गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 622

केंद्रात व राज्यात महिला-भगिनींचे हित पाहणारे सरकार कार्यरत – पालकमंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून शुभारंभ

नांदेड (भोकर), दि. १७ : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछेडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपल्या परंपरागत बंजारा पेहराव मध्ये आलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात महिलांनी राज्य शासनाच्या या योजनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारने महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्रात आलेल्या शासनाने दहा वर्षापूर्वी घरातील महिलांना स्वयंपाकाच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. केंद्र सरकारने 20 कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. आम्ही राज्य सरकारने आणखी त्यामध्ये भर घातली असून आता महिलांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.महिलांना एसटी भाडे 50% माफ करण्यात आले आहे. राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या  बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देण्यात येत असून सोळा हजार कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे. हक्काचे घर, प्रत्येकाला घर,प्रत्येक घरात शौचालय आणि आता प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

यावेळी उपस्थित महिलांना संबोधतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील त्यांनाही ते मिळतील याबद्दल आश्वस्त केले.31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असेल. त्यामुळे या संदर्भात कोणी काही गैरसमज पसरवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,बचत गट स्थापन करावेत असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशी उपस्थित महिला समुदायाला विचारणा केली. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्या सर्व महिलांना अर्ज करायला सांगा असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी संबोधित केले. केंद्र व राज्य शासन महिलांसाठी नवनवीन योजना आणत असून त्या सर्व योजनांचा वापर भोकर पासून तर नांदेडपर्यंत सर्वांना मिळेल याची खात्री बाळगा. आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अजित गोपछडे, श्रीजया चव्हाण यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.

०००

जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावर पण येणार पैसे

जळगाव, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जिल्ह्यातील अंदाजे 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पुणे येथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पार पडलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ‘ शुभारंभ कार्यक्रम जळगाव जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रेक्षपणाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, मोठया संख्येनी पात्र बहिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.

जिल्ह्यात आज अखेर 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित बहिणींचे पैसे लवकरच जमा होणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांची संख्या 5 लाख 23 हजार 59 एवढी असून काहींच्या आधार लिंक व्हायचे आहेत, ते होताच त्यांनाही पैसे मिळतील असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. बहिणींनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे सांगून एकही पात्र महिला या योजनेतून सुटणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बहिणींनी बांधल्या राख्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे उपस्थिती बहिणींनी औक्षण करून राखी बांधली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी सांगितले.

०००

 

 

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):  पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजनेचा राजस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला. येथील वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचे थेट प्रसारण पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी  या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशा शब्दात अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित  बहिणींशी संवाद साधला.

येथील वंदेमातरम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महापालिकेचे अपर आयुक्त रणजीत पाटील, महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यात बालविवाह प्रतिबंध अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने पात्र महिलांपर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार महिलांना लाभ मिळाला असून उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच लाभ देण्यात येईल. राज्यशासनाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडेल या अपप्रचाराला बळी पडू नये. महिला सक्षमीकरणाचा हा निधी असून तो महिलांच्या हक्काचा निधी आहे. या योजनेचा लाभ हा महिलांचा सन्मान म्हणून दिला जातोय. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असून वचनपूर्तीचे समाधान आहे.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले. त्यात त्यांनी लाभार्थी नोंदणीसाठी अंगणवाडी पातळी ते सुपरवायझर यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले. या कार्यक्रमात वंदेमातरम सभागृहात जिल्हाभरातून आलेल्या बहिणींची उपस्थिती होती.

०००

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली ‍दि. १७ (जिमाका) : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे  यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. हे शासन सर्वसामान्यांचे असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे. स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची घाई करू नये. या पैशाचा विनियोग कुटुंबीयांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. दि. 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश व रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख 59 हजार इतके अर्ज आले असून त्यापैकी सुमारे चार लाख 45 हजार अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी अश्विनी संकपाळ व वैष्णवी राजपूत या पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नीता केळकर, स्वाती शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

शहरी भागातील एक लाखाहून अधिक महिला लाभार्थी – मनपा आयुक्त शुभम गुप्ता

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेचे 14 ऑगस्ट पासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले. शहरी भागातील सुमारे 1 लाख 25 हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75 हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित 50 हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील, अशी  माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील. या कामी माहिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

०००

भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार– मंत्री दीपक केसरकर

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शानदार शुभारंभ
  • बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ
  • सिंधुरत्न समृद्ध योजना महिलांसाठी वरदान

सिंधुदुर्गनगरी, दि.१७ (जिमाका):  शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे माझ्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथे पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात  या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक महिलांनी हा कार्यक्रम पाहिला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे, यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  सिंधुरत्न योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भगिनींना स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. सिंधुरत्न योजनेचा देखील महिलांनी लाभ घ्यावा. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी ते २० हजार रूपये इतके मानधन करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जर्मन शिकल्यामुळे सिंधुदुर्गातील युवकाचे जर्मनी येथे नोकरी करण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ते सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

०००

रक्षाबंधनानिमित्त बहिणींना मिळाली उत्कृष्ट भेट – पालकमंत्री अतुल सावे

  • मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर नियमितपणे जमा होणार रक्कम
  • मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न

जालना, दि. १७ (जिमाका) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी  शासनाने मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जालना जिल्हयातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शासनाकडून महिलांना मिळालेली ही उत्कृष्ट भेट आहे. यापुढेही नियमितपणे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्कम मिळणार आहे, त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करु नये, अशी ग्वाही गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडला. या निमित्ताने या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आणि लाभार्थी महिला, उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नवनाथ वामन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास ) कोमल कोरे आदींसह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जालना जिल्हयात मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागंनी अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे  ही योजना यशस्वी झाली आहे. अगदी कमी कालावधीत सर्व आव्हानांवर मात करीत समन्वय व सकारात्मकतेमुळे आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार श्री. कुचे यांनी  मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले. सर्वसामान्य महिलांना अर्थिक सक्षम करणारी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना जिल्हयात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, समाज आणि देशाची प्रगती ही  महिलांवरच अवलंबून असते. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला अर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  सर्वांनी चांगले सहकार्य केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्षाबंधनाची एक चांगली भेट मिळाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.

यावेळी काही लाभार्थी महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. गोंदेगाव येथील मीरा वाघ म्हणाल्या की, शासनाचे आम्ही खूप आभारी आहोत. मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे. रक्षाबंधनाची आम्हाला चांगली ओवळणी मिळाली आहे. तर नंदा खंदारे म्हणाल्या की, या योजनेमुळे आम्हाला खूप आनंद झाला. मुख्यमंत्री दादा आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वप्नातसुध्दा आम्हाला वाटले नाही की, अशा योजनेतून चांगला आर्थिक लाभ मिळेल.

प्रास्ताविक श्री. वामन यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योजनेच्या यशस्वी अंमलबजवणीबद्दल उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचाही गौरव करण्यात आला.

०००

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना 

  • लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्री यांचे आभार
  • बहिणींच्या खात्यावर जमा झाले 3 हजार रुपये
  • रक्षाबंधनाची मिळाली ओवळणी

जालना, दि. १७ (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री भावाकडून ओवाळणी मिळाली, त्यांच्यासाठी मी राखी घेवून आले आहे. त्यांच्या सहकार्याने आमचा आनंद गगनात मावेना.  शेतात, वाडी, वस्त्यांवर सगळीकडे साऱ्या महिलांच्या तोंडात फक्त मुख्यमंत्री दादांचे नाव आहे, असे उदगार गोंदेगाव येथील नंदा अशोक खंदारे यांनी काढले.

जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये दोन दिवसांपासूनच जमा होत होते. पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर पाहुन महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानिमित्ताने जालना जिल्ह्यातील लाभार्थी महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. जिल्हयातील वर्षा कपिल करपे (मोदीखाना जालना), ज्योती विजय दळवी (कन्हैय्यानगर जालना), सविता कुऱ्हाडे (काजळा),  मंगल बाबुराव भिंगारे (दाढेगाव ता.अंबड), मंगल रामभाऊ बोडखे (चुरमापुरी ता.अंबड), उषा सुधाकर मोरे (शिवनगाव ता.घनसावंगी), प्रतिभा किशोर आपार (नुतन वसाहत जालना), मिरा गजानन वाघ (गोंदेगाव), नंदा अशोक खंदारे (गोंदेगाव) या काही बहिणींचे मनोगत जाणून घेतले असता, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने माझ्या घर खर्चासाठी  हे तीन हजार रुपये खूप उपयोगी पडणार आहेत. तसेच एका महिलेने माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी या पैशाचा उपयोग करणार असल्याची भावनाही बोलून दाखविली. आपल्या भावाने पाठवलेली ही रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हा पैसा निव्वळ योजनेचा लाभ न राहता त्याला एक वेगळे भावनिक परिमाण लाभले आहे, असे या बहिणींच्या मनोगतातून स्पष्ट होते. कुणाला आपल्या संसाराला हातभार लाभल्याचे अप्रुप होते तर कुणाला आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद होता. भावाने दिलेला शब्द पाळला अशीही भावना व्यक्त करत पदोपदी आभार व धन्यवाद हे वाक्य प्रत्येक महिलेच्या तोंडून ऐकावयास मिळाले. एकंदर महिलांच्या जीवनात या योजनेमुळे बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास बळावलेला दिसला. आपल्याला हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात द्वितीय – पालकमंत्री दादाजी भुसे

  •    याेजनेच्या शुभारंभाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न
  •    कार्यान्वयीन यंत्रणांचे केले अभिनंदन

नाशिक, दि. १७ (जिमाका ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासन महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. जिल्ह्यात योजनेचे साधारण 7 लाख 20 हजार 844 अर्ज मंजूर झाले असून, या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभाबरोबरच जिल्हास्तरावरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हाभरातून आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन राज्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी अभिनंदन केले.

ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 नंतर अर्ज करतील, त्यांना देखील या योजनेचा सुरूवातीपासून लाभ मिळणार असल्याचे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी देखील योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थितीदर्शक माहिती सादरीकरणातून माहिती दिली.

 

प्रारंभी पालकमंत्री व उपस्थित प्रातिनिधीक महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी काही महिलांनी श्री. भुसे यांना राखी बांधली. शेवटी सर्व तालुक्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देवून सन्मानित करण्यात आले. तसेच लाडकी बहीण योजनेच्या सर्व तालुकास्तरीय समित्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

०००

 

 

 

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ लाख ७७ हजार ३२३ अर्ज मंजूर  -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
  • राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार

पालघर दि. १७ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासन लोकोपयोगी योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचवत असून राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन सभागृह पालघर येथे करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते (दुरदृष्य प्रणालीद्वारे) करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सावरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे तसेच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

केंद्र व राज्य शासनाने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असे जवळपास 17 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 लाख 96 हजार 207 अर्ज प्राप्त झाले असून 2 लाख 77 हजार 323 अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 2 लाख 8 हजार महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसात पैसे जमा होतील. या योजनेमुळे जिल्ह्यातील भगीनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून या रक्कमेतून त्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येकांच्या हाताला काम देण्याच्या धोरणानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी शासन मदत करणार आहे.

ज्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये, एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे नियोजन राज्य शासनाने केले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अशा महिलांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

०००

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री संजय बनसोडे

  • पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार लाडक्या बहिणींना लाभ
  • लातूर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
  • पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार अर्ज ठरले पात्र
  • प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार लाभाची रक्कम
  • योजनेविषयी पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास ठेवू नका

लातूर, दि. १७ :  राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असून महिला-भगिनींसाठी यामुळे मोठी मदत होईल. यासोबतच महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्यात आले असून या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडी-पुणे येथून झाला. यानिमित्ताने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमामध्ये मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. यावेळी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, राजेश्वर निटूरे, योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष हृषीकेश कराड, प्रेरणा होनराव, बापूराव राठोड, व्यंकट बेंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांची यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये रक्कम गेल्या दोन-तीन दिवसांपासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही रक्कम जमा होईल, असे ना. बनसोडे म्हणाले. तसेच ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे. त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून इयत्ता बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांना ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. बनसोडे यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी प्रास्तविकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती दिली. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार ९५ अर्ज पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष हृषीकेश कराड, प्रेरणा होनराव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना यावेळी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेसाठी महिलांच्या नाव नोंदणीत उकृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा सेविका यांचाही गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचा शुभेच्छासंदेश यावेळी सभागृहात वाचून दाखविण्यात आला. या योजनेमुळे राज्यात आर्थिक सक्षमतेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली  आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्या स्वावलंबी होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. महाजन यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला. तसेच या योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व बहिणीचे अभिनंदन केले.

महिलांनी मंत्री श्री. बनसोडे यांना राखी बांधून मानले शासनाचे आभार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याबद्दल लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात या महिलांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना राखी बांधून या योजनेबद्दल शासनाचे आभार मानले. आता आमची ओळख ‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण’ अशी झाली असून हे आमच्यासाठी सुखावह असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

०००

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात – मंत्री गिरीश महाजन

  •  भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ९२७ कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

नांदेड दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती, लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

 

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकरसारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगरपरिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला  पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅड. रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाजभूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केला जाईल. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. अन्य मान्यवरांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघुपाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या  6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे  जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या   येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

 

 

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...