवर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर त्या उमेदवाराने सोडविलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका दि. १५.१२.२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांना चुकीचे प्रश्न, प्रश्नांची चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी आक्षेप / हरकती नोंदविण्यासाठी दि. १८.१२.२०२३ ते २०.१२.२०२३ या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहे. आक्षेप / हरकतींचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ही परीक्षा पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी विभागातील अधिकारी व टिसीएस यांचे प्रतिनिधींशी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. या भरती प्रक्रियेमुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे .

000

महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर,दि.13 : सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात पडत आहेत. सोशल मीडियावर महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी ट्रोलिंगची पद्धत आली आहे, मात्र महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता सामोरे जावून प्रतिकार करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांना सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ कार्यक्रमात डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील महिला सदस्या उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या छळांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांच्या वाईट नजरा, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचा लैंगिक छळ याबाबत आलेल्या कायद्याचा महिलांनी वापर करावा. महिला लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सायबर क्राईमबाबत आवाज उठविणे आवश्यक असून सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये काम कसे चालते याची माहिती घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला तक्रार समित्या असून याचा आढावा कोणी घ्यावा, याबाबत स्पष्टता नसल्याने बैठका होत नाहीत, यावरही आवाज उठविला जावा. महिलांच्या छळवणूक, तक्रारीचा प्रत्येक विभागाचा अहवाल महिला व बालविकास विभागाकडे येत असल्याने या विभागाचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या विभागासाठी असणारा निधी, पदांची शासनाने दखल घ्यावी.

संसदेप्रमाणे महिलांनी प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी 33 टक्के महिला आणि 33 टक्के अधिकाऱ्यांनी मिळून बैठका घेवून महिलांच्या समस्या, अडचणी सोडविणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक, महिला आमदार, महिला आयोग सदस्य यांचीही बैठक घेवून महिलांच्या समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करून सोडवणूक करण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.

ग्रामीण आणि शहरी भागातील सायबर क्राईमबाबत महिलांच्या तक्रारी येतात, मात्र पुरावा मिळत नसल्याने आरोपी सापडत नाही, अशावेळी सायबर तज्ज्ञांची मदत घेवून अशा तक्रारींचा निपटारा करणे शक्य होणार आहे. महिलांनी अश्लिल संदेश, घाणेरडे बोलणे याबाबत 112 नंबरवर तक्रार करता येते, अशावेळी पोलिसांची मदत घेणे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाचा प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा-कु. आदिती तटकरे

सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यम आली आहेत. सोशल मीडिया प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञाकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोग महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांच्या सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन श्री. गादिया यांनी केले.

वैद्यकीय आरोग्य सेवा गट ‘ब’ संवर्गाची अंतरिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द

मुंबई, दि. १३ : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब संवर्गामध्ये बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक पथके, आयुर्वेदिक दवाखाने, कारागृह यांचे आस्थापनेवर कार्यरत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट ब संवर्गामध्ये एकूण १२८५ पदे मंजूर असून १०४७ पदे भरलेली आहेत व २३८ पदे रिक्त आहेत. या संवर्गाची अंतरीम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्येष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आरोग्य मंत्री यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

संवर्गातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांची दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजीची अंतरिम ज्येष्ठता सूची शासन परिपत्रकानुसार दिनांक ११ डिसेंबर २०२३ अन्वये प्रसिदध करण्यात आलेली आहे. ज्येष्ठतासूची बाबत काही आक्षेप असल्यास १ महिन्याच्या आत सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. मुदतीअंती अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्यात येणार आहे.

अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांचे नियमित महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब या संवर्गात सन २०१९ मध्ये समावेशन करण्यात आले होते. तेव्हापासून जेष्ठतासूची प्रसिध्द झाली नव्हती. जेष्ठतासूची वैद्यकीय अधिकारी गट-ब यांचे समावेश करण्यात आल्यानंतर प्रथमच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जेष्ठतासूची प्रसिध्द केल्यामुळे संवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नती व इतर सेवाविषयक बाबीची पूर्तता व निपटारा करणे सुलभ होणार आहे.

000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...