रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 752

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store)  व ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा  आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9 नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप  डाऊनलोड करुन वापरण्याची लिंक  सोबत जोडली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजताची अंदाजित  टक्केवारी बघता येते. काही मतदान  केंद्रावर संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची  वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू असण्याची उदाहरणे आहेत.

मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येवून मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास  उशीर होतो किंवा कधी कधी  पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखिल उशिर होवू शकतो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा मुख्यालयात  पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना सूचित केल्यानंतरच मतदान यंत्राचा प्रवास चालू होतो. अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Encore ह्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर जाहीर करतात. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी “Close of Poll”  म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते.

केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी  आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या  Encore या सॉफ्टवेअरवर भरण्यात येते आणि  तीच टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर  प्रसिध्द करण्यात येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी  वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसारित होते. त्याला “end of poll” अंदाजित टक्केवारी म्हणतात. यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.

वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर  मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व  मतदान केंद्रावरील  माहिती  एकत्र होऊन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. ही सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण  उघड आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सूपुर्द केलेली असते.  प्रत्येक मतदान केंद्रावरील  ही संख्या आणि टक्केवारी हा संपूर्ण आकडेवारीचा मूळ आधार असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 98,000 च्या आसपास होती. यावरुन ही आकडेवारी तयार करण्याचे काम किती मोठे आहे याची कल्पना करता येते.

एखादया राजकीय पक्षाने नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि  टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी निश्चितपणे जुळेल. तरी देखिल वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) मध्ये अंतिम टक्केवारीला  Approximate असेच म्हटले आहे.  त्याचे कारण असे की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट  (डाक मतपत्रिका) द्वारे झालेल्या मतदानाची संख्या  समाविष्ट केली जाते.  त्यामुळे मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात मतमोजणीच्या दिवशी  किंचीतशी वाढ दिसून येते. वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या  दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील  मतदानाची टक्केवारी  असते. त्यामध्ये  Election Duty Certificate (EDC)  मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते.

ही सर्व रचना लक्षात घेतल्यास या रचनेमध्ये बारकाईने विचार करुन त्याचे काटेकोर असे कार्यवाहीचे टप्पे भारत निवडणूक आयोगाने  गेल्या लोकसभा निवडणूकीपासूनच निश्चित केलेले आहेत. ही पध्दत आता चांगली प्रस्थापित  झालेली असून पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज अथवा  अफवा  पसरु शकते आणि उपयुक्त तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या सगळयांच्या हाती असूनही तिचा सुयोग्य उपयोग होत नाही, अशी परिस्थिती होऊ शकते.

०००००

-डॉ.किरण कुलकर्णी,

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,

महाराष्ट्र राज्य.

 

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर

मुंबई, दि. १७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे २०२४ रोजी मतदान  होणार आहे. २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही समस्या अथवा तक्रार असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षातील ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.

२८ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १५५ – मुलुंड, १५६ – विक्रोळी, १५७-भांडूप पश्चिम, १६९-घाटकोपर पश्चिम, १७०-घाटकोपर पूर्व, १७१-मानखुर्द, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसह मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले.

०००

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

मुंबई, दि. 17 : पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे आंतरदेशीय जलयाने कायदा 1917 (इनलँड व्हेसल कायदा 1917) च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांनी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात जलयाने घेऊन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ.प्रवीण एस.खरा यांनी केले आहे.

000

एसडीओरके/स.सं.(मा.)

 शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मतदानाचा टक्का वाढीसाठी जनजागृती

ठाणे,दि. 16 (जिमाका ) – मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांनी बजावावा. आपले मत अमूल्य असून मतदान करुन आपण आपली लोकशाही बळकट करा.. मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो.. अशी जनजागृती  शहापूर मधील आदिवासी वाड्या, पाडया, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, आदिवासी मुलांमुलींचे शासकीय वसतीगृह, शासकीय/अनुदानित आश्रमशाळांमध्ये करण्यात आली.

१३५ शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघामध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढविण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती करणेबाबतचे विविध उपक्रम आले. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर तथा स्वीप नोडल अधिकारी श्री. आर. बी. हिवाळे यांनी, विविध मतदार जनजागृती उपक्रम राबवून मतदान करण्याबाबत आवाहन केले.

दिव्यांग व वृध्द मतदार, नवीन मतदार, विविध सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सहा. निबंधक सहकारी संस्था मिरची गल्ली, हॉटेल संघटना शहापूर, शहापूर मार्केट, ता. शहापूर, वैद्यकीय व्यावसायिक, ज्वेलर्स असोसिएशन, ट्युशन क्लासेस व्हीजन अकॅडमी विश्वानंद संकुल पंडीत नाका या ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

 तसेच सावरोली, कोठारे, सुसरवाडी, दहागावं, पिवळी, टेंभा, शेणवा, डोळखांब, टाकीपठार येथील शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या विविध शाळा येथे पायी रॅली उपक्रम राबविण्यात आला असून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच आईबाबांना पत्र, चर्चासत्र, यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले.

तसेच नाभिक संघटना शहापूर, वकील संघटना आसनगाव रेल्वे स्टेशन, शहापूर बस स्थानक, आशीर्वाद हॉटेल चौक, स्मार्ट पॉईंट, बिकानेर स्वीट मार्ट, नर्सिंग कॉलेज इ. गर्दीच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सापगांव, साखरोली येथील विटभट्टी कामगारांना मतदानाबाबतचे महत्त्व सांगून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत तपासता यावे व त्यांचे मतदान केंद्राची माहिती व्हावी याकरीता मतदान चिठठ्या बीएलओ मार्फत वाटप करण्यात येतील व मतदानाचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच १७/०५/२०२४ व १८/०५/२०२४ रोजी शाळा व महाविद्यालयांमार्फत पालकांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करणारे संदेश व्हॉटस अॅप द्वारे पालकांना पाठवून मतदानांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पेंढरघोळ येथे आदिवासी संस्कृतीचे आदर्श मतदान केंद्र बनविण्यात येत असून तेथे सेल्फी पॉईंटची स्थापना करणे, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या विविध वस्तूंची मांडणी करणे, वारली पेंटींग, आदिवासी बोलीभाषेत बॅनर बनविणे, आदिवासी वेशभुषा, आदिवासी पथनाटय बसविणे, मतदान करण्यासाठी येणा-या लोकांना पुष्प देऊन स्वागत करणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री.आर.बी.हिवाळे यांनी दिली.

00000

 ठाणे जिल्ह्यात निवडणूक कामात ‘नारी’शक्ती अग्रेसर

               ठाणे, दि. 16 (जिमाका) : रोजच्या जगण्यात एकाच वेळी अनेक “आघाड्यांवर”  यशस्वी काम करण्याचे सामर्थ्य आणि कसब कुणात असेल ती म्हणजे कुटुंबातील “महिला” होय. अवकाशाला गवसणी घालण्याचे धाडस महिलांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात दाखवलेच..  नि:पक्षपणे प्रशासन चालवण्यातही महिलांनी आपली कर्तव्य दक्षता सिध्द केली आहे.  म्हणूनच ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात आदर्श निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका पार पाडण्याचे काम जिल्ह्यातील महिला अधिकारी समर्थपणे सांभाळत आहेत. एका अर्थाने नारीशक्तीच निवडणुकीचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलताना दिसत आहेत.
देशात लोकसभा निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात निवडणुका होत असून यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठाण्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी या पदावर महत्त्वाच्या पदावर महिला अधिकारी सक्षमपणे काम करीत आहेत. ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना कदम या संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणूक कामावर लक्ष ठेवत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी
24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची धुरा उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे असून 25 ठाणे  लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची धुरा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे यांच्याकडे आहे.
निम्म्या मतदारसंघात महिलांकडे जबाबदारी
ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून तीन विधानसभा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला अधिकारी समर्थपणे कामकाज सांभाळत आहेत. 146 ओवळा माजिवडा येथे उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे या कामकाज पाहत आहेत.
तर कल्याण लोकसभा मतदारसंघात 143 डोंबिवली ‍विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी आणि 24 कल्याण विधानसभा मतदारसंघात वैशाली लंभाते यांच्याकडे सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी आहे. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघात अंजली पवार यांच्याकडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी असून त्या समर्थपणे ही जबाबदारी पार पाडत आहेत.
तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात तहसीलदार कोमल ठाकूर, कल्याण लोकसभा मतदारसंघात तहसीलदार प्रशांती माने, तहसीलदार कल्याणी मोहिते, तहसीलदार स्वाती घोंगडे, ठाणे लोकसभा मतदारसंघात आसावरी संसारे यांच्याकडे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयातही महिला अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविलेली आहे. यामध्ये तहसीलदार उज्ज्वला भगत, नायब तहसीलदार स्मितल यादव, निलिमा मेंगळ, हेमलता भोये यांचा समावेश आहे.
याशिवाय निवडणूक विषयक माहिती प्रसारमाध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोचविण्याचे कामही महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या उप माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळत आहेत तर कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे या ही जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे याही एकत्रित माध्यम कक्षात प्रसिद्धीचे कामकाज सांभाळत आहेत.
ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकांचे काम सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाने आखून ‍दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे काम या जिल्ह्यातील नारीशक्ती करीत आहे. स्वतःचे घरसंसार सांभाळात दिवसरात्र या महिला अधिकारी निवडणुकीचे काम अतिशय जबाबदारीने सांभाळत आहेत.

‍              निवडणुकीसाठी ‍रिंगणात असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेण्यापासून ते त्यांची अंतिम यादी  तयार करणे, मतदान केंद्रे ‍निश्चित करुन त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे. मतदान  केंद्रावर  निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स, बॅलेट ‍ युनिट, कंट्रोल युनिट आदींची उपलब्धतता करुन देणे, तसेच राखीव मशीन्स ठेवणे आदी सर्व कामांचाआढावा स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी घेत आहेत. निवडणुकांसाठी ठाण्यात दाखल झालेले  केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी समन्वय साधणे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना  मतदान करता यावे यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध  करुन देणे, 85 वर्षावरील व दिव्यांग व्यक्ती ज्या मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशा नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करणे, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील व्होटर स्लीपची सोय करणे, जिल्हा प्रशासन करत असलेल्या कामांची प्रसार माध्यमांमार्फत जनतेपर्यंत माहिती पोचविणे आदी सर्व जबाबदारी या महिला अधिकारी चोख पार पाडत आहेत.

000000

लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३मधील लिपिक टंकलेखकगट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

दिव्यांगमाजी सैनिकअनाथप्रकल्पग्रस्तभूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनपत्रात लिपिक टंकलेखक‘ संवर्गाचा विकल्प दिलेल्या व पूर्व परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचाच शासनस्तरावर तपासणी करण्याच्या अधीन राहून या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालात समावेश करण्यात आला आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी होणाऱ्या मतदानाकरिता मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

  • मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार
  • २ हजार ५२० मतदान केंद्रे

मुंबई, दि. १६ :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज आयोजीत पत्रकार परिषदेत श्री. यादव बोलत होते.

श्री. यादव पुढे म्हणाले की, ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण २४ लाख ९० हजार २३८  मतदार असून २ हजार ५२० मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात सोमवार २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मंगळवारी ४ जून  रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधेची खात्री (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप, प्रसाधन गृह, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका (Ramps), स्वयंसेवक, व्हीलचेअर्स व विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार माहिती स्लिपचे वाटप सर्व नोंदणीकृत मतदारांना करण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी १५ हजार कर्मचारी

लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पारदर्शक, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८

एकूण पुरुष मतदार :- १३ लाख ४३ हजार ९६९

एकूण स्त्री मतदार :- ११ लाख ४६ हजार ०४५

एकूण तृतीयपंथी मतदार :- २२४

ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +)

एकूण:- ५५ हजार ८१७

एकूण पुरूष :- २६ हजार ८१५

एकूण स्त्री :- २९ हजार ००१

१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार

एकूण मतदारः- २६ हजार ४५०

एकूण पुरुषः १४ हजार ७१७

एकूण स्त्री:- ११ हजार ७३३

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५५४९

एकूण पुरुष:- ३३२२

एकूण स्त्रीः- २२२७

मतदान केंद्रांची माहिती

एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५२०

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना संबंधित सुविधा पुरविणा-या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. ’३०–मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे ३१० ज्येष्ठ नागरिक मतदार व ९ दिव्यांग मतदारांनी तर ’३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघात ५८४ ज्येष्ठ नागरिक मतदार व ४८ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन श्री. यादव यांनी केले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मतदानाच्या दिवशी मुंबईतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

मुंबई, दि. १६  : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५+ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून मुंबई शहर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशीचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांकरिता एक दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे दहा दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बस सेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता १० लो फ्लोर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आलेले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता ५ व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण १३ दिव्यांग मित्र नियुक्त केलेले आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे अरुंद रस्त्यामध्ये बसेस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय एक टॅक्सी म्हणजेच एकूण दहा टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर बसेस सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे.

  • ️ १७८-धारावी/नामदेव साबळे/९७०२८३२००९
  • ️ १७९-सायन कोळीवाडा/विजय साळुंखे/८३६९५३२१३८
  • ️ १८०-वडाळा/तृप्ती धोंडे/९८९२१५४३०७
  • ️ १८१-माहीम/रोशन पिंपळे/८९८३०४१२३६
  • ️ १८२- वरळी/ज्ञानेश्वर पाटील/९४२२२००१७६
  • ️ १८३-शिवडी/रवींद्र वाडीले/९४२११६९७७६
  • ️ १८४-भायखळा/सुषमा गुप्ता/९८६९६२८९००
  • ️ १८५-मलबार हिल/स्वाती जिरंगे/९८६९०२४२५४
  • ️ १८६-मुंबादेवी/मनोज नेमाने/९८६९६०२८८५
  • ️ १८७-कुलाबा/दत्तात्रय कांबळे/९१३७५१३८३२

****

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई उपनगर, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण १७३ मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

१५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ – विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गीता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

१६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ, १५६ विक्रोळी,  १७० – घाटकोपर पूर्व, १५७ – भांडूप पश्चिम, १७१ – मानखुर्द शिवाजीनगर, तसेच १५५- मुलूंड या विधानसभा मतदारसंघात समन्वय अधिकारी यांनी पथकासह मतदारांच्या घरी जाऊन गुप्तपणे गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडली. उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, समन्वय अधिकारी श्री. वानखेडे, तहसीलदार वृषाली पाटील, एस. ए. खानविलकर, तहसिलदार ज्योती वाघ, तहसीलदार सतीश कदम या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह गृहमतदानाची जबाबदारी पार पाडली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे यांनी केले मतदान

आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल, असेच वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाही, मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई कुपटे या १०० वर्षीय आजीबाई यांनी यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील १२६९ कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई उपनगर, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे रोजी टपाली मतदान सुरू झाले होते. आज शेवटच्या दिवशी ४९९ मतदारांनी मतदान केले असून एकूण १२६९ मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

विक्रोळी पूर्व येथील कार्यालयात मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.  तीन दिवस सुरू असलेली ही मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले आहे.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...