मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 642

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री

पुणे, दि. १५: केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून  शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले,  अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., मुख्य अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्य सरकारच्यावतीने केंद्र शासनाकडून राज्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम करण्यात येत आहे. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता उपमुख्यमंत्री कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विकास कामे करताना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, पुणे महानगर विकास प्राधिकरण, कॅम्प आदी यंत्रणेत समन्वय साधून  कामे करावी लागतात. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.

यापूर्वीदेखील चांदणी चौकातील पूल उभारुन वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले आहे. बाह्यवळण मार्गाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल, याकरिता ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुण्याच्या लोकसंख्येत वाढ होत असून पाणी, वाहतूक अशा विविध पायाभूत समस्या निर्माण होऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन ते इच्छितस्थळी वेळेत पोहोचले पाहिजे, याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे  नागरिकांना  वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात वाहतूक कोडींचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आढावा बैठक घेण्यात येईल.

खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिंहगड रोडवरील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता या भागात कायमस्वरुपी मार्ग काढण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने एकतानगर येथील सामूहिक विकास क्षेत्राविषयी (कलस्टर डेव्हल्पमेंट) सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी कामे करतांना राडारोडा नदीपात्रात टाकू नये. नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे बांधकाम करु नये, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट

राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या पायाभूत विकासात भर पडत असून आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट देण्याचा प्रयत्न आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे श्री.पवार म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत ३५ लाख  माता-भगिनींना लाभ

महिला सबलीकरणाकरिता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ३५ लाख माता-भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ५० लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्रीमती मिसाळ म्हणाल्या, नागरिकांची गैरसोय टाळून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील  पुलाचे काम करण्यात येत आहे. आगामी  काळात या ठिकाणाहून जाणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या पिलरचे कामही करण्यात आले आहे. यापुढेही  लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शहरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही श्रीमती मिसाळ म्हणाल्या.

डॉ. भोसले  म्हणाले, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहादरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्यापैकी आज राजाराम पुलाजवळ ५२० मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले  आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचे इंधन व वेळेची बचत होणार आहे. उर्वरित पुलाचे कामही लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले म्हणाले.

लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

  • लातूर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
  • शेतकरीमहिलायुवा वर्गाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय

लातूरदि. 15 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामाध्यमातून सर्व समाज घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, भारत कदम, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 85 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले ससून पात्र महिलांच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या 3 हजार 720 मुलींचे जवळपास 18 कोटी 47 लाख रुपयांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षित युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात राज्य शासन दरमहा 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. 2023-24 मध्ये इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या 11 हजार 935 विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून 43 कोटी 16 लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून 5 हजार 665 विद्यार्थ्यांना 22 कोटी 65 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मातंग समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘आर्टी’ची स्थापना केली आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जळकोट आणि रेणापूर येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे सुरु केली आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अखंडितपणे सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज सवलत; कापूस व सोयाबीन उत्पादकांना अनुदान

शेतकरी बांधवांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. जिल्ह्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. नादुरुस्त विद्युत रोहित्र तातडीने बदलून मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 200 रोहित्र खरेदीसाठी निधी देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 6 लाख 8 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून 70 तलावातील सुमारे 37 लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. यामुळे पाणी साठ्यात 376 कोटी लिटरची वाढ झाली. हा गाळ 9 हजार 500 एकरावर पसरण्यात आला आहे. त्यामुळे शेती सुपीक बनण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

वयोवृद्ध नागरिकांना सहाय्य साधने खरेदीसाठी मदत; तीर्थ दर्शनही घडविणार

वाढत्या वयामुळे वृद्धांना अशक्तपणा, दिव्यांगत्वाला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना करण्याकरिता 65 वर्षांवरील अशा नागरिकांना व्हीलचेअर, श्रवणयंत्र यासारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा घडविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली.

अंगणवाडीतील ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय बालकांसाठी फायदेशीर

जिल्हा परिषदेने अंगणवाडीमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’ सुरु करण्यात आली असून आरोग्य तपासणी, लसीकरण, समुपदेशन, बाळंतविडा वाटप या सारख्या सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. तसेच 177 बालकांना असलेल्या दुर्मिळ आजारांचे वेळेत निदान होवून त्यांना संदर्भ सेवा देण्यात आली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. तसेच जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 8 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळालेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिवहन विभागामार्फत उदगीर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. एमएच 55 क्रमांक असलेल्या या कार्यालयाद्वारे पाच तालुक्यांतील नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. उदगीर येथे विविध समाजासाठी भवन, सभागृह उभारण्यात येत आहेत. तसेच उदगीर येथे नगरपालिकेने भव्य बुद्ध विहार उभारले आहे. या बुद्ध विहाराचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न

जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी 164 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातून लातूर विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल आणि 6 तालुका क्रीडा संकुलांचा विकास केला जाणार आहे. तसेच मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 101 शाळांमध्ये क्रीडांगण विकास करण्यात येत असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावर्षी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा अभियानाद्वारे राज्य शासनाच्या योजनांचा प्रसार आणि प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत झाली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र कमी असल्याने वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान सुरु केले आहे. जून महिन्यापासून या अभियानामध्ये जवळपास 30 लाख वृक्ष लागवड झाली असल्याचे नमूद करून प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी झाड लावून लातूर जिल्हा हरित बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी यावेळी केले.

ध्वजारोहणानंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक डी. डी. माने यांच्या पथकाने मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल यावेळी त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त खेळाडू, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ

 लोककल्याणकारी योजना राबविण्यावर भर; जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू

सिंधुरत्न समृद्ध योजना जिल्ह्यासाठी  वरदान

सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जि.मा.का) : सर्वसामांन्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने आणि राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालय, पोलिस परेड ग्राऊंड येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.

श्री. केसरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या त्यागातून, प्राणार्पणातून आपल्याला स्वराज्य मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्याबरोबरच विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीच्या बाडेन-वर्टेम्बर्ग राज्य यांच्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या कराराचा पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत आणि लवकरच ते सर्वत्र सुरू होतील. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी २० हजार रूपये इतके करण्यात आले आहे. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी ग्रंथपालांना १४ हजार रूपये, प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार रूपये, कनिष्ठ लिपिकांना १० हजार रूपये तर केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रूपये मानधन देण्यात येत आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याचबरोबर एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देखील दिले जात आहेत. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील विकासाविषयी बोलताना ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टल अंतर्गत ७५२ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. माझी ई शाळा डिजिटल साक्षरता मिशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या २०२ शाळांमध्ये राबविला जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत १४ कोटी रुपये खर्चुन वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून  107 कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी  57 कोटी इतका निधी वितरीत झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण  करुन अनेक सुख सुविधा निर्माण केल्या आहेत. या तिन्ही स्थानकांचे लोकार्पण नुकतेच पार पडले. जिल्ह्यात तीन दिवस जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२१ साली तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेाते. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासाठी शासन स्तरावरुन निधी कमी पडल्याने पाठपुरावा केल्यानंतर ३ कोटी ४६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून त्यापैकी २ कोटी ५९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे असेही ते म्हणाले.

शासन राबवित असलेल्या महत्वाकांक्षी योजनांविषयी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनअंतर्गत ३२४ उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली आहे. यापैकी ५५ उमेदवार संबंधित आस्थापनांवर रुजू झालेले आहेत.  लेक लाडकी योजनेअंतर्गत ०१ एप्रिल २०२३ नंतर ज़न्मलेल्या २९२ मुलींना ५ हजार रुपये या प्रमाणे १४ लाख ६० हजार एवढी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात १३७ प्रकल्पांना ८ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आलेले असून  २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान अर्थ साहाय्य स्वरुपात देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत गट लाभार्थी मंजुरी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम ठरलेला आहे

पोलिस प्रशासनाने ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान’, ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान, सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेस उपक्रम राबविण्यात आला असेही ते म्हणाले.

विशेष गौरव 

विशेष कामगिरी आणि उत्कृष्ट काम केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांच्याकडून गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग पोलिस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.  विशेष कामगिरी केलेल्या तसेच पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त पोलिस अधिकारी आणि धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक पध्दतीने बनविली जाणारी हस्तकला ‘सावंतवाडी गंजिफा पेंटीग’ करीता भौगोलिक मानांकनाचे देशस्तरावरचे अधिकारी प्राप्त करुन दिल्याबद्दल ॲङ समीक्षा राजेंद्र दाभाडे यांना गौरविण्यात आले.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्ष इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रुद्र पिकुळकर, संचिता संभाजी पाटील, वेदा प्रविण राऊळ, संस्कार चोपडे, चिन्मयी खानोलकर, ईशान नागवेकर यांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार-

श्रध्दा सतिश पाटकर, विवेक तिरोडकर, ऐश्वर्य मांजरेकर, निलम राणे,

संस्था- देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे, प्रितगंध फाउंडेशन, मुंबई, साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,

जिल्हा क्रीडा पुरस्कार-

पूर्वा संदिप गावडे हिला जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारतीय स्विमिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या 49 व्या ज्युनिअर नॅशनल ॲक्वॅटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झालेली आहे. पूर्वा गावडे हिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे.

आयुष पाटणकर याचा रायफल शुटींग एअर पिस्टर स्पर्धेत गुणवंत खेळाडू  म्हणून सन्मान करण्यात आला.

सोमनाथ गोंधळी यांचा सॉफ्टबॉल, थ्रोबॉल आणि बेसबॉल मार्गदर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार-

प्रथम पुरस्कार-  हर्षवर्धन किरण बोरवडेकर

व्दितीय पुरस्कार – स्वप्नाली समीर शिरवडकर

 

००००००००

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापनदिनाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा संदेश

 नांदेड दि. 15 ऑगस्ट:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9.05 वाजता हर्षोल्हासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ध्वजवंदनानंतर सलामी देण्यात आली.  परेड कमांडर पोलीस निरीक्षक अविनाश धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बी.आर. देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.

विशेष कामगिरीचा गौरव

हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954 मधील तरतुदी व शासन राजपत्रानुसार गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे सदस्य म्हणून अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काम केले. याबाबत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, साऊथ आफ्रिका येथील मॅरेथान स्पर्धेत सहभाग नोंदवून विहित वेळेत अंतर पूर्ण केल्याबाबत उपजिल्हाधिकारी रोहयोचे ललीतकुमार वऱ्हाडे यांचा गौरव करण्यात आला. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित कालमर्यादेत काम करणाऱ्या अर्धापूरचे नायब तहसिलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा पदक जाहिर केले. याबाबत पोलीस उप निरीक्षक सागर सुभाषराव झाडे, वैशाली निवृत्ती कांबळे, नारायण मारोती शिंदे, प्रियंका पवार, राजेश मारोती नंद, निजाम मुसा सय्यद, नरेश केशव वाडेवाले, सचिन मुकुंदराव आरमळ, उमेश किसनराव कदम, पोलीस नायक आशिष प्रभु माने यांना पुरस्कार प्रदान केले.

जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

यावेळी जिल्हा युवा पुरस्कार 2020-21 मध्ये युवक गटात खान इमरान मुजीब पाशा रा. बिलोली जि. नांदेड यांना  10 हजार रुपयांचा धनादेश व जिल्हा युवा पुरस्कार 2021-22 युवक यामध्ये अमोल उध्दवराव सरोदे यांचा रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सत्कार केला. संस्था या गटात अल इम्रान प्रतिष्ठान, बिलोली, जि. नांदेड यांना रोख रक्कम 50 हजार रुपये आणि जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 युवक या गटात अमरदीप दिगंबर गोधने हाडको नवीन नांदेड यांना रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह, सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2023 सीबीएसई विभाग इयत्ता पाचवीतील 5 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यात शाश्वत संतोष केसराळे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा, पार्थ लिंगेश्वर सोनटक्के, नारायणा ई-टेक्नो स्कूल वाडी, बु नांदेड, सोहम उत्तम मोरे, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर, प्रज्वल सुंदर धवन, पोदार इंटरनॅशनल स्कूल, पूर्णा रोड नांदेड, सान्वी बाबाराव दारकू, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2023 मध्ये ग्रामीणमध्ये शाकुंतल फॉर एक्सलंसचा मारोती शिवराज कुरुंदकर, ज्ञानभारती विद्या मंदिर पुयनीचा अद्वैत नरहरी भोसले, समृध्दी नागनाथ भुरे, कल्याण पद्यनजय कोनाळे यांना तर माध्यमिक शहरी विभागातून राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वसंत नगर, नांदेडचा दयासागर गंगाधर चिंचणे, केंब्रिज माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, नांदेडचा श्रीयश रावसाहेब झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सीबीएसई विभाग आठवीचे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड येथील प्राची पंढरीनाथ जाधव, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा येथील विघ्नेश बालाजी राजे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड ओमसाई धर्मवीर ठाकूर, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा मयुरेश उमाकांत वाग्शेट्टे, अभिजीत संतोष मोरे, दिव्या राम अनकाडे, शाकुंतल फॉर एक्सलंस अथर्व संग्राम झुपडे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड स्नेहा देविदास जमदाडे, श्रेयस प्रभू दुगाळे पाटील, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव सोहम निलेश कोटगिरे, शाकुंतल फॉर एक्सलन्स रोहन गोविंद कौसल्ये, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव श्रुतिका गोविंद येळगे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा श्रीकर विक्रम महुरकर, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड सोहम गंगाधर मंत्रे, श्रीकांत शिवाजी मिरासे, पोदार इंटरनॅशनल स्कूल पूर्णा रोड तनिष्क दिनेशकुमार धुत यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यानंतर नांदेड येथील अवयवदान केलेल्या ढोके यांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व अक्षय रोडे यांनी केले.

000

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५- देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान आणि राज्यगीत गायले गेले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री श्री.लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिक, उपस्थित विद्यार्थी, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.

00000

बी.सी. झंवर/वि.स.अ

 

विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. 15: विधानभवन, मुंबई येथे आज देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष, ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. जयप्रकाश बाविस्कर, विधानसभेचे माजी सदस्य राम संभाजी गुंडीले, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठये, उप सचिव सुभाष नलावडे, उमेश शिंदे, अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह, सुनिल वाणी, रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीराम कोरेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील हजारो बहिणींना मिळणार लाभ

जिल्ह्याचा ई – चावडी प्रकल्पात विभागात पहिला क्रमांक

महसूल पंधरवाडा आणि हर घर तिरंगा मोहिम उत्साहात संपन्न

जळगाव दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सहायक जिल्हाधिकारी ( प्रशिक्षणार्थी)  वेवोतोलू केझो, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक,  विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

शासनाकडून नारीशक्तीचा सन्मान

   पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या संदेशात म्हणाले, नारीशक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेतून प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 34 हजार बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. पात्र बहिणींच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस जोडणी आहे, अशा महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याच बरोबर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो युवतींचे फक्त पैशामुळे उच्च शिक्षण थांबणार नाही याची पुरेपुर काळजी शासनाने घेतली आहे.  युवक, युवतीचे पुढचं भवितव्य घडविण्यासाठी  कौशल्य व आर्थिक ताकत निर्माण व्हावी म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. यासाठी जळगाव जिल्हयात आतापर्यंत विविध आस्थापना, कंपन्याकडून 4630 पदे अधिसुचित झाली आहेत. उमेद‌वारांकडून ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशाची कार्यवाही सुरु आहे.

ज्येष्ठ नागरिकांची काळजी

   शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असून  यासाठी ज्यांना 60 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना  31  ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबरोबर शासनाने जेष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत जिल्हयात आतापर्यंत 17485 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 65 वर्ष, पूर्ण झाली आहेत. अशा जेष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

आरोग्य व्यवस्था बळकटीकरण

  जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे बाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठी कामं झाली आहेत. त्यात आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे, शेतकरी, शेतमजूर, गोर-गरीब जनतेच्या आरोग्याला संजीवनी देणाऱ्या जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला गेल्या दोन वर्षात 40 कोटी पेक्षा अधिक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसाठी दोन वर्षात 47 कोटी पेक्षा अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून दिल्यामुळे हे रुग्णालयं अद्यावत झाली आहेत.

पीक विम्याच्या पैशाचा हातभार

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्र शासनाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सन 23-24 या खरिप हंगामात स्थानिक आपत्तीमुळे 2 लाख 49 हजार 488 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याच्या भरपाई पोटी 132 कोटी 74 लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तर उत्पन्नावर आधारित 3 लाख 87 हजार 973 शेतकऱ्यांना 523 कोटी 28 लाख मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची महिती पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात दिली.

जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केल्याचे सांगून महसूल प्रशासन हा शासनाचा, प्रशासनाचा कणा आहे. सर्व सामान्यांची छोटी छोटी कामं साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी अडलेली असतात. याची जाणीव ठेवून जिल्हा महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या पंधरवाड्यात महसूल पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यात प्रत्येक दिवशी एक विषयासाठी विशेष शिबीर घेवून लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

ई – चावडी प्रकल्पात विभागात जिल्हा प्रथम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याने सर्व गावांची 100% मागणी ई चावडी प्रणाली मध्ये नोंदणी केली त्यामुळे ई -चावडी अंमलबजावणी मध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आला, शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. पोलीस प्रशासनाच्या बळकटी करणासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून कायदा व सुव्यस्था अधिक मजबूत होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा गौरव वाढवित राहण्याची ग्वाही देऊन स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

०००

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

००००००

एकनाथ पोवार/वि.स.अ

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मुंबई शहर येथील उत्कृष्ट अधिकारी व  कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2024 मधील पारितोषिक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

आशिष राजपुत/प्रतिवेदक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : देशाच्या  ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी  पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...