मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 810

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, दि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. 17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी श्री.यादव यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास दि.31 मे,2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

0000000

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन ठामपा सौरव राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक कर्मचा-यांनी धावपटू मतदारासोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. तसेच स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच… आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असलेले माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन रन फॉर वोट’ मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मार्फत करण्यात आले.

00000

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे दि 10 (जिमाका ) – लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी  आज (10 मे) ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

सदर हिरानंदानी इस्टेट परीसरात १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मधील कर्मचारी मोठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात देऊन व हातात मतदान जनजागृतीचे संदेश यावेळी नागरिकांनी दिले.

संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.

मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप मॅस्कॉटच्या हस्ते सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.

0000

 

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली असून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील एकूण 262 नागरिकांनी तर 38 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.            

 40 टक्के अपंगत्व (Locomotive) 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

25-ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानाची आकडेवारी – 145 मिरा-भाईंदर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-34, दिव्यांग मतदार-3 ) 146 ओवळा माजिवडा (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-46, दिव्यांग मतदार-16 ), 147 कोपरी पाचपाखाडी (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-22, दिव्यांग मतदार-4 ) 148 ठाणे (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-103, दिव्यांग मतदार-2 ), 150 ऐरोली (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-18, दिव्यांग मतदार-4 ) 151 बेलापूर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-39, दिव्यांग मतदार-9)

          ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८५+ वर्षावरील 27 हजार 325 मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

            ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 07 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- 15 हजार 21, महिला मतदारांची संख्या- 12 हजार 304 इतकी आहे. ज्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे 25-ठाणे लोकसभा मतदार संघाच्यानिवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी नमूद केले.

00000

 

 

भिवंडीतील प्रभाग समिती परिसरात वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी  स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असून येथील नागरिकांनी मतदान करावे यासाठी याठिकाणी आज वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

स्वीप उपक्रमांतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवाने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या प्रत्येकाचे मत आवश्यक असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. आपले मत अमूल्य आहे, ते वाया घालवू नका असा संदेश नागरिकांना वासुदेवाने दिला.

यावेळी मतदानाबाबत जनजागृतीपर संदेश देणारे फलक घेवून जनजागृती करण्यात आली. वासुदेवाला पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी आम्ही मतदान करणार.. अशा घोषणा दिल्या. 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवा, आपणही मतदान करा आणि  आपल्या आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन करण्यात आले.

00000

 

कल्याण पूर्व मतदारसंघात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : येत्या 20 मे 2024 रोजी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, मतदान करुन आपली लोकशाही बळकट करा असा संदेश देत विदयार्थ्यांनी नागरिकांना देत मतदानाबाबत जनजागृती केली.

 24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली गणेश विदया मंदिरातील विदयार्थ्यांनी  नागरिकांमध्ये जनजागृती केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत ड प्रभागक्षेत्र कार्यालय, विजयनगर, ओपन जिम, डी मार्ट रेडी, विजयनगर पोलीस चौकी, गौरी विनायक बिल्डर कार्यालयासमोर, विजयनगर नाका चौक, ओम नमो साई श्रद्वा अपार्टमेंट जवळ,पोटे अपार्टमेंट ,शशिकला एनक्लेव, स्वामी समर्थ मठाजवळ, दादासाहेब  मतदारांना मतदनाचे महत्व विषद केले. यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाविषयक पत्रके वितरित करीत येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीपर घोषणा देऊन नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संदेश दिले.

यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.

00000

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. 10  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ’30-मुंबई दक्षिण मध्य व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून उमेदवार,प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले  आहे. दरम्यान, दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी  09 मे रोजी झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील भाग बी 1 व भारत निवडणूक आयोगाच्या  18 फेब्रुवारी 2019 च्या पत्रानुसार खर्च निरीक्षकांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासावयाचा आहे. ’30- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू यांची तर ’31 – मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मुकेश जैन काम बघत आहेत.

दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

खर्च तपासणीसाठी तारीख :- 1) दि.१३ मे २०२४ २) दि. १९ मे २०२४,  तपासणीचे ठिकाण :- सह्याद्री अतिथीगृह, बाळासाहेब खेर रोड, कृष्णराज सोसायटी, वाळकेश्वर, मलबार हिल, मुंबई, महाराष्ट्र ४००००६. तपासणीची वेळ :- दुपारी ०२.०० वाजता

उमेदवार,प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके,देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. याप्रमाणेवरी नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी,ई-मेलने कळविण्यात येईल, असे ’30-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे व ’31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मंतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी सांगितले. खर्चाच्या अंतिम लेख्यासंदर्भातील त्रुटींचे निराकरण करण्यासाठी विशेष समितीदेखील मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आली आहे.

0000

मुंबई शहर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांतील कामकाजाची निवडणूक आयोगाच्या सचिवांनी केली पाहणी

मुंबई, दि. 10  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ‘मुंबई दक्षिण’ व ‘मुंबई दक्षिण मध्य’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाची आज  भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व अवर सचिव अनिल कुमार यांनी पाहणी केली.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात  20 मे,2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर तयारीला वेग आला आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील माहीम विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २६ मतदान केंद्रांना श्री. दास व श्री. कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मंडप व्यवस्था याबाबत माहीम विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी माहिती दिली.

000

८.८३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुंबई, दि. 10  : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  8.83 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड 10 जून, 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह  11 जून 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर 11 जून, 2024 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24 (2)  व 24 (3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील. तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.83 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सह्योगी बँकांच्यामार्फत, ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोख प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील, त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्धारे त्याचे प्रदान करील.

0000

वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी...

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल – जलसंपदा मंत्री...

0
नवी दिल्ली, दि. ४ : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण  आणि  हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून (National Dam Safety Authority) तपासली जाईल, अशी माहिती...

अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर, दि. 4 :  जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची...

जिल्हा वार्षिक योजनेतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर,दि.04 : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विविध विभागांना उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून विविध योजना साकारल्या जातात. यातून नाविन्यपूर्ण योजना आकारास येतात.  या कामांमधून  विविध ठिकाणी...

महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. वुईके

0
चंद्रपूर, दि. 4 : सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलद गती आणि...