रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 921

‘चांदा ते बांदा’ योजनेला मिळणार गती

मुंबई, दि. 15 : चांदा ते बांदा योजनेंतर्गत सर्व कामे गतीने करावीत. पर्यटन विभागाचा  या योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले.

चांदा ते बांदा योजनेंतर्गत मंत्रालयात आयोजित बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभाच्या सचिव शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, शालेय शिक्षण विभाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सिंधुदुर्ग  जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यात असलेले प्रत्येक पर्यटन स्थळ विकसित झाले, तर येथील पर्यटनाला सर्वाधिक वाव मिळेल. स्थानिक ठिकाणी विकासाला चालना मिळून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चांगल्या सुविधा मिळावे त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतील सर्व कामे गतीने करावी. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या भागातील पर्यटनाचा विकास करावा.

चांदा ते बांदा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शिल्प ग्राम, हेल्थ पार्क भोसले उद्यान व रघुनाथ मार्केट, स्पाइस व्हिलेज(वेंगुर्ला), दिशादर्शक फलक ही कामे पूर्ण आहेत. या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या योजनेतील उर्वरित सर्व कामे पुढील एक वर्षात पूर्ण करायची आहेत.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी 25 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित कामांमध्ये रेल-ओ- टेल (सावंतवाडी रोड), महाराष्ट्र गोवा सीमेवरील सुशोभीकरण. (बांदा), आंबोली येथील साहसी क्रीडा प्रकार, जंगल सफारी, फुलपाखरू उद्यान ही कामे, नवाबाग फिशिंग व्हिलेज (वेंगुर्ला), नरेंद्र डोंगर (सावंतवाडी), यशवंत गड (दोडामार्ग), भरतगड किल्ला (मसुरे, मालवण), नापणे (वैभववाडी) व सावडाव धबधबा (कणकवली), कर्ली खाडी (तारकर्ली, मालवण), तिल्लारी धरण (दोडामार्ग), आरोंदा खाडी (शिरोडा), निवती -(वेंगुर्ला), मोनोरेल (सावंतवाडी भोसले उद्यान) या चांदा ते बांधा योजनेतील पर्यटन विभागाशी संबंधित कामासाठी उपलब्ध निधी मार्च 2025 पर्यंत खर्च करण्यासाठी मान्यता मिळावी, अशी सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, १५ :- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, आदिवासी विकास विभाग, भारतीय लघु उद्योग विकास बॅंक, खादी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे आयोजन १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए च्या मैदानावर होणार आहे.

या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खासदार पूनम महाजन, आमदार झिशान सिद्दिकी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, भारतीय लघु उद्योग विकास बँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामन, महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला उपस्थित राहणार आहेत.

या एक्स्पोमध्ये खादी वस्त्रांच्या सोबतच महाराष्ट्रातील लघु उद्योजकांची निर्मिती असलेल्या पैठणी, हिमरु शाल, बांबूच्या वस्तु, वारली पेंटिंग, महाबळेश्वर मधुबन मध, कोल्हापुरी चप्पल, मसाले, केळीचे विविध पदार्थ इत्यादींसोबतच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. कापड उद्योग आणि फॅशन इंडस्ट्री याची वाढ आणि विकास यावरील चर्चासत्रे, परिसंवाद याशिवाय  फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. तसेच याठिकाणी उभारण्यात येणा-या ‘एक्सपिरीएंस सेंटर’ मध्ये   चरख्यावरील सूतकताई, हातमागावर कापड निर्मिती, बांबूच्या वस्तुची निर्मिती आदींचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिक १६ ते  २५ फेब्रुवारी दरम्यान अनुभवता येणार आहे.  नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

००००

मनिषा सावळे/विसंअ

‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि.१५:-पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या  उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित  ‘स्कोच’च्या (SKOCH) रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कोच (SKOCH) समूह हा 1997 पासून सर्वसमावेशक वाढीवर लक्ष केंद्रित करून सामाजिक-आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य थिंक टँक आहे. हा समूह देशाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. हा समूह विविध शासकीय संस्था, खाजगी संस्था यांच्याशी संलग्नित आहे.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, एमटीडीसी अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.

‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम पर्यटनमंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली, पर्यटन सचिव श्रीमती भोज आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.  एमटीडीसीची ३० पर्यटन निवासे, २९ उपहारगृहे, २ बोट क्लब आणि २ अभ्यागत केंद्रे, आयआयएसडीए (Indian institute of scuba diving and aquatic) स्कूबा डायव्हिंगसाठी ओळखली जाणारी आणि जलक्रीडांना समर्पित आयआयएसडीए, अजिंठा वेरुळ अभ्यागत केंद्र, वॉटरपार्क या ठिकाणी या उपक्रमाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

घारापुरी लेणी (एलिफंटा), खारघर, टिटवाळा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा, फर्दापूर, अजिंठा टी पॉईट, लोणार, गणपतीपुळे, तारकर्ली, इसदा, वेळणेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, महाबळेश्वर, कार्ला, पानशेत, माळशेज घाट, माथेरान, भिमाशंकर, कोयना, नागपूर, ताडोबा, बोधलकसा, वर्धा, सिल्लारी, भंडारदरा, शिर्डी, ग्रेप पार्क, बोट क्लब नाशिक, चिखलदरा इ. ठिकाणी ‘जबाबदार पर्यटन’ या उपक्रमांतर्गत ‘एमटीडीसीची’ पर्यटक निवासे आहेत.

पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, रोजगाराला चालना मिळावी यासाठी ‘एमटीडीसी’ सदैव प्रयत्न करत आहे.  उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून, इतर कोणताही खर्च न करता एमटीडीसी हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. ‘जबाबदार पर्यटन’ अंतर्गत स्वच्छता मोहीम, पर्यटकांसाठी माहितीपूर्ण फलक, कोणतेही संरक्षक किंवा कृत्रिम पदार्थ किंवा कृत्रिम रंग नसलेल्या आरोग्यदायी आहारावर लक्ष केंद्रित करणे आणि एमएसजी, प्लास्टिक चा वापर टाळणे, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम करत आहे. एमटीडीसीच्या ‘भूमिपुत्र’ धोरणाद्वारे रोजगार आणि पर्यटन प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

‘जबाबदार पर्यटन’ मध्ये शाश्वत संसाधन व्यवस्थापन, नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समुदाय सहभाग यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम वन्यजीव सफारीला प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक वाहतूक पर्यायांद्वारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करत आहे. याव्यतिरिक्त स्थानिक समुदायांकडून वस्तू आणि सेवा मिळवून स्थानिक अर्थव्यवस्थांना बळकटी मिळत आहे.  पर्यटन स्थळांची सखोल माहिती देणे, पर्यटकांमध्ये जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि भागधारकांसोबत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये राज्याला अग्रस्थानी ठेवण्यासाठी  ‘एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. जयस्वाल प्रयत्नशील आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 15 : बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा अभिवादन कार्यक्रम झाला.

संत सेवालाल महाराज जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, दिनेश चव्हाण, कक्ष अधिकारी तुषार राठोड, शिवाजी चव्हाण, निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.

००००

प्रवीण भुरके/स.सं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १५ :- संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जागतिक बँकेच्या पथकाकडून जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी

कोल्हापूर, दि. १४ (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता (उत्तर) स्मिता माने, कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या पथकाने व्हीनस कॉर्नर, सुतार वाडा, आंबेवाडी, प्रयाग चिखली, राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पुल या क्षेत्रांची तसेच जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची व  दुधाळी येथील महानगरपालिकेच्या एसटीपी प्लॅन्टची पाहणी केली. तसेच पूर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपाययोजनांबत चर्चा केली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे. यातील 3200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील पूर परिस्थिती, पूर परिस्थितीत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी, पुरामुळे शेती, होणारे नुकसान, बाधित गावे, भूस्खलन होणारी गावे या विषयीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या पथकाला दिली.

पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीच्या वाढत जाणाऱ्या पाणी पातळीच्या नोंदी सन 1988 पासून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळीवरुन घेण्यात येतात. यावरुन पूर परिस्थितीचा अंदाज घेतला जातो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी दिली.

०००

जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि. १४ (जिमाका): जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स. क्र. १३ (९२पै), महाजनवाडी, मीरा रोड येथे उभारण्यात आलेल्या ‘मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय’ तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या ‘फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्रा’चे ई-अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडले, तसेच जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले आणि रुग्णालयाची पाहणी केली.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार पराग शहा, माजी आमदार रवींद्र फाटक, आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.), पोलीस आयुक्त मधुकर पाण्‍डेय, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दीपक खांबित या मान्यवरांसह विभागप्रमुख, माजी नगरसेवक/नगरसेविका, महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आज लोकार्पण केलेल्या या रुग्णालयाची मी पाहणी केली. हे रुग्णालय पंचतारांकित दर्जाचे आहे. या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवनवीन विकास कामे सुरू आहेत, बंद असलेली विकास कामे पुन्हा वेगाने सुरू केली आहेत. दहिसर ते डहाणू, विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचे काम हाती घेतले आहे. ॲक्सेस् कंट्रोल, ग्रीन फील्ड पद्धतीने पनवेल-गोवा महामार्गासह इतरही महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल.

गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळे आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली. सुमारे साडेबारा कोटी जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली असून मागील दीड वर्षात 180 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे देण्यात आली. सर्वसाधारण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले की, मागील काही काळात जवळपास ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य पूर्व तपासणी (Early Detection) महत्त्वाची असून त्यामुळे आजाराचे निदान लवकर होवून संबंधित आजारावर लवकर मात करता येते. ‘आयुष्यमान भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली मोठी भेट आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनही उत्तम काम करीत आहे. ‘फिरती आरोग्य सेवा’ ही संकल्पना सर्वत्र राबवित आहोत.

 

‘डीप क्लीन ड्राईव्ह’ बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियान ही एक चळवळ बनली आहे. मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरून काम करीत आहेत त्यामुळे अधिकारीही फील्ड वर काम करताना दिसत आहेत. असेच सर्वत्र दिसायला हवे, शासन आणि प्रशासनाने लोकांच्या कामांसाठी मैदानात जायला हवे. या अभियानामुळे प्रदूषण कमी होत आहे. या अभियानाला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या यशाचे खरे श्रेय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांनी चांगले काम केले. म्हणूनच  त्यांनाही आपण सोयीसुविधा दिल्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करायला हवे,असे आवाहन करीत मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, क्लस्टर विकास (Cluster Developement) योजनेला मंजूरी देऊन त्यातून गरजू लोकांना घरे देत आहोत. राज्यात 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील शाळा चांगल्या सर्व सोयीसुविधायुक्त असाव्यात, त्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे,यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे.

आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन यांचे उत्तम काम करत असल्याबाबत अभिनंदन करून मीरा-भाईंदर या शहरातही कॅन्सर हॉस्पिटल उभे करू. त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी घरे या विषयाबाबतही योग्य निर्णय घेवू,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चुकीचे वृत्तांकन होणार नाही किंवा अफवा पसरू नये, याची काळजी घेत जबाबदारीने सकारात्मक वृत्तांकन केल्याबद्दल मीरा-भाईंदर या परिसरातील पत्रकारांचा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तम काम केल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पाण्‍डेय व मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांचाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मीरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहालगतच मीरा-भाईदर महापालिकेचे पहिले कॅशलेस रुग्णालय बांधण्यात आले आहे. शहरातील पहिले व राज्यातील हे दुसरे सरकारी कॅशलेस  रुग्णालय असणार आहे. या रुग्णालयात एकंदर १०० खाटांची सुविधा आहे. रुग्णालयाची इमारत महापालिकेला विकासकाकडून मोफत बांधून मिळाली आहे तर रुग्णालयात आवश्यक असलेली सर्व आधुनिक यंत्रसामग्री व वैद्यकीय उपकरणे आमदार श्री. सरनाईक यांच्या प्रयत्नातून खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत होणार आहेत. कर्करोग उपचारासह अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर अशा अनेक मोठ्या शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार या ठिकाणी मोफत होणार आहेत. त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधा पत्रिकाधारक रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. उद्यापासून या रूग्णालयात ओपीडी सुरू होणार असून पुढील १० दिवसात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाची मान्यता घेवून गरजू रूग्णावर आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

०००

 

गरजूंना घरकुल मिळण्यासाठी अतिक्रमणे नियमानुकूलची कार्यवाही गतीने पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. १४ : सर्वांसाठी घरे या धोरणातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील भूमिहीन लाभार्थ्यांची गावठाण, गायरान, शासकीय, पुनर्वसन व अन्य जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करुन गरजूंना घरकुल उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृती दलाची बैठक डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपायुक्त संजय पवार, श्री. फडके, श्री. जोशी, कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजनेंतर्गत घरकुलांची अपूर्ण कामे गतीने पूर्ण करण्यात यावी. सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना, दलित वस्ती सुधार योजना व आदिवासी विकास विभागाची शबरी, पारधी, आदिम जमाती योजनेंतर्गत घरकुलाची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने याबाबतचा सविस्तर आढावा घ्यावा. अपूर्ण घरकुल लवकर पूर्ण होण्याच्यादृष्टीने कार्यान्वयन यंत्रणांसोबत बैठक घेऊन घरकुलांचे लक्ष्यांक पूर्ण होण्याच्या दृष्टीने समन्वय व प्रभावी नियोजन करावे. आवास योजनेसंदर्भात संपूर्ण समन्वय व देखरेखीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.

लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अगोदर विभागातील सर्व प्रलंबित घरकुलांची कामे पूर्णत्वास जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. निधी खर्चाच्या बाबी संदर्भात प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यतेच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता प्राप्त करुन घ्यावी. विभागांतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

विकास उपायुक्त श्री. फडके यांनी अमरावती विभागातील अपूर्ण व पूर्ण घरकुलांच्या सद्यस्थिती व अनुषंगिक बाबी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. तर उपायुक्त श्री.जोशी यांनी विभागातील आस्थापना विषयक बाबींसंबंधी सादरीकरणातून माहिती दिली.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, स्वच्छ भारत मिशन, ग्राम बालविकास केंद्र, कर वसुली अहवाल, 15 व्या वित्त आयोग मासिक प्रगती अहवाल, माझी वसुंधरा योजना, मुलभूत सुविधा, ग्रामीण रस्ते व इतर योजना, सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे, अनुकंपा पदांची सद्यस्थिती आदीबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीत घेतला.

०००

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा -ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

अमरावती, दि. १४ : शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व आवश्यक दाखले दिव्यांग बंधु-भगिनींना सुलभरित्या मिळण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरांच्या आयोजनातून संबंधितांना विविध योजनांचा लाभ व आवश्यक प्रमाणपत्र, दाखले मिळवून दिले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दिव्यांगासाठी राखीव असलेला पाच टक्के दिव्यांग निधी हा दिव्यांगांचे आरोग्य, रोजगार, शिक्षण तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी खर्च करावा. त्यानुषंगाने अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत श्री. कडू यांनी अमरावती विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, उपायुक्त संजय पवार, महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम-2016 अन्वये दिव्यांगांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, घरकुल, शौचालय, सहाय्यकारी उपकरणे, कृत्रिम अवयव आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाना पाच टक्के अपंग निधी मंजूर असतो. परंतू, बऱ्याच ठिकाणी अपंग निधी अखर्चीत असल्याचे आढळून आले आहे. अधिनियमातील कलमनुसार ग्रामस्तरावर ग्राम पंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेने दिव्यांगांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अपंग निधी अनुषंगिक बाबींवर खर्च करावा.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या कळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन गावनिहाय, तालुकानिहाय, प्रवर्गनिहाय, अपंगाच्या प्रकारनिहाय यादी तयार करावी. याव्दारे विविध योजनेंतर्गत संबंधितांना दिलेल्या लाभाविषयी माहिती गोळा होऊन योजनांचे लाभ देणे सोईचे होऊ शकते. दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) व अपंगाचे प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व सामान्य रुग्णालय याप्रमाणे शिबिरांचे आयोजन करावे. यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवावी. विभागातील किमान तीनशे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल्स उपलब्ध करुन द्यावेत. दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विशेष अर्थसंकल्पीय लेखाशिर्ष तयार करावे, असेही श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींना सुलभरित्या सर्व योजनांचा लाभ देणारा विभाग म्हणून अमरावती विभागाचे नाव होण्यासाठी जिल्हा प्रशासनांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी अमरावती जिल्ह्याने आरोग्य, अकोला जिल्ह्याने रोजगार व शिक्षण, बुलढाणाने कौशल्य विकास,  शिक्षण, रोजगार तर वाशिमने दिव्यांग शेतकऱ्यांची उन्नती या विषयांवर लक्ष केंद्रीत करावे. विभागातील एकही दिव्यांग व्यक्ती युडीआडी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्धते विना राहू नये, असे आदेशही श्री. कडू यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले. यासंबंधी विभागीय आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन लक्ष केंद्रीत करावे, असेही श्री. कडू म्हणाले.

यावेळी पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अभियानाच्या अनुषंगाने सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्याची माहिती अध्यक्षांना दिली.

दिवाळीत दिव्यांग महोत्सवाचे आयोजन

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी व प्रोत्साहनासाठी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आगामी नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी विभागाने प्रभावी नियोजन करुन आराखडा तयार करावा. या महोत्सवात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. या महोत्सवात विभागातील उत्कृष्ठ दिव्यांग उद्योजक, शेतकरी बांधव-भगिनी, गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींनींचा सत्कार करण्यात यावा, अशा सूचना दिव्यांग कल्याण मंत्रलयाचे अध्यक्ष श्री. कडू यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

०००

ताज्या बातम्या

पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारिता करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

0
हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न हिंगोली (जिमाका), दि. 27: पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)ने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

0
नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
शिर्डी, दि. २७ जुलै -  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे....

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७: - रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या...

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू

0
मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर...