बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 621

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सातारा दि.18 (जिमाका):   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत, तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते.  या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील.  राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढत जाऊन टप्प्याटप्प्याने 3 हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री भावनिक होत म्हणाले, माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.  शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.  महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे.  लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करुन मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात.  त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिलाकेंद्रित योजना राबवित आहे.  एसटीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना 50 टक्के सूट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.  लवकरच आणखी 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे.  12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात 12 महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यासाठी आदर्शवत ठरणारे उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. पहिले पुस्तकाचे गाव सातारा जिल्ह्यातले, पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातले, आता पहिले सौर उर्जेचे गाव मान्याचीवाडी होत आहे.  या गावाला त्यामुळे मोफत वीज मिळणार आहे. मान्याचीवाडीप्रमाणे राज्यातील अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घेऊन गावे सौर उर्जेवर चालणारी करावीत. यावेळी त्यांनी सातारा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात उपायोजनांबाबत कौतुक केले. भरोसा केंद्राचे भूमिपूजन, ऑटोरिक्षामध्ये क्यूआर कोड प्रणाली, बसेसमध्ये कॅमेरे, महिलांसाठी हेल्पलाईन या सर्व उपक्रमांबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.

महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वांत जास्त ऑनलाईन नोंदणी गतिमान पद्धतीने झाली आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकिंग झाले नाहीत त्यांचे आधार लिकिंग करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

प्रास्ताविकात पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सातारा जिल्ह्यात 1 जुलैपासून सुरु झाले. पहिल्या पाच दिवसात बहुतांश सर्व अर्ज भरले गेले.  घरोघरी, शेतावर, बांधावर, कामाच्या ठिकाणी जाऊन महिलांकडून अर्ज भरुन घेण्याची संकल्पना प्रथम सातारा जिल्ह्याने सुरु केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वत: लक्ष घालून या योजनेच्या कामाला अतिशय गती दिली.  अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या सर्वांनीच यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण गोड करण्याचे काम शासनाने केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमास जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या.

विणकरांना शासकीय नोंदणीतून मिळणार नवीन ओळख व योजनांचा लाभ – मंत्री छगन भुजबळ

येवल्यात विणकर सर्वेक्षणास सुरुवात 

नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा):    येवला शहरात  विणकर सर्वेक्षणास सुरुवात झाली असून या सर्वेक्षणातून विणकरांची शासकीय नोंदणीद्वारे ओळखपत्र प्राप्त होणार  असून याद्वारे  सर्व घटकांतील विणकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. हे सर्वेक्षण करताना यातून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

आज येवला शहरात विणकर सर्वेक्षणबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी राजेश भांडगे, पप्पू सस्कर, मनोज दिवटे, शंभाशेठ लक्कडकोट, मयूर मेघराज, मकरंद सोनवणे, प्रवीण पहिलवान, अविनाश कुक्कर, केशव भांडगे, रमेश भावसार, गोविंदसा वाडेकर यांच्यासह विणकर बांधव उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, राज्यात शेती व्यवसायानंतर विणकर व्यवसाय हा दुसऱ्या स्थानावर आहे. येवल्यातील विणकरांच्या सर्वेक्षणास  ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्व विणकर बांधवांची नोंदणी होणार असून  शासकीय ओळखपत्र मिळणार आहे. आजपर्यत तालुक्यातील ३० ते ४० गावांतून जवळपास ३ हजार विणकरांची नोंदणी सर्वेक्षणातून झाली आहे. आजपासून येवला शहरातील विणकारांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.सुरुवातीला एका पथकाच्या मार्फत नोंदणी चालू होती मात्र गणेशोत्सवाच्या आत नोंदणी होऊन विणकारांना लाभ मिळावा यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तांसोबत संपर्क साधून पाच पथकांमार्फत हे सर्वेक्षणाचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

येवल्यातील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळण्यासाठी राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचेसोबत चर्चा केली होती तर वस्त्रउद्योग आयुक्तांना येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना केल्या होत्या.त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेक्षणासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या सर्वेक्षणात विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात त्यात रेशीम कळ्या उखलन्याचे काम करणारे कारागीर,कांड्या, काकडे भरणारे, चिवट्या करणारे, सांधणी करणारे, रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर विणकर बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २०० युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता, रेशीम खरेदीवर १५ टक्के राज्य सरकार व १५ टक्के केंद्र सरकारकडून सूट यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहिणींनी मंत्री छगन भुजबळ यांना बांधल्या राख्या

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पहिले  दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून येवला मतदारसंघांतील सुमारे ५३ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. आज येवला दौऱ्यावर असताना विणकर सर्वेक्षण कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मंत्री छगन भुजबळ यांना राखी बांधत आभार मानले.

चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा –  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

चंद्रपूर, दि. १७ :  गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्‍यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातांची शक्‍यता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले व सुनील कुंभे, मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. बोबडे, जिल्‍हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, मुख्‍य अभियंता विजय बोरीकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रस्‍त्‍यांवरील खड्डयांचा आढावा घेतला. जिल्‍हा परिषदेनुसार जिल्‍हयात ओडीआर व व्‍हीआर चे 6 हजार किमीचे रस्‍ते आहेत, ज्‍यापैकी 450 किमी रस्‍त्‍यांचे नुकसान झाले आहे. याच्या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 5 कोटी रू. तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 115 कोटी रूपयांची गरज आहे. याकरिता राज्‍याच्‍या ग्रामविकास विभागाला ताबडतोब निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सिडीवर्कचे 39 रस्‍ते खराब झाले आहे, ज्‍याकरिता 1 कोटी 10 लक्ष रूपये लागतील असे अधिका-यांनी सांगीतले. हा निधी जिल्‍हा नियोजन समितीतून घ्‍यावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्‍या गडचिरोली विभागाच्‍या अखत्‍यारित चंद्रपूर जिल्‍हयात 219 किमी तर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्‍ह्यात 50 किमी रस्‍ता आहे. या रस्‍त्‍यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्‍याची दुरूस्‍ती कंत्राटदारांकडून पावसाने उसंत घेतल्‍यास 7दिवसात करून घेतल्‍या जाईल, असे त्‍या विभागातर्फे सांगण्‍यात आले. तसेच श्री. मुनगंटीवार यांनी मुल रोडवरील चिचपल्‍ली गावाजवळ ड्रेनेज सिस्‍टीमसाठी नाल्‍या करण्‍याच्‍या कामात विलंब झाल्‍याबद्दल अधिका-यांना खडसावले. त्‍यावर अधिका-यांनी त्‍या कामाचे अंदाजपत्रक बनवून वरिष्‍ठ अधिका-यांकडे पाठविले असल्‍याची माहिती दिली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार जिल्‍हयात 686 किमीचे राज्‍य रस्‍ते आहेत ज्‍यापैकी 70 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत, तर जिल्‍हयात एमडीआर चे 2116 किमीचे रस्‍ते असून त्‍यापैकी 555 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत ज्‍यापैकी 70 टक्‍के काम हे डब्‍ल्‍युबीएम पध्‍दतीने करणार आहे. आमच्‍या विभागाकडे 17.57 कोटी रूपये वार्षीक देखभालीसाठी मंजूर झाले आहेत त्‍यापैकी 74 ठिकाणी 2.28 कोटी रूपये तात्‍पुरता खर्च करण्‍यासाठी घेणार आहोत. हे काम पावसाने उसंत घेतल्‍यावर 15 दिवसात पूर्ण करण्‍यात येईल.

चंद्रपूर महानगरपालिकेच्‍या अधिका-यांच्‍या माहितीनुसार शहरात 600 किमीचे रस्‍ते आहेत. त्‍यापैकी 400 किमीचे रस्‍ते हे सिमेंटचे आहेत. सध्‍या रस्‍त्‍याच्‍या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 40 लाख रूपयांची तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 2 कोटी रूपयांचे तरतूद आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे अशा रस्त्यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

यावेळी पालकमंत्री श्री.  मुनगंटीवार म्‍हणाले की, बागला चौक ते बाबूपेठ ब्रिज हा रस्‍ता अतिशय खराब झाला असून त्‍याच्‍यासह गावातील मुख्‍य रस्‍ते सिमेंटचे करावेत, ज्‍यामध्‍ये उत्‍तम लायटींग करावी. पालकमंत्री यांनी बेलसनी येथील रस्‍ता न झाल्‍याबद्दल तिव्र नाराजी व्‍यक्‍त केली. या बैठकीत अनेक पदाधिका-यांनी अनेक ठिकाणी रस्ते खराब आहे यासंदर्भात माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी ताबडतोब रस्ते दुरुस्त करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह देवराव भोंगळे, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अमर बोडलावार, बंडू गौरकार उपस्थित होते.

०००

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

  • आमझरी पर्यटन संकुलला भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी संवाद
  •   ‘प्रकाश होम स्टेला भेट व पाहणी
  •   चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

अमरावती, दि. १६ : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकीक व्हावे तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व सी.एस.आर. फंड मधून निधी उपलब्ध करुन देणार, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील ‘आमझरी निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’ला पालकमंत्र्यांनी आज भेट ‍देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली.‍ त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पंकज कुमावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील ‍म्हणाले की, आमझरी येथील निसर्ग  पर्यटन संकुलात स्थानिक 20 युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत असून त्यांना साधारणतः 10 हजार रुपये मानधन दिल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून येथे उत्पादीत होणारे विशेष उत्पादन, तृणधान्य, खपली गहू, मध, खवा, मोहफुलावर प्रक्रीया करुन उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमझरी हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मधापासून निर्माण होणारे विविध उत्पादन तयार करुन विपणन केंद्र निर्माण करण्यात यावे. या अशा अनेक उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटातील ग्रामीण क्षेत्राचा विकास साधला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खटकाली येथील प्रकाश जाम्भेकर यांच्या  ‘प्रकाश होम स्टे’ ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. होम स्टे ला येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, भोजन व्यवस्था आदी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील कॉफी प्रकल्प व उत्पादनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शहापूर येथील खादी व ग्रामोद्योग आयोगाव्दारे पुरस्कृत शिवस्फुर्ती प्रक्रीया फाउंडेशनला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्र्यांची चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

दरम्यान यावेळी पालकमत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून वैद्यकीय सोयी- सुविधांचा आढावा घेतला. हतरु गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृती विषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

चिखलदरा तालुक्यातील हतरु येथे काही दिवसापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली.

०००

चांगले काम करून बहिणींकडून शाबासकी घेण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 
  • बहिणींच्या खात्यात निधी वितरणाचा शुभारंभ
  • जिल्ह्यात 4 लाख 60 हजार खात्यात रक्कम जमा
  • प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश

यवतमाळ, दि. १७ (जिमाका) : गेल्या काही दिवसात महिलांच्या कल्याणासाठी शासनाने नवनवीन योजना सुरु केल्या. त्यातील लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच समाजात, कुटुंबात चांगले स्थान निर्माण करून दिले जात आहे. अशा चांगल्या कामाद्वारे बहिणींची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथून झाला. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री मदन येरावार, डॅा.संदीप धुर्वे, इंद्रनील नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शाम जयस्वाल, माजी सभापती श्रीधर मोहोड आदी उपस्थित होते.

कमी कालावधीत जिल्ह्यात योजनेचे अतिशय उत्तम काम झाले. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच आज 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली. आपण जिल्ह्यात 7 लाख पात्र महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या आकडा आपल्याला गाठायचा आहे. एकही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.

महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी अन्नपुर्णा योजना सुरु करण्यात आली. बचतगटाच्या महिलांना फिरते भांडवल अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. गटाच्या ग्रामसंघांना 1 कोटी रुपये खर्चाचे कार्यालय, गोदाम बांधून देण्याचा कार्यक्रम आपण राबवतो आहे. युवक, वयोवृद्ध, शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना शासनाने सुरु केल्या असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले. आभार महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी मानले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुमन ताळीकोटे, गंगा ताळीकोटे, हर्षा पप्पुवाले, मंजूषा दुधे, नेहा अमरीन फय्याज अहमद, नुसरतजहॅा अब्दुल लतीफ, अश्विनी डंबे, माणिक तांबेकर, ममता पाईकराव, श्रृती भगत, नंदा सुतारकर या महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे, पर्यवेक्षिका मनिषा पवार, अंगणवाडी सेविका सुलभा सिंगारकर, धनश्री ठाकरे, तिलोतमा बेले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

 

केंद्रात व राज्यात महिला-भगिनींचे हित पाहणारे सरकार कार्यरत – पालकमंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून शुभारंभ

नांदेड (भोकर), दि. १७ : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछेडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपल्या परंपरागत बंजारा पेहराव मध्ये आलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात महिलांनी राज्य शासनाच्या या योजनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारने महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्रात आलेल्या शासनाने दहा वर्षापूर्वी घरातील महिलांना स्वयंपाकाच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. केंद्र सरकारने 20 कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. आम्ही राज्य सरकारने आणखी त्यामध्ये भर घातली असून आता महिलांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.महिलांना एसटी भाडे 50% माफ करण्यात आले आहे. राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या  बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देण्यात येत असून सोळा हजार कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे. हक्काचे घर, प्रत्येकाला घर,प्रत्येक घरात शौचालय आणि आता प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

यावेळी उपस्थित महिलांना संबोधतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील त्यांनाही ते मिळतील याबद्दल आश्वस्त केले.31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असेल. त्यामुळे या संदर्भात कोणी काही गैरसमज पसरवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,बचत गट स्थापन करावेत असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशी उपस्थित महिला समुदायाला विचारणा केली. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्या सर्व महिलांना अर्ज करायला सांगा असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी संबोधित केले. केंद्र व राज्य शासन महिलांसाठी नवनवीन योजना आणत असून त्या सर्व योजनांचा वापर भोकर पासून तर नांदेडपर्यंत सर्वांना मिळेल याची खात्री बाळगा. आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अजित गोपछडे, श्रीजया चव्हाण यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.

०००

जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावर पण येणार पैसे

जळगाव, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जिल्ह्यातील अंदाजे 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पुणे येथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पार पडलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ‘ शुभारंभ कार्यक्रम जळगाव जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रेक्षपणाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, मोठया संख्येनी पात्र बहिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.

जिल्ह्यात आज अखेर 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित बहिणींचे पैसे लवकरच जमा होणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांची संख्या 5 लाख 23 हजार 59 एवढी असून काहींच्या आधार लिंक व्हायचे आहेत, ते होताच त्यांनाही पैसे मिळतील असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. बहिणींनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे सांगून एकही पात्र महिला या योजनेतून सुटणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बहिणींनी बांधल्या राख्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे उपस्थिती बहिणींनी औक्षण करून राखी बांधली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी सांगितले.

०००

 

 

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):  पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजनेचा राजस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला. येथील वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचे थेट प्रसारण पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी  या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशा शब्दात अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित  बहिणींशी संवाद साधला.

येथील वंदेमातरम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महापालिकेचे अपर आयुक्त रणजीत पाटील, महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यात बालविवाह प्रतिबंध अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने पात्र महिलांपर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार महिलांना लाभ मिळाला असून उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच लाभ देण्यात येईल. राज्यशासनाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडेल या अपप्रचाराला बळी पडू नये. महिला सक्षमीकरणाचा हा निधी असून तो महिलांच्या हक्काचा निधी आहे. या योजनेचा लाभ हा महिलांचा सन्मान म्हणून दिला जातोय. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असून वचनपूर्तीचे समाधान आहे.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले. त्यात त्यांनी लाभार्थी नोंदणीसाठी अंगणवाडी पातळी ते सुपरवायझर यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले. या कार्यक्रमात वंदेमातरम सभागृहात जिल्हाभरातून आलेल्या बहिणींची उपस्थिती होती.

०००

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली ‍दि. १७ (जिमाका) : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे  यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. हे शासन सर्वसामान्यांचे असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे. स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची घाई करू नये. या पैशाचा विनियोग कुटुंबीयांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. दि. 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश व रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख 59 हजार इतके अर्ज आले असून त्यापैकी सुमारे चार लाख 45 हजार अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी अश्विनी संकपाळ व वैष्णवी राजपूत या पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नीता केळकर, स्वाती शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

शहरी भागातील एक लाखाहून अधिक महिला लाभार्थी – मनपा आयुक्त शुभम गुप्ता

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेचे 14 ऑगस्ट पासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले. शहरी भागातील सुमारे 1 लाख 25 हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75 हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित 50 हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील, अशी  माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील. या कामी माहिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

०००

भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार– मंत्री दीपक केसरकर

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शानदार शुभारंभ
  • बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ
  • सिंधुरत्न समृद्ध योजना महिलांसाठी वरदान

सिंधुदुर्गनगरी, दि.१७ (जिमाका):  शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे माझ्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथे पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात  या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक महिलांनी हा कार्यक्रम पाहिला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे, यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  सिंधुरत्न योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भगिनींना स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. सिंधुरत्न योजनेचा देखील महिलांनी लाभ घ्यावा. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी ते २० हजार रूपये इतके मानधन करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जर्मन शिकल्यामुळे सिंधुदुर्गातील युवकाचे जर्मनी येथे नोकरी करण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. तावडे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ते सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

०००

ताज्या बातम्या

कामगार विभागाच्या नव्या अभ्यासक्रमामुळे न्यायालयांवरील ताण कमी होईल – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

0
मुंबई,  दि. १६ : कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्योग व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर...

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे....

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु

0
मुंबई, दि. १६ : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता महाडीबीटी प्रणालीवरून नवीन तसेच नुतनीकरण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची ऑनलाईन स्वीकृती १ जुलै २०२५ पासून सुरू...

इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरातील औद्योगिक क्षेत्रास वाढीव जमीन देण्यास शासन सकारात्मक – क्रीडा मंत्री...

0
मुंबई, दि. १६ : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील मिनी एमआयडीसीकरिता सुमारे १५०० एकर जमीन देण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठकीत...

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची उद्याची शेवटची तारीख

0
मुंबई, दि.१६ : 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने...