सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 753

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नाशिक, दि. १६ मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज येथे दिले.

मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी, यावर लक्ष केंद्रित करून आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाकडूनही मतदानासाठी आवाहन करणारे मेसेज केले जात आहेत. मतदान केंद्रे आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज ठेवावीत. व त्याबाबत मतदारांमध्ये पुरेशी जनजागृती करावी. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्स अशा ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदानादिवशी पाऊस आला तर पर्यायी नियोजन तयार ठेवावे. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीत नाव न सापडण्याच्या तक्रारींचे निराकरण तात्काळ करावे. त्याच ठिकाणी मतदार यादीत नावाच्या समावेशाबाबतचा अर्ज भरून घ्यावा, जेणे करून विधानसभा निवडणुकीवेळी असे प्रकार रोखले जातील, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

एस. चोक्कलिंगम म्हणाले, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर प्रतिबंधित वस्तू जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटात निराकरण करावे, मतदान संबंधी सर्व अहवाल अचूक व वेळेत सादर करावेत. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, मेडिकल इमर्जन्सी आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करावी, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक विषयक नियमांचे उल्लंघन कोणत्याही घटकाद्वारे होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे.असे सांगून श्री. चोक्कलिंगम् म्हणाले, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात. निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारीत होणाऱ्या व गैरसमज पसरविणाऱ्या संदेश व इतर घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड येथे भेट देऊन स्ट्राँग रूम व मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

00000

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

ठाणे, दि. १६ (जिमाका): लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाऊनलोड करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन अँप आणि https://voters.eci.gov.in/  व https://electoralsearch.eci.gov.in/  या दोन वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाऊनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12 पैकी एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App -VHA) – या ॲपलिकेशन द्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती  इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

खालील पायऱ्या फॉलो करून व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे व्होटर स्लिप डाउनलोड करू शकता :

पायरी 1: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ डाउनलोड करावे.

पायरी 2: मतदार सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/ ) या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तेथे नोंदणीकृत तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही मतदार सेवा वेबसाइटवर नोंदणीकृत नसाल तर ‘नवीन वापरकर्ता’ म्हणून नोंदणी करा आणि ॲपमध्ये लॉग इन करा.

पायरी 3: ‘मतदार यादीत आपले नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘मोबाइलद्वारे शोधा’, ‘बार/क्यूआर कोडद्वारे शोधा’, ‘तपशीलांनुसार शोधा’ किंवा ‘EPIC क्रमांकाद्वारे शोधा’.

पायरी 5: आवश्यक माहिती समाविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 6: मतदारांचे तपशील दिसेल. त्या ठिकाणच्या ‘डाउनलोड’ आयकॉनवर क्लिक करा.

वेबपोर्टलवरून ऑनलाईन मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) अशी करा डाउनलोड

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

पायरी 1: भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/https://electoralsearch.eci.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील ‘मतदार यादीत शोधा’ (Search in Electoral Roll) टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: सोबतच्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘तपशीलांनुसार शोधा’, ‘EPIC द्वारे शोधा’ किंवा ‘मोबाईलद्वारे शोधा’.

पायरी 4: आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाका करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 5: समोर तुमचे मतदार विवरण दिसेल. तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता.

पायरी 6: मतदार तपशीलाच्या खालील बाजूस ‘मतदार माहिती छापा’ (प्रिंट व्होटर इन्फॉर्मेशन) बटणावर क्लिक करा.

डाऊनलोड झालेली मतदार माहितीची प्रिंट काढून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक व नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल.

ठाणे जिल्ह्यातील सजग मतदारांनी आपले मतदार चिठ्ठी घेऊन येत्या 20 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

०००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. १६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात उद्या शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ११ वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमाद्वारे पाहण्यास उपलब्ध होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत मुंबई उपनगर प्रशासनामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजना, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांना आवाहन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —–

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मुलाखत

मुंबई, दि.१६ : नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची  ‘लोकसभा निवडणूकीसाठी नाशिक जिल्हा सज्ज’ या विषयावर दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.निवेदक शैलेश माळोदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर असलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन याविषयी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी माहिती दिली आहे.

००००

 

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

????????????????????????????????????

धुळे, दि. १६ (जिमाका) : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडीकल किट, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी. सूक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. दर दोन तासांनी मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

ईव्हीएम मशीन हाताळतांना काळजी घ्यावी. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांना मोबाईल फोन वापरण्यास प्रतिबंध असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदानाच्या दिवशीचे सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही अमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, साक्री व शिरपूर विधानसभाक्षेत्रात मतदान प्रक्रिया पुर्ण झाली असूनही संबंधित क्षेत्रात एसएसटी पक्षक कार्यान्वित करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांना व्होटर स्लीप तसेच मतदान मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार संघातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींगची सुविधा करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी 153 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 17 अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्याठिकाणी गत पंचवार्षिकेत मतदानाची टक्केवारी कमी होती त्याठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचार संहिता कक्ष तसेच इतर कक्ष करीत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे श्री.गोयल यांनी यावेळी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी श्री. नरवाडे यांनी मतदार जनजागृती व सहभागीता कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत राबविण्यात आलेल्या व सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच गृहभेटी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदिंबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदार संघात निवडणुकीबाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव (धुळे ग्रामीण), महेश जमदाडे (शिंदखेडा), सीमा अहिरे (धुळे शहर), बबनराव काकडे (बागलाण), नितीन सदगीर (मालेगाव बाह्य), पल्लवी निर्मळ (मालेगाव मध्य), राजय उत्पादन शुल्कच्या अधिक्षक स्वाती काकडे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी संदिप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

०००

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

चंद्रपूर, दि. १६ : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आढावा घेताना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा दि. १५ :  निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे सांगून प्लॅस्टिक निर्मुलन उपक्रम हाती घेवून संपूर्ण स्वच्छता माहिमेही युध्द पातळीवर राबवा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थिती आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगरपालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल अधिकारी निलीमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, यांच्यासह प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेवून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उजाड डोंगर, वैराण माळराणे दिसत आहेत. ती हिरवीगार करा. वनविभागासह सर्व यंत्रंणानी पुढाकार घेूवन मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन झाडे लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत आणि संवर्धित केली पाहिजे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा, घाण ही आपल्या डोळ्याला खटकली पाहिजे. आपण समाजाचा घटक आहोत. देशाचा नागरिक आहोत. आपला परिसर आपला गाव स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवा. पुढच्या पिढीसाठी प्लॅस्टिक घातक आहे याची जाणीव ठेवून कोणाचेही भय न बाळगता प्लॅस्टिकचे अनधिकृत साठे विक्री उत्पादन आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर छापे टाका आणि प्लॅस्टिक निर्मुलनाची मोहिम युद्ध पातळीवर राबवा.

प्लॅस्टिक माणसांच्या आणि जनावरांच्या शरीरात पोहचले आहे. पाणी अन्न प्रदुषित होत आहे. हे दुष्ट चक्र तोडण्यासाठी सर्वांनी या मोहिमेमध्ये झटून सहभागी व्हा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसिंचन विभागाने अनेक ठिकाणाची गळती काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाण्याच्या दोन आवर्तनामधील  कालावधी वाढून शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणे पाणीपुरवठा झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिली असता विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सातारा जिल्ह्यात हे काम अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी झाले असल्याचे सांगून त्यामुळे इतर कालव्यांची पाण्याची गळती काढून शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

चारा डेपो/ चारा छावणी मागणीचे फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी आणि सासवड या दोन ठिकाणचे प्रस्ताव शिफारशीसही शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा सादर केला यामध्ये त्यांनी मे 2024 मध्ये जिल्ह्यात टंचाई ग्रस्त गावे 210, आणि वाड्या 694 असून 3 लाख 25 हजार 156 बाधित लोकसंख्या आहे तर 2 लाख 8 हजार 806 बाधित पशुधन आहे. या साऱ्यांना 199 टँकरर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 114 खाजगी विहीर आणि बोअर अधिग्रहीत करण्यात आल्याचे सागितले. सातारा जिल्ह्यात वाई व खंडाळा तालुक्यसाठी दुष्काळ निधी शासनाकडून प्राप्त झाला असून यामध्ये वाई तालुक्यासाठी 22 कोटी 41 लाख तर खंडाळा तालुक्यासाठी 17 कोटी 82 लाख इतका निधी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी वितरीत करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. सदरचा निधी हा ई पंचनामा पोर्टलवर तहसलिदारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात वाई व खंडाळा या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर करण्यात आला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील 7 आणि खंडाळा तालुक्यातील 4 महसूल मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 89 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ/ दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या महसूल मंडळांमध्ये शासन निर्णयानुसार सवलती लागु करण्यात आलेल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पुर्ण करणे, विहीर खोलीकरण गाळ काढणे, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रोजगार हमीतील कामे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

खरीप हंगाम 2024 दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरघास लागवड उपक्रमास गती देण्यात येवून त्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ज्या भागांमध्ये प्रकल्पांचे पाणी पोहोचले आहे तेथील शेतकऱ्यांना ज्वारी आणि मका यांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी ओला आणि सुका चाऱ्याचे जुलै 2024 पर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बांबू लागवड अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून 10 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. पावसाला सुरुवात होताच पुन्हा या मोहिमेला गती देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियान 4.0 शहरी भागासह ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा, दि. १५:  ग्रामीण भागातील गावे व शहरे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 4.0 प्रभावीपणे राबवावे. हे अभियान राबविताना जास्तीत जास्त नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात माझी वसुंधरा अभियान 4.0 आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगर पालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल ऑफीसर निलीमा धायगुडे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर परिषदांचे  मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानाचा  लाभ शहरी व ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे, असे सांगून आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावणे आपल्या हातात आहे. गावे व शहरे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करा. या अभियानात शहरी व ग्रामीण भागातील शाळेंच्या नोंदी कराव्यात. नोंदी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा.

ग्रामीण भागातील गायरान जागेवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. मागील वर्षी ज्या गावांनी व शहरांनी माझी वसुंधरा अभियानात नामांकन प्राप्त केले होते त्यांनी नामांकन टिकविण्यासाठी पूर्ण वर्षभर हे अभियान राबवावे. या पुढे बैठक न घेता माझी वसुंधरा अभियानात सहभागी गावांची व शहरांची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचेही आयुक्त  डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी शहरी व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

०००

२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा, महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

ठाणे, दि. १५ (जिमाका):    लोकसभा निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहे, या निवडणुकांसाठी सर्व लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून  23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.  यामध्ये युवा, महिला संचलित मतदान केंद्र आणि दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात युवा, महिला व दिव्यांग अशी मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

युवा मतदारसंघात मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे युवा असणार आहेत. युवा मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे 134 भिवंडी ग्रामीणमध्ये मतदान केंद्र क्रमांक 10 वाडा नगरपंचायत वाडा, मतदान केंद्र क्रमांक 291 ओसवाल इंग्लिश मीडियम हायस्कूल अंजुर, मतदान केंद्र क्रमांक 91 शिशुविहार शाळा दांडेकर पोस्ट ऑफिस जवळ, मतदान केंद्र क्रमांक 197 न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण, मतदान केंद्र क्रमांक 308 न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड, मतदान केंद्र क्रमांक 157 युवा मतदार केंद्र खाडे विद्यालय शहापूर या ठिकाणी युवा मतदान केंद्र असणार आहेत.

सखी महिला मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी या सर्व महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे महिला संचलित  135 शहापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 170 जिल्हा परिषद शाळा,वाशिंद, मतदान केंद्र क्रमांक 208 जिल्हा परिषद शाळा कांबे, मतदान केंद्र म्हणून 258 होली मेरी हायस्कूल राहनाळ, 136 भिवंडी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 166 महिलां कर्मचारी संचलित  राईस हायस्कूल, भिवंडी, 137 भिवंडी पूर्व  मतदान केंद्र म्हणून 299 माध्यमिक विद्यालय नवीन बिल्डिंग भादवड, 139 मुरबाड अंतर्गत महिलांकरता मतदान केंद्र क्रमांक 238 हेवेनबल कॉन्व्हेंट स्कूल शिरगाव, आपटेवाडी बदलापूर याठिकाणी महिला मतदान केंद्र असणार आहेत.

तर दिव्यांग मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे सर्व दिव्यांग कर्मचारी असणार आहेत.दिव्यांग मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे केंद्र 154 मतदान केंद्र खाडे विद्यालय शहापूर, मतदान केंद्र क्रमांक 66 प.रा. विद्यालय, मतदान केंद्र 145 विस्डम अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल, अंसार नगर नागाव,  138 कल्याण पश्चिम मतदान केंद्र 6 महर्षी रघुनाथ कर्वे महापालिका शाळा क्रमांक 12 उंबर्डे, मतदान केंद्र क्रमांक 353 जिल्हा परिषद शाळा नांदप, मतदान केंद्र क्रमांक 60 राजश्री शाहू महाराज विद्यालय पवार कॉम्प्लेक्स बेलवली येथे असणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

०००

कल्याण पूर्वेतील खासगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

ठाणे,दि.१५ (जिमाका): येत्यालोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कल्याण पूर्व येथील दुकानदार, हॉटेलचालक तसेच खासगी आस्थापनांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकाच्या (मतदार जनजागृतीपथक )  माध्यमातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत अमूल्य आहे .. तेव्हा सर्वानी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी दुकानदार, हॉटेलचालक व खाजगी आस्थापनांमधील मतदारांमध्ये स्वीप पथकाने केली. महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मलंग रोड येथील महेश डेअरी, हॉटेल जयमल्हार, आहेर होंडा बाईक शोरुम, रंगीला बार ॲण्ड रेस्टॉरंट, कशीश बार ॲण्ड रेस्टॉरंट,  हॉटेल 50-50 धाबा इत्यादी खाजगी आस्थापनांमध्ये  जाऊन मतदान विषयक पत्रके वितरीत करुन तेथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी प्रणव देसाई, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती डगळे उपस्थित होते.

०००

१४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे, दि. १५ (जिमाका) :  24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये 7 लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे काल दि. 14 मे 2024 रोजी एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे (रा.पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये 7 लाख पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दीपेश राठोड यांनी दिली आहे.

०००

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...