मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 645

एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत समारोप

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल

पुणे, दि. १४: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. अपयशाच्या वेळी  निराश न होता कसोशीने प्रयत्न केल्यास यश नक्की तुमचेच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल  बोलत होते. यावेळी आयर्नमॅन मेजर जनरल विक्रम देव डोगरा, विद्यापीठाचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवी चिटणीस आदी उपस्थित होते.

सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांनी आयुष्यात ध्येय निश्चित करावे आणि त्याकडे सुसंगत वेगाने जावे. कधीही हार मानू नका, जे प्रयत्न सोडतात त्यांना यश मिळत नाही.  जीवनात यशस्वी व्यक्तीमत्त्वाचा आदर्श पुढे ठेऊन वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल.

ते म्हणाले, विद्यापीठातील शैक्षणिक सोयीसुविधांचा वापर करून, खूप शिक्षण घ्या. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला लोकांची मदत करायची आहे, या भावनेने वाटचाल करा. भ्रष्टाचार हा कर्करोगासारखा असून आपल्या विकासात खूप मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला मुळापासून काढून फेकण्यासाठी कार्य करायचे आहे असे ध्येय मनाशी बाळगून वाटचाल करा. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवा, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा, इतरांचे ऐकून घेण्यासाठी कायम संयम ठेवावा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात देशाचे नेतृत्व करायचे आहे हे लक्षात ठेऊन विद्यापीठीय अभ्यासक्रमासोबतच आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींचे शिक्षण घेऊन वाटचाल करावी. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि यशस्वी व्हाल, असेही ते म्हणाले.

विक्रम देव डोगरा म्हणाले, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात कुठेतरी अपयश येऊन गेलेले असते. त्यामुळे अपयशाला घाबरू नये. आपल्याला यशस्वी व्हायचे आहे, याचे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

राहुल कराड यांनी सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. कुलगुरू डॉ. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठात नव्यानेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
0000

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
  • राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा; कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी
  • गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत

मुंबई, दि.१४ : राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराने बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत.

महापालिकांनी गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री. श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सार्वजनिक गणेशोत्सव एकत्रित, मूर्तीकारांचे प्रतिनिधी, पर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे शाम शेंडकर आदी उपस्थित होते.

००००

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित; तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारही जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा 

मुंबई दि. 14 : अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सन 2020 वर्षासाठीचा 58 वा तसेच 2021 वर्षासाठीचा 59  वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आहे. सन 2020 या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून,जयंती, फनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.

उत्कृष्ट कला दिग्दर्शन अशोक लोकरे, ए.ऋचा ( मी वसंतराव), उत्कृष्ट छायालेखन अभिमन्यू डांगे ( मी वसंतराव ),उत्कृष्ट संकलन मनीष शिर्के (गोष्ट एका पैठणीची), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण राशी बुट्टे ( बिटरस्वीट कडूगोड ), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अनमोल भावे (मी वसंतराव),उत्कृष्ट वेशभूषा सचीन लोवाळेकर ( मी वसंतराव ), उत्कृष्ट रंगभूषा सौरभ कापडे ( मी वसंतराव ), उत्कृष्ट बाल कलाकार अनिश गोसावी ( टकटक ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

58 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 28 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

सन 2021 च्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  पारितोषिकासाठी नामांकन झाली  आहेत.  याचबरोबर प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम,कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

सन 2021 साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शन भूषण राऊळ, राकेश कदम (पांडू ), उत्कृष्ट छायालेखन  रणजित माने  (पोटरा), उत्कृष्ट संकलन  परेश मांजरेकर (लक डाऊन be positive), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण अनिल निकम (बेभान), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अतुल देशपांडे (बाई पण भारी देवा), उत्कृष्ट वेशभूषा शफक खान, रोहित मोरे, निलेश घुमरे ( येरे येरे पावसा), उत्कृष्ट रंगभूषा पूजा विश्वकर्मा (हलगट), उत्कृष्ट बालकलाकार आर्यन मेगंजी ( बाल भारती ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021  या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण  50 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 59  व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी प्राप्त झाल्या होत्या.

 58 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत.-

सर्वोत्कृष्ट कथा  :- विठ्ठल काळे (बापल्योक), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ), रमेश दिघे ( फनरल उत्कृष्ट पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे  (बापल्योक ),गजेंद्र अहिरे( गोदाकाठ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट संवाद :- रमेश दिघे (फनरल), मकरंद माने, विठ्ठल काळे  (बापल्योक ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक), वैभव जोशी ( मी वसंतराव ), गजेंद्र अहिरे ( गोदाकाठ)

उत्कृष्ट संगीत: – विजय गवंडे ( बापल्योक ), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), रोहित नागभिडे ( फिरस्त्या )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- सारंग  कुळकर्णी, सौरभ भालेराव ( मी वसंतराव ), विजय गवंडे ( बापल्योक ), अद्वैत नेमळेकर (फनरल),

उत्कृष्ट पार्श्वगायक:- अजय गोगावले (बापल्योक), आदर्श शिंदे (फिरस्त्या), राहूल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वगायिका:– आनंदी जोशी (काळी माती), सावनी रवींद्र (जीवनाचा गोंधळ), प्राची रेगे (गोदाकाठ)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- शर्वरी जेमनीस ( मी वसंतराव ), सुजितकुमार ( गोष्ट एका पैठणीची), सुजितकुमार (चोरीचा मामला ),

उत्कृष्ट अभिनेता:- आरोह वेलणकर (फनरल), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), सिद्धार्थ मेनन (जून )

उत्कृष्ट अभिनेत्री :- सायली संजीव ( गोष्ट एका पैठणीची ), अक्षया गुरव ( बीटर स्वीट   कडुगोड ), मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी (चोरीचा मामला), हेमंत ढोमे (चोरीचा मामला)

सहाय्यक अभिनेता :- नितीन भजन (सुमी), विठ्ठल काळे (बापल्योक), पुष्कराज चिरपुटकर (मी वसंतराव)

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे (फनरल), नीता शिंडे (बापल्योक),  स्मिता तांबे (बीटर स्वीट कडुगोड),

प्रथम पदार्पण अभिनेता :- ऋतुराज वानखेडे ( जयंती), ओमप्रकाश शिंदे ( काळीमाती), वैभव काळे ( काळोखाच्या पारंब्या )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पायल जाधव ( बापल्योक ), पल्लवी पालकर ( फास ) रेशम श्रीवर्धन ( जून )

 

 59 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत. –

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी), जयंत पवार ( भाऊ बळी ३६०० रुपयांचा सवाल ), सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं)

उत्कृष्ट पटकथा :- रसिका अगासे ( तिचं शहर होणं ), वैशाली नाईक ( बाईपण भारी देवा ), निखील महाजन, प्राजक्त देशमुख ( गोदावरी )

उत्कृष्ट संवाद :-  रशिद उस्मान निंबाळकर ( इरगाल ), नितिन नंदन ( बाल भारती ), प्रकाश कुंटे ( शक्तिमान )

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी ), वलय मुळगुद (बाई पण भारी देवा ), संदिप खरे ( एकदा काय झालं )

उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा ), डॉ.रुद्र कर्पे ( कुलूप ) सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- पंकज पडघन ( आणीबाणी ) ए.व्ही.प्रफुलचंद्र ( गोदावरी ), सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहूल देशपांडे ( गोदावरी ), शुभंकर कुलकर्णी ( एकदा काय झालं ), डॉ.भीम शिंदे ( इरगाल )

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर), आर्या आंबेकर ( कुलूप ) सुवर्णा राठोड ( बाईपण भारी देवा )

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :– फुलवा खामकर ( लक डाऊन be positive ), विठ्ठल पाटील ( पांडू ), सुभाष नकाशे ( बाईपण भारी देवा )

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)  सुमित राघवन ( एकदा काय झालं ), संदीप पाठक ( राख )

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ), मृण्मयी देशपांडे ( बेभान), स्मिता तांबे ( गौरीच्या लग्नाला यायचंहं )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू ), आनंद इंगळे ( लक डाऊन be positive ), सिद्धार्थ जाधव ( लोच्या झाला रे )

सहाय्यक अभिनेता :- प्रियदर्शन जाधव ( शक्तीमान), मोहन आगाशे ( कारखानिसांची वारी ), अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ), क्षीती जोग ( झिम्मा ), शीतल पाठक ( जननी )

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- रसिद निंबाळकर ( इरगाल ), महेश पाटील ( कुलूप ), योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमध्वनी), सृष्टी वंदना(कुलूप), सृष्टी जाधव(इरगाल)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :– सुकन्या कुलकर्णी-मोने ( बाई पण भारी देवा ), निर्मिती सावंत ( झिम्मा ), शुभा खोटे ( लक डाऊन be positive )

00000

दीपक चव्हाण/विसंअ

 

महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरण

नवी दिल्ली, 14 : प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज राष्ट्रध्वज वितरीत करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात आले.

स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई पासून देशभरात राबविण्यात येणारा ‘हर घर तिरंगा’ (घरो घरी तिरंगा) अभियानास प्रारंभ केला. राज्य शासनाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा अभियाना’ची सुरुवात झाली असून, या अभियानातंर्गत आज कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदनाच्या परिसरात असणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जावून यावेळी निवासी आयुक्तांनी राष्ट्रध्वज वितरित केले. हे ध्वज प्रत्येकांनी घरावर लावण्याचे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सदनातील घराघरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ असे नारे दिले व वातावरण देशभक्तीमय केले.

निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही राष्ट्रध्वजाचे वितरण

‘घरोघरी तिरंगा अभियान’अंतर्गत महाराष्ट्र परिचय केंद्रातही उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्या हस्ते कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

000

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विभागाचे सूक्ष्म नियोजन; २८ जिल्ह्यात २५० मे.टन मेटाल्डिहाईडचा पुरवठा, गोगलगायीमुळे होणारे संकट टळले

मुंबई दि. 14: – 2022 व 2023 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायींनी पिकांच्या केलेल्या नुकसानाच्या अनुषंगाने यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित म्हणून यावर्षी गोगलगायीचे संकट पूर्णतः नियंत्रणात आले आहे.

सन 2022 आणि 2023 या वर्षात राज्यामध्ये बहुतांशी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेती पिकाचे आणि फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, यवतमाळ  आदी जिह्यांमध्ये नुकसानाचे प्रमाण अधिक होते. इतरही बऱ्याच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले होते.

लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेत पिकाचे आणि फळ पिकाचे नुकसान झाले, त्यांचे क्षेत्र 72,490 हेक्टर होते तर नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांची संख्या 129,596 इतकी होती.

राज्यामध्ये गोगलगायीमुळे नुकसान होण्याची समस्या साधी होती. परंतु अलीकडील काही वर्षांमध्ये ही समस्या प्रमुख होत गेली. या बाबीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आणि कृषी विभागाने याची दखल घेत राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी प्रकल्पाअंतर्गत राज्याच्या 28 जिह्यांमध्ये 250 मे.टन मेटाल्डिहाईड या गोगलगाय नाशकाचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये या बाबीची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून 2024 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव पूर्ण नियंत्रणात आणला गेला.

यावर्षीच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली असून गोगलगायीचा प्रादुर्भाव नगण्य असून राज्यामध्ये कृषि मालाचे उत्पादन उच्चांकी असेल अशी भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. राज्यातील आणि विशेष करून लातूर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यातील अनेक  शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर

दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी

मुंबई, दि. १४:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ चा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली असून दिनांक २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

‘राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा सर्वांना अभिमान आहे.  त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले.

दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोम, वरळी मुंबई येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’, तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

नवी दिल्ली, 14 : 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2024 साठी 59 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक” तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक” प्रदान करण्यात आला.

देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 4 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 55 कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील 14 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 3 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 11 कर्मचारी, स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली.

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि  ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिकाऱ्यांची नावे-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक – संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्निसेवा पदक

किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी, अनंत भिवाजी धोत्रे, उप अधिकारी, मोहन वासुदेव तोस्कर, आघाडीचे फायरमन, मुकेश केशव काटे, लीडिंग फायरमन आणि किरण रजनीकांत हत्याल, अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक

नितीन भालचंद्र वयचल, प्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधव, जेलर ग्रुप-1, दीपक सूर्याजी सावंत, सुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघ, हवालदार यांचा समावेश आहे.

०००००

महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १७ पोलिस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक” प्रदान

नवी दिल्ली, 14: पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 59 पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2024 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील एकूण 908 पोलिस अधिकारी/ कर्मचारी यांना ‘पोलीस पदके’ प्रदान करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये  राज्याचे चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, श्री. राजेंद्र बालाजीराव डहाळे, संचालक, श्री. सतीश राघवीर गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.

राज्यातल्या 17 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. पोलीस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे – उप-विभागीय पोलीस अधिकारी, दीपक रंभाजी आवटे – पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर),  नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना – नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख – पोलीस शिपाई,  विश्वनाथ सामैय्या पेंदाम – पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे – पोलीस शिपाई,  मोरेश्वर नामदेव पोटावी – पोलीस शिपाई,  कैलाश चुंगा कुळमेथे – पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी – पोलीस शिपाई,  कोरके सन्नी वेलादी – पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे – पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक,  राहुल नामदेवराव देव्हाडे – पोलीस उपनिरीक्षक,  विजय दादासो सकपाळ – पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा – मुख्य शिपाई,  समय्या लिंगय्या आसाम – नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातल्या 39 पोलिसांना‘पोलीस पदक’ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये  – दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक,  सदानंद जनाबा राणे- निरीक्षक, विजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे-उपनिरीक्षक,अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक, शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक, बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई, अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक, संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सविस्तर यादीचा  तपशील  www.mha.gov.in आणि  https://awards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे ११, १६, २१ व २५ वर्षे मुदतींचे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०३५  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

 महाराष्ट्र शासनाचे १६ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 16 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २१ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 21 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 21 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०४५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 26 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 2६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०५० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर शिक्षकांनी भर द्यावा – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

मुंबई, दि. 14 : शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाढीव पदावरील 18 पात्र शिक्षकांच्या समायोजन आदेशाचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असे सांगून श्री.केसरकर यांनी समायोजित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यावेळी उपस्थित होते.

वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी मुंबई विभागातील 21 शिक्षकांना मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते 10 जानेवारी 2024 रोजी समायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, यापूर्वी समायोजन न झालेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश 7 मार्च 2024 रोजी प्राप्त झाल्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 16 वाढीव पदावरील कार्यरत शिक्षकांचे समायोजन केले. मात्र काही पात्र शिक्षकांना समायोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध नव्हते, अशा शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रिक्त जागांचा आढावा घेऊन पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासनास विनंती केली होती, त्यानुसार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र प्राथमिक‍ शिक्षण परिषदेच्या चर्नी रोड येथील राज्य प्रकल्प संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते 18 शिक्षकांना हे वाटप आदेश देण्यात आले.

या कार्यक्रमास संबंधित शिक्षकांसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य शासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या रुग्णांसाठी आशेचा किरण

0
राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-२)

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी...

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...